बीइंग नारी... भाग ५
जेव्हा आई होणं अवघड होते...
आधीचा भाग ४ इथे वाचा भाग ४
कथा मालिकेची लिंक - कथेचे प्रकाशित झालेले सर्व भाग इथे आहेत.
२००७ च्या सुरुवातीला अक्षदा पडल्या होत्या, दोघेही आयुष्य सोबत काढण्यासाठी तयार झाले होते... लग्नासाठी उर्वीने तिची नौकरी सोडली होती आणि ती आता पुण्यात नौकरी शोधणार होती. तशी तिनेही मास्टर डिग्रीसाठी एडमिशन घेतली होती. तिलाही तिचं करिअर होतंच ना...
लग्नाचा थाट राजेशाही होताच, उर्वीच्या आईवडिलांनी लोकं मर्जी राखत, समजाच्या चौकटीत लग्नाचा उत्सव उभा केला होता. सारंकाही संपन्न झालं होतं. रुसवेफुगवे होतेच पण कुणी कुणाचं नव्हतं, साऱ्यांना जवाबदारी पार पडायची होती.
जवाबदारी आता दोघांची होती. नाती जपायची होती, दोन्हीकडे मनात नसलेली नाती मनात फुलवायची होती.
खरच, लग्न हे प्रेमाचं अंतिम चरण नसतं कधीच, ती तर सुरुवात असते.
आपण प्रेमात पडलो की वाटतं आपलं आपल्या प्रेमाशी लग्न व्हावं, मग धडपड सुरु होते त्याला मिळवण्याची, मनात युद्ध सुरु असतं, नाती दावावर लागतात, आणि तो उंबरठा ओलांडल्या जातो... मग भरकटणाऱ्या मनाला जरा विसावा मिळतो. पण, तो उंबरठा ओलांडून पुढे जाणं म्हणजे खऱ्या आयुष्याची सुरुवात... नाहीका?
मी तर म्हणेल लग्न हे प्रेमाचा अंत नसतो, ती येणाऱ्या आव्हांना स्वीकारण्याची एक रीतसर पद्धत आहे. पुढे काय काय समोर वाढून ठेवलं आहे हे आपल्याला माहित नसतं... त्याची जराही जाणीव नसते. अलगत आपण कधी त्यात शिरत जातो आणि त्या साऱ्यांचा भाग होत जातो... तेव्हां आयुष्याचा जोडीदार हवा असतो सोबत...
दोघांच प्रेम, लग्नानंतर दोघांच असलं तरी त्यात आता कुटुंब आलेलं असतं, एकमेकांच्या मर्जी राखतांना आपल्याला आपल्या नात्यामुळे नाती जुळलेल्या प्रत्येक मनाची मर्जी राखावी लागते... ही खरी कसोटी! आणि इथेच परीक्षा प्रेमाची!
“आपण आईला सोबत घेवून जावूया आताच...”
काय बोलणार होती ती आकाशला..
आईत अडकलेल्या आकाशला स्पष्ट नकार देणं उर्वीला जमलं नाही. तिच्याही मनाला वाटलं, भेटी आणि गाठी आकाशसोबत नवीन नव्हत्या मग काय फरक पडणार म्हणून, नको मनात असूनही तिने सासूला सोबतच पुण्याला घेवून जाण्याच्या आकाशच्या निर्णयावर शिक्का लावला.
खर तर लग्न कुठलाही असोत काही दिवस तरी आपले असावे. नको कुणीच मध्ये... पण राजत्या रमात्या घरात हे कुठे असतं हो. तरीही असावे आपले काही दिवस, तेव्हांच तिसरा निभवून जातो. पहिल्या काही दिवसात निवांत जगलो तर नंतर आयुष्यात सल राहत नाही, कारण होणाऱ्या कुरबुरी आपल्याचमुळे असतात, उगाच त्याचा आरोप थोपायला समोर कुणी नसतो... पुढचं खूप काही आपण थांबवू शकतो. बसं जरा त्या वेळी आपला वेळ हिसकावून घेण्याची ताकद हवी.
लग्नानंतर जे स्वतंत्र असतं ते त्या लग्नाआधीच्या चोरून भेटीत कधीच नसतं, ते उधारीच्या बाईकवर रुमाल चेहऱ्यावर लावून फिरणं आणि लग्नानंतर स्वतःच्या बाईकवर बिनधास्त नवऱ्याला चिपकून बसत खुलेआम गप्पा करणं, फरक आहे राव... पण तरीही उर्वी आणि आकाशने सासूला सोबत घेतलं.
