बीइंग नारी... भाग ३
जेव्हा आई होणं अवघड होते... © उर्मिला देवेन
कथेचा आधीचा भाग ---भाग २
कथा मालिकेची लिंक - कथेचे प्रकाशित झालेले सर्व भाग इथे आहेत.
विचारांच्या वादळात भरकट उर्वी चालत राहिली, माधुरीचं
घर आलेलं, माधुरी म्हणाली,
“उर्वी माझ्या आईला माहित झालं असेलच ग, आकाशच्या
बहिणीबद्दल, गावातली गोष्ट लपणार नाहीच ना! पण तू त्यालाच भेटायला आलीस हे तिला
काही माहित नाही, मग जरा सांभाळून घे. उगाच विषय कशाला चीरघडायचा. आपल्याला
मित्रम्हणून आकाशसाठी वाईट वाटतय हेच जाणवायला हवं तिला. आणि बघ, तू माझ्याकडून
आता पूनमकडे निघालीस असचं बोलू आपण, ती उद्या माझ्या मामाकडे जाणार आहे मग ती नाही
येणार आहे पूनमकडे, तू कुठे जाणार आहेस हे तिला काही कळायचं नाही... समजलं ना?”
“हुम्म, पण?”
“पण काही नाही, नाहीतर आईचे नुसते प्रश्न
राहायचे.”
माधुरी खर तेच बोलत होती. बरोबर होतं तिचं तिला
स्वतःला आणि उर्वीलाही सांभाळून घायचं होतं.
उर्वीचा मनातून आवाज आला, तिने डबडलेल्या
डोळ्यांनी माधुरीकडे बघितलं, म्हणाली,
“मधु, मला नाही जायचं ग घरी, असं कसं त्याला
सोडून जावू, गरज आहे त्याला माझी.”
“हो, पण, समज ना, हा मामला जर आकाशवर आला आणि तू
इथे असल्याने तुझ्यावर आला तर? काही उगाच होवू नये ग... तुझ्या घरच्यांना काय
सांगशील?”
“नाही ग, मन मानत नाही, चार वर्षापासून सोबत आहोत,
आता कुठे आयुष्याची नवीन सुरवात होणार होती, आनंदही आनंद होता मग ह्या अचानक
आलेल्या संकटाला त्याने का एकट्याने समोर जावं.”
माधुरी खडसावून म्हणाली,
“भावनेत वाहवून जावू नकोस, तू आधी निघ इथून... नंतरच नंतर.. मला तुझी काळजी आहे आधी.”
तेवढ्यात बिल्डींगच्या आवारात सुधीर पोहचला होता.
त्याने गाडी लावली आणि तो दोघींकडे आला,
“मधु आणली का हिची बॅग? सोडतो मी हिला
नाक्यापर्यंत.”
उर्वी उतरत्या स्वरात म्हणाली,
“नाही सुधीर मला नाही जायचं. तू मला तिकडे हॉस्पिटलला
घेवून चल, मला आकाशशी बोलायचं आहे. मला नाही जाता येणार असं. मी नाही जाणार. मित्र
आहेस ना माझा, समज ना मला.”
दोघांनी तिला खूप समजण्याचा प्रयन्त केला पण ती
काही ऐकायला तयार नव्हती. शेवटी सुधीर माधुरीला म्हणाला,
“समान घे तू, मी परस्पर हिची भेट झाली आकाशशी की
हिला बसमध्ये बसुवून देतो.”
उर्वीच्या मनात अजूनही गोंधळ सुरु होता. ती गप्प
होती. माधुरीने समान आणून दिलं आणि ती सुधीरच्या बाईकवर शहराच्या दिशेने निघाली.
सुधीरलाही सुचत नव्हतं, त्याने बाईक बस स्टॉपवर
घेतली. तिला म्हणाला,
“उर्वी, मी ना आधी हॉस्पिटलमध्ये जावून बघून
येतो. सगळं नीट वाटलं तर तुला घेवून जातो. तू इथे बस. समज ना थोडं ग. मी बोलतो ना
आकाशसोबत.”
