बीइंग नारी... भाग २३
“जेव्हा आई होणं अवघड होते!” © उर्मिला देवेन
--
उर्वीने आता खूप काही माहित करून घेतलं ह्या PMS बद्दल, आजची नारी होती, मनात धक धक नारा ज्वालामुखी होता तीच्या, स्वतःला अस हताश बघू शकत नव्हती, आणि मग मनात विचार शिरला,
“नलिनी किती पुढे गेली, प्रेम, लग्न, घर, मुलं आणि आता करिअरची भरारी... सगळं कसं वेळेवर आहे तिचं... आणि मी इथेच अडकून आहे. पुढे काही जातं नाही. ह्या एकविसाव्या शतकात वावरणारी मी कुठे ह्या विचारात पडली आहे. मला ह्यातून निघायचं आहे लवकरात लवकर. मी अशी बसू शकत नाही. मार्ग निघायला हवा.”
रात्री आकाश घरी आली, त्याला तिने सगळं सांगितलं, तर तो म्हणाला,
“असं आहे तर... आता तू तर कंट्रोल व्हायची नाहीस ह्या वेळी. मीचं स्वतःला कंट्रोल करत जाणार... पण आता जरा विचार कर... नुसता तोच विचार करू नकोस.”
“पण कसं ना, हे निघून गेलं तर मी मोकळी ना, म्हणून वाटतं रे, मी करिअरच्या मागे आता लागले तर मग हे सुटून जायचं ना, वेळ आणि वय दोन्हीकडे महत्वाच आहे. आणि मला काहीच सुटू द्यायचं नाही...
बीइंग नारी म्हणून मार्तृत्व जेवढं महत्वाचा आहे ना
तेवढच बीइंग आजची नारी म्हणून माझ्यासाठी माझं स्त्रीत्व उभं करणंही महत्वाच आहे...
म्हणून वाटतं, वेळेत सारं झालं कि सारं कसं लाईनअप होईल... पण काय करू... इथेच मार खात आहे...प्रत्येक महिना लाल होतो आणि जखम परत उघडी होते.
“ये जास्त विचार करू नकोस, ये बऱ इकडे.”
आकाशने तिला ओढलं. आणि मग रात्र निघाली प्रवासाला नवीन पहाटेच्या...
तीन महिन्याची आयुर्वेदिक औषध संपली होती, आता ह्या औषधाने गुण दाखवावा असचं वाटत होतं उर्वीला, पण लागलीच काही महिना राहणार असंही नव्हतं. पण आशा होतीच ना, ती कुठे सुटली होती.
जीवनात ही अशाच तर असते,
जी नव्या उमेदीची उर्मी कायम ठेवत असते....
स्वतःच्या शरीराचे भेद घेत उर्वीने महिना काढला, त्यात स्वतः स्वतःच बोचणं वेगळच, शिकून पडून असल्यासारखं मनात सतत वाटत होतं. त्यात एक दोन ठिकाणी इंटरविव्हलाही जावून आली. काही हातात आलं नव्हतं. त्यात मागे दिलेला जपान स्कॉलरशिपचा निकाल बोंबलला होता. आणि पाळीही आली होती. सगळा गोंधळ झाला होता. आकाश नाराज होताच पण दाखवत नव्हता. उर्विच्या मनात ग्लानी शिरली होती. तिच्या हातात काहीच येत नव्हतं.
२०१० सूर होतं, जग प्रगती करत होतं उर्वीच्या अवतीभवतीचं, जवळपास सगळे सेटल झाले होते. मागच्या वर्षी लग्न झालेल्या आकाशच्या मित्राला मुलगी झाली होती. हे ऐकून तर उर्वी अजूनच खचली. मागून लग्न होवून येणाऱ्याही आता तिच्या पुढे गेल्या होत्या.
आईने मिसकॉल केला, उर्वीने फोन लावला, रडत होती, विचारलं तर म्हणाली,
“अग राणीचं मिसकेरेज झालंय.”
उर्वीला आश्चर्य वाटलं, तिला तर कुणी काही बोललं नव्हतं. जरा वेळ ती गप्प होती, मग हळूच तिने प्रश्न केला,
“कुठे आहेस?”
“इकडेच आलो होतो आम्ही राणीकडे, वाटलं बातमी ऐकली, जावून भेटून यावं राणीला.”
“असं, म्हणजे तू राणिकडे आहेस?”
उर्वीला वाटलं, तिला तर आईने सांगितलंही नाही, आतच तर बोलणं झालं होतं दोन दिवसाआधी. मनाला जरा धक्का बसला तिच्या पण सावरत म्हणाली,
“काय झालं होतं... मला माहित नाही. सांगतेस का काही?”
“अग आम्ही तिच्याकडे गेलेलो, तिने स्वयंपाक केला. खूप खुश होते ग सारे, तिचे सासू सासरे, जावई तर आनंदाने नाचत होते.”
“तेही होते का तिकडे?”
