बीइंग नारी... भाग २१
जेव्हा आई होणं अवघड होते... © उर्मिला देवेन
जुने दिवस आठवले, शहरात नौकरी करतांना ती एकटी खोली करून राहायची, आकाशपण तिकडे कधी कधी यायचा. मग त्या काकूंनाही आकाशबद्दल माहित झालं होतं, त्यांनी आईला सांगितलं होतंच पण गोष्ट सांभाळल्या गेली होती. सहज उर्वीला वाटलं, जावं काकूला भेटायला, तिने बसमध्ये पाय ठेवला, आणि निघाली. वेळ भरपूर होता, एवढ्या लवकर गेली असती तर निदान काकूने राहण्याचा आग्रह केला नसता म्हणून उर्वीने इकडेच पोहचल्यावर बस स्टँडवर वेळ घालवला. नंतर पाच वाजता ती तिकडे निघाली. काकूकडे तिने रात्र काढली. जुन्या गप्पा करण्यात वेळ गेला, आकाशच गुणगाण सांगण्यात त्याच्यावरचा रागही उडून गेला. तिने फोन बहितला, खूप कॉल्स होते आकाशचे. तोही काळजीत होता.
सकाळीही त्याचा कॉल सुरु झाला, आता उर्वीने उचलला,
“कुठे आहेस. किती कॉल करत आहे मी. तू तुझ्या आईकडे नाहीस. माझं बोलणं झालं आहे तुझ्या आई सोबत.”
“तू तिला सांगितलं?”
“हो, सांगायला नको का, मुलीची करतूद.”
“मग, ठीक झालं.”
“तू आहेस तशी.”
उर्वी आता भडकली, पण काकूकडे होती. ती काहीच बोलली नाही आणि फोन आता स्वीच ऑफ करून ठेवला.
काकूकडून तिचा पाय निघत नव्हता, शेवटी ती दुपारी निघाली, नागपूरच बर्डी हुंदडून काढलं. काही शॉपिंग केली. आणि मग निघाले पावलं आईच्या घराकडे. भीत भीत ती आईकडे आली. आईला तर काहीच माहित नव्हतं. उर्वीने दीर्घ श्वास घेतला. गुमान खोलीत जावून फोन सुरु केला. सुरु करताच फोन वाजला. आकाशचा होता. तिने तसाच वाजू दिला आणि फ्रेश होण्यासाठी गेली. घरी जुना कॉम्पुटर होता, तिने सुरु केला. लंडलाईन बीएसएनएल नंबरवरून इंटरनेट सुरु केलं जे आतापर्यंत तिलाच तिकडे सुरु करता येत असायचं. आकाश ऑनलाइन होता. जीमेल चाट वरून ती त्याच्याशी बोलू लागली, काही सूटत नव्हतं, मग तिने एक मेल लिहिला, काय काय ते सारं लिहिलं, भल्या मोठ्या मेलच उत्तर आला,
“तू पागल आहेस.”
वेळचा फरक असल्याने जपानमध्ये उशीर झाला होता, शेवटी आकाशने सॉरी टाईप केलं आणि लव यू लिहून त्याचा लॅप टॉप बंद केला.
दिवस गेले, रात्री संपल्या, उर्वी खूप सारं काही सामान आणि औषधी घेवून एकटीच ट्रेनने दिल्लीला पोहचली आणि मग तिथून विमानाने जपानला रवाना झाली. इकडे आकाशचा प्रोजेक्ट बदलला होता. आता त्याला मोठं घर मिळालं होतं.
ती तिकडे सुखरूप पोहचली होती. तिला बघताच परत आकाशच मन वर खाली झालं होतं.
महिन्या भरानंतर दोघेही भेटले होते. खूप काही सांगायचं आणि बोलायचं होतं. घरही तिला लावायचं होतं. उर्वीने आणलेलं सारं सामान घरात पसरून होतं. तीही त्यामध्ये बसून होती, दाखवत होती तिने त्याच्यासाठी काय काय शॉपिंग केली ती. उर्वीने आता आकाशला सांगितलं कि ती आईसोबत एका वैद्याकडे गेली होती,
“तुला सांगू मी एका वैद्यकडे गेली होती आईसोबत...”
“तुझ्या आईसोबत... मग तर सांगूच नको.”
“का, तुझी आई नेणार होती मला!”
“जावूदे तो विषय.”
“अरे ऐक ना, त्यांच्याकडे दूरू दूरचे लोकं येतात. औषध घ्यायला.”
“आता तू म्हणू नकोस कि तू ही आणलं म्हणून.”
“मग, त्यांना काय भेटायला गेली होती मी, आले घेवून, आईने तर तुझ्यासाठी पण मागितलं.”
