बीइंग नारी... भाग १४
जेव्हा आई होणं अवघड होते... © उर्मिला देवेन
.............................
लग्नाच्या वाढदिवसाच्या दोन दिवसाआधी उर्वी सर्वांचा रोष पत्करून तिकडे जपानला आकाशकडे पोहचली.
"असं म्हणतात ,नातं दोघांच असतं...
पण त्याचं नात्याला टिकवण्यासाठी
कितीतरी नात्यांना सांभाळावं लागतं....
तेव्हाच दोघांचं नातं असतं ..."
असचं म्हणावं लागेल, बघा पटलं तर...
“धुंदी त्या दोघांना होती, मन दोघांची होती,
पण... अजून बरच काही होतं,
जे काहीही नव्हतं पण खूप काही होतं...
खरच प्रेमात तिच्या त्याच्या सारी दुनियापण होती.”
उर्वीने एवढ्यात तिकडे जावू नये असं तिच्या माहेरी वाटत होतं. कदाचित ते योग्य असावं, तिच्या बहिणीच लग्न तोंडावर होतं. आणि नवीन पाहुण्यांना उत्तर देणं माहेरी कठीण होणार होतं. उलट एवढा खर्च करून आताच तिकडे गेलेली लगेच दोन महिन्यात परत यावी हे जरा कठीण होतं, पण उर्वी आणि आकाशने मनावर घेतलं होतं. कारण नाती जन्माला घातल्या जात नाहीत ना त्याला उभी करावी लागते. मोठ्यांनी पुढाकार घ्यावा लागतो पण इथे तसं नव्हतं... तुम्ही वाटेल ते करा, काय करायचं ते करा पण आमचं पूर्ण करा... कारण आम्ही लग्न लावून दिलंय... जन्म दिलाय...
इकडे सासरी हाल काही वेगळा नव्हता, त्याने त्याच्या बायकोला सोबत नेलं हेही बोलतांना कसा रोष दिसायचा ना शब्दात, हे काही वेगळं. जन्म द्यायचा आईने आणि सुख भोगणार बायको... आणि बोलणारे तर सोडूनच द्या.. हे बघणाऱ्या लोकांना काय गध्याची पण कीव येते आणि गध रिकामी नेणाऱ्या मालकावरही हसू.... जिकडे विषय वळेल तिकडे जीभं वळते....
असो,
कुछ तो लोग कहेंगे
लोगों का काम है कहना
छोड़ो बेकार की बातों में
कहीं बीत ना जाए रैना..
नाहीका?
असंच काहीस होतं दोघंच...
उर्वी सगळं तिचं सोडून तिकडे विदेशात आकाशच्या भरोसे आली होती. मनात तर तिच्याही होतं, तीही तिचं जमलेलं करिअर सोडून परत शून्य झाली होती. नवीन देशात, नव्याने परत नवीन सुरुवात करणं कठीण असतं, पण अवघड नसतं.
दोघांनी लग्नाचा दुसरा वाढदिवस सोबत साजरा केला. आकाशला हा दिवस एकटा काढायचा नव्हताच म्हणून तर सारी खटपट झाली होती ना. जगाची पर्वा न करता उर्वी त्याच्या कडे आली होती. चिंब होते दोघेही प्रेमात, स्वप्न पूर्ण होतांना दिसत होते. शून्यातून उभा झालेला आकाश आज विदेशात उर्वीसोबत लग्नाचा वाढदिवस साजरा करत होता. सारंकसं त्याच्याजवळ उर्वीच्या पावलांनी चालत आलं होतं. दोघंही हे दिवस आता जगायचे ठरवलं, तशी फेब्रुवारी मह्निण्यात जपानमध्ये खूप थंडी होती, दोघेही अंगावर गघेवून हिटर समोर बसले होते.
आकाश म्हणाला,
“काय मग, आलीस तू इथे, बघ ना आलोय शेवटी आपण...”
“हुम्म्म, सगळी तुझी मेहनत आहे रे...”
“नाही, फक्त माझी नाही, आपली आहे.”
उर्वी स्मित हसली, म्हणाली,
“मला जेव्हा अमेरिकेचं स्थळ आलं होतं ना, तेव्हां सर्वांचे चेहरे खुलले होते. आणि मी एकदम नकार दिला होता, चक्क दोन महिने घरात माझ्याशी कुणी बोलत नव्हतं... आता तेच माझे बाबा गावात छाती ठोकून सांगतात की त्यांचा जावई जपानला नौकरीवर आहे म्हणून...”
“मग, शेवटी केलंस ना तू मला तुझ्या लायकीच...”
“असं मी म्हणार नाही...”
“पण काय बघितलं होतंस ग माझ्यात असं, काहीच तर नव्हतं माझ्याकडे. ना घर, ना गाडी, ना घारण, ना मी खूप देखणा, रुबाबदार....”
“आता आहेस ना, तुला कोण ओळखू शकतो रे आता, बघ कसा मस्त दिसतोस... आपली ना दूरदृष्टी आहे.”
“असं...”
