बीइंग नारी... भाग २२ “जेव्हा आई होणं अवघड होते!”

 बीइंग नारी... भाग २२ 

“जेव्हा आई होणं अवघड होते!”

© उर्मिला देवेन

----



नलिनीला उर्विला मदत करायची होती. तिच्यातला तो तिला जाणवला होता. उर्वी मात्र गप्प झाली, नलिनी पुढे म्हणाली,

“उर्वी तशी ही गोष्ट मी माझ्या एका कॉन्फरन्समध्ये मांडली आहे. उदाहरण म्हणून ग, पण तूला सांगते. जिची ही कथा आहे ना तीमाझ्या सोबत आता ह्या उपक्रमात काम करते, पूर्वी माझी पेशंट होती.”

“हो मी वाचत होते तुझ्या वालवर, आणि तू पिंग केलंस.”

“बऱ तुला सांगते, सुरुवातीला तो तीला जवळ घेऊन समजवायचा, कि तो तिचाच आहे. तिला कुठलीही परिस्थितीत एकटं सोडणार नाही. तीही सगळं विसरून जायची, कधी कधी स्वतःवर हसायची, केलेल्या गोष्टीबद्दल तिला वाईट वाटायचं आणि आपला नवरा आपल्याला समजून घेतो ह्या विचाराने मनोमन सुखावत होती. पण, हळूहळू भांडण वाढत गेली, ती प्रत्येक वेळेस नवनवीन कारणांनी त्याच्याशी भांडायची, शुल्लक कारणंच मोठं वादळ व्हायचं. उलट सुलट बोलणं, नको त्या गोष्टीला चिडचिड करणं, सासरच्या लोकांचा अपमान करणं, आणि हे दर महिन्याला नेमकं काही त्याच दिवसात घडत असायच.

लग्नाआधी, त्याला ती फार आवडायची, शिकलेली, सुंदर मुलगी आपली जोडीदार असणार ह्याच विचारांनी तो आनंदी असायचा. पण, आता त्याला आपण आयुष्यातली फार मोठी चूक केली असंच वाटायचं. नेहमीच्या होणाऱ्या बाचाबाचीला तो कंटाळला होता. तिच्या बोलण्यातला तीव्रपणा आणि वागण्यातला विचित्रपणा त्याला सतत भेडसावत होता. तीला समजवायचे कसे हेही त्याला कळेना, ती तिच्या नादात ऐकायलाही तयार नसायची. बऱ्याचदा ती त्याला म्हणायची, 

"माझ्या समोरून निघून जा",

 "तू आधी घरातून निघ",

"जास्त बोलशील ना, तर मी माझं काहीतरी करून घेईल.”

“बापरे, एवढं...” उर्वी जरा दचकल्या सारखी झाली.

“काही गोष्टी तिच्या मनासारख्या नाही झाल्या कि ती सामान फेक फाक करायची, बरेचदा ती त्याच्या हातून मारही खायची. रागात तिने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. हे सगळं का आणि काय घडत आहे हे त्याला कळतच नव्हतं. नेहमीच्या त्रासाला तो त्रासला होता आणि ती हैराण झाली होती. राग शांत झाला कि, तीला तीची चूकही कळायची, पण, फयदा काय! खुप काही घडलेलं असायचं. त्याची कितीदाही माफी मागून फरक पडत नव्हता. तिला तिचं वैवाहिक आयुष्य वाचवायचं होतं पण उपाय सुचेना. शेवटी खुप विचार केल्यावर काही गोष्टी तिच्या लक्षात आल्या. लगेच पेन आणि कागत घेऊन तिने सर्व घडलेला प्रकार तारखेनुसार मांडला, जे काही वाद आणि भांडण होत होती, ते नेमके महिन्याच्या मोजक्या दिवसातच व्हायची. तिच्या लक्षात यायला लागलं होतं, नवऱ्याला सांगावं आणि मार्ग काढत हॉस्पिटल गाठावं असंच काहीसं तिने ठरवलं होतं. पण समोरचाही माणूस होता, त्याच्याही कदाचित सहणशक्तीची सीमा तुटली असावी. तिने तिच्या नवऱ्याला सांगण्याचा प्रयन्त केला, तर तो म्हणाला,

"ये, असले कारणं घेऊन माझ्या जवळ येऊ नको, स्वतःच्या चुका लपवण्यासाठी या असल्या गोष्टीचा सहारा घेऊ नकोस."