उर्वीकडेही पर्याय नव्हता, गुमान बसून राहिली.
दोन तास निघून गेले होते. काहीच सुचत नव्हतं.
इकडे सुधीर हॉस्पिटलमध्ये पोहचला होता. आकाशला
काही विचारावं अशी परिस्थिती नव्हती. मनालीने जीव सोडला होता. बॉडी
पोस्टमार्टनसाठी गेली होती. घरीची लोकं घरी परतून गेली होती. आकाशची आई तिथे
नव्हती मग हळूच सुधीर त्याच्याजवळ आला,
आकाश त्याला बघून म्हणाला,
“उर्वी...?”
“कुठे आहे. गेली ना ती तिच्या गावी.”
“नाही रे, इथे बस स्टॉपवर बसून आहे.”
“अरे, तुला बोललो ना, जा म्हणावं तिला. “
“तू आधी शांत हो...”
आकाश उर्वीला ओळखून होता, जरा हळूच म्हणाला,
“ही पण ना, नाही जायची...”
हळूच सुधीर म्हणाला,
“आकाश, काही मामला तुझ्यावर तर नाही?”
“नाही रे, सारंकाही तर घेवून गेली ती
तिच्यासोबत... तीही राहिली नाही आणि आता काय झालं होतं हेही कळत नाही... माझं काय
चुकलं हेही कळालं ना तरी खूप रे, पण काहीच कळत नाही...”
आकाशच्या मनाला धक्का लागला होता. तो नुसता विचार
करत होता. तिथेच असलेल्या संदीपने सुधीरला बोलावलं,
“सुध्या, आकाश अजूनही रडला नाही कि कुणावर ओरडला
नाही, गुमान चूक शोधत बसला आहे. मित्र दिसले कि म्हणतो, उर्वीला पाठवून द्या. आणि
चुकल्यासारखा नजरा लपवत आहे. ह्याची काहीच चूक नाय बे... आता बहिणीन विचार केलाच
नाही ना बे... जावूदे कुणाला बोलायचं हेही कळत नाही... त्याची बहीण तशी आपलीपण, गेली
ती, प्रश्न उरलेत फक्त ज्याची उत्तर तिच्याकडे होती. आणि ती उत्तर आता कधीच मिळणे
नाही, शोधूही नये ह्या आकाशने, उर्वी थांबली हा उत्तम निर्णय आहे. ती नक्कीच
सांभाळू शकते ह्याला. निदान तिच्या शी बोलण्याने ह्याचा मनस्ताप थांबेल.”
“अबे पण ती कशी?”
“ते काही माहित नाही, पण आकाशने किती केलंय इथवर
येण्यासाठी हे आपल्याला सर्वांना माहित आहे. त्याने काही भलतं विचारात केलं ना तर
मग काय करायचं यार... आता मनालीच काय कसं कुणाला माहित नाही. बदनामीही खूप झाली तिची आणि
ह्या सर्वांची... साऱ्या आतापर्यंतच्या मेहनतीवर पाणी असेल बे... काही अजून विपरीत
घडलं तर.”
“अबे पण आता काय करायचं आपण...?”
“आम्ही बॉडी घेवून त्याच्या घराकडे येतो. तू पोहच
उर्वीला घेवून तिकडे. इथे कसं पोलीस वगैरे आहेत त्यांना भेटणं जमणार नाही पण तिकडे
आपण करू काहीतरी, रंजित त्याच्या घराच्या अगदीच जवळ राहतो. मी बोलतो त्याच्याशी,
तो करेल काहीतरी. तू माधुरीला बोल. उर्वी तिकडे एकटी येता कामा नये.”
“पण आकाश?”
