बीइंग नारी... भाग ७

 बीइंग नारी... भाग ७ 

--------------


आधीचा भाग इथे वाचा भाग ६

आकाशने मावस भावाची गाडी आणली होती आणि दोघेही उर्वीच्या माहेरी निघाले.

इकडे स्वागत झालं, चहा नाष्टा झाला, प्राथमिक चौकशी झाली, जरा सध्याच्या राजकारणावर गप्पा झाल्या.

अजून काय होणार होतं... वर वर सारं सुरेख होतं...

खरच तर आहे, वर वर दिसणारी नाती पोकळ असतात आणि हे ज्याचं त्यालाच माहित असतं... ती पोकळी भरून निघावी म्हणून कुणी फारसा प्रयत्नही करत नसतं,

सर्वाना प्रिय असतो तो त्यांचा मान... 

अहो इथेच येते अभिमान!

गरज त्या प्रेमात उडणाऱ्या फुलपाखरांना असते, गरज नाही म्हणता येणार बस सिध्द करायचं असतं की आपली निवड यौग्य.... तेवढीच धडपड सुरु असते दोन जीवांची...

निवांत भेटला, उर्वी, आई आणि बहिणीसोबत गप्पा करत बसली होती.

तशी उर्वी तिच्या आईला आणि बहिणीला चांगलीच माहित होती, ही काही लवकर चान्स घ्यायची नाही हे त्यांना माहित होतंच. मग तसा विषय इकडे नव्हता. उलट उर्वीची Mtechची परीक्षा जवळ होती. आणि आता ती कशी मॅनेज करणार हे आईला जाणून घ्यायचं होतं.

“काय ग उर्वी, कसं जमणार तुला परीक्षेला यायला? क्लासपण तू फारसे केले नाहीस. प्रक्टीकॅलच वगैरे काय? ती टाकलं सर्व वाऱ्यावर?”

उर्वी काकुच्या विचारत होती, त्याचं विचारात म्हणाली,

“करू आता जसं जमेल तसं? आता काय इकडेच तर येणार ना मी.”

आई पटकन येवून जवळ बसली,

“काय ग काही गोड बातमी आहे का?”

आता उर्वी पटकन भानावर आली,

“नाही ग तसलं काही नाही अजून. परीक्षा आहे ना, मला इकडे यावं लागेल, इथूनच परीक्षा देणं सोपं राहिल म्हणून म्हणाले..”

आई बहीणीकडे बघून हसली,

“असं होय, पण काय ग, नाही झालं तुला जे करायला आणि मधात काही राहिलं तर?”

“तसं कसं राहिल?”

उर्वी सहज बोलली, आणि मग आकाशने तिला काही कामासाठी बोलावलं.

ती जाताच आई लहान बहिण राणीला म्हणाली,

“बघितलं, ही काही चान्स बिन्स घ्याची नाही, गोळ्या बिळ्या घेत असावी. जावूदे, आजकालच्या मुली, करिअर महत्वाच... बर आहे बाई.आपल्याला काही हरकत नाही. पण आई म्हणून वाटते, पुढे मागे पुरषांची जात बदलली तर काय, जेवढ्या लवकर बंधन गळ्यात पडलं तेवढं चांगल."

जरा शांत झाली, म्हणाली,

“बरोबर तर आहे. स्वतःच्या पायावर उभं असावं स्त्रीने, मुलं काय म्हणेल तेव्हां होईलच, आता तिला तिचं काय ते करू दे. पण तरीही आपलं वाटतं लोकांच बघून ना, उगाच नाही नाही म्हणत राहिलो की कायम नाहीच होते मग... तसं होवू नये बाबा माझ्या लेकीचं, कितीही झालं तरी लेक तर माझीच आहे.”

तेवढ्यात राणी बोलली,

“आई सर्वांचं नसते ग तसं, तू येवढा विचार करू नकोस. ती करते तिचं बरोबर. हुशार आहे ती.”

“हो, आता तेच ना, बघून घेतील त्यांचे ते, तसंही असं घडायला उत्तम एकांत लागतो, मनात मोकळेपणा हवा असतो, हे तर सासूला सोबत नेवून कुठले दिवे लावणार कोण जाणे... काय ती पौर्णिमा काकू बोलत होती ना, हिच्या सासरची, हिची सासू पार गावात वाईट बोलते हिच्याबद्दल... काय म्हणावं बाई, आपलाच दाम खोटा...”

“आई, तसं नाही, ताई खुश आहे हे नाही का म्हत्वाच, बाकीच काय?  आणि बाकीच्यांचं काय! तीची सासू काय अडाणी बाई, तिला कुठे हिची किंमत कळायची.”

आईने सुस्कारा दिला आणि म्हणाली,

“नवऱ्याला जरी कळाली ना तरी खूप, नाहीतर हे असले लोकं बायकोला पाण्यात बघतात, आपण आपल्या पोरीला काहीही बोललो तर आपण वाईट व्हायचो त्यापेक्षा जा बाई तुझं तू बघ...”