उर्वीला जाणवलं, तिनेही हे त्याचं दिवसात अनुभवलं होतं. पुढे नलिनी म्हणाली,

“तिला मुलंही होतं नव्हती ह्या सगळ्या प्रकारात चीडचीड आणि टेन्शनमध्ये, मग कसं सारंच अवघड झालं. अखेर, चार वर्ष रेंगाळत सोबत राहिल्यानंतर एक दिवस तो तिला बोलला,

"मी असं अपमानाच आणि चुकल्यासारखं आयुष्य नाही जगू शकत."

“मी तुला अजून सहन करू शकत नाही". 

तिने त्याची गयावया करून बऱ्याचदा माफी मागितली, 

"मी सुधरण्याचा प्रयत्न करेल, मला थोडा वेळ दे."  

पण त्याने निर्णय घेतला होता. त्याने तिला घटस्फोट मागितला, आणि योगायोग बघ ना हे सारं त्याचं दिवसात घडून गेलं. तिनेही तावातावात त्याच्या अंगावर कागदपत्र सही करून फेकून दिले. माझ्याकडे आली तेव्हां, ती हताश आणि डिप्रेसड होती.”

“बापरे, असं पण होवू शकतं का, बरोबर आहे आपण आपला विचार करतो, समोरचा कधी पर्यंत सहन आणि आपला विचार करेल. पण नेमकं काय आहे हे... स्त्रीला भोगावं लागतं कि पुरुषांनाही...”

“पाळी निसर्गाने स्त्रीला दिली आहे ना, मग तिच्यासोबत ती हे सगळं पण घेवून येते. अग त्यांच्या दोघात भांडण लावणारा तिसरा मला सापडला. आणि,तो म्हणजे PMS( प्री-मेन्सचुरेशन सिन्ड्रोम). जेव्हा, ती पूर्णपणे PMS च्या आहारी जायची, तेव्हा तिच्या वागण्यात असामान्यपणा असायचा. अगदी मासिक पाळीच्या सात-आठ दिवसाआधी,  तर कधी पाळीच्या दिवसात. PMS -प्रीमेन्सचुरेशन सिन्ड्रोमला आहारी गेलो की हा तिसरा आपल्यात शिरतो आणि आपलीच मर्जी करतो, ना बोलण्यावर ताबा असतो ना वागण्यावर, आणि समोरचा जर शांत राहणारा नसेल तर आगीत तेल ओतलं जातं ग, संसार मोडायला वेळ लागत नाही.”

“भयंकर आहे हे सारं, एक सुंदर नातं कायमच तुटलं, आणि कारणीभूत होता तो तिसरा, जो अस्तित्वात नसून सुद्धा आपलं अस्तित्व दाखवत राहिला. तो तिसरा दोघात शिरला, आणि त्याने राजाराणीच राज्य उध्वस्त केलं.”

“त्यानी दुसरं लग्न केलंय आणि पत्नी आणि मुलांसोबत मजेत राहतो. ती अजूनही डीप्रेशन मधून बाहेर येण्याचं प्रयत्न करते आहे. आणि तिला दुसरं लग्नही करायचं नाही. तिला आता समाजकार्य करायचं आहे, आपल्या सारख्याच लोकांची मदत करायची आहे. मग माझ्यासोबत काम करते ती आता. तुला गोष्ट जरा अतिशयोक्ती वाटत असले आणि सांगायचं झालं तर गोष्ट अगदीच खरी आहे. आता तो आपण कसा विचार करतो त्यावर डिपेंड असते.”

