बीइंग नारी...
जेव्हा आई होणं अवघड होते... © उर्मिला देवेन
भाग १५
मैत्रिणी शशीच ऐकून आता उर्वीलाही आत्मविश्वास आला होता, तिलाही आता समीकरण मांडायचं होतं. पण मन मनात नव्हतं, तरीही तिने पक्क केलं होतं. पाळीची दिसव संपले आणि मग बाराव्या दिवसापासून तिने स्वतःला आकाशच्या स्वाधीन केलं. पुढचे दिवस वाट बघण्यात मजेत गेले. पण महिना संपत आला आणि चिडचिड वाढली.
इकडे बहिणीच लग्न वीस दिवसावर होतं, उर्वी भयंकर टेन्शनमध्ये होती, आकाशने ऑफिसमधून येताच चहा मागितला, उर्वी भडकली,
“कर स्वतः आणि पी, मी काय चहा करण्यासाठी आहे का?”
आकाशला काही समजलं नाही.
“अग बसं चहा कर म्हटल तूला, नसेल करायचा तर नको करूस.”
तिने रागात पातेलं गेसवर आदडलं,
“हो मांडते ना, आता काय तेवढंच करू शकते मी. आई वडिलांनी शिकवायचं आणि इथे चहा मांडायचं.”
“तुला काय म्हणायचं आहे. स्पष्ट बोल, सगळ्याच मुली करतात त्या काय नवीन.”
आकाशला तर कळून चुकलं होतं कि उर्वीने तिच्या माहेरी फोन केला असणार आणि तिला तिच्या आईने काही म्हटलं असणार. तोही भडकला, आणि चिडवत म्हणाला,
“केला होता का फोन तिकडे?”
“म्हणजे...”
“म्हणजे सुर बिघडला ना तुझा...”
“असं, म्हणजे आता तुला वाटतं कि मी माझ्या आई वडिलांशी बोलू नये.”
“असं मी नाही म्हणालो.”
“तसचं म्हणायचं आहे तुला.”
“उर्वी... “
“ओरडू नकोस...”
“उर्वी...”
“आणि तू तुझ्या आईला रोज फोन करतोस त्याचं काय... काय सुरु असते तेच तेच रोज बोलणं, जेवली का? झोपली का? बसली का?”
“उर्वी, माझी आई एकटी आहे तिकडे, मला करावा लागेल फोन”
“असं, मग मी काय इथे ऐकटी नसते दिसवभर!”
“मी आहे ना इथे... तिच्याजवळ कुणीही नाही.”
“मग काय ती हवी इथे?”
“मी असं म्हणालो?”
“ती म्हणत असेल ना...”
“तू गप्प हो आधी...”
“हो हो, तुला तिला फोन करायचा असेल ना.”
“उर्वी उगाच काहीच बोलू नको...”
“मी काहीही बोलते ना, अरे मी माझं सर्व सोडून आली, माझा जॉब होता, तोही सोडला.”
“मी म्हणालो होतो का?”
“तू कसा म्हणशील, मनात तर तेच होतं.”
“म्हणजे!”
“म्हणजे, तुझ्या आईने म्हटलं असेल ना, आता तिला जॉब सोडायला सांग आणि चान्स घे म्हणून. ती भडकवत असेल तुला.”
“उर्वी मी असं आईशी बोलत नाही.”
“काय बोलतोस ना माहित आहे... मीचं आपली आली इथे, माझ्या बहिणीच लग्न सोडून, तुझ्या मागे. प्रेम करते ना मी, मीचं सर्व सोडायचं, आणि हा धरून आहे अजूनही...”
“उर्वी जास्त होतं आहे... तुला जायचं आहे का लग्नाला तसं बोल. तुचं म्हणाली होतीस तुला जायचं नाही म्हणून... आपलं बोलणं झालं आधी, आपण मोठी वस्तू घेणार आहोत तुझ्या बहिणीच्या लग्नात असं ठरलं आहे ना, आणि मग तिकडे गेलोच कि आधी तुझ्या बहिणीकडे जावू असंही ठरलं ना...”