परदा जरा हलला, राणीने आईला इशारा केला, उर्वीने सारं ऐकलं होतं, ती परदा सारून खोलीत शिरली, रागातच म्हणाली,

“विचार तर करून बोलत जा, समोर सर्व ऐकायला येत होतं ना.”

आईने विषय मोडला. उर्वीनेही टाळला... पण माहित होतं कुठेतरी मनाच्या कुपीत गोष्टी सदा लपून बसल्या असतात बसं उत्तम संधीच्या शोधात.

रात्र झाली होती, जेवण मजेत झाली, सारे झोपायला तयार झाले होते. कुणाला काही बोलायचं  नव्हतं. वर वरची नाती वर वर गोड होतीच ना!

उर्वीने सकाळीच निघण्याची तयारी केली. ती कुठे थांबणार होती. तिला तर ओढच नव्हती माहेरची. आईचे शब्द कानात घुमत होते आणि मनाला खात होते,

“तिचं ती बघेल, लावू दिलं ना लग्न तिच्या मनासारखं, आता आपल्याला काय!”

हे शब्द वारंवार मनाच्या कप्या कप्यात घुमत होते.

उलट आकाशने मनात रेकॉर्डिंग करून ठेवलं असणार हेही तिला माहित होतं... आणि अश्या वातावरणात कुठे कधी ते वाजणार काही सांगू शकत नव्हती.

खरच एवढचं असतं का आईवडीलांच नातं? जरा मुलांनी मनाविरुद्ध काही केलं तर उपकाराची भावना मनात शिरते आणि पालकत्वाचा खून होते. लहाणपणी मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी आतुरलेले पालक इथे ह्या वळणार असे का वागतात न सुटणार कोडं आहे...

आणि हे मुलींच्या बाबतीत जास्त होतं, एखादवेळ मुलाकडले  त्यांच्या मुलासाठी शांत होतीलही पण मुलीला मुलीकडे सहन करावं लागतं... कदाचित ह्या उलटहि कुठे असेल... पण स्त्री म्हणून तिला सगळं सहन करतच रहावं  लागतं...

बीइंग नारी सहन करणं भारीच जातं पण तीच तर तिची खासीयत असते स्त्री म्हणून...

 

उर्वी आकाश परतले होते पुण्यात, त्यांच्या नगरीत, उर्वीची परीक्षा होती. ती अभ्यासाला लागली होती, इकडे आल्याने उर्वीने तिच्या आधीच्या नौकरीचे पफ फंडाचे पैसे काढले होते. मग महिन्याभरात काही रक्कम देवून लोनवर आकाशला सॉफ्टवेअर शिकण्यासाठी लॅपटॉप लागतो म्हणून त्यांनी तो घेतला.

महिना लोटला होता, आणि परीक्षा जवळ होती, आकाशने आईला बोलावून घेण्याचा निर्णय घेतला, योग्य होता, आकाशच्या जेवणाखाण्याच उर्वी नसतांना बघणार कोण होतं.

पण आकाशच्या आईने भलतेच ग्रह तयार केले होते, मुलाने तातडीने बोलावलं म्हणजे गोड बातमीच असणार असचं काहीसं होतं ते, आता तिची बुद्धी तेवढीच काम करत असणार ह्यात नवीन काय.

आकाशने आईची येण्याची सोय एका मित्रासोबत केली होती. ती पुण्यात पोहचली होती, आणि तिला सारं काही कळालं, कदाचित मनाला त्रास झालाच असेल तिच्या, पण काय करू शकत होती. सोबत आणलेलं सारं काही तिने सोबत तसंच ठेवलं, मोकळेपणा तर नव्हताच नात्यात, होती ती उपकाराची भावना, हिला स्वीकारलं मग माझा मान मोठा...

आठवड्याभरात उर्वी आईकडे निघाली, तसं तेही सासूला पटलं नव्हतं, पण बोलून करणार काय.

महिनाभर माहेरी राहून उर्वी पुण्यात होईल तेवढ्या लवकर परतली, आल्या आल्या तिला नौकरीच्या ऑफर मिळाल्या. पुण्याच्या एका मोठ्या कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून नौकरी उर्वीने पत्करली.

आता दोघांना नौकरी होती. पैश्याची आवक वाढली होती, आकाशने बाईक घेतली. घरात हळूहळू सामान वाढत होतं. आनंद होता. लग्नाला वर्ष होतं आलं होतं. आता नौकरीच्या ठिकाणी बायकांमध्ये ह्या गप्पा होतं असायच्या, उर्वीने आता चान्स घ्यावा म्हणून सांगणाऱ्या तिच्या सोबत काम करणारा महिला वर्ग वाढला होता.

त्यातच उर्वीच सीलेक्शन रोबोटिक टीमसाठी झालं, तिला खूप आनंद झाला होता, आता रोबोटिक्स तिला शिकायला मिळणार होतं. तिच्या करिअरसाठी उत्तम होतं. आलेली संधी जावू द्यायची नव्हती. जणू तिच्या स्वतःला सिध्द करण्याची ओढ आता निर्माण झाली होती. आकाशची साथ होतीच मग मागे वळणे नव्हते.

