बीइंग नारी... “जेव्हा आई होणं अवघड होते!” भाग २६
© उर्मिला देवेन
---
डॉ. मानसीला घाई होती, बोलण्यात वेळ झाला होता, डॉ. मानसी निघण्यासाठी उठल्या, परत म्हणाल्या,
“उर्वी तुझ्या घरी बाबांना मधुमेह आहे तेव्हा तुझी टेस्ट करून घे, आणि रिपोर्ट पाठव मला, तेवढं अजून करूया. हेही कारण असू शकतं. आणि तुझ्या नवऱ्याला पण सांग शुगर चेक करायला. तू तिकडे गेली कि करा टेस्ट. तिकडेच केली तरी चालेल. बघ कसं जमेल ते.”
आता उर्वीची आई परत बोलली, “आता तिच्या बाबांना आहे मग ह्याचा काही परिणाम होतो का?
“अर्थात! वंशपरंपरा असू शकते ना. तिला कंसीव करायला प्रोब्लेम होत आहे. मग ही पॉसिबिलिटी सुद्धा मला बघावी लागेल. आणि ती काही नेहमी नेहमी येणार नाही ना.”
आई दीर्घ श्वास घेत म्हणाली, “काय सांगाव बापा, आमच्या वेळी नव्हतं असं, मला तर भरा भरा झाले मुलं. नवीन नवीन कानावर येते. आता हे दोघं नवरा बायको, ह्यांच्यात काय ते असावं.”
“नाही हो काकू, ह्याची कारण आणि मूळ खूप दूरवर असतात, घराण्यात मागच्या तिसऱ्या पिढीला जरी काही असलं ना तरी त्याचे परिणाम चालू पिढीत आढळू शकतात. एवढचं नाही तर तिच्या आयुष्यातल्या आता पर्यंतच्या घडामोडीही करणीभूत असू शकतात... आपल्या अवती भवती असणारी प्रत्येक व्यक्ती आणि त्याची वागणूक, सगळं मेंदूत साठलं असतं. आणि आपण मेंदूतून नियंत्रित असतो... तो एक वेगळा विषय आहे. मी त्याच्याही कॉन्सिलिंगला पाठवते, पण सध्या आपण शारीरिक गोष्टीवर लक्ष देवू या. स्टेप बाय स्टेप जावूया.”
“हो आता जे जे म्हणाला ते...”
आईचं बोलणं झालं आणि उर्वीने डॉक्टरचा नंबर घेतला. आता ठरलेल्या दिवसाची वाट होती.
त्यात आकाशशी बोलणं झालं तर समजलं, कि उर्वीला टोक्यो इंसटीटूड ऑफ टेकनॉलॉजिच्या प्रोफेसरकडून पीएचडीसाठी रेकमेंडेशन मिळालं होतं. त्याला खूप आनंद झाला होता. तशी उर्वीही त्या एका सुखाच्या झोक्याने सुखावली होती आणि आता तेही काम तिला भारतातून काही कागदपत्र जोडून पूर्ण करायचं होतं.
दोन दिवसाने तिने नजीकच्या पैथोलॉजी जावून शुगर चेक केली, आकाशनेही करवून घेतली होती, रिपोर्ट ओके मिळाले होते. उर्वीने मॅडमला पाठवून दिले होते.
त्या वेळी पतंजलिचा खूप वाजागाजा होता. त्यांच्या केंद्रांवर एवढी भीड असायची कि सांगूच नका. उर्वीची आई सकाळीच टीव्हीवर सगळं बघायची. तिच्याकडे खूप औषधिही होत्या. मग काय, आई उर्वीला तिकडेही घेवून गेली. तिकडेही प्रत्येक सेंटरला आयुर्वेदिक डॉक्टर किंवा त्याचे प्रशिक्षित लोक असायचे. त्याच्याकडे गेल्यावर त्यांनीही खूप मोठी लिस्ट दिली औषधांची. सगळं मिक्स करून काय ते पुड्या बांधायच्या होत्या. उर्वीचे बाबा त्या कमी लागले होते. आणि आई लागली होती अजून काही मिळते का म्हणून जे उर्वीसोबत घेवून जाईल.