आकाशने हात जोडले, “बाई धन्य तू आणि तुझी ती आई... घ्या आता औषधी मग, मलाही घ्याची आहे का?
“मग दोघांना असते.”
“असं...
“आपल्याला काही औषध नको बाबा, आपण अजून हनिमूनवर आहोत. तू एकचं औषध दे मला... देतस ना कितीवेळची बडबड करत आहेत.”
आणि त्याने तिला सामानातून उचललं, आणून बेडवर पाडलं, आणि मग प्रेमाची धुंदी दोघांना चढली.
उर्वीने मनाला आता तयार केलं होतं, वैद्यांनी दिलेली औषधी काम करायला निदान तीन महिने लागणार असं त्यांनी सांगितलं होतं. तीन महिन्यानंतर काय तो गुण दिसेल. त्या पूर्ण तीन महिन्यात उर्वीने स्वतःपूर्ण तयार केलं. योगासन केले. हिरवा भाजीपाला आहारात घेतला. पाळीच्या दिवसात ती काढा करून प्यायची ज्याने पोट साफ होईल. आणि प्रत्येक गोष्ट ती आता वाचायची. नेमकं काय त्या वैद्याने दिलंय हेही तिने शोधून काढलं होतं.
एक लोध्र नावाच्या आयुर्वेदिक वनस्पतीच्या पत्यांच आणि खोडाच पावडर दिलं होतं. जे स्त्री प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी उत्तम मानल्या जातं. शिवाय स्त्रीबीज प्रमाणपण वाढवते. एकंदरीत आयुर्वेदानुसार, स्त्री रोगांच्या सर्व गोष्टीवर उत्तम उपाय होती ती औषधि. हे कळताच उर्वी अजूनच उत्साहित झाली. तीन महिने असेच गेले. दिवस तर तिला नव्हते गेले. पण आता आशा वाढली होती. शिवाय मागच्या तीन महिन्यात तिने इकडे तिकडे खूप जॉबसाठी प्रयत्न केले होते पण अजून हाती काही लागलं नव्हतं.
ह्या दरम्यान तिला पाळी येणाच्या दिवसाआधी चीडचीड होण्याचं कारण लक्षात आलं होतं. तिला PMSचा त्रास जाणवत होता. आणि मानसिकता खराब होत चालल्याने आता तो वाढत होता. दर वेळी मासिक पाळीच्या वेळ होणारं मोठंस भांडण त्याचाच परिणाम होता. आणि मग त्या भांडणाच्या प्रतिक्रिया महिनाभर चालत असत. दोघांत प्रेम होतं म्हणून अजूनतरी नातं टिकून होतं असं म्हणता येईल.
भांडणांच्या फोडणीत अलगत हळुवार प्रेमाची धार पडायची आणि मग सांर कसं परत सुरळीत होतं असायचं.
PMS- हलकसं बोलायचं झालं तर तो ती आणि हा तिसरा... जो पती पत्नीच्या नात्यात पत्नीच्या वाटेने नकळत शिरतो. आणि पती सहन करू शकत नाही. साहजिक आहे त्या तिसऱ्याला कोण आणि कसं सहन करणार... पण प्रेमाने हाताळलं तर तो तिसरा काहीच करू शकत नाही. आणि तो येतही असतो जवळपास आठवड्याभरा साठी. उर्वी आणि आकाश मधेही हा यायचा, आणि अलगत त्यांच्या नात्याला भेगा पडून जायचा आणि मग त्या भेगांना भरण्यासाठी उर्वीला आणि आकाशला प्रेमाने जवळ यावं लागत असायचं. पण प्रत्येकाच असं होतं नाही.
उर्वीला कळत नव्हतं ह्याबद्दल कशी माहिती मिळवावी, तिलाही जाणवत होतं हे आणि ह्यामुळे मन उगाच त्रासून जातं असायचं. नको नकोस असणार बोलणं मनाला छीलत असायचं.
आठवड्याभराआधी तिने तिच्या PMTला सोबत क्लासेसला असणाऱ्या एका मैत्रिणीला फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट होती. तिने ती अॅक्सेप्ट केल्याच नोटिफिकेशन फेसबुक काकाने दिलं आणि उर्वीने तीच अकाऊंट चाळून काढलं. नलिनी स्त्री रोग तज्ञ झाली होती, तिच्या प्रोफाईलवर PMS आणि PDDM वगैरे खूप काही दिसत होतं. नलू अमेरिका, इंग्लड मधेही कॉन्फरन्ससाठी जावून आली होती. तिचा फोटो बघितला आणि उर्वीला PMT चाटे क्लासेसच्या जुन्या गोष्टी आठवल्या. त्या दोघी नागपुरात सोबत अभ्यास करत असत. उर्वीला तिच्यापेक्षा जरा मार्क्स कमी पडले होते. तिला गवर्नमेंट कॉलेज एडमिशन मिळाली होती आणि उर्वीच्या घरच्यांना तिला दूरू पाठवायचं नव्हतं. पुढचे एडमिशनचे राउंड करण्यासाठी आणि खर्च करण्यासाठी आई बाबांनी मनस्थिती दाखवली नाही. आणि मग उर्वीने इंजिनिअरिंगला त्याचं गावात एडमिशन घेतली. उर्वीने तिच्या फोटोंवर कॅमेंट टाकली. तिच्या मुलाचे आणि मुलीचे फोटोही होते, त्यांना बघून परत उर्वी हळवी झाली. आणि काही वेळात मेसेंजरवर मेसेज आला,
“हाय, कशी आहेस... तू तर जपानला गेलीस...”