“मग मी तर तेव्हांच तुझ्यात असं तुला बघितलं होतं, आणि ठरवलं होतं, आधीच ज्याच्याकडे सर्व आहे त्याच्याशी लग्न करून काय अर्थ, अरे मजा तर तेव्हां आहे जेव्हा नवऱ्याला उभं करण्यात आपला हात असेल... आयत्या बिळात नागीण व्हयाच नव्हतं मला.. “
“अरेच्या, फसला साला हा भोळा माणूस...”
“तू... आणि भोळा? बारा गावाचं पाणी पिणारा तू ...”
“चल चलं,
“कुठे,... पाणी प्यायला?”
“अग आता जास्त झाला हा डोस... झोपू आता...”
आकाशने तिला अंगावर ओढलं, उर्वी कानात म्हणाली,
"बघ हा मी सर्व सोडून तुझ्याजवळ आली आहे...
“सात समुन्दर..
सात समुन्दर पार मैं तेरे
पीछे पीछे आ गयी...”
“हो, ना... मग ये जवळ ये लाजू नको...”
आकाश आणि उर्वी त्या दिवशी पहिल्यांदा खुलले होते, जणू आज दोन वर्षाने माधुचद्राची रात्र आली होती.
"अजून रात्र तरुण आहे.
तू अशी दूर दूर का ग,
प्रीतीचा ऋतू असतांना
घे ना जवडी जरा ग!
मिठीतही माझ्या म्हणतेस
स्वर्ग मिळतो तुला ग
मी तुझ्या समोर असतांना
तू अशी दूर दूर का ग,
"अजून रात्र तरुण आहे"
__________
महिना कसा गेला कळालं नाही. त्या महिन्यात उर्वीने ओर्कुटवर तिचे मित्र मैत्रिणी जुळवल्या, जवळपास सर्वांची लग्न झाली होती. काहीना मुलही झाली होती, काही करिअर करत अजूनही लग्नापासून दूर होत्या.
काही तर ओर्कुटवर नव्हत्याही. उर्वी रोज आठवून आठवून मैत्रिणी शोधायची, स्वतःचे नवीन नवीन फोटो अपलोड करायची. मित्र मैत्रिणीच्या फोटोंवर कॅमेंट करायची. मैत्रिणींच्या तुलनेत तिच्या मित्रांची म्हणजे क्लासमेटची मात्र लग्न अजून झालेली नव्हती. मनात विचार शिरायचा, तेवढ्या दूरू शिक्षकांची झेप घेवूनही मुलामुलीत हमखास भेदभाव तिला दिसत होता.
मुली शिकून आता संसाराला लगल्या होत्या. तर मुलं अजूनही नौकरीसाठी बाहेरगावी भटकत होते. काहींना उत्तम जॉब होता तर काही अजूनही चांगल्या ब्रेकच्या शोधात होते.
त्या तुलनेत आकाशने बरंच काही मिळवलं होतं, त्याच्या जवळचे मित्र आणि मैत्रिणी ह्यासाठी उर्वीला क्रेडिट देत होते. उर्वीला त्याचा अभिमान वाटणं साहजिक होतंच. कुठे खेड्यात राहणार आकाश आणि कुठे साता समुद्रापार प्रगत देशात स्वतःच अस्तित्व निर्माण करणार आकाश.... अंतर होतं.
मजा मस्तीत महिना गेला. आकाशने उर्वीलाही इथे नौकरी शोध म्हणून पर्याय दिला होता. तसं तिचं ध्येय आता नौकरी नव्हतं पण प्रयत्न सुरु करायचे असं तिने ठरवलं होतं. अर्थात सोपं नव्हतं ते.
त्या दिवशी अचानक आकाश त्याच्या आईशी बोलत असतांना उर्वी भडकली,
“तुला नुसता तुझ्या आईला फोन करायचा असतो. काय बोलतो एवढा. मी इथे सर्व काही सोडून आली आहे. समजत नाही तुला...”
“त्यात काय समजायचं, सर्व मुली येतात.”
आणि तो सांगायला लागला, की कशी त्याच्या मित्राची बायको लगेच आली होती. आणि बरच काही...
उर्वीला राग आला होता, रागात शब्द वाढत गेले आणि... वाद झाला...
दुसऱ्या दिवशी उर्वीला पाळी आली होती, आता ती त्याच्याशी बोलतही नव्हती. आपलं असं का होते हे तिला कळत नव्हतं. साधारण ह्याच काळात तिची चीडचीड वाढत असायची. पाळी येण्याच्या काही दिवसाआधी तिला काहीही तिच्या मनाविरुद्ध घडलं तरी तिला कसं तरी होतं असायचं आणि मग मनातली घुसमट अशी बाहेर निघायची. पाळी सुरु झाली कि स्वतःची लाज वाटायची. आपण असं का वागलो ह्याचा विचार तिला त्रास देत असायचा. माफी मागावीशी वाटायची. पण तीही हल्ली ती मागत नसायची...