त्या औषधांमध्ये शिवलिंग बीज होतं. आईलाही त्याची जरा फार माहिती होती, तिच्याकडे तर पुस्तकच होती. मग ते पुस्तक उर्वीने वाचून काढलं, त्यात जे जे सांगितलं होतं ते सर्व तिने त्या दिवसात जमा केलं. बाबा शिनिवार रविवार आले कि बर्डीवरच्या नाहीतर जिथे मिळेल तिथल्या आयुर्वेदिक दुकानात जात असत आणि उर्वीसाठी औषधी घेवून येत असत. उत्तम दर्ज्याच शिलाजित, अश्वगंधा, शतावरी, त्रिफळा, मंजिष्ठा, चन्द्रप्रभा आणि बऱ्याच औषधी आणल्या होत्या. कुठली औषधी कशी आणि कुठल्या प्रमाणात घ्यायची सारं काही तिने नोंद केलं होतं. शिवाय सगळ्या औषधी आयुर्वेदिक होत्या, सहसा साइड इफेक्ट नसतोच. आणि साधारण तो होऊ नये म्हणून काही मसाल्यांची पत्त, ताक सेवन, गुलकंद, साजूक तुपाचा वापर सगळं तिने लक्षात घेतलं होत. दिवसं निघत होती आणि उर्वी नव्या उमिदेने उभी होत होती.
--
त्या दिवशी आईचा आणि उर्वीचा परत वाद झाला, वाद तोच होता, उर्वीने चुकून आई बाबांच्या गोष्टी ऐकल्या होत्या. आणि ती भडकली,
“काय ग, सारखी आकाशला घालून पाडून बोलत असतेस. लग्न झालंय माझं त्याच्याशी. आता जे होईल ते होईल ना.”
“आमचं ऐकलं असतं तर असे दिवस बघायला मिळाले नसते. तू अशी इथ मरमर करते आणि तो तिकडे मजेत. आणि तुझी ती सासू ती तर वाट बघत असणार तो मुलगा कधी तुला टाकतो म्हणून.”
“तो मुलगा? त्याला नावं नाही का? सांभाळून बोल.”
“असं, मला शिकवते का? काय बाई काय भरलं त्या लोकांनी माहित नाही. पोरगी आमचं ऐकतच नाही. नाहींतर मुली आईवडीलांच ऐकणार नाही.”
“का, मला डोकं नाही, मला समजते कोण कसं आहे ते.”
“डोकच नाही तुला. नाहीतर ह्या असल्या लोकांची संगत झाली नसती, ना तोलामोलाचे होते ना काही.”
“मग, आता तू माझी बरोबरी करू शकत नाहीस त्याचं काय.”
“तू आमची कधीच बोरोबरी करू शकत नाही. आली मोठी...”
“तुचं जन्म दिलाय मला, घाल शिव्या स्वतःला, मला कशाला म्हणतेस.”
बाबा आईला समजावत होते. पण आईही उर्वीचा त्रास बघून त्रासली होती. आई म्हणून ती व्यक्त होतं असावी पण... का अजूनही हे सारं बोलणं होतं हेच कळत नव्हतं.
आकाश आणि उर्वीच्या नात्याला मनापासून आजही कुणी स्वीकारलं नव्हतं. नाळीच नातं होतं पण मनात अळ पडली होती उर्वीच्या त्या एका निर्णयाने.
दुपारभर तिच्याशी कुणी बोलत नव्हतं, ऊन ओसरली आणि ती निघाली घरातून, जाणार कुठे होती, निघली सासूकडे. आई बोलणार होती तर बाबाने अडवलं. कदाचित राग शांत करण्याचा हाच मार्ग त्यांना योग्य वाटत असावा. सासरी काही ठिकाणा लागणार नव्हता पण नायलाज होता. आता माहेरी राहायचं नव्हतं तिला.