“हो सध्या नवऱ्याच्या माथे आहे इकडे.”
तिने हसण्याचे इमोजी पाठवले.
नंतर म्हणाली, “वेळ आहे मला बोलायचं, कॉल करूया गुगल टॉकवर...”
उर्विकडे तर वेळ होताच, हो म्हणाली,
नलिनी आधीपासूनच बोलण्यात फटकळ होती, सरळ मुद्दा गाठला तिने,
“ये लव मेरेज ?”
“हो.”
“माझही, एकाच कॉलेजमध्ये होतो, कॉलेज झाल्या झाल्या आईवडिलांना सांगून लग्न करून टाकलं. सोबत MDला एडमिशन घेतली. मुलगा झाला नंतर मुलगी... आणि माझं MD पूर्ण झालं.”
“आणि जीजुच काय?”
“तो, मला शिकवायचा... प्रोफेसर आहे कॉलेजला... मी माझं कॅरिअर गायनिक म्हणून सुरु केलं.”
“मस्त ग.”
“तुझं काय, मुलानांचे फोटो दिसले नाही फेसबूकवर? कि अजूनही हनिमून सुरु आहे तुझा?”
“तसं समज... नवरा तर असचं म्हणतो माझा.”
“मग बढीया ग. कीप ऑन मस्ती...”
“मस्ती कसली, वेळेचा उपयोग करावा म्हणून चान्स घेण्याच्या मागे आहे.”
“बऱ, हो हो तेही महत्वाच, नाती गुंतून राहतात.”
“हो ना, आपल्या रक्ताच कुणी असलं कि माया वाढते, आता बायको म्हटलं तर कुठे रक्ताचं नातं ग, त्या नात्याला एक दुवा हवा असतो... आपली काळजी वाढते मग समोरच्याच्या मनात, नाहीतर काही फरक पडत नाही... आपण असलो काय आणि नसलो काय.”
“ये असं काय म्हणतेस, प्रेम उत्तर आहे ह्यावर सुद्धा..”
“हो ग...”
“काही असलं तर हमखास विचार ह...”
“नक्की.”
उर्वी जरा शांत झाली,
तिला काहीतरी ऐकायला आलं, नलिनी कदाचित तिच्या कॅबीन मध्ये होती आणि तिची नर्स तिच्याशी बोलत होती, “मॅडम त्या श्रुती मॅडमचा फोन होता, आज येणार आहेत त्या.”
“कोण ग?”
“मॅडम, त्या PMS इशू वाल्या.”
“ओ.. ठीक आहे. सांग मला ती आली कि... आज तशीही एकचं सर्जरी आहे संध्याकाळी. वेळ आहे माझ्याकडे. सहाच्या आधी यायला सांग.”
ती उर्वीला म्हणाली, “उर्वी सॉरी ग, वेळ आहे माझ्याकडे, बोल.”
“अग, एक विचारू का…”
“एक का, कितीही विचार, तुझ्यासाठी हजर आहे मी, किती वर्षाने बोलत आहोत आपण, मला तर काय बोलू आणि काय नाही असं झालंय... इतक मस्त फील होतं आहे ना, की काय सांगू तुला, पण तू विचार मला बिनधास्त…”
“अग, मी तुझे आर्टिकल वाचले PMS वरचे. जरा सांगतेस का त्याबद्दल?”
“हो का नाही, तू फेस करत आहेस का?”
उर्वी शांत झाली...
“बघ आता तुला ना त्या पेशंटची गोष्ट सांगते, म्हणजे तुला सर्व कळेल, मग तुझं तू ठरव.”
“चालेल..”
उर्वीला जाणून घ्यायच होताच, आणि नलिनीने उर्वीच्या मनाची घालमेल ओळखली होती. ती काय सांगते, आणि अन तिने कसं ऊर्वीला ओळखलं वाचूया पुढच्या भागात.
© उर्मिला देवेन
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो साभार गुगल
0 Comments