बीइंग नारी... भाग १

 


बीइंग नारी... भाग १ 

जेव्हा आई होणं अवघड होते... © उर्मिला देवेन

कथेची प्रस्तावना इथे वाचा...  बीइंग नारी... कथेची प्रस्तावना 

https://www.manatalyatalyat.com/2022/06/blog-post_28.html


कथा.................

शेजारी सनिकाने तिच्या लग्नाच्या वाढदिवसाची पार्टी ठेवली होती, दहा वर्ष झाली होती तिच्या आणि सुमंतच्या लग्नाला. तशी उर्वी नेहमी तिच्या कामात मग्न, पण तिची मुलगी सानिकाच्या मुली येवढीच आणि एकाच शाळेत, मग संबंध बऱ्या पैकी होते. उर्वीला सहपरिवार आमंत्रण होतं. ऑफिस संपवून सारं काही मॅनेज करून उर्वीने मुलींना तयार केलं. आकाशही आल्या आल्या तयार झाला. घर जवळच वरच्या माळ्यावर. मग सगळे पोहचले.

मुली सानिकाच्या मुलीबरोबर खेळण्यात मग्न होत्या. आणि सगळे आपल्या आपल्या मस्तीत. सर्वांचे कसे वयानुसार ग्रुप तयार झाले होते. उर्वी बायकांच्या घोळक्यात होती खरी पण तिचं लक्ष तिच्या मुलींवर होतं. मुलांची मैफिल जमली होती. काय बोलत होते काही उर्वीला गोंधळामध्ये कळत नव्हतं. पण तिच्या मुलीचा चेहरा जरा पडला होता हे तिला जाणवलं. काहीतरी झालंय किंवा कुणीतरी काहीतरी बोललं हे उर्वीला उमगलं होतं. तिने आकाशला इशारा केला पण तोही सुमंतसोबत गप्पा मारण्यात मग्न.

जरा नजर चुकवत उर्वी आकाश जवळ आली,

“आकाश लाडोच काही बिनसलं काय रे, बघ ना कशी गाल फुगवून बसली आहे.”

“काही नाही ग, असेल काही, तिला काही नवीन डॉल नाही तर गेम दिसला असेल तिच्या मैत्रिणीकडे. घरी सांगेल आपल्याला.”

“अरे पण, तसलं काही असतं तर तिने मला दाखवलं असतं, हुबेहूब तसच हवं म्हणून... नाही रे काहीतरी वेगळं आहे.”

“तू जास्त विचार करू नकोस. तू छोटीला भरव लवकर. मला आज रात्री मिटिंग आहे. निघायचं आहे ग लवकर.

“काय रे, तुझे ते कलाइन्ट काही तूला सोडत नाहीत.”

“महत्वाची मिटिंग आहे ग. मी प्लेट घेतो छोटीसाठी. तू घे तिला इकडे. लाडो घेईल तिच्या मैत्रिणीसोबत, माझं लक्ष आहे तिच्यावर. तूही घे, आटोप लवकर, उद्या ऑफिसपण आहे ना!”

सुमंतने त्याला आवाज दिला आणि आकाश काळजी करू नकोस असा इशारा करत त्याने सुमंतला हात दाखवला आणि छोटीसाठी प्लेट तयार करून उर्वीच्या हातात आणून दिली.

तोच सानिकाची नजर पडली,

“आहा, बघा ह्या दोघांना, रोमान्स कुठेच सोडत नाहीत, प्लेट तयार करून, इशारा वैगेरे करता काय हो आकाश भाऊ.”

आकाश हसला, जरा लाजलाही, म्हणाला,

“अहो वहिनी, तसं नाही, छोटीला भरवायच होतं ना, मी जरा प्लेट तयार केली.”

त्याने सुमंतला हात दाखवला आणि तो निघाला त्याच्याकडे. उर्वी मात्र सानिकाला सापडली,

“उर्वी ताई, मजा आहे बुवा तुमची, अजूनही काळजी घेतात हा भाऊ तुमची.

ती जरा दचकली, म्हणाली,

“अजूनही म्हणजे ग...”

“अजूनही म्हणजे, तुमच्या लग्नाला पंधरा सोळा वर्ष झाले असतील ना, आता माझे हे जेमतेम नव वर्ष झालीत तरी कधी जेवली का म्हणून विचारात नाहीत.”

उर्वी हसली, “अग आज वाढदिवस आहे ना तुझ्या लग्नाचा, आताच केक कापला तुम्ही दोघांनी, आणि आताच त्याच्याबद्दल असं बोलतेस.