“नाही आम्हीच होतो, जेवणं झालं आणि मग अचानक तिला रक्त स्त्राव सुरु झाला. डॉक्टरकडे घेवून गेला तर..”
“तर काय?”
“मला आणि जावयांना बोलावून त्याने सांगितलं की बाळाला हृद्य नाही. लवकरात लवकर काढून टाका म्हणाला.”
“मग, ग?”
“मग काय, तिच्या सासूला सांगितलं तर म्हणाली, काही नाही, तिकडे मुंबईचे डॉक्टर काहीपण सांगतात. इकडे नागपूरला घेवून या.”
“मग कुठे आहात तुम्ही आता.?”
“अग, इकडे आपल्या घरी...”
“झालं का मग सर्व?”
“मग मलाही वाटलं, आमच्यावेळी तर असं नव्हतं कधी, मला चार मुलं झाली, घरात प्रत्येकाला चार पाच तरी लेकरं आहेत पण असं ऐकलं नव्हतं. म्हणून मीही म्हटलं निघूया नागपूरला म्हणून. पण येतांना रेल्वेचा प्रवास, आणि काय हाल झाल्या राणीचे म्हणून सांगू... त्यात तिची सासू काही ऐकायला तयार नव्हती. मीचं भांडली, म्हटलं, एवढा मुलीला त्रास होतं आहे... सरळ तिला घेवून गेले माझ्या ओळखीच्या ठिकाणी... वरून बोलत होते चांगला मोठां डॉक्टर का नाही बघितला म्हणून.”
“मग काय झालं?”
“अग ऑपरेशन करून काढून टाकलं बाळ, तीन महीन्याच होतं ग.”
“आता सर्व ठीक आहे ना?”
“हो आहे, काय हाल झाले बाई आमचे, तिच्या घरचे डबा पण आणून देत नव्हते. तिची सासू तर बोलली, तुम्ही गेले म्हणून हे झालं.”
“असं! असं काही नसतं.”
“मग काय, आम्हाला काय नवल नव्हतं का, का पहिल्या मुलीकडून काही ऐकायला मिळालं नाही, आणि मग असं किती छान वाटते... म्हणून बाबाने सुट्या काढल्या आणि आम्ही गेलो होतो. तिकडून रंजित आणि सुजितपण आले होते.”
“म्हणजे पार्टी होती का? “
“हो आता बहिणीच नवल होतं सर्वाना, म्हणून आले होते त्या दिवशी, आणि असं घडलं, काय करावं बाई, नशीबच फुटकं माझं.”
“जावूदे, ती ठीक आहे ना, सगळं क्लीन केलं ना?”
“हो, मी विचारलं डॉक्टरला, म्हणाली, आता सहा महिने तरी काही चान्स घेवू नका.”
“पण बाकी सर्व ठीक ना...”
“हो आता ठीकच आहे. तुझं कसं, सगळं ठीक ना?”
आई रडत होती, उर्वीला काय सांगणार होती तिच्याबद्दल, सगळं ठीक म्हणून तिने बहिणीला फोन द्यायला सांगितला, जरा वेळ बोलली. पण मनात गोष्ट घर करून गेली.
ती कशी परकी झाली होती ह्या सर्वात, घरात सर्वाना ही गोड बातमी देतांना आईला तिची आठवण आली नसावी. आणि आता वाईट झालं तर आठवणीने मिसकॉल केला...
मनात म्हणाली, “जावूदे, मला दिवस राहत नाहींत ना, म्हणून कदाचित तिला वाटलं असणार. पण तरीही सांगायला काय हरकत होती. आता डोळ्याला अश्रू लागले तर आठवण झाली, नशीब, निदान आता तरी सांगितलं... तसंही तीन महिने बाहेरच्या लोकांना सांगत नसतात...”
आणि परत मन खच्ची झालं तिचं, मनातले शब्द तोंडावर आले आणि एकटीच बसली बडबडत.
“म्हणजे मी बाहेरची झाले... व्हा...”
तोंडात शब्द येवून मागे गेले... “बर झालं... नाही ग असं नको म्हणायला, निदान त्यांना दुखात आठवण झाली हे महत्वाच ना...”
जावूदे,
वेळ बदलली कि लोकं सरड्यासारखी बदलतात.
आणि वेळ आली की लोकं सारंकाही विसरतात.
तरीही मनात विचार शिरला होता, आता बहिण स्पर्धेत उतरली होती. स्पर्धा कसली, वेळे वेळच गणित म्हणावं...
आकाशची बदली टोक्यो ब्रांचला झाली, आणि मग उर्वीने अजून पीएचडी साठी नव्याने प्रयत्न सुरु केले. त्यात कुठलाच महिना लागत नव्हता हेही सहन करणं महाकठीण झालं होतं. टोक्यो युनिवर्सिटीमध्ये प्रोफेसरला प्रोजेक्टसाठी भेटायला गेली होती. प्रेझेंटेशन देवून परत आली होती, उशीर झाला होता, तिने दार उघडलं, तर आकाश आधीच घरी आलेला, आणि फोन वर बोलत होता, त्यावेळी ऑनलाईन कॉल्सची सुविधा होती, तेच ते वापरत असत, स्पीकरवर कॉल असायचा सारं ऐकायला येत असायचं. कॉल सुरु होता म्हणून आकाशला दाराचा आवाज आला नाही, उर्वी आत शिरली, आकाशच लक्ष नव्हतं, तो त्याच्या आईशी बोलत होता,
“आई तसं नाही.”
