बीइंग नारी... भाग ६
जेव्हा आई होणं अवघड होते...
आधीचा भाग इथे वाचा भाग ५
ऑटो आला होता, दोघेही बसले. शांत होते. आकाशने त्याच्या आईला कसं समजावलं असेल हे उर्वीला माहित नव्हतं, पण तिला माहित करून घायचं होतं.
खरं तर गरज नव्हती, पण ती वेळ तशी कि नको असलेली गरज हवीशी वाटते... नाहीका?
आकाशचं मनात काय सुरु होतं त्याचं त्याला माहित. त्याच्यासाठीही त्याच्या आईचं वागणं विचित्र होतंच, पण काय बोलणार होता, म्हणून कदाचित उर्वीला गप्प करत होता. ऑटोने स्पीड ब्रेकर ओलांडला आणि उर्वीला आकाशने संभाळलं, त्याच्या स्पर्शाने सारंकाही विसरली उर्वी.
ऑटोमध्ये समोरच्या शीटवर एक बाई छोटश्या मुलीला घेवून बसली होती. आता लक्ष तिच्यावर खिळलं होतं दोघांच. आकाश उर्वीला इशारे करत होता आणि उर्वी त्याला. सारं काही मागे टाकून ते दोघे रमले होते विचारात. स्वारगेट आलं होतं. दोघेही उतरले. आकाशने त्याच्या मित्राला फोन लावला. आणि ते दोघे तिथेच सर्वांची वाट बघत उभे राहिले. नंतर ते सर्वांसोबत पिच्चर बघायला गेले. पिच्चर संपल्यानंतर आईसक्रीम खाल्ली, सर्वांचा जेवणाचा बेत होता, आकाश आणि उर्वीच ठरलं, कि ते दोहे आईसाठी जेवण पॅक करून घेवून जातील. त्याने बोलतांना फोन हातात घेतला, बघतो तर काय, बिल्डिंगमधल्या समोरच्या सरांचे दहा मिसकॉल होते. आकाशने हळबळीत त्यांना फोन लावला, तर समजलं,
आईला बाहेर सहज फिरायला जायचं होतं, त्या घरच्या बाहेर आल्या पण किल्या घेवून बाहेर आल्याच नाही, त्या बाहेर निघाताच दार ऑटोलॉक झालं, आता त्यांना घरात शिरता येत नव्हतं. आणि त्या चार वाजेपासून खाली बसून रडत आहेत. कुणाकडे यायलाही तयार नाहीत. सरांनी आता त्यांना चहा खाली नेवून दिला.
आकाशच्या सारा प्रकार लक्षात आला, त्याने निघतांना आईला समजावून सांगितलं होतं, बाहेर निघतांना किल्या हातात घ्यायला पण...
आकाशने मित्रांचा निरोप घेतला, माफी मागितली. आणि ते दोघेही निघाले. उर्वी मनात रागात येत होती पण बोलणार काय, आकाशला तिचं मन उमगलं होतं पण त्याला तिचे शब्द ऐकायचे नव्हते. सारा प्रकार त्याला समजला होताच.
रस्त्यात, ऑटोत असतांना परत एकदा त्या समोरच्या सरांचा फोन वाजला... बेल जात होती पण आकाश उचलत नव्हता... त्याला घरी जायचं होतं, फोन उचलून अजून काय ऐकून घ्यायचं होतं, गुजराल सर आधीच्या कॉलमध्येच आकाशवर ओरडले होते कदाचित, म्हणून फोन वाजत राहिला... रिंग जात होती...
आणि.. परत फोन वाजला, उर्वी कालच्या विचारातून आवाजाने बाहेर आली, आकाशचा फोन होता, तो आज परस्पर क्लाससाठी मित्राकडे निघणार होता. उशिरा येणार होता. उर्वीने घर आवरलं, बाल्कनीत आली, खाली मुलं खेळत होती. त्यांना बघत ती तिथेच बसली. कालच्या वागणुकीमुळे सासू फुगून होतीच, आणि उर्वीनेही स्वतः जावून बोलण्याची तसदी घेतली नाही.
जरा बोलणं झालं असतं तर कदाचित दरी भरून निघाली असती, पण इथे त्या कुणीच पुढाकार घेत नव्हत्या. बसल्या बसल्या उर्वीचा वेळ गेला. स्वयंपाक झाला होता, कर्तव्य म्हणून तिने सासूला जेवायला बोलावलं, त्यांना वाढून दिलं, आणि वाढतांना सांगितलं की आकाश उशिरा येणार म्हणून.
बसं तेवढच ते बोलणं. वाढून उर्वी तिच्या खोलीत निघून गेली. रात्रीचे अकरा वाजले होते, आकाश घरी आला होता, सोबत त्याने आजचे पेपर आणि उर्वीसाठी बरच काही कामाचं आणलं होतं, ती पेपर बघत नौकरीसाठी मुलाखतीचा पेज बघत मग्न होती. आकाश आईकडे जावून बोलून आला.