“मी बोलतो त्याच्याशी. तू निघ तिकडे. उर्वीला
माधुरी भेटल्याशिवाय सांगू नकोस काहीच, उगाच तीही स्वतःला जवाबदार समजायची... इथे
ह्या दोघांची काहीच चूक नाही. ह्यांना ह्यातून बाहेर हे दोघंच काढू शकतात, आपण बस
तेवढी मदत करू. बाकी ते बघतील.”
सुधीर उर्वीकडे निघाला, ती तशीच बस स्टॉपवर बसून
होती. सुधीर दिसताच उठली,
“सुधीर मी येते आहे ना? मला आकाशशी फक्त थोडं
बोलायचं आहे रे. मग मी निघते इथूनच.”
“उर्वी शांत हो, आता आपण परत जातोय, आम्ही तुला
घेवून जातोय आकाशच्या घराकडे. तु तिकडे त्याच्याशी निवांत बोल.”
“पण कसं, त्याच्या घरी मी कधी गेले नाही आणि आता
ह्या अश्या वेळी... आणि त्याची बहिण कशी आहे.”
“ते मी तुला सांगतो, आधी तू चल.”
त्याने गाडी फोनबूथकडे घेतली,
“थांब, आपण ह्या माधुरीला बोलवू. तू तिकडे
तिच्यासोबत असणार. असं ठरलं आहे आमचं.”
त्याने माधुरीच्या घरी फोन केला. योगायोगाने तो
तिनेच उचलला, सगळं सांगून त्याने तिला तयार राहायला सांगितलं.
सुधीर माधुरीच्या घराजवळ आला, माधुरी उभीच होती.
तिघेही, शेजारच्या बागेत जावून बसले, आणि सुधीर म्हणाला,
“उर्वी, बातमी वाईट आहे. मनाली राहिली नाही. आणि
आकाश तुटला आहे, तुलाच त्याला सांभाळाव लागेल. आम्ही फक्त त्याच्याशी तुला भेटवून
देण्यासाठी जराशी मदत करणार. बाकी तुला सांभाळायच आहे. त्याचा चुलत भाऊ आणि सगळे
मित्र बॉडी घेवून पोहचले असतील. आपण जरा उशिरा निघूया, म्हणजे गर्दी नसेल तिकडे.
सारं खूप अचानक झालं ग, कुणाला काहीच कळत नाहीं आहे. सारे प्रश्न निरुत्तर आहेत.
आकाश स्वतःला जवाबदार समजत आहे.”
उर्वीचा कंठ दाटून आला होता, तिने आवंढा गिळला
आणि म्हणाली,
“मग आता रे, पोलीस केस झाली होती ना?”
“हो, पण सारं संपलं, काही तासात. आत्महत्या
म्हणून केस बंद झाली. मनालीने स्वतः जबानी दिली आणि बाकी ती काहीच बोलली नाही...
आकाशला काहीच कळत नाही आहे. तो कुठे इकडे राह्यचा ग नेहमी, जावूदे, काही बोलायचं
नाही. उगाच विषय वाढवायचा नाही आता, तुला आकाशला सांभाळायच आहे.”
उर्वी बघत राहिली, तर सुधीर परत म्हणाला,
“म्हणजे, तुझी तयारी असेल तर... तुझ्यासाठीही हे
सारं अकस्मात आहे हे जाणून आहोत आम्ही. शिवाय तुझ्यात आणि आकाशमध्ये खूप अंतर आहे
ह्याचीही जाणीव सर्वाना आहे...”
उर्वी काहीच बोलली नाही, जरा वेळ शांतता होती
तिघात. माधुरी आणि सुधीर तिच्याकडे बघत एकमेकांना ईशारा करत होते, तोच उर्वी
म्हणाली,
“निघायचं का? मला आकाशशी बोलायचं आहे. मी नाही
परत निघू शकत त्याला भेटल्याशिवाय.”