“मग कसं हाय ते तरी सांग, आता लग्नाला चार वर्ष होतील, तरीही पाळणा हलणार नसल तर दे सोडून तिले, तुले काय मुलीची कमी हाय, म्या तर आधीच बोलले होते, लोकं तर तुले हुंडा द्यालेबीन तयार होते. इथून काय भेटलं.”
“आई माझं प्रेम आहे तिच्यावर, मी तिला नाही सोडू शकत.”
“अन मह्यावर. म्हणजे ती आताच आयुष्यात आली अन प्याराची झाली, मग माह्या इच्छेच काय रे.”
“काहून माही इच्छा तुही नाही का?”
“हो आता समजतो तसचं, पण काही बी म्हण, तुहे काही बीन भेटलं नाही त्या उर्वीशी लगन करून, ना तिच्या घरचे मान पान करत ना तिला काय बीन होत. तू बीन तर नवसाचा होतास, झालं ना मले, त्या गोट्याच्या देवाले अनवाणी पायान गेली होती... काय हे असे दिवस पावाले.”
“आई, मग जा ना आता नातवासाठी बीन… तुचं गेली नाहीस म्हणून होतं नाही आहे.”
“हो तेबीन करून पायतो आता. ते तर बाई मोठी माह्या पोराच्या माथे सूख भोगते आणि म्या इथ हावो एकटंगली. ते तिथे राहू शकते म्या नाही…”
“असं आता आला मुद्दा माझ्या लक्षात, तुला यायचं आहे इकडे, सरळ बोल ना मग.”
“तू काहुन नेशील रे मले... बायको ले घेवून गेला अन माय काय सोडून देली ना.”
“असं नाही, ती बायको आहे माझी, माझ्यासोबत राहीलच.”
“पण म्या आई हाय त्याचं काही नाही तुले.”
“आहे ना, सगळं नीट होऊ दे तुलापण घेवून येईल मी.”
“तवावरी कोण रायते कोण जाणे, इथे मले लोकं विचारतत, तू कवा जातं म्हणून, ऐकली माय कळत नाय तुले.”
“असं, आणि बायको तिकडे चार महिने राहिली होती तेव्हां तर तू एकदाही म्हटलं नव्हत तिला घेवून जा म्हणून, उलट तिला इकडे आणलं तेव्हां तू फुगून होती दोन महिने.”
“मग, ते काहुन रायल, माह्या लेकाजवळ, माझा अधिकार हाय लेकाजवळ राहाचा, सारे लोकं म्हणत्यात मले. कवा जातस म्हणून. काय सांगू त्यायले.”
“आता तुझा सूर बदलला, तुला काय बोलायचं आहे ना ते आधी ठरवं, तुझा प्राब्लेम मला समजत नाही. मुलाशी बोलत आहेत हे आधी लक्षात ठेव.”
“असं, तू शिकव आता मले, आला मोठा, बायकोचा नवरा, लल्लू बनून राय अजून तिचा.”
“आई जास्त होतं हे, मी माझं बघून घेईल. तू काळजी करू नकोस. नाही होतील पोरं तरी काही फरक पडत नाही मला. काय देतेत मुलं होवूनही, मी काय देलं तुले, हे भांडून राहिलीस माह्यासंग.”
“जावूदे, तुह्यासंग बोलत नाही मी, तू तुह्या बायकोचं वकीलपत्र घेवून उभा रायतसं...”
आकाश बोलत होताच पण तिने फोन ठेवला, आकाशनेही मग परत केला नाही. त्याचा पूर्ण मूड ऑफ झाला होता. लॅपटॉप बाजूला ठेवून त्याने त्याचे कपडे काढले. आणि फ्रेश होण्यासाठी तो इकडे वाशरूम कडे आला, आणि त्याची नजर उर्वीवर पडली. ती गुमान गप्प एका ठिकाणी बसून होती. ती धावत तिच्याजवळ आला, म्हणाला,
“ये उर्वी तू टेन्शन घेवू नकोस. मी आहे ना. मी तर टेन्शन घेत नाही.”
“तू कसा घेशील रे, ज्याचं जळतं ते त्याला कळतं, तुला असं बोलायला काय जातं.”
उर्वीच्या मनाला सारे शब्द लागले होते. आकाश जरी बोलला नसला तरीही विचार त्याच्या मनात शिरला होताच ना. ही जाणीव उर्वीला खात होती.
कथा क्रमशः
© उर्मिला देवेन
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो साभार गुगल
0 Comments