बीइंग नारी... भाग 2

 


बीइंग नारी... भाग 2 

जेव्हा आई होणं अवघड होते... © उर्मिला देवेन

कथेचा पहिला भाग इथे वाचा पहिला भाग

कथा मालिकेची लिंक - कथेचे प्रकाशित झालेले सर्व भाग इथे आहेत.

भाग दूसरा .. 

मुलीचं लग्न म्हटलं, की मुलाला उत्तम पगारची नौकरी असायला हवी हीच प्राथमिक अट असते की सामान्य माणसाची, आणि ती अट पूर्ण करण्यासाठी उर्वीलाही कष्ट करायचे होते, हे ती जाणून होती. तिच्यासाठी स्थळांची कमी नव्हती. पण आईवडिलांनी शिक्षणासाठी दिलेलं स्वतंत्र आणि भरभरून जगण्यासाठी स्वप्न बघण्याची मुबा तिला अलगत आकाशच्या प्रेमात अडकवून गेली. आणि आता ते स्वप्न जगण्यासाठी तिला आपल्यांसोबत लढायचं होतं हेही तिच्या लक्षात येत होतं. आकाश तिच्या आयुष्यात मागच्या चार वर्षापासून होता पण त्याला आयुष्याचा जोडीदार म्हणून आयुष्यात आणण्यासाठी अजून खूप काही बाकी होतं पण तरीही मागे वळायच नव्हतं, विश्वास होता स्वतःवर... आणि आज तो दिसलाही होता.

आकाशला भेटण्याच्या नादात ती तयार झाली. गुणगुणततिने स्वतःची गाडी काढली, आईला हात दाखवून ती वाऱ्याच्या वेगाने कॉलेजकडे निघाली. गाडी लावली आणि नेहमीच्या ठिकाणावर ती त्याला शोधू लागली.

मित्र मैत्रीणीत दोघांची चर्चा होती. कौतुकाचा वर्षाव होता. कॉलेजच्या कप्या कप्यामधून डोकावणार आठवणींच प्रतिबिंब गौरांकित झालं होतं. उर्वी भारावून गेली होती, आकाशला बघण्यासाठी आतुर झाली होती. सारं कॉलेज शोधून झालं, त्याच्या मित्रांना विचारून झालं पण तो काही दिसला नाही. जरा नाराज झाली, मनात गोंधळली, काय झालं असेल ह्या विचारात चेहरा पडला होता. कॉलेजच्या बाहेर दुकानं होतं, ती एकटीच नजरा चोरून बाहेर गेली. अवघडत मनाला धीर देत तिने तिच्या डायरीमधून आकाशने दिलेला नंबर काढला, इकडे तिकडे नजरा फिरवत ती टेलीफोन बूथच्या खोलीत शिरली, नंबर भीतभीत लावला, समोरून आवाज आला

“हॅलो, कोण?

“भय्या, आकाशसे बात हो सकती है क्या?

“नही, वो तो घरमे नही है, सुबह काम पे चला गया.”

फोन ठेवला. उर्वी अजूनच नाराज झाली, खोलीतून बाहेर निघून तिने पाचरुपये बिल दिलं, मनात बोलत राहिली, “आजच्या दिवशी तरी सुट्टी घेवून यायचं ना ह्याने.”

तसं इंजिनिअरिंग कॉलेज उर्वीच्या गावात होतं, आणि आकाश तिथे शिकायला बाहेरून आलेला होता.  इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षाच्या मध्यापासूनच काम करायला सुरुवात केली होती त्याने. घरी हलाकीची परिस्थिती, वडील दारूच्या मस्तीत दोन वर्षाआधीच देवाघरी गेलेले. घरी आई, बहिण मनाली जेमतेम १८ वर्षाची, बारावीला होती. कसं बसं ह्याच्या त्याच्या उपकारावर घर चालायचं. आई पडेल ते काम करत दोन वेळच्या जेवणाची सोय करत असायची. आकाश हुशार, मग स्कॉलरशिप आणि समाजकार्य करणाऱ्या मंडळींच्या मदतीने, तर कधी शिक्षकांच्या सहकार्याने इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षापर्यंत पोहचला होता. प्रेम करणं ही त्याच्या काळाची गरज नव्हती. पण तरीही अडकला होता उर्वीत... कदाचित त्याला उर्वी त्याच्या आयुष्यात हवी होती मग त्याची तिला मिळवण्याची धडपड सुरू झाली होती. परिस्थितीची जाणीव होतीच. प्रेम केलंय मग त्याला पूर्ण करत आयुष्यभर साथ द्यायची तर पोटापाण्याचा विचार करावा लागणार होताच ना!