तिघेही एकाच बाईकवर वस्तीवर पोहचले, मनालीला
नुकतंच स्मश्नात नेलेलं. आणि तिच्या आईच्या किंचाळ्या घरात सुरु होत्या. घरासमोर
काही बायका उभ्या होवून बोलत होत्या. सुधीरने बाईक रंजितच्या अंगणात लावली,
त्याच्या आईला म्हणाला,
“काकू, आपल्या आकाशच्या मैत्रिणी आहे. त्याला
भेटायला आल्या आहेत. बसू देवू ना इकडे?”
रंजितच्या आईने त्यांना बसायला लावलं. उर्वी ती
वस्ती बघून गडबडली होती. ती पहिल्यांदा अश्या वस्तीत आली होती. पडके घरं, मातीच्या
भिंती, त्यावर गौऱ्या छापलेल्या, कवलारू, काळी, हिरवी झालेली घरची छत. घराबाहेर
बसलेली लोकं. आणि सारं कसं वेगळ आणि नवीन, धक्कादायक होतं तिच्यासाठी. त्या
वस्तीतल्या साऱ्या नजरा जणू तिला बघत होत्या असचं तिला वाटत होतं. त्यात रंजितची
आई प्रश्न करत होती ते वेगळं. रंजीत सोबत होता म्हणून जमलं, काही वेळाने ती
बाजारासाठी निघून गेली.
तेवढ्यात आकाश आणि बाकीची मंडळी, स्मशानभूमीत
परतली होती, एकायक आकाशची नजर रंजितच्या अंगणात बसलेल्या उर्वीवर पडली, तो तसाच
तिकडे आला,
उर्वीही उठली, कंठ दाटून आला होता, पण तिने भावना
मनातच कोंबल्या. आकाश जसा जसा जवळ येत होता, उर्वीच्या हृदयाने जणू काम करणं बंद
केलं होतं.
आणि त्याने आवाज दिला,
“उर्वी, तुला तिच्या लग्नात सर्वांशी ओळख करवून
देणार होतो ग, पण आता हेच लग्न समज, हा बघ मी पोहचवून आलो तिला तिच्या घरी...”
रंजितने आकाशला अंगणातून खोलीत ओढलं, आणि उर्वीही
आत शिरली, त्याला असं समोर बघून ती स्वतः ला थांबवू शकली नाही, त्याला जावून
बिलगली, तिच्या शरीराचा स्पर्श होताच आकाश रडायला लागला,
तिला बिलगून रडत होता आणि साऱ्या थांबलेल्या
भावना वाहून जात होत्या,
“उर्वी, मला मनाली पाहिजे, तू देशील ना मला, मी
कुठे चुकलो ग... मला मनाली हवी आहे उर्वी, तू देशील ना मला...”
उर्वीला काहीच सुचत नव्हतं, तिनेही त्याला
समजवण्याचा प्रयत्न केला,
“आकाश शांत हो, हो... ना शांत.”
रडून भानावर आलेला तो तिला हळूच म्हणाला,
“असा आहो ग मी, हेच माझं सत्य आहे. आता निर्णय
तुझा... प्रेमाच्या गोष्टी आणि वास्तविकता वेगळी वेगळी असते ग, माझ्याकडे काहीही
नाही... तुझ्या तर मी लायकीचाही नाही... आता तर माझ्या बहिणीने मला हरवलं... तू
मला साथ देशील... हरलेल्याला पुन्हा उठवायला कस लागतो...”
तो रडता रडता हसला, उर्वी गप्प होती, चिडली होती
मनात. तिला आता आकाशचा राग येत होता. शून्यात बघत होती...
कथा क्रमश...
प्रतिकिया नोंदवायला विसरू नका.
© उर्मिला देवेन
फोटो आभार गुगल
कथे बद्दल जाणून घेण्यासाठी कथेची प्रस्तावना इथे वाचा...
कथेची प्रस्तावना इथे वाचा...
बीइंग नारी... कथेची प्रस्तावना
https://www.manatalyatalyat.com/2022/06/blog-post_28.html
0 Comments