कसंतरी हळूहळू बोलणं सुरु होतं असायचं. असचं काहीसं झालं त्याही दिवशीही... पाळी आली होती, प्रयत्न तर ह्याही वेळी फसला होता. उर्वीला कसं तरी झालं होतं. आकाश संध्याकाळ पर्यंत सगळं विसरला, तिला जवळ घ्यायला सरसावला, आणि उर्वी रडायला लागली,
“पाळी आली?”
आकाशने लगेच तिला सोडलं, आणि मग काही वेळाने परत जवळ घेतलं,
“जावूदे ना, विचार करू नकोस.”
“अरे आपला हानीमुन तर आता सुरु झालाय, लग्नानंतर किती दिवसानी आपल्याला एकांत मिळालाय.”
त्याच्या ह्या शब्दाने उर्वी मनातून सुखावली होती. तिचा आनंद आता चेहऱ्यावर येणार होताच तर आकाश म्हणाला,
“इथे तर आईपण नाही आता आपल्या खोल्या चेक करायला... वाटेल ते करू आपण, काय उर्वी?”
आईचं नाव घेताच परत उर्वीच्या मनात राग आला होता. पण तिचे तो गिळला. जणू आकाशचे शब्द रेकोर्ड होतं होते... भविष्यासाठी... मनात तिला वाटलं,
“मी काय आरोप करत होती काय ह्याच्या आईवर, ती तर करतच तशी होती, यालाही वेळ काळ कळत नाही जिथे तिथे आईचा विचार घुसवतो.”
रक्ताचं नातं रक्ताकडे धाव घेतं!
नाहीतरी आकाशला त्याची आई कितीही चुकीची असली तरी प्रियअसणार होतीच ना... बोलून दाखवत नव्हता पण असं बोलायला मागेही बघत नव्हता.
पण विषय उर्वीने जरा पॉज केला. समजूत तिने स्वतःच्या मनाची काढली. हवं तेवढं त्याच्या आईला बोलून मनातच मोकळी झाली. पण मोकळी खरच झाली होती का?
आपण स्त्रिया पण ना, लगेच व्यक्त झालो नाही की पुरुषाचे शब्द मनाच्या टेपरेकॉर्डरमध्ये रेकोर्ड करून ठेवतो. वेळ पडली की पुरुषांना छळण्यासाठी... नाहीका?
महिन्याभराने उर्वीच्या बहिणीच लग्न होतं. तिच्या घरचं प्रेशर वाढत होतं. तिने लग्नाला यावं असचं सर्वाना वाटत होतं. पण उर्वी काही ओढ नव्हती. घरचे सर्व तिला ती लग्नात यावी म्हणून विनंती करत नव्हते तर नवीन पाहुणे काय बोलतील ह्याची काळजी त्यांना होती. उर्वीला वाटायचं ह्या महिन्यात दिवस गेले की मुद्दाच संपला, जायची गरज पडणार नाही...
त्यात तिच्या एका मैत्रिणीशी तिचं बोलणं झालं, तिला मुलगा झाला होता पहिला, आणि ती आता मुलीसाठी प्रयन्त करत होती.
म्हणाली, “उर्वी सगळं आपल्या हातात असतं ग, पाळी संपली कि बारा दिवसांनी प्रयत्न करायचा, मी तसंच केलं. लग्नांनंतर सहा मिहीने मी ते दिवस टाळले आणि मग वाटलं नाही आता चान्स घ्यावा, बसं पहिल्याच महिन्यात दिसव गेलेत... आणि तुला सांगू, मुलगा मुलगी पण आपण ठरवू शकतो?
उर्वीला आश्चर्य वाटलं, तिने परत विचारलं,
“काय ग हे कसं... हे गणित कुठलं?”
“अग, सोपं आहे, ज्या दिवशी ओव्हूलेशन होतं त्याचं दिवशी शरीर संबंध केली कि स्पर्म फ्रेश असतात, म्हणजे मुलगा होण्याचे चान्स जास्त, पण त्याच्या आधीच्या काही दिवसापासून आपण संबंध केले तर काय ना मुलगी होण्याची संभावना जास्त असते.”
“हो, पण कसं ग?”
“अग, पुरुषांच्या स्पर्ममध्ये x आणि y असतात ना, त्यातले y जास्त काळ जीवंत राहत नाहीत. आणि x तीन चार दिवस राहू शकतात. आणि मिलन झालं तर मग मुलगी होणार ना?”
“बापरे, भारी गणित आहे तुझं, काही कळायचं नाही मला, तू तुझं सुरू ठेव बाबा.. मला मुळात नकोच ग, जेही असू देत, मुलगा मुलगी...”
“मग तर ठीकच ग, कर सुरु दहा बारा दिवसापासून.. पण मला आता मुलगी हवी, म्हणजे कसं, मुलगा मुलगी दोन्हीची हौस पूर्ण. घरचेही खुश आणि मीही.”
ती हसत होती. आणि उर्वी मनात ते गणित मांडत होती. तिचं मनात ठरलं होतं.
आता तीच काय ठरलं होतं बघूया पुढच्या भागात..
--
कथा क्रमशः
© उर्मिला देवेन
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो साभार गुगल
0 Comments