उर्वी विचारात कॉलेजच्या गेटमधून आत शिरली, आकाश आला नाही ह्या विचाराने नाराज होती पण कारण कळालं होतं तिला, आता कधी भेट होणार ह्या विचारात तिला समोरून येणारी माधुरी दिसली नाही.

तोच माधुरीने तिला आवाज दिला,

“हे उर्वी, काँग्रॅट्स ग, तुझा हिरो कुठे आहे.

“थँक्स ग, तुलाही अभिनंदन.”

माधुरी त्याच्या गावची, उर्वी तिच्या कानाशी झाली,

“माधुरी, आकाश आला नाही ग, आज यायला हवं होतं ना त्याने.”

ती जरा शांत झाली, त्याची प्रजेक्ट पार्टनर होती, त्याला ओळखून होती. म्हणाली,

“उर्वी तो आला नाही म्हणून काय झालं, तू चल ना, घे भेटून. राहा माझ्या घरी दोन दिवस, मग कुठे आपण असं निवांत भेटणार आहोत. झालं आता इंजिनिअरिंग, नौकरीचा शोध, लग्न आणि पुढचं आयुष्य ग... तू चल माझ्यासोबत.”

तिलाही एकदम हायसं झालं, पण घरी काय सांगणार होते ह्या विचारात ती पडली, तोच पूनम जवळ आली, तीही त्याचं गावची, जरा गोष्टी कानावर आल्या होत्या तिच्या. आकाशाला तीही ओळखून होती. म्हणाली,

“उर्वी चल ग, माझ्या बहिणीचा साखरपुडा आहे. तुझ्या घरी सांग तसं, मी बोलवलंय म्हणून.”

ती माधुरीला म्हणाली,

“हे मधु, चल हिच्याघरी, जेवायला, आपण हिच्या आईशी बोलून हिला घेवून जावू.”

बेत ठरला होता. माधुरी सोबत पूनम उर्वीच्या घरी... आईला बोलून उर्वी पोहचली आकाशच्या गावी. पूनमने आकाशच्या मित्राला सांगून त्याला कळवलं कि उर्वी माधुरीकडे आली आहे म्हणून. सारंच कसं स्वप्नासारखं होतं. मित्र मैत्रिणी मिळून आकाश आणि उर्वीची भेट घडवून देण्यासाठी फिल्डिंग करत होते. वेळ, ठिकाण ठरलं.

माधुरीच्या घरी बहाणा टाकून, उर्वी आणि माधुरी गावाबाहेरच्या टेकडीकडे निघाल्या. आकाशच काम त्याचा मित्र करणार होता मग सारं काही ठरल्याप्रमाणे झालं होतं. तोही भेटायला निघाला होता.

उर्वी त्याची वाट बघत टेकडीच्या पायथ्याशी उभी होती. तोच तिला दुरून आकाश सायकलवर जोरात येतांना दिसला, तिच्या मनाने उभारी घेतली. हृद्य जोरात धडधडायला लागलं. तो जसं जसा जवळ येत होता उर्वीचे श्वास फुलत होते. आकाश आता तिच्या अगदीच जवळ येणार होता, तिने डोळे मिटले, आणि कानावर आवाज पडला,

“उर्वी, मनाली खूप जळली आहे. वाचेल कि नाही माहित नाही. मी शहरात हॉस्पिटला चाललोय, तू घरी जा. इथे थांबू नको. जा तू, आताच निघ... भेटू नंतर आपण.”