सासूसुनेच नातं नवीन आहे असं म्हणता येणार नव्हतं, आकाशची आई उर्वीला आधीपासून ओळखायची, मनालीच्या मृत्यूनंतर तिला हळूहळू आकाश आणि उर्वीच नातं लक्षात येत गेलं होतं. तिचे तिच्या पद्धतीने ग्रह कधीचेच तयार होते. पण मुलाच्या इच्छेपुढे सारं नमलं, आणि तिच्या मनात उर्वीला स्वीकारल्याने त्यांच्या नात्याबद्दल उपकाराची भावना शिरली होती.
पुण्यात तिघेही पोहचले, घर लावणं, नवीन नवीन सारंकाही, महिना गेला. त्यात आकाशची MBA कॉलेजची नौकरी, आणि त्याचं सॉफ्टवेअर क्षेत्रात शिरण्यासाठीची धडपड सुरु होती. कॉलेजची नौकरी त्याला जास्त काळ करायची नव्हती. त्याचं पूर्ण लक्ष त्याच्या करिअरवर होतं.
उर्वीलाही स्वतःला सिध्द करायचं होतं, तीही नौकरीच्या शोधात लागली होती. खोलीत वाचत बसली होती तर त्या दिवशी तिच्या आईचा फोन आलेला,
“काय ग, घरीच असतेस काय?”
“हो, अजूनतरी, काही नाही, आता महिना होईल, बघते काय मिळते काय. आणि माझा अभ्यास आहे ना Mtechचा.”
“बऱ बाई, एवढं मुलीला शिकावा आणि काय!”
आईचा स्वर उतरला होता. तिची काळजी तिच्या ठिकाणी योग्य होती. पण कदाचित हे बोलून दाखवण्याची वेळ चुकली असावी... तरीही ती तिच्याजागी योग्य म्हणता येईल.
तिने परत म्हटल,
“काय ग कुठे जाता कि नाही फिरायला...”
प्रश्न योग्य होता, साहजिक होता पण तरीही उर्वीला लागला.
मग स्वतःच म्हणाली,
“अरे, तुझी सासू आहे ना तिकडे, काय ग बाई, एखाद्या मोठ्या घरी दिलं असतं तर फॉरेनला गेली असती लग्नानंतर फिरायला... जावूदे... जात जा फिरायला तिघही...”
ती हसली, तिला असं बोलतांना बघून उर्वी म्हणाली,
“जावू ग, कालच जावून आलोय आम्ही...”
“दोघे?”
“हो, पिच्चर बघितला ना आमच्या ग्रुपसोबत.”
“अरे व्हा! छान. काळजी घे.”
उर्वीने फोन ठेवला. शेजारच्या खोलीत असलेल्या सासूला जाम राग आला होता. फोन तिला केला नव्हता ना उर्वीच्या आईने. आणि काहीही तिच्याबद्दल विचारलं नव्हतं. पण उर्वी आईच्या त्या बोलण्यामध्ये गुंतून पडली. मनात आईचा राग येत होता. वाटलं,
“आता लग्न झालंय जे होईल ते आकाशसोबत. आता कशाला मी असा विचार करू. मी खूप खुश आहे आकाशसोबत”
मनात हसता हसता तिला कलाच प्रकार आठवला,
आकाश आणि उर्वीला दोघांना मित्रासोबत बाहेर जायचं होतं. आईला ते घेवून जावूच शकत नव्हते,
उर्वीने सकाळी सर्व आवरलं आणि आकाशच त्याच्या आईला सांगून झालं होतं, तिने हो ला हो करत गोष्ट ऐकली होती. आकाश आणि उर्वी निघणार तोच, त्याच्या आईचं रडणं सुरु झालं, आकाशला काहीच कळेना, तो आईकडे गेला, उर्वीही धावली,
काही केल्या आई काही सांगायला तयार नव्हत्या, शेवटी आकाश बसला,
“काय झालंय, सांगशीलं, काय चुकलं आता आमचं?”
तर त्या रडत म्हणाल्या,
“माझी मुलगी असती तर मला सोबत घेवून गेली असती मित्र मैत्रीणीना भेटायला, इथे तर नवऱ्या सोबत बायकोलाच जायचं असतं. मलाही आता बघावं लागेल, फिरायला जायचं असेल तर...”