उर्वी ऐकून मनातच स्वतःला शोधात होती, तीही आकाशला असचं काहीही भलतं सलतं बोलत असायची. हल्ली चीडचीड वाढली होती तिची. म्हणाली,

“मग ह्यावर काही उपाय नाही का?”

“ह्या दोघांच्या संबधातून एक गोष्ट लक्षात येणं अतिशय गरजेचं आहे,की कुठलाही संबंध पूर्णपणे तोडण्याआधी त्याची कारण शोधायला हवी. अश्या बऱ्याच घटना असतात, ज्यांच्या घटस्फोटाच काहीच मोठं कारण नसतं, मी अश्या बऱ्याच स्त्रियांना ओळखते, ज्यांचे घटस्फोट झाले आहेत आणि काही वर्षेनंतर त्या आपल्याच निर्णयावर पश्याताप करत असतात, कदाचित तो निर्णयही त्यांनी आवेशात येऊन त्याच काळात घेतला असावा याची १% शक्यता नाकारता येत नाही. आपण एखादा मोठा आजार सहज स्वीकारतो, मग PMS का नाही! कधीकधी आपण एखाद्या व्यक्तीला उगाच कारण न जाणता वाईट ठरवतो. कधीकधी PMSकिंवाPMS+ सुद्धा कारण असू शकतं त्या व्यक्तीच्या वागण्यामागे. PMS हा खुप संवेदनाशील विषय आहे, प्रत्येक स्त्री ही तिच्या आयुष्यात कधी न कधी ह्याला अनुभवतच असते. साधारण २० पैकी १ महिलेत ह्याचं प्रमाण असतंच. PMS हे वैवाहिक जीवन उद्धवस्त होण्याचं कारणही असू शकते. PMS म्हणजे काय, आणि, त्याची तीव्रता काय असू शकते हे प्रत्येक जोडप्याला माहित असणं फार गरजेचं आहे. आपल्या वागण्याने आपली प्रेमाची, जवळची माणसं दुरावू नयेत, किंवा PMS प्रभावित व्यक्तीला समजून घेण्यासाठी ह्याची माहिती असणं अत्यावश्यक आहे. आपण असल्या विषयावर बोलतच नाही, हीच खंत वाटते.”

“बरोबर आहे तुझं, मोकळेपणाने बोलायला हवं, मग आधीच्या बायको कसं करायच्या ग, हल्ली आपण खूप मोकळं वागतो पण आधी?”

“आधीपण होतं ग, जादू टोणा, भूत मंतर अश्याच प्रकारातून जन्माला आले आहे. लोकांना कधी स्त्री कळाली नाहीच. आधी मोकळेपणा नव्हता पण ह्या अश्या जुन्या गोष्टीत समजून घेत असत लोक, नात्याच्या बंधनात सारं सामावून जात असायचं आणि आता मोकळेपणा आलाय पण समजून घेणारे नाहीत, आणि समजून घ्यायला वेळही नाही.”

“तसं ते अतिशय अवघड आहे ग... स्त्री कुणाला कळणं म्हणजे अशक्य...”

“आता तू बोललीस मुद्दा... तशी तू साहित्यिक विचारांची आहेस आधीपासूनच...”

“पण नेमकं काय आहे हे PMS?”

