बीइंग नारी... भाग १०
जेव्हा आई होणं अवघड होते... © उर्मिला देवेन
.............................................................
त्या दिवसा पासून उर्वी अजूनच अंतर ठेवून राहत होती सासूपासून. आकाश मात्र बोलायचा, त्याला बोलणं भाग होतं. आई होती त्याची. पंधरा दिवसांनी सासूबाई गावी निघून गेल्या. आकाशनेही कॉलेजची नौकरी सोडली आणि जोमात अभ्यास सुरु केला. रोज मित्रांकडे जाणं, प्रोग्रमिग शिकणं, इंटरव्ह्युची तयारी करणं सुरु झालं होतं. उर्वी तिच्या जॉब मध्ये मग्न होती. त्या दिवशी अचानक कॉलेजमधून परत येतांना तिच्या लक्षात आलं, ह्या वेळी दिवस जास्त झाले होते. पाळी अजून आली नव्हती... आणि तिने भराभर घर गाठलं. आकाश घरी अभ्यास करत होताच, त्याला बिलगत म्हणाली, आकाश तुला सांगू
“सांग ग, आणि चहा ठेव ना, मी ठेवणार होतो ग पण वेळेचं भान राहिलं नाही...
उर्वीने तिची बॅग आणि आधी चहा ठेवला, चहा सोबत सांगूया म्हणून तीही गप्प झाली, तर आकाश किचन मध्ये आला, म्हणाला,
“उर्वी मला इंटरव्ह्यु आलाय, पुढच्या आठवड्यात आहे, इथे झालं ना तर एकदम ४०००० पगार असेल आणि विदेशात जाण्याची संधीही... म्हणून जरा जोरात तयारी सुरु होती, सॉरी ग, तुझ्या येण्याची वेळ लक्षात आली नाही माझ्या. मी आलो असतो तिकडे तुझ्या बस स्टॉप कडे.”
उर्वीने चहाची कप भरली, आणि घेवून हॉल मध्ये आली, म्हणाली,
“ मग अभ्यास कर...”
चहाचे सिप घेत म्हणाली,
“आकाश, ह्या वेळी पाळी आली नाही रे अजून, आठ दिवस जास्तच झाले...”
आकाश हळूच म्हणाला,
“हुम्म, थांबू ना जरा, मग जावूया डॉक्टरकडे, नाहीतर मी ते कीट घेवून येतो घरी…”
मग ती हळूच म्हणाली,
“ये बाळ असेल काय रे?”
“असेल तर मस्तच ना, पण विचार करू नकोस उगाच, गुंतलीस ना की त्रास होईल. मी जातोच ना घेवून येतो कीट.”
त्याने चहा संपवला, शर्ट घातलं, चप्पल घालणार होताच तर उर्वीकडे आला,
“उर्वी, काय आणू आज, कि बाहेर जायचं जेवायला...”
“नको रे...”
“सांग ना ग, नको करू स्वयंपाक, तसंही आज तुला माझं ऐकायचं आहे. मी खूप तयारी केली आहे. कोण घेणार माझं...”
“बऱ, मग चायनीज घेवून ये... “
तिने पाकीट हातात घेतलं, आकाश म्हणाला,
“उर्वी आहेत माझ्याकडे.”
तरीही तिने पाकीट त्याच्या हातात ठेवलं...
“तुझं टॉनिक पण आण सोबत, माझ्यासाठी जूस आण...”
आकाशला जवळच्या कुठल्याच केमिस्टकडे कीट मिळालं नाही. तो तसाच परत आला. दोघांनी पार्टी केली... उर्वीने त्याचा अभ्यास घेत इंटरव्यू घेतला... वेळ कसा गेला कळालं नाही...
सकाळी उर्वी आकाशजवळ बसली, तर तो म्हणाला,
“काय हे उर्वी, आता तर आपण सुरु झालंय ग, अजून वेळ आहे... चल ऑफिसची तयारी कर... नंतर केली तरी चालेलं टेस्ट, आपण डॉक्टरकडे जावू. नाहीतर मी तिकडे काळेवाडी फाट्याला जावून घेवून येईल. पण उगाच काही नसेल तर आपल्याल चूटचूट, तू काळजी करू नकोस.”
उर्वीही हसली, आणि सारं आवरून ऑफिसला निघाली, जातांना, आकाश बोलला,
“हुम्म, विचार करायचा नाही, आता तर सुरुवात आहे... आणि सुरुवात झाली की... फळ मिळणार...”