“ताई, जावूया, आम्हाला लाग्नांतर खूप मजा वैगेरे करायला मिळाली नाही, पहिल्याच महिन्यात मी प्रेग्नंट राहिली, मग काय... बाळ आणि बाळ, बोंबला... मुलगी आधी नव वर्षाची झाली मग आमच्या लग्नाला तेवढी वर्ष झाली... आणि वाढदिवस काय हो, मुलीचा आणि आमचा सोबतच... घ्या काय केक म्हणता, तिनेच तर कापला...

उर्वी नुसती स्मित हसली, तशी तिची नजर तिच्या मोठ्या मुलीवर पडली, तिने ऐकलं होतं बोलणं... उर्वी तिला बघून हसली, आणि काय हवंय म्हणून विचारायला तिच्याकडे सरसावली. लाडो काहीच बोलली नाही. उर्वीने तिला गुलाबजाम वाढले, तिच बोलत होती पण लाडो काही बोलत नव्हती. ती गुमान तिच्या मैत्रिणीकडे ताट घेवून निघून गेली. उर्वी बायकांमध्ये बसून छोटीला भरवत होती. पण लक्ष तिचं लाडोवर होतं.

आकाशने घाई केली आणि सारेच लवकर घरी परत आले. घरी आल्या आल्या लाडोने तिचे कपडे काढून फेकले. स्वतःच नाईट सूट घातला. खोलीत झोपायला गेली. उर्वीने छोटीला आवरून दिलं आणि तीही त्यांच्या खोलीत बसली. आकाशची मिटिंग सुरु झाली होती, तो त्याच्या खोलीतून ती जॉईन करून बसला होता.

उर्बीने लाडोला कुरवाळलं, म्हणाली,

“बाळा काय झालं, तुझा चेहरा का पडला, काय हवंय?”

ती गप्पच होती, तर उर्वी म्हणाली,

“मला नको सांगू मग, पप्पाला सांगशील?

ती पटकन म्हणाली,

“मम्मा तुझ्या आणि पप्पाच्या लग्नाला मागच्या वर्षी १५ वर्ष पूर्ण झाले होते, आता तर सोळा होतील.”

“हो, मग ग काय?

“जानवीच्या मम्मा पप्पाच्या लग्नाला आज दहा वर्ष पूर्ण झाली पण ती माझ्या एवढी आहे.

“मग काय झालं बाळा, काही हरकत नाही ना?

“हरकत कशी नाही, ती बोलली मला, तिच्या मम्माला ती हवी होती मग ती लवकर जन्माला आली. तुला मी नको होते का?”

“तसं नाही ग बाळा.”

आता कुठे उर्वीच्या लक्षात आलं, लाडो का पार्टीत तशी वागत होती. काय बोलावं ह्या विचारात होतीच तर, लाडो परत म्हणाली,

“मग कसं? तू का मला लवकर जन्माला नाही घातलं?

“अग...

उर्वीला तिने बोलूच दिलं नाही... म्हणाली,

“मी ऐकलं, जानवीची मम्मा म्हणत होती ना, तू आणि पप्पाने लग्नानंतर खूप एन्जॉय केलं. तुला मजा हवी होती आम्ही नको होतो लवकर.”

उर्वी हसली... निव्वळ बघत राहिली. काय उत्तर असणार होतं तिचं, किती सहज प्रश्न होता, पण...? त्यातल्या त्यात पाच वर्षाची छोटी म्हणाली,

“मम्मा तू एन्जॉय केला. आम्ही तुझ्या टमित वाट बघत होता ना?”

उर्वीने त्यांना जवळ कुशीत घेतलं, म्हणाली,

“तुम्ही दोघी तिथे मस्ती करत होत्या, मग तुम्हाला कुठे सूद होती बाहेर येण्याची.”

दोघीही गदकन हसल्या, हसतच तिने दोघींचा लाड करत म्हटलं,

“बाळांनो, तुम्ही आयुष्यात यावं म्हणून काय काय घडलं हे मी कसं सांगू, पण तुम्ही दोघी माझ्यासाठी अनमोल आहात. मोठ्या झाल्या की नक्की सांगेल सारं.”

मोठी पटकन म्हणाली,

“म्हणजे? आता सांग ना? मला समजतं सारं काही. सांग ग तू. सांग तुला का नको होतो आम्ही...”

“बाळा, तसं नाही आहे. आणि तू उशिरा जन्माला आली म्हणून माझ्या आणि पप्पाच्या प्रेमात काही फरक आहे का? तुम्ही आमच्या आयुष्यात आहात ह्यापेक्षा दुसरी मजा ग काय... यू बोंथ आर माय बंडल ऑफ जॉय... इट्स द फन टाइम ऑफ अवर लाईफ.”