PMS हे एक शारीरिक, वर्तनात्मक किंवा मानसिक कारणातील नकारात्मक बदल आहे. जो स्त्रीच्या मासिक पाळीच्या एक ते दोन आठवड्यांपूर्वी होतो. शरीरामध्ये होणाऱ्या हॉर्मोन्सच्या बदलामुळे हे घडत असते. मायोक्लिनिकच्या रिसर्च मध्ये हे प्रमाणित केले आहे की ७०% तरुण स्त्रियांना ही समस्या असतेच. त्याच प्रभाव हा कमी जास्त आणि तो वेगवेगळ्या स्वरूपाचं असू शकतो. वयाच्या २० ते ४० वयापर्यंत शरीरात होणाऱ्या हॉर्मोनल बदलामुळे, तसेच प्रसूतींनंतरही स्त्रिया ह्या समस्येला सामोर जात असतात. सुमारे १५० पेक्षाही जास्त PMS ची लक्षणे आहेत. चेहऱ्यावर मुरुम येणे, डोकेदुखी, पाय दुखणे, कंबर दुखणे, सूज येणे, थकवा, मनःस्थिती बदलणे, आत्मविश्वास कमी होणे, भावनिक होणे, चिंता, निराशा, चिडचिडणे, घाबरणे, आक्रमक असणे, राग येणे यासारख्या अनेक लक्षण असू शकतात. PMS हा त्या व्यक्तीवर पूर्णपणे रूढ होऊन असह्य करतो, आणि नकळत ती व्यक्ती चुकीचं वागते, म्हणूनच हे स्पष्ट आहे की नातेसंबंधात अडथडा आणण्यास कारणीभूत असू शकते. तेव्हा PMS ला दोघांतला तिसरा बनू देऊ नये, ह्या विषयांवर संवाद करावा, बोलाल तर नक्कीच मार्ग निघेल. माझे ह्या विषयावर सेमिनार सुरु असतात.”

“हो बघितला मी तुझा प्रोफाईल... मी तुझं एक पोस्टर PDDM वर पण बघितलं, ते काय आहे?”

“PMS+ (PMSचा वरचा टप्पा PDDM) हा पीएमएसचा धोकादायक प्रकार आहे. दुसऱ्या शब्दात, प्रीमेन्स्ट्रल डिसफोरिक डिसऑर्डर (PDDM) हा PMSचा चुलत भाऊ आहे. PDDM हा अतिशय गंभीर स्वरूपाचा मानले जातो. साधारण ३-८% स्त्रिया ह्याने प्रभावित असतात. PDDMच्या जवळजवळ १५% पीडित महिला आत्महत्येचा प्रयत्नही करतात.”

“बापरे असंही आहे.”

“अरे खूप काही आहे ग, स्त्री उलगडणे सोपे नव्हे, माझा तर अजूनही अभ्यास सुरु आहे. तशी मी गायनिक आहे पण मला स्त्री मानसिकतेवर जास्त डिटेलिंग करायचं आहे.”

“नलिनी, खूप छान, मलाच खूप काही शिकवून गेलीस तू, मीही हल्ली खूप चिडचिड करते ग, त्या काळात तर मी उगाच कुणावर आरोप करत असते. कारण नसतांना कुणालाही आमच्या दोघांत ओढते आणि मग ... वाद होतो, ह्यातलं बरचं काही मी अनुभवत आहे.  माझा नवरा प्रेमाने समजून घेतो. पण त्यावळेवर तोही चिडतो कधी कधी... मग मात्र कठीण होऊन जातं सर्व.”

“त्याला माहित आहे का हे सर्व?”

“नसावं, पण प्रेम करतो मग करतो मला सहन...”

“मग ठीक आहे, पण सांग त्याला हवं तर माझे आर्टिकल वाचायला दे. तुला सांगू का सर्वात चिंतेची बाब म्हणजे, बहुतेक स्त्रियांना ह्याच्या बद्दल काहीच माहित नाही, ह्या विषयावर अजूनही गुप्तता पाळली जाते. उलट, लोक स्त्रियांच्या मनःस्थितीवर विनोद करतात, हसतात, मुर्खात काढतात. बायका अश्याच असतात असा ठप्पा मारून मोकळे होतात. अश्या, आणि अश्या गंभीर गोष्टीबद्दल पुरुषांना माहित असणे जास्त गरजेच आहे. तेव्हाच ते आपल्या अवतीभवती असणाऱ्या स्त्रियांची नीट काळजी घेऊ शकतील. आता काय बायकोच नसते ना स्त्री म्हणून, आई, बहीण, मुलगीही असू शकते. शिवाय आता स्त्रिया ऑफिसमधेही असतात कधी मैत्रीण तर कधी सहकारी. मग अश्यावेळी ही निदान माहिती असणे तरी महत्वाची ठरते. कारण मूड स्विंगवर एवढं ओढतात ना पुरुष ते ऐकल्या जात नाही ग.”