दिवस जात होते. उर्वी रोज पाळीची वाट बघत होती, पण तीही येत नव्हती, आकाशला बोलायची पण तो म्हणायचा,
“जरा उशिरा होईल, काळजी नको करूस, आणि असेल तर असेल ना...”
आता पंधरा दिवस झाले होते, आणि आकाशला चिंता वाटायला लागली होती, त्याने ती ऑफिसमधून येण्याआधी डॉक्टरांची अपॉइनमनेट घेवून ठेवली.
उर्वीही बोलत नसली तरी ऑफिसमध्ये बसल्या बसल्या विचार करत राहायची. आज तर तिने तिचा कॉम्पुटर नेटवर्कवर लावला होता, आणि फॉलिक अॅसिडच्या गोळ्यांबद्दल वाचत होती. तसं तिला काहीतरी जाणवलं, पोटात कळ आल्यासारखी झाली. जाण्याची वेळ झाली होती, बसकडे ती घाईत निघाली, तेवढ्यात मागून येवून लॅबमधल्या मॅडम म्हणाल्या,
“अग जोरात नको चालू... बस तुला घेतल्याशिवाय निघायची नाही.”
आता ती काही बोलणार ह्या आधीच उर्वीने तिची गती कमी केली.
कसं असतं ना, सुरुवातीला काहीच कळत नाही, मन भरकटत असतं, कुणाला सांगावंस वाटत नाही... उगाच मनात काहीबाई सुरु असते. इकडलं तिकडलं ऐकून मन काहीही विचार करत असते. मी जोरात चालले, माझं काही दिसलं तर नाही हीला, कशाला म्हणाली मला, हिला समजलं का... काय ते भलते प्रश्न स्वतःलाच पडतात ना, समजत नाही...
उर्वीने बस गाठली, आणि कुणाशीही न बोलता ती गुमान तिचा स्टॉप येण्याची वाट बघत राहिली. आज तिने विचारात आकाशलाही कॉल केला नव्हता.
इकडे तोही उर्वीच्या येण्याची वाट बघत होता पण त्याला तर अभ्यासात वेळेचं भान कधी राहतच नव्हतं. तोच ती घरी आली, ती येताच आकाश म्हणाला,
“अरे मला कॉल का केला नाही जवळपास आल्यावर..."
“अरे सुचलं नाही, पोटात सारखं दुखत आहे...”
“चल, तयार हो आपण क्लिनिकला जावून येऊ, इथे जवळच, उगाच कशाला ग…”
“थांब मी तयार होते.”
ती वाशरूमला गेली, आणि मग परत येवून म्हणाली,
“आकाश आता काही फायदा नाही रे जावून, पाळी आली मला... असुदे... पण जास्त झाले होते ना दिवसं?”
आकाशने दीर्घ श्वास घेतला, म्हणाला,
“ठीक आहे ना, तरी आपण जावूया... आता मी अपॉइनमनेट घेतली आहे.”
नाही, हो म्हणत, आकाश उर्वी क्लिनिकला पोहचले, जवळच होतं, डॉक्टरने नेहमीचे प्रश्न केले.
डॉक्टरने आत घेताच सोनोग्राफीला घेतलं, ती गप्प झाली...
“किती वर्ष झाली लग्नाला...”
“वर्ष झालं.” उर्वी आकाशकडे बघत म्हणाली.
“बऱ, बाळ हवय की प्लानिंग सुरु आहे?”
“म्हणजे?”
“अग, म्हणजे, लग्न आताच झालंय ना, दोन चार वर्ष थांबायचं आहे की...”
आकाश लगेच म्हणाला, “म्हणजे तसं काही नाही, बाळ लगेच हवय असही नाही..
“तसं नाही हो, आजकाल लोकं कॉपर टी बसवून घेतात. उगाच पाळीचे दिवस वाढले की मनाला धुकधुक लागली राहते.”
उर्वीने आकाशचा हात घट्ट पकडला... डॉक्टर त्यांना असं बघून म्हणाली,
“असं काही नाही... मी आता हिची सोनोग्राफी केली ना तर मला जरा जाणवलं पण आता काही नाही...
“अहो पण पाळी आली ना आता... “ उर्वी हळूच म्हाणाली
“हे बघ उर्वी, उर्वीच नाव ना तुझं.” डॉक्टर परत फाइल बघत म्हणाली.