आता मात्र आकाश उठला, उर्वी म्हणाला,
“उर्वी, जा बॅग घे तुझी, वेळ होतोय... जा निघ पुढे, खाली वाट बघ माझी. हिच्यात सासू शिरली आहे. मला खूप काम आहेत माझ्या मित्रांसोबत, त्यांनी बोलावलंय आणि आपण गेलो नाही ना तर मला ते जे सॉफ्टवेअर कोर्सेस शिकवत आहेत ना ते शिकवाचे नाहीत... हिच्या मागे लागण्यात काहीच अर्थ नाही.”
उर्वीही उठली, कारण सासूच्या शब्दांचा अर्थ काय होता हे तिला चांगलंच कळालं होतं... सुचत नव्हतं, ह्या थराला विचार सुरु होता तिच्या सासूचा, करणार काहीच नव्हती पण, असे तोंडातून शब्द बाहेर काढणं म्हणजे फारच वेगळा अनुभव होता उर्विसाठी. उर्वी पायऱ्या उतरत खाली आली, खालच्या बागेत मुलं खेळत होती, मुलांचा लाड करत ती तिथे उभी होती, हळूच विचार शिरला,
“जावूदे, एखाद मुलं झालं की आई रमतील, आणि मग सारं कसं जमत जाईल, तसंही आम्हाला लवकर मुलं हवय, मला कुठे फॅमिली प्लॅनिंग करायची आहे. आपल्यासोबत मुलही मोठे होतात...”
तिने विचारांचे जाळे मनातच विणायला सुरुवात केली होती.
तेवढ्यात आकाश आला,
“हुम्म्म, निघायचं ना?”
उर्वी, स्वप्नातून बाहेर आली,
“अरे आई ठीक आहेत ना?”
“हो, चल...”
तो तुटक बोलत होता, उर्वीला कळत नव्हतं. चिंचवडच्या मुख्य रस्त्यावर येईपर्यंत ते दोघे गप्प होते, ऑटोसाठी उभे होते, तर उर्वी हळूच म्हणाली,
“कशी बोलली रे तुझी आई, शोभतं का असं बोलायला! कळायला हवं ना. मला तर काहीच सुचलं नाही.”
आकाशच्या मनात कदाचित आधीच राग धगधगत होता, आणि आता तो फुटला,
“तुला काय करायचं आहे, नाही भेटलं तिला फिरायला, मग बोलली.”
उर्वीला किळसवाण झालं, तीही म्हणाली,
“म्हणजे, मग काय ती असं बोलणार, तेही मुलाला... काही नात्यात मर्यादा आहेत की नाही. आई सारखं राहावं आणि बोलावं.”
“हे बघ, ती बोलली आता, आपण बदलू शकत नाही. मी तुला समजावू शकतो तिला नाही... तिचं बोलणं चुकीच वाटलं म्हणून आपण जातोय ना... मी तुला तर काही म्हणालो नाही ग, मलाही कळतं, कोण कस आणि कुठे चुकतो, शिकवू नकोस.”
“अरे पण...”
“विषय ओढू नकोस, माझा मूड घालवू नकोस. मी तुला काही बोललो का?”
“पण ती मर्यादा सोडून बोलली ना!”
“आता तू मर्यादा सोडू नकोस, विषय संपला...”
विषय संपला नव्हता, आता कुठे सुरु झाला होता, त्या एका विषयाला अनेक फाटे होते. त्यातल्या अतिशय नाजूक विषयाची सुरुवात उर्वीच्या मनात झाली होती...
जरा काही करायचा विचार केला ना की सर्वात आधी टांग टाकतात ते आपले जवळचे... त्यात पालकही मागे नसतात.
आकाश आणि उर्वीला खूप काही करायचं होतं, दोघांना उडायला पंख हवे होते... जे त्यांना स्वतःच निर्माण करायचे होते. सर्वांना सोबत घेतांना त्यांना काही गोष्टी आपसूकच आयुष्यात हव्या होत्या.
पुढचा भाग लवकरच...
आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा, तुमची प्रतिक्रिया अनमोल आहे.
संपूर्ण कथा मालिकेची लिंक - कथेचे प्रकाशित झालेले सर्व भाग इथे आहेत.
-उर्मिला देवेन
0 Comments