“तुचं ठरवलं ते.”
“असं...”
आणि आकाश तिकीट बघू लागला, म्हणाला,
“आता खूप महाग आहेत, तूच बोलली होतीस...”
“असं, आणि तू तर मोठ्या तोऱ्यात म्हणाला होतास, येवू लग्नाला म्हणून. काय झालं त्याचं?”
“हो, पण त्यांनी माझं ऐकलं का? मी म्हणालो होतो लग्न दोन महिने लांबवा म्हणून... इकडे सुट्या होत्या... त्यांनी मोठ्या जावयाला मान नको द्यायला हवा. इथे माझ्या ऑफिसचा सुमेध आहे ना त्याच्या सासऱ्याने तर लग्न चक्क त्याला विचारून काढलं. आणि आता तो जाईलही आणि आम्ही बघा, सात जन्मात कुणी फॉरेनमध्ये नसेल ह्यांचा तरी मान असा असतो जसे खानदानी रयीस आहेत आणि अखं फॉरेन खिश्यात घेवून फिरतात.”
उर्वी जरा वेळ शांत झाली, आकाशच म्हणणं बरोबर होतं, पण तिला कुठे शांत राहायचं होतं.
शब्द वाढले आणि गणित बिघडलं..
पाहाटे दोघेही झोपले. मग काय दुसऱ्या दिवशी ऐकमेकांचे दुश्मन…
होता शनिवार पण ह्यांना ग्रासलं होतं क्षणिक शनीदेवाने. घरात दोघेच पण बोलतील तर... उर्वीने सकाळी चहा नेवून आकाशच्या पुढे ठेवला. त्यानेही तो निमूटपणे घेतला, जणू मनात म्हणाला होता,
“चायला कालचा चहा आज सकाळी भेटला.”
गुमान येवून कप त्याने धुवून ठेवून दिला आणि परत परिस्थिती जैसे थी... उर्वीने स्वयंपाकही केला. आता जेवायचं कसं, ऐकट तर जेवू शकत नव्हतं कुणी. मग काय ताट वाढून ठेवली उर्वीने... आकाश आला आणि बसला जेवायला. जणू त्यालाही माहित होतं. तो जेवला नाही तर उर्वीही उपाशी राहिल म्हणून.... दुपार झाली, आणि उर्वीला पोटात दुखायला लागलं, ती आली होती, तसं तिने ती येण्याचं आधीच सांगितलं होतं, पण उर्वीला कळेल तेव्हां ना, तिच्या वागण्याने सारा पसारा झाला होता, आता कसा आवरायचा हा गोंधळ तिला कळत नव्हतं.
उर्वी आता एका खोलीत रडत बसली, शांत झाली होती, तिची चूक तिला गवसली होती, उगाच आपण राईचा पहाड केलाय हे लक्षात आलं होतं. पण पुढे जावून माफी कोण मागणार...
रडण्याचा आवाज झाला आणि आकाश तिकडे आला,
“हुम्म, आता काय नवीन, काही अजून आहे का बोलायचं? कि अजून सुरु करायचं?”
उर्वीला मात्र माफी मागायची नव्हती, ती रडत राहिली, शेवटी तो सॉरी म्हणून त्याच्या खोलीत गेला. आता मात्र उर्वी मनातून चिडली. तरीही बोलायचं नव्हतं. दिवस असाच गेला. रात्रही अशीच गेली. रविवार उजाडला पण काहीच देवून गेला नाही, कामापुरतं बोलणं होत होतं.
आणि दुसऱ्या दिवशी आकाश ऑफिससाठी तयार होतं असतांना त्याच्या लक्षात आलं की उर्वीला पाळी आलेली, आणि ती म्हणून रडत होती. तो तिच्याजवळ आला,
“उर्वी, सांगितलं नाही मला, जावूदे ना, कशाला विचार करतेस. खूप वेळ आहे आपल्याकडे.”