“तुमची पहिली वेळ आहे ही हॉस्पिटलमध्ये येण्याची. आणि तुमच्या वयातील अशी करिअर करणारी कितीतरी जोडपी माझ्याकडे स्व इच्छेने कॉपर टी बसवायला येतात... त्यांना माझा नेहमी सल्ला असतो कि करू नको... पण शेवटी त्यांची मर्जी. कारण काय ना कधी कधी त्यामुळे होर्मोनलं इमबॅलेंसमुळे पाळी लांबते, आणि मग त्यांना बॅलेन्स करण्यासाठी औषधी घ्यावी लागते. मला तिचं शंका आली म्हणून मी तुला सोनोग्राफीला घेतलं, आणि तुला विचारत आहे. पण तुमचं तसं नाही म्हणता. शिवाय काही दिवस राहुन ही प्रेग्ननंसी स्वतःच सुटली. म्हणजे काही नव्हतं हेच समजा. पण आपण काही टेस्ट करून घेवूया. अर्थात तुमची हरकत नसेल तर?
आकाशने प्रश्न केला, “म्हणजे?”
“अहो, काहीही नाही, नाहीच समजायचं. असं होतं, आता तुम्ही इथपर्यंत आलात, म्हणून हे मी बोलले. पण ५० % प्रेग्नन्सी अश्या नैस्रागिक रित्या निघून जातात. आणि आपल्याला कळत नाहीत. अर्थात ह्या नसतातही. ज्या लक्षात आल्या नाही त्यांचा विचार करायचा नाही. निर्सगाचे नियम आहेत ते.”
“डॉक्टर म्हणजे मी प्रेग्नेंट होते का?” उर्वी आकाशचा हात घट्ट पकडत प्रश्न केला.
“नव्हतीच असचं समज.”
“पण तुम्ही म्हणताय ना असं...”
“बघ, आता तुम्ही दोघं मला उत्तम शिकलेले दिसता, कुणी दुसरं असतं तर मी फारसं बोलले नसते. कारण त्यांना समजवतांना वाट लागते आणि ते समजतही नाहीत. शियाव तसली लोकं दोन तीन महिन्याने इकडे भटकतात.
तुम्ही लगेच आलात, नवीन आहात. म्हणून बोलले. काळजी करू नको. मी काही औषधी देते. घ्या, आज काही टेस्ट कर आणि पाळी झाली की काही टेस्ट करवून घे.”
उर्वीचा चेहरा पडला होता. आकाश तिला नजरेने खुणावत होता. डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहीत होती, हळूच तिने तिच्या चष्म्याच्या वरच्या भागातून दोघांकडे बघितलं, स्मित हसली, लिहून झालेलं प्रिस्क्रिप्शन तिने आकाशकडे दिलं. पेन बाजूला केला, ती उर्वीला बघत म्हणाली,
“मी जरा सोपं करून सांगते, आता ज्या फुलांना फळ येतात अशी झाड तुला माहित आहेत ना.. खूप आहेत.. किती फुलं असतात, पण सारीच फळापर्यंत पोहचत नाहीत ना, काही फुलं गळून जातात, काहींची जराशी वाढ होते. काहीतर फळ नाजूक छोटसे असतांना कोमेजून जातात. काहींना कीळ लागते. काही वाकडे तिकडे होतात, आणि वाढ त्यांची खुंटते. पण काही अगदीच मोठे होतात, त्यांना काहीच होतं नाही... असचं आपलं... आता त्या झाडात काही खोट होती का. त्याने तर त्याचं सर्वकाही सर्व फुलांना दिलं. पण, काहीच फुलं अगदी सुंदर फळात रुपांतरीत झाली... आपलंही असचं असतं... फरक एवढा कि आपण त्या नसलेल्या आणि हातात न आलेल्या गोष्टीचा विचार करून स्वतःला त्रास करवून घेतो. पण कधी कधी वाटतं कि वेळेत माहित झालं तर आपण काही करू शकलो असतो... तरीही ह्या जर तर च्या गोष्टी, म्हणून मी बोलले.
पण काही हरकत नाही, होतं कधी कधी, तुम्ही टेस्ट करून घ्या, मी ह्या टेस्ट लिहून दिल्यात, इथे खाली पाथ्यालोजीमध्ये होतील. रिपोर्ट आणा दाखवायला. मग बघू आपण.”
तेवढ्यात उर्वीच्या आईचा फोन आला, डॉक्टरशी बोलणं झालं होतं, उर्वी उठली,
पुढील भाग लवकरच...
0 Comments