बीइंग नारी... भाग ९
जेव्हा आई होणं अवघड होते... © उर्मिला देवेन
लग्नाला वर्ष झालं होतं त्या दिवशी, दोघींनी जोडीने सकाळी आईचा आशीर्वाद घेतला. आणि ऑफिससाठी निघून गेले. त्यांच ठरलं होतंच, दोघेही लवकर येणार होते.
उर्वी ऑफिस मध्ये असतांना तिच्या आईचा फोन आला,
“अग, वर्ष झालं तुझ्या लग्नाला, असं वाटतं की मी आजचं ओरडत आहे तुझ्यावर कि कर तयारी म्हणून..."
"हो ना ग, खूप लवकर दिवस गेलीत ना..."
"लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा... आम्हा सर्वांकडून... "
"खूप खूप धन्यवाद ग, हो ना, कसं पटकन गेलं हे वर्ष.”
“हो ना, आता पटपट गोड वार्ता येवू द्या, कसं आहे ना उर्वी नातं मजबूत होतं ग...”
“हो ग, पण मला स्वतःलाही खूप काही करायचं आहे ना...”
“हो, सोबत तेही, काय. आमचं काम बोलण्याचं, बाकी मग आज कुठे पार्टी... काय ग आजही ऑफिसमध्ये?”
“नाही ग, जरा आले होते मिठाई वगैरे वाटली, आता निघेल घरी, मग जावू आम्ही कुठेतरी...”
“काय ग, तुझी सासूपण आहे ना तिकडे! काय बाई, पोरांना एन्जॉयपण करू देत नाही ही बाई, कशाला जायला हवं होतं... तुम्ही आजकालची मुलं, कसं मोकळं हवं असतं, आमचा काळ नाही ना हा की घरात सतरा लोकं, तरी वर्षात पाळणा हलणार... दहा कामाचे तुम्ही, मग एकांत नको.”
“आई, ती आली तशी जाईल, जावूदे असेल तिचं काही नवल. पण आम्ही केलाय बेत, जाणार आहोत दोघेच...”
ती मिश्कील हसली, सुखावली होती लेकीच्या शब्दाने,
“मग, काढला का मार्ग,... जा जा, मजा, मस्ती करा, हेच दिवस आहेत. मग काय मुलं झाले कि काही करता येत नाही... जावयांना सांग आठवण केली म्हणून... करू आम्ही फोन संध्याकाळी...”
आईने हसत फोन ठेवला. उर्वीने स्वतःला आवरलं आणि निघाली हाफ डे घेवून.
आकाश नेहमीच्या ठिकाणी तिला घायला उभा होताच. दोघेही घरी आले, तयार झाले, आकाश आईला म्हणाला,
“आई, माझा लॅपटॉप जरा काम करत नाही आहे सकाळपासून, मी जरा जावून येतो. मग संध्याकाळी आपण बाहेर जावू जेवायला.”
आईने होकार दिला, तर हळूच म्हणाला, “उर्वीला घेवून जातोय. आजच्या दिवस तरी तिला कसं ऐकट ठेवू. पण तू तयार राहा.”
आताही आईने होकार दिला. दोघेही गुमान गप्प निघून गेले. मस्त फिरले. लॅपटॉप सर्विस सेंटरला दिल्यानंतर दोन तास होते त्यांच्याकडे. दोघेही पुण्याच्या शनिवार वाडा परिसरात घुमले. जरा उर्वीने शोप्पिंग केली. दुकानात असणारे लहान मुलांचे कपडे बघून उर्वीला कसं मस्त वाटलं, मग तिने त्या कपड्यांना बघत मनाला तजेलं केलं.
त्यात आकाश म्हणाला, “अग आलोच आहोत तर माझ्या मित्राच्या मुलासाठी घे ना काही... तीन महिन्याचा आहे, असा बोलला तो, आपल्याला सगळ्यांना बोलावलं आहे त्याने ह्या रविवारी जेवायला.”
तिने एक ड्रेस काढला, समजतही नव्हतं. मग दुकानदारा विचारून तिने तीन महिन्याच्या मुलाचा सुंदर ड्रेस घेतला. तिचं लक्ष समोर असणाऱ्या मोठ्या बॅनरवर पडलं, एका मोठ्या डॉक्टरच्या हॉस्पिटलची जाहिरात होती.
लिहून होतं, “द बेस्ट ट्रीटमनेट फॉर इनफर्टिलिटी, आजच संपर्क साधा.”
जरा वेळ गोंधलली, विचारात प्रश्न तिलाच पडला,
“किती लोकं येत असतील?”
तेवढ्यात आकाश ओरडला,
“काय ग, चल, फोन आलाय. लॅपटॉप तयार आहे. निघायला हवं.”