तरीही उर्वी नाराज होती, त्याचा जेवणाचा डबा तिने तयार करवून दिला आणि आकाश ऑफिसला निघून गेला. आता दिवसभर उर्वी घरी होती. ओर्कुटवर मैत्रिणींना मेसेज करण्यात वेळ गेला. नंतर त्यांच्या मुलांच्या फोटोला कॅमेट करण्यात. पण तिचं मन काही लागेना, आपल्याला का दिवस जात नाही ह्या विचारात ती आता वाहवत जात होती.
उलट मन खात होतं, बहिणीच्या लग्नाला जात नसल्याने. आणि माहेरी सांगितलंही नव्हतं, त्याचंही तिला वाईट वाटत होतं. नवीन नौकरी होती, पैसा फारसा नव्हता, आणि उर्वीला तिकडे जावून हा महिना घालवायचा नव्हता. तसंही माहेरी जाण्यात तिला काही अर्थ वाटत नव्हता. तिच्याही मनात गाठ पडली होती माहेरच्या नात्याबद्दल, त्यांनीही लग्न आकाशच्या सोयीने कुठे काढलं होतं. पण सख्या बहिणीच्या लग्नाला न जाणं म्हणजे काय, हा प्रश्न तिला मनात खात होता.
पाळीचे दिवस संपले होते, लग्नही जवळ आलं होतं. आकाशने त्याच्या आईला राणीच्या लग्नाला जायला सागितलं होतं. ती जाणार होती आणि रीतसर मोठं गिफ्ट आकाशने मित्राच्या मदतीने तिकडे मांडवात पोहचवण्याची सोय केली होती. सारंकाही ठरलं होतं. पण उर्वी जाणार नाही हे अजूनही उर्वीने तिच्या माहेरी सांगितलं नव्हतं, तिला ते सांगता येत नव्हतं, आणि जायचं तर नव्हतंच.
उर्वी आता दिवसभर इटरनेटवर प्रेग्नन्सीबद्दल वाचत राहायची. आकाश फक्त दोन वर्षासाठी तिकडे होता आणि ते दोन वर्ष उर्वीला असे गुंतवायचे होते. आजच्या युगाची नारी होती, कुठेच मागे राहायचं नव्हतं, ती नुसती बसून वाट बघत राहू शकत नव्हती, प्रयत्न करत तिला स्वतःला ते दिवस जगायचे होते. ह्या प्रवासात तिला करिअर सोडायचं नव्हतं... फक्त जरा ब्रेक हवा होता. नवीन विचाराची होती, शिकलेली होती, तिला स्वतः अस्तित्व जपायचं होतं, असं त्याचं गोष्टीत ती सारं कसं गमावणार होती.
तसंही स्वतः काही हवं असेल तर धडपडही स्वतःच करावी लागते ह्या विचाराची ती होतीच. तिला बाळ हवं होतं तेही ह्या काळात, त्याला कारणं खूप होती, त्यातलं एक म्हणजे तिचं करिअर, जे तिला वाया जावू द्यायचं नव्हतं.
तिचे प्रयत्न सुरु झाले होते. दोन महिने असेच गेले होते. आता वाट होती ती परत त्या दिवसांची... तसं उर्वीला खूप काही कळत नव्हतं, पण माने मॅडमच समीकरण तिने अंबलात आणायचं ठरवलं, तसं ती ह्याबद्दल अजूनही आकाशशी बोलली नव्हती. तिचं तिचं सुरु होतं सारं...
बहिणीच लग्न झालं होतं, सर्वांची नाराजी तिने पदरात घेतली होतीच. पण तिला पर्वा नव्हती, जिथे असून कधी फरक पडला नव्हता तिथे तिच्या असल्याने काय फरक पडणार होता हे गणित तिच्या लक्षात आलं होतं. तरीही मनात सल गोठून बसली होती.
क्रमशः
© उर्मिला देवेन
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो साभार गुगल
0 Comments