आकाशचा फोन आला आणि तिने भडाभडा सर्व सांगितलं. त्या क्षणाला कदाचित ते तिला उचित वाटलं होतं. पण खरच ती चुकली होती असं म्हणायला हरकत नाही, सांगू नये कधीच माहेरच्या लोकांच काही तेही जेव्हा बाजू पक्की नसेल. कारण आज जरी आकाश शांत असला तरी हे सारं पुढे निघणार होतं हे कुठे माहित होतं उर्वीला.
आपण इथेच चुकतो, नाती खूप नाजूक असतात. आणि जुळवून घ्यायचं असेल तर निदान काही गोष्टी स्वतः पुरत्या ठेवाव्या. पण ते कळायला तसा हवासा वेळ हवा असतो हेही तेवढच महत्वाच. आणि कधी कधी ते एकचं नातं महत्वाच दिसतं मग मार्गही सुचत नाही त्याविणा.
आकाशने त्याच्या आईला, सांगितलं कि उर्वी आज तिकडे येणार म्हणून. आणि तेही बजावलं कि, तिला पोहचायला वेळ होणार म्हणून रोडवर तिला घ्यायला जा. त्याचा वेळ झाला होता झोपायचा तो झोपला.
इकडे मात्र संध्याकाळची वेळ होती. लाईट नव्हती तशीही त्या काळात लोड शेडींग मुळे खेड्यापाड्यात वीजच राहत नव्हती. आणि त्यात सासू कशी येणार होती तिकडे रोडवर. उर्वीच कशीतरी तिकडे रस्त्याने निघाली. तिने धाकधूक मनात ठेवत सासूला फोन लावला, पण उत्तर होतं,
“कशी येऊ मी, केवढा अंधार हाय. तुचं ये.”
तीही तिच्याजागी बरोबर असावी, पण कधी काळी ती यायची येही उर्वीला माहित होतं, पण तेव्हां गोष्ट वेगळी होती. लग्नाची गाठ नव्हती तेव्हां, लग्न जुळलं आणि नात्यात मान शिरला होता. ती सासू झाली होती आणि उर्वी सुनबाई. मुलाची मैत्रीण म्हणून जे वागणं असायचं ते साहजिकच मुलाची बायको म्हणून असणं कठीण होतं.
नातं पण ना, जेवढं परकं असतं तेवढं कधी कधी उत्तम असतं, एकदा का त्या नात्यात जवळीक आली, आणि गाठी सुटू लागल्या कि परत चुकीच्या गाठी पडत जातात. आपली धडपड नाती जुळेपर्यंत असते. नंतर आपण पाय पसरून देतो, पण नात्याला टिकवून आणि निरोगी ठेवण्यासाठी सतत त्याला नवीन ठेवावं लागतं, बघा पटलं तर...
नात्यात दुरावा कधी कधी नातं जवळ आल्यानेही येतो...
असो, उर्वी तिकडे आली, तेव्हां तिने एक असा अनुभव घेतला कि तिच्या अंगावर शहारे उभे राहिले होते त्यातून निघतांना. कितीही स्त्रीने प्रगती केली आणि कितीही शिक्षण घेवून विचाराने ती परिपक्व झाली तरी तिला मादी म्हणून बघणारे अजून तरी बदलले नाहीत.
वस्तीच्या वाटेने चालतांना तिच्या पाठमोऱ्या शरीरला पूर्ण हात लावून एक तरुण सायकलवरून मजा आली, येते का असं म्हणून निघून गेला.
क्षणात तो घाणेरडा स्पर्श तिला किळसवाण करवून गेला. तिने खूप ओरडून त्याला जेवढ्या येत होत्या तेवढ्या शिव्या दिल्या पण काहीही फरक पडला नाही. शांत होत ती घरी पोहचली.
जरा वेळाने ती सासूला म्हणाली, “लोकं बरे नाहीत इकडले, मला ना एका मुलाने मागून पूर्ण हात लावला.”
सासू बाहेरूनच म्हणाली, “आपण तसं असलं क लोकं तेसच दिसतात. तू जीन्स घालून येशीन अन पोरायले कायले म्हणतस.”
“अहो पण आई, असं करायचं का..”