त्या दिवशी आईला तिने फोन केलेला, तसा तिला तिच्या आईने स्वतःहून कधी फोन केला नव्हता.

लव मॅरेज हो, पंधरा दिवस जरी झाले ना तरी कुणाचा फोन तिच्यासाठी येत नव्हता... काय विचित्र वागणूक असते असते ना, दोन दिवस जरी मुलीचा फोन आला नाही म्हणून सरळ सासरी जावून चौकशी करणारे आईवडील आहेत हो, पण लग्न अरेंज हव ना त्यासाठी.

असो, उर्वीने फोन लावला, आई म्हणाली,

“चला, आली का आमची आठवण, कधी कधी लावत जा ग इकडे ही ऐक कॉल...”

उर्वी काहीच बोलली नाही, आनंदात होती, सांगितलं तिने,

“अग मी जरा बिझी होती, माझं रोबोटिक्स टीम मध्ये कॉलेजकडून सिलेक्शन झालं आहे. मग वेळ नाही मिळाला.”

“अरे व्हा, मग कधी आणताय छोटा रोबोट पण. आता वर्ष होईल लग्नाला, तुझ्या मागून मुलींचं लग्न झालं आणि त्या परत माहेरी आल्याही. तू आली होती तेव्हां किती लोकांनी विचारलं होतं मला, सांगितलं, तिची परीक्षा होती म्हणून. पण आता मनावर घे, लग्नाला वर्ष होईल तुझ्या पंधरा दिवसांनी...”

आईच्या बोल्यात उत्साह आणि आनंदापेक्षा काळजी होती पण उर्वीला ते बोलणं लागलं होतं.

हो नाही उत्तर देत तिने फोन ठेवून दिला.

खोलीत अभ्यास करत असणाऱ्या आकाशजवळ येवून ती बसली, तर आकाश म्हणाला,

“तुझ्या आईला फोन केला होतास का?”

“हो, तुला कसं माहित.?”

“तुझ्यासोबत रहातो मी, तेवढं ओळखतो, जावूदे, मला तुझ्याशी महत्वाच बोलायचं आहे.”

“आकाश मलाही बोलायचं आहे आता...”

“तू काय बोलणार आहेस मला पुसटशी कल्पना आहे, पण आता ते महत्वाच नाही... तुला माहित आहे तुझे आई बाबा आपल्याशी असं तुटक का वागतात, कारण त्यांना विश्वास नाही, तुझ्या माझ्या नात्यावर, माझ्या कर्तुत्ववार, माझ्यावर, मी पुढे काहीच करू शकणार नाही असं वाटतं त्यांना…”

“आकाश, तसं नाही रे...”

“हुम्म्म, पण तसचं आहे... तुला काही कळायचं नाही..”

“मला कळते आकाश, उगाच काहीही बोलू नकोस त्यांना, तुझी आई पण काही कमी नाही. तिला कुठे माझ्यावर विश्वास आहे. सारखी पाण्यात बघते मला.”

“आता माझी आई कशी आली इथे?”

“आली म्हणजे, ती आहेच ना मधात, तू कसा तिचं ऐकतोस.”

“उर्वी, जास्त बोलू नकोस, आता मी तिचं काय ऐकलं असं तुला वाटते.”

“सर्वच ऐकतोस, बाळ आहेस तिचा अजूनही...”

“बऱ मग काय हरकत आहे, अहो मी, निदान आहो म्हटलं, तुझं काय, तुला मुलगी तरी समजतात काय ग ते!”

“आकाश मी त्यांची मुलगीच आहे, तू नाकारू शकतोस काय?”

“नाही, पण त्यांनी नाकारलं ना..”

“तुला बोलले ते?”

“म्हणाले ना, तुझं तू बघ, आम्ही लग्न लावून दिलं. असं कुणी बोलतं काय ग, स्वतःच्या मुलीला... बघू ना तुला बहिण आहे अजून.”

“आता तिचं काय, आणि ते बोलले म्हणून काय मी त्यांची मुलगी नाही...”

“मी कुठे नाही म्हणतो, तू आहेस ना, हे काय इथे माझ्यासमोर त्यांच वकिलीपत्र घेवून उभी आहेस.”

“मग तू काय तुझ्या आईला तोंडावर पाडत आहेस, तू तर तिच्यावर काहीच येवू देत नाहीस.”

“नकोच बोलूस माझ्याशी.”

ती धस्कन बोलून खोलीतून निघून गेली. रडत राहिली. आकाशही खोलीत बसून राहिला, रात्र खूप झाली होती, रात्रीचे अडीच वाजले होते.


पुढचा भाग लवकरच... 

कथा आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा, तुमची प्रतिक्रिया अनमोल आहे.

संपूर्ण कथा मालिकेची लिंक - कथेचे प्रकाशित झालेले सर्व भाग इथे आहेत.

-उर्मिला देवेन


Post a Comment

0 Comments