नंतर लॅपटॉप घेताला. गाडी घेवून सिग्नलवर होतेच तर आकाशच लक्ष समोर लागलेल्या दानिण्याच्या पोस्टरवर पडलं, आणि त्याने गाडी दागिन्याच्या दुकानासमोर लावली,
“काय रे, काय घायचं आहे आपल्याला?” उर्वी गाडीवरून उतरत म्हणाली.
“उर्वी, लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. काहीतरी घेवूयाना आठवण म्हणून, पैसे आहेत ग आपल्याकडे थोडेफार.”
उर्वी हसली, दोघही आत शिरले, भल्या मोठ्या दुकानात एकमेकांनी हात घट्ट पकडले. भीत भीत त्यांनी हलक्या सोन्याच्या बांगड्या घेतल्या. उर्वी जाम खुश झाली.
काय त्या दीड तोड्याच्या बांगड्या! जेमतेम १२ हजार रुपये तोडं होतं सोनं. तरीही दोघे जाम खुश होते. उर्वीने स्वतःच कार्ड वापरलं, आणि काही पैसे आकाशने दिले. पहिल्यांदा सोनं घेतलं होतं. स्वतःसाठी, स्वतःच्या पैश्याने. जाम खुश होते दोघे. आनंदात घरी आले.
आल्या आल्या, आकाशने आईला तयार व्हायला सांगितलं. आणि तो उर्वीच्या मागे खोलीत गेला. उर्वीने किचन बघितलं तर आई अजून जेवल्या नव्हत्या, तिने हळूच आकाशला सांगितलं. तो आईकडे गेला.
“आई, काय, जेवली नाहीस? “
तिने काहीच उत्तर दिलं नाही, आकाशला वाटलं जावूदे, नसेल जेवायचं, तो परत म्हणाला,
“कर बऱ लवकर तयारी, जावूया आपण लवकर जेवायला.”
आणि त्याने आनंदात उर्वीसाठी घेतलेल्या बांगड्या आईला दाखवल्या,
“आई बघ, उर्वीसाठी, पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाची आठवण म्हणून...”
आईने बघितल्या आणि, छान आहे म्हणत तिने समोर ठेवून दिल्या. आकाशनेही उचलल्या आणि घेवून उर्वीला घालण्यासाठी आग्रह करत मिठी मारत खोलीत तिला बिलगला. दोघेही मिठीत मग्न होते, हळूहळू आकाशचे ओठ उर्वीच्या ओठांवर कधी आले आणि सारं अमृत प्याले त्यालाही कळाल नाही, मिठीत दोघेही बेधुंद होते. तोच रडण्याचा आवाज आला, उर्वी म्हणाली,
“आकाश, आई रडत आहे का?”
तो अजूनही उरविला घट्ट मिठी मारून होता, त्यातच म्हणाला,
“नाही ग, ती तयार होतं आहे... आताच बोलून आलो मी.”
उर्वी परत म्हणाली,
“नाही आकाश त्या रडत आहेत. बघ ना आवाज येतोय.”
आकाशने उर्वीला सोडलं आणि तो आईच्या खोलीकडे गेला, ती बॅगचं सामान काढून रडत होती. त्याला काहीच कळत नव्हतं, तो जवळ आला,
“काय ग झालं, बॅगचं सामान का काढून फेकत आहेस. साडी नाही का तुझ्याकडे.”
आणि त्याने उर्वीला आवाज दिला,
“उर्वी तुझी एखादी नवीन साडी घे तर, तशीही तू कुठे घालतेस. आणि तू मला जीन्सवर मस्त दिसतेस, काय ग...”
आई अश्रू पुसत म्हणाली, तिचा स्वर बदलला होता.
“नाय पाहिजे मले तिची साडी... अन काही बीन नाही पायजे, घे तिलेच, तुह्या घर राखाले आलो का इथ... नाही, मले दिवसभर एकटीले घरी ठेवता अन दोघंबीन फिराले जाता, मले काय पागल समजून राहिले काय... दोघ मस्त सोबत जेवता, मले एकटीले देता, तू उशिरा येतस मग बायकोच्या खोलीत राहतास, मी काय कुत्री हो... अन्न टाकून देता एका ताटात अन तुम्ही सोबत हासत हासत जेवता...
देवा काहून असे दिवस आले माह्यावर, म्या कष्ट केले अन बांगड्या हिले...”
ती दात ओठ खाऊन बोलत होती... हाताने बोटं मोडली तिने, आकाश उभाच झाला, उर्वी दारात उभी राहून शून्य झाली होती.