उर्वीला एक दोन जॉब तिच्यासाठी योग्य वाटले होते. आणि तिने त्या मुलाखती देण्याचा निर्णय आकाशला सांगितला,
“आकाश हे भोसरी कुठे येणार?”
“माहित नाही ग मलाही, चिंचवड वरून बस असेल ना, तिकडे गेली कि कर विचरापूस.”
“हुम्म्म, मी जाते आहे हा उद्या, बघू काही झालं तर?”
“हुम्म्म, तुझा Mtechचा अभ्यास पण कर, मास्टर झालीस की जास्त पगाराची नौकरी मिळेल ना...”
दोघांनी बोलत जेवण केलं. रात्र सरकत होती आणि उर्वी आकाशच्या कुशीत शिरली होती.
“आकाश, कसं करायचं रे सारं, आता चान्स घ्याचा का?”
“चान्स घ्याचा की नाही, हे नको विचारू, आपलं काय ठरलं आहे, झालं तर झालं लवकर, आणि लवकर झालं तर बरच की, आई आहे, सांभाळून घेईल. तुझंही मास्टर होईल त्या दिवसात, लवकर मोकळे होवू आपण.”
“तेही बरोबर, आता नवीन दिवसात नवीनपण मिरवायला मिळेल आणि मग आपल्याला आपलं करिअर करायला वेळ मिळेल. आईची सोबत मिळून जाईल. त्याही आता करू शकतात मग जास्तच उतरता काळ आला तर कठीण ना.”
“ये बाई, हे असं उतरता काळ बीळ तिच्यासमोर बोलू नको, उगाच वाट लावायची, म्हणेल, तिच्या मरणाची वाट बघतोय आपण.”
“आकाश असं कुठे म्हणाले रे मी, बसं काळजीपोटी बोलले ना, आता कसं त्या करू शकतात सर्व, नंतर पाच सात वर्षात उगाच कुठे धावपळ होणार त्यांच्याकडून.”
“काळजी वगैरे, तुझी तुझ्या जवळ ठेव, पण असे शब्द चुकून काढूही नकोस.”
आकाशने दिवे विझवले, उर्वी गालातल्या गालात हसत होती, त्याला बघून म्हणाली,
“काय मग काय विचार आहे...”
“काहीही नाही...”
दिवे विझले होते, दोघेही एकरूप झाले उद्याच्या स्वप्नामध्ये...
दिवस भराभर धावत होती, सासूही आता तिथे राहून कंटाळल्यामुळे, गावी परत गेलेली होती. आकाश त्याच्या नौकरीत आणि अभ्यासात मग्न होता. उर्वी जॉब शोधत अभ्यासात होती. सहा महिने असेच गेले होते. दिवाळीला आकाश आणि उर्वी गावी आले होते.
गावात उर्वीला भेटायला येणाऱ्या बायको तिला म्हणायला लागल्या होत्या,
“काय सुनबाई, आता झाले ना सहा महिने, कधी बातमी देता.”
उर्वीही डावलून लावायची,
“काय हो, मला काय विचारता, तुमच्या मुलाला बोला की?”
उर्वीच असं उत्तर देणं सासूला आवडायचं नाही, साहजिक होतं ते. गावात असं कोण बोलणार, अवघ्या सहा महिन्यात लोकं अपेक्षा ठेवणार हेही अशक्य होतं ना, पण आपला समाज हो. प्रश्न करायला कधी मागे पुढे बघतो. बसं ना विचार करायचा ना काही, समोरच्याला कटघऱ्यात उभं करण्याची रीत आहे आपली.
एक काकू तर चक्क म्हणाल्या,
"आव, ती मागची राधा, महिन्याभरात पोटुशी राहिली, ह्या काय शहरी पोरी, काय ते करिअर बिरीअर करायचं म्हणत्यात, अन गोळ्या घेतात माय.”
मग ती तिच्या सासूला म्हणाली,
“काय व मंदे, तुही सून बी वापरते काय व,..?”
सासूला तर मुद्दा मिळाला होता, तीही शब्दाला शब्द म्हणाली,
“काय माहित बाई, आता पोरगाच आपला राहिला नाही मग नवख्या पोरीले काय विचारायचं.”
तशी उर्वीची सासू कधी मोकळी बोलत नव्हती, एकतर ती तिरकस बोलायची नाहीतर झगड्यात. कधी तिने तिला काय हवंय हे स्पष्ट सांगितलं नव्हतं. पण समोरच्याने ते ओळखावं ही अपेक्षा मात्र ठेवून असायची.
जुनं खोड म्हणावं की आपली परंपरा... मोठ्यांच्या मनातलं ओळखण्याची अपेक्षा वाढत असते, पण लहानांच्या मनात काय सुरु असते हे जाणून घेण्याची जणू परंपराच नाही आपली...
मोठ्यांनी थोपत जावं आणि लहानांनी ये निमूट करावं, नाही केलं तर कारटी/कारटा वाया गेला असचं... लग्न झालं शिंग फुटले... काय काय ते... असो!
सासूलाही सुनेच्या आणि मुलाच्या आयुष्यात काय सुरु आहे हे जाणून घेण्यासाठी मौका मिळाला होता जणू...