“काही नाही केलं कोणी, इथे माह्या ओळखीचे पोर हायत सारे, कोणीबी कराच नाही असं.”
आता उर्वी भडकली, “म्हणजे मी काय खोटं बोलत आहे का?”
“काय त”
मग तिने शेजारच्या बाईला आवाज देत म्हटलं
“अय सुनीची माय, आपल्या गावात कोणी असं हाय का व, माही सून म्हणते तिले कोणीतरी मागून हात लावला.”
ती घरातून ओरडली, “तुही सून जास्तच शायनी हाय. चुकून धक्का लागला असल, आपले गावातले पोरं आपण पाहून हावो...”
“नाय त काय?”
आता उर्वीला रडायला आलं, ती रडत बसली होती, तर शेजारीच्या काकूची सून सोनाली घरात मटानाच्या भाजीची वाटी घेवून आली, उर्वीला असं बघून ती जरा वेळ उभी राहिली.
“काय ग काय झालं? मी ऐकल माझ्या खिडकीतुन.”
ताई, मी खरच बोलले हो
हो, आहेत तशी मुलं इथे. ह्यांना सांगून काही अर्थ नाही. दुसऱ्यांना झालं ना तर घरीच ये. ह्यांना सागते मी तिकडे उभं राह्यला.
तिच्या बोलण्याने उर्वीला जरा बऱ वाटलं, भाजीची वाटी तिने हातात घेतली. आणि सोनाली म्हणाली,
“निघते मी, सासूला मी कुणाकडे जास्त वेळ थांबलेली आवडत नाही. तू भाजी सांग कशी झाली ते उद्या. उद्या आहेस ना?”
“हो हो, पण जास्त दिवस नाही थांबणार इकडे.”
सोनाली निघून गेली. आणि सासू बाहेरून आत मध्ये आली. स्वयंपाक झाला होताच. उर्वीने जेवणाचं घेतलं. मन मारून ती कशीतरी तिकडे दोन दिवस राहिली. दरम्यान आकाशने फोन केला, तेव्हां उर्वी त्याला बोलली सारं, पण काही अर्थ नव्हता. त्याने जावूदे म्हणून गोष्ट संपवली, म्हणाला,
“मी तिकडे आलो कि बघतो, कुणाची हिंमत झाली ते. तू अजून काही आईला सांगू आणि बोलू नकोस.”
उर्वीच्या हिस्टेरोस्कोपीची आज दिनांक होती, तिला सकाळीच निघायचं होतं. आता सोबत कोण असणार हा प्रश्न तिला सकाळीच पडला होता. सासूला तर म्हणणं म्हणजे आ बैल मुझे मार होतं, नुसती किरकिर, तेही घरी आल्यावर, कारण बाहेरच्या लोंकासमोर तर तेच बरोबर दिसत होते तिला. हाच तो स्वभाव लोकांना वाटायचं किती शांत स्वभाव आहे. पण ते तसं नसायचं ते तर टिपणं असायचं, ज्याचं पोस्टमार्टन घरी आल्यावर कुठल्या वेळी होईल ह्याचा अंदाज बांधणेही जाणीवेत नसायचं. लगेच बोलून मोकळं होणं जणू त्यांच्या आयुष्याच्या डायरीत नव्हतंच मुळी.
आणि हेच असं काही आपल्या आयुष्याच्या डायरीत कुठल्याही शाईविना कोरल्या जातं.
कथा क्रमशः
कथेचे सर्व भाग वेबसाईट आणि पेजवर आहेत, तुम्ही वेबसाईटवर, कथा मालिका -बीइंग नारी... ला क्लिक करा. आणि सर्व भाग वाचा.
नोट- माझी विषकन्या कश्यपी ही ऐतिहासिक कादंबरी सध्या मराठी साहित्यात खूप कौतुकाचा विषय ठरत आहेत.... सर्वाना धन्यवाद! आपणास हवी असल्यास आपण अमेझोन/ फ्लिप कार्ट वरून मागवु शकता. लिंक हवी असल्यास मला मेसेज करा...
© उर्मिला देवेन
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो साभार गुगल
0 Comments