आई ओक्साबोक्शी जोरजोरात रडत होती. आकाश ने तिला गप्प राहायला सांगितलं,
“आई गप्प हो, इथे माझी थोडशी इज्जत आहे. शेजारी पाजारी काय म्हणतील...”
“हो रे माझी त नायचं ना कायबीन.... आता बायको केली मग माही काय फिकर तुले... तुही वाली इज्जत तुले, एवढ्या कसता मी खाल्या अन...”
“आई जास्त होतं आहे... अन तिने तिच्या जमा पैश्यातून त्या बंग्याड्या घेतल्या आहेत. माझ्या नाही...”
“अरे देवा, आता काय बोलू मी...”
“तू फालतू बोलून राहिलीस व, तुले ना अक्कल नाही...”
“हो ना, आता तुले अक्कल आली. बायको आली म्हणून. पहिले तुले नव्हती का? आता बायको आली नवीन माय बाप आले.”
“आई, माझ्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. तू दिवस खराब करू नको, काहीही बोलू नकोस.”
“अरे माह्या देवा, मी काय करतो तुम्हाले... माह्या एकटा जीव...”
“मग काय आहे हे..”
“काय मंजी, माह्या जीवाचे हाल हायती... नवरा नसे अन पोर बी मेली... पोरगा काय मले होयल... त्याले त नवीन भेटलं सारं.”
“आई मला बाहेर जायचं आहे, तू येतेस ना…”
“काहून येवू मी, तुह्या लायकीची ना कायची.. तुह्या गाडीवर तरी बसवलास काय मले आलो तवापासून...”
आकाश खोलीतून निघून गेला... उर्वीही त्याच्या मागे गेली.
दोघेही खोलीत गप्प बसून होते...
काही वेळाने, आकाशने उर्वीची माफी मागितली,
“उर्वी, सॉरी यार, पहिला वाढदिवस आणि तोही असा संपत आहे... भूक लागली आहे. आता आपण बाहेर गेलो तर ही अजून काय करायची काही माहित नाही. बाहेर तमाशा नॊकच आणि जेवलो तर अजून काय म्हणेल माहित नाही...”
तो हात जोडून उभा होता, उर्वीला कळत नव्हत, तिने असं पहिल्यांदा बघितलं होतं, मनात नसतांना ती बोलली,
“कशाला आली रे तुझी आई, हे करायचं होतं म्हणून आली ती, समजते का तुला...”
आकाश आधीच रागात होता, उर्वीच्या शब्दाने अजूनच भडकला, रागात तो परत आईकडे गेला, म्हणाला,
“कशाला आली ग तू? हे हे कराच होतं ना म्हणून आलीस... स्वतः च्या आयुष्यात सूख बघितलं नाही मग मुलाला कसं बघू देशील... "
त्याने रागात जेवण वाढून आणलं, आईलाही ओढलं.
“जेवली नाहीस दिवसभर, आणि तिकडे गावात गेल्यावर सांगशील कि जेवायला देत नाही म्हणून, घे जेव आता...”
त्याने तिला परत ओढलं, ताटासमोर बसवलं, तो परत रागात म्हणाला,
“जेव म्हटलं ना... जेव माझ्या समोर...”
उर्वीला खोलीत कसंतरी झालं, उगाच आपण बोललो असचं तिला वाटत होतं, ती लगेच आली,
“राहूदे ना आकाश... जावूदे...”
“काय जावूदे ग, अशी असते का आई, अरे मुलाने बायकोसाठी... नाही, नाही तसं नाहीच, बायकोने तिच्या कामाईतून वाढदिवसा निमित्य काही घेतलं तर ही फुगून बसणार... हिला कळत कसं नाही माझी नाही आहे लायकी अजून...”
“जावूदे ना आकाश,,,, तू ये इकडे... आपण नाही जावूया...”
उर्वीने आकाशला ओढलं... खोलीत घेवून गेली. दोघेही गप्प बसून होते, उर्वीच्या आईचा फोन आलेला. फोन वाजत राहिला, पण तिने उचलला नाही. आकाश गप्प होता. उर्वी नाराज झाली होती... शेवटी उर्वीने आकाशला मिठी मारली, बारा वाजणार होते, म्हणाली,
“जावूदे, कुणी कुणाचं नसतं आकाश, आपल्याला समजून घेणारं अजूनतरी पैदा झालं नाही कुणी... ना तुझी आई ना माझी आई... आता आपणच आपले आई बाप आणि सर्वकाही... लग्नाच्या प्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा नवरोबा...”
आकाश जरा हसला, आणि मग प्रेमात तुझ्या माझ्या ही दुनिया रे कैसी ह्या विचारात दोघेही ऐकमेकांच्या कुशीत शिरले...
0 Comments