बायका बोलत होत्याच तर आकाश घरात शिरला, आणि काकू आता त्याला बोलू लागली,
“काय रे, नातवाच तोंड दाखवणार आहेस की नाही? पाय बाबा आजकालच्या जमान्यात तुम्ही लोकं मोठी बायको करता. काय असल रे हीच वय.?”
“काहून व काकू, माह्या येवढीच हाय ते...”
“अरे म्या म्हणतो, लहान बायको असली की पोरं लवकर होत्यात...”
“तुले काहून एवढी घाई व, आता तर माही वाली पहिली दिवाळी हाय... मीचं लहान हाय अजून... अन जेव्हा होयल ना तेव्हां सांगू तुले...”
काकू आता चिडली, म्हणाली,
“तुह्याशी बोलणं म्हणजे ना, स्वताच्या पायावर धोंडा मारणं...”
मग तिचा मोर्चा परत उर्वीकडे आला, जवळ आली, गालाला हात लावत मुका घेतला तिने, म्हणाली,
“आईकडे गेलतीस काय व पोरी...”
उर्वी अवघडत म्हणाली,
“नाही जायचं आहे आता, इकडेच आलो आधी आम्ही.”
“जाय बाई, जरा समजूतदरीच्या चार गोष्टी सांगल तुले तुझी आय, बाईची जातं आहेस, मायवाल बोलणं समजलं असल तुले. म्या काय तुझं वाईट चीतणार नाय, पण अनुभव बोलला पोरी, काय ते लवकर पाय नाहीतर आपल्या राकेशच्या बायकोसारखं होईल...
उर्वीने तिचा हात पकडला, “कोण राकेश?”
“आव तो, तुझ्या लग्नात लय नाचत होता ना. तो?”
उर्वीने आकाशके बघितलं, आणि म्हणाली,
“नाही मी नाही ओळखत”
“जावूदे, ओळख महत्वाची नाय, पण त्याची बायको बी तुझ्या सारखी काय ते B E हाय, नौकरी करत होती. पोर नाही पाहिजे म्हणून गोळ्या खात होती. आता लाग्नाले पाच वर्ष होत्याल, आता त्यायले पोर पाहिजे पण काही गुण नाही... रडत होती आली होती तवा. म्हणून म्या तुले बोलली बाई. बाकी तू आणि तुह्या नवरा...”
उर्वीने स्मित हास्य दिलं, जरा आकाशकडे बघत होती, तर त्याने टेन्शन घेवू नकोस असं इशाऱ्यात बोलून सांगितलं. काकू निघून जातांना परत कानाशी आल्या,
"तू तयार असशील तर माह्या ओळखीची बाय आहे एक, लय लोकाले गुण आला हाय."
उर्वीस्मित हसत म्हणाली, "मग त्या ज्यांना होतं नाही आहे त्या गेल्या नाही का तिकडे."
"हुम्म, जावूदे, माह्या लेकीसारखी आहेस म्हणून म्हटलं तुले, जाय माय सुखी राय..."
त्या निघून गेल्या होत्या. आणि उर्वी आईकडे जाण्याच्या तयारीला लागली होती.
तसा तो विषय तिथे संपला होता. कारण सासू कधीच मनमोकळेपणाने बोलत नसायची. आकाशला उगाच वाद नको असायचा आणि उर्वीने मनात असूनही सासूशी अंतर ठेवलं होतं. अवघ्या काही महिन्यात तिच्या मनात धास्ती भरली होती, कि आपण काही बोलायचं आणि सासूने उगाच त्याचा अर्थ नको त्या पद्धतीने काढायचा आणि मग आकाशला सांगून दोघामध्ये वाद व्हायचा. तसा आकाश आईचं सगळच मनावर घेत नव्हता पण शेवटी मुलगा होता, तिच्यासाठी त्याला काही तरी मनावर घ्यावं लागत होतच ना!
आयुष्याच्या वळणावर त्याला आता त्याच्या करिअर सोबत उर्वीच करिअरही म्हत्वाच होतं, मग तो हा विषय जेवढा टाळता येईल तेवढा प्रयत्न करायचा.
उर्वीने असं काही मनात ठरवलं नव्हतं, तिच्यासाठी आयुष्य जसं वळेल त्यात तिला स्वतःला शोधत स्वतःच अस्तित्व उभं करायचं होतं. नवीन विचारांची आणि स्वाभिमान जपणारी, स्वतःला आणि प्रेमालाही सिध्द करण्याची गुर्मी तिच्यात विराजमान होती. आपण कुठेच मागे पडू नये ह्या विचाराने मनातच शर्यत सुरु होती तिची, मग कुणी असं बोललं कि हमखास तिच्या मनाला नाही म्हटलं तरी लागायचं.
पुढचा भाग लवकरच ....
पुढचा भाग लवकरच...
कथा आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा, तुमची प्रतिक्रिया अनमोल आहे.
संपूर्ण कथा मालिकेची लिंक - कथेचे प्रकाशित झालेले सर्व भाग इथे आहेत.
-उर्मिला देवेन
-उर्मिला देवेन
0 Comments