तो ओरडत सायकलवरून निघून गेला. उर्वीला क्षणभर काहीच सुचलं नाही. ती शून्यात बघत राहिली. श्वास गोठले होते. डोळे पाणावले होते, कुणासाठी होते तिलाही कळत नव्हत, तिची आकाशसोबत भेट झाली नव्हती म्हणून की मनालीसाठी... मनातल्या निसर्गाने अचानक बदलावं असचं काहीसं झालं होतं. क्षणात प्रेमावर काळे ढग जमायला लागले होते. मनात कोलाहाल माजला होता. आता जे तिने ऐकलं ते खर होतं की काय... ह्याचा विचार करत तिने नजर माधुरीवर टाकली.

माधुरी जवळच होती, ती सावरायला जवळ आली,

“उर्वी घरी चल, मी माहिती काढते काय झालं ते. तू काळजी करू नकोस. आकाश सांभाळेल सारं... आपण निघायला हवं ग. उगाच ना काही तुझ्यावर यायला नको.”

उर्वी गुमान रस्त्यावर चालत राहिली. मध्ये टेलीफोन बूथ लागलं, माधुरीने आकाशच्या मित्रांना फोन केला. तिला माहिती मिळाली होती. तोच फोनबूथजवळ, सुधीर आला, आकाशचा मित्र, म्हणाला,

“उर्वी, तू तुझ्या घरी जा, हा मामला जरा कठीण आहे. अवघड होईल सारं. आकाश म्हणतोय तुला इथून निघून जायला. पोलीस केसं झाली आहे. मनाली वाचेल असं वाटत नाही. काहीतरी गडबड आहे. का असं झालं काही माहित नाही. आकाशची आई सारखी शिव्या देत आहे, कुणाला देते काहीच कळत नाही आहे. तिकडे हॉस्पिटलमध्ये सगळा गोंधळ माजला आहे. तू निघ आधी इथून. आकाश म्हणाला, सगळं नीट झालं कि तो तुला भेटेल.”

त्याने माधुरीला ईशारा केला,

“माधुरी हीच काय समान आहे ते घे तुझ्या घरून आणि मी हिला सोडतो बसं स्टॉपला.”

माधुरीने उर्वीचा हात धरला, आणि निघाली. उर्वी अजूनही गप्प होती. शब्द गोठले होते. मनात युद्ध सुरु होतं. मनाचा मनाशी संवाद सुरु झाला,

“काय झालं असेल, माझ्यामुळे तर नाही, आकाशमुळे? शी बाई असं का केलं तिने? काय कारण असेल? त्याची आई शिवीगाळ का करत होती? मला तर बोलत नव्हती ना? पण मी तर भेटलेच नाही कुणाला? कधी भेट झाली नाही, बोलणं झालं नाही मग मी... नाही, मी नसणार ना कारणीभूत... मग आकाश? तो तर तिकडे माझ्या गावी खोली करून कॉलेजसाठी राहायचा, पण ह्या वर्षी तो इकडे आलाय, पण कामासाठी बाहेर तर कधी कॉलेजसाठी तिकडे यायचा... मग? पण चिंता होती त्याला त्याच्या बहिणीची, मला बोलला होता तो, ती ही फाक्ट्रीची परीक्षा पास झाली कि तिलाही नौकरी लागेल म्हणून पण? ती तर तयारी करत होती परीक्षेची... काय झालं असं... प्रेम, प्रेमभंग... काही माहित नाही... की एक स्त्री म्हणून तिने हा निर्णय घेतला होता... तरही नको घायला हवा होता, पण आपण कसं असं बोलू शकतो...”

अनेक विचारात आणि प्रश्नांच्या जाळ्यात उर्वी अडकली होती. त्या प्रश्नांमधून मार्ग निघत नव्हता. तिला राहून राहून आकाश आठवत होता.

 

कथा क्रमश...

प्रतिकिया नोंदवायला विसरू नका. 

© उर्मिला देवेन 

फोटो आभार गुगल

कथे बद्दल जाणून घेण्यासाठी कथेची प्रस्तावना इथे वाचा...  

कथेची प्रस्तावना इथे वाचा...  

बीइंग नारी... कथेची प्रस्तावना 

https://www.manatalyatalyat.com/2022/06/blog-post_28.html

कथा आठवड्यातून दोनदा प्रकाशित होईल. 

 

 

Post a Comment

0 Comments