गोड पापा देवून दोघींना गप्प केलं, त्यांना झोपवत तिथेच ती बसली, दोघीही निवांत झोपल्या पण तिचं मन विचलित झालं होतं... मन मनाला म्हणायला लागलं, प्रश्न तिला पडला,

“आपण खरच मजा केली होती का?”

त्यात ते आकाशचं मिश्किल हसत लोकांना दिलेलं उत्तर तिला आठवत होतं,

उई आर स्टील ऑन हनिमून...”

ह्याच शब्दांमागे सारं काही लपत होतं. आणि ते दोघं अजून लोकांच्या नजरेत खुपत होते... पण...

मनाला खुपतं ते कुठे कुणाला दिसतं...

ज्याचं जळतं त्यालाच ते कळतं...

आज लाडोच्या हट्टी स्वभावात तिला आकाशच तेच वागणं दिसलं, त्यालाही त्या दिवशी समजवताना तिची कसोटी लागली होती आणि आज हिलाही तेच करत उर्वीच मन भूतकाळात शिरलं... सारं चित्र तिच्या डोळ्यासमोर उभं झालं. आणि मनात चित्रपट सुरु झाला...

नुकताच इंजिनिअरिंगचा निकाल हातात आला होता. उर्वीला उत्मम मार्क्स मिळाले होते. तोही मागे नव्हता. आकाशला आकाश जणू ठेंगण झालं होतं. उर्वीला त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळाले होते. प्रेमात मुलं आंधळे होतात, मार्ग भटकतात, नापास होतात, प्रेमात वाहवत जावून अनपेक्षित प्रसंगाणा सामोरे जातात आणि मग आयुष्य चीरघडून जातं, असे अनेक गैरसमज त्या दोघांनी पुसून काढले होते.

महिन्याभरा आधी दोघांची भेट झाली होती, पण आजची भेट काही औरच होणार होती. सकाळी पेपरमध्ये निकाल बघितल्यापासून उर्वीचे पाय जमिनीवर नव्हते. सारखं लक्ष तिचं घरच्या फोनवर होतं. आकाश फोन करेल ह्या प्रतीक्षेत तिने कसं बसं स्वतःला दहा वाजेपर्यंत सांभाळलं. घरात तिची ती धडपड, तिच्या लहान बहिणीच्या लक्षात आली होती. आईला पुसटशी कल्पनाही होती. पण अजून घरात आकाशचा रीतसर विषय नव्हता.

उर्वीचा हात कहीदा घरच्या फोनवर गेला, पण ती कुठे फोन करणार होती, आकाशकडे फोन नव्हताच. आणि त्याने दिलेला नंबर हा शेजारचा होता, मग कसं त्याच्याशी बोलायचं ह्या विचारात उर्वी आकाशवर मनातच भडकत होती, पण, प्रेम आज तिला तेही करू देत नव्हतं...

सामान्य कुटुंबात वाढलेल्या मुलीला तिचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नसतो, घरात शिक्षणाचे वारे असतात अजून काहीच नसतं. मग उत्तम डिग्री घेवून स्पर्धेच्या जगात स्वतःला सिध्द करण्याच्या खुमारीने उतरण्यासाठी सज्ज झालेली उर्वी, स्वतःच भारावून गेली होती. आता नौकरी शोधून, आकाशला सेटल होण्यासाठी वेळ देवूया, मग हळूच लग्नासाठी त्याचा विषय घरात काढूया, आई बाबांना माझ्या आनंदाशिवाय दुसरं काय महत्वाच असणार... आणि अस सारं काही तिचं तिच्या मनात गुंतल्या जात होतं मनातल्या मनात तिच्या विचारांची पुष्माला विणल्या जात होती आणि मनाचा तो हसरा कोपरा त्याला साद देत गुणगुणत होता.

आज मैं ऊपरआसमा नीचे
आज मैं आगेज़माना है पीछे
आज मैं ऊपरआसमा नीचे
आज मैं आगेज़माना है पीछे
टेल मी ओ ख़ुदा
अब मैं क्या करूँ
चलूँ सीधी कि उल्टी चलूँ

 कथा क्रमश...


© उर्मिला देवेन 

फोटो आभार गुगल

कथे बद्दल जाणून घेण्यासाठी कथेची प्रस्तावना इथे वाचा...  

कथेची प्रस्तावना इथे वाचा...  

बीइंग नारी... कथेची प्रस्तावना 

https://www.manatalyatalyat.com/2022/06/blog-post_28.html

कथा आठवड्यातून दोनदा प्रकाशित होईल.

Post a Comment

0 Comments