बीइंग नारी... “जेव्हा आई होणं अवघड होते!” भाग २९
© उर्मिला देवेन
---
उर्विला अजून खूप काही वाचायचं होतं, किती काही दडलं होतं ह्या प्रवासात... ते तिला शोधायचं होतं. आपल्याला काहीतरी भेटावं आणि मग आयुष्यात आनंद शिरावा असचं तिला वाटत होतं. जरा थबकली आणि परत निघाली शोधात....
मानवी जीवन रोगमुक्त असावं म्हणून विविध वनस्पतींच्या औषधी गुणधर्मांचे ज्ञान जगासमोर आणले ते प्राचीन आयुर्वेदाने. त्यातली अजून एक अमुल्य जडी बुटी म्हणजे अश्वगंधा. अश्व चा अर्थ होतो घोडा. घोडा हा पौरुषत्वाच प्रतीक मानल्या जाते. अश्वगंधाच्या सेवनाने दुर्बलता नाहीशी होऊन पौरुषत्व वाढते अर्थात प्रजनन क्षमता आणि टेस्टोस्टेरॉन वाढते असं आयुर्वेद सांगतं.
“मग मला तर त्या पतंजलीच्या औषधांमध्येही हे दिलं होतं.” उर्वी लिहिता लिहिता थांबली,
आणि तिला आठवलं, “त्या पतंजलीच्या डॉक्टरने विचारलं होतं, तर