“बरोबर आहे ग, सांगते ह्याला वाचायला... ये थॅंक्स ग.”

“कशाला?”

“तुझा अनमोल वेळ दिला म्हणून.”

“तसं नाही, म्हटलं ना स्त्रियांच्या मानसिकतेवर मी अभ्यास करत आहे म्हणून, बसं तुझ्या बोलण्याचा ओघ कळला मला... तुझी माझ्या मुलांच्या फोटोवर केलेली कॅमेंट ही माझ्या फोटोवरच्या कॅमेंटच्या आधी होती. तुझं ऑनलाईन असूनही मला पिंग न करणं, माझ्या विचारात बसलं नाही आणि वाटलं तुझ्याशी आता बोलावं... तुझ्यासारखी तरतरीत असणारी, स्वतःसाठी स्वतः उभी होणारी मैत्रीण मी अजूनही बघितली नाही उर्वी... म्हणून हा वेळ खास तुझ्यासाठी...”

“नले कसं ओळखलंस ग, दोन महिने सोबत होतो आपण, तरीही मी एवढी लक्षात राहिली तुझ्या.”

“अरे, काही लोकं दोन तास जरी आपल्या आयुष्यात असले ना तरी आयुष्यभर आठवणीत असतात... आणि तुला गरज असल्यावर तर मी असायला हवी. तुझं रोबोटिक्सवरच आर्टिकल वाचण्यात आलं होतं माझ्या. बस तेव्हांपासून तुला मेल टाकून ठेवला आहे. पण तू उत्तर दिलं नाहीस. म्हंटल, मोठी झालीस, काय उत्तर देशील!”

“ये असं नाही ग, मी मेल बघितला नसेल कदाचित... कदाचित तू माझ्या ऑफिसच्या मेलवर पाठवला असेल.”

“हो, तोच होता आर्टिकलवर, असो, पण तू स्वतः मला शोधून फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, मस्त वाटलं...”

“खूप वर्षाने आपण बोललो ना, मोकळं वाटलं... तुझा विषय पण खूप महत्वाचा आहे.”

“अनुभव आहे माझा, PMS ला माझ्या दुसऱ्या डिलिव्हरी नंतर अनुभवल आहे. अजूनही त्रास होतो. डॉक्टरी पेशात अनेक महिलांना भेटत असते आणि हा PMS सारखा दुर्मिळ विषय हातात लागला. वाटलं PMS बद्दल प्रत्येक स्त्रीलाचं नाही तर प्रत्येक प्रियकराला, होणाऱ्या पतीला, पतीला आणि प्रत्येक पुरुषला माहिती असणे आवश्यक आहेच. मग कौन्सिलिंग सेंटर सुरू केलंय मी.”

“मस्त ग... किप इट अप डियर.. प्राउड ऑफ यू…  बोलत राहू...”

“हो, मी पुढच्या महिन्यात अमेरिकेला जात आहे, ह्याच संदर्भात वर्षभर तिकडे असेल. काही वाटलं तर बोल.”

कॉल झाला आणि उर्वी जरा वेळ शांत झाली. आज तिला तो, ती आणि तिसरा कळाला होता. 

कथा क्रमश-


© उर्मिला देवेन

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल... 

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

फोटो साभार गुगल

Post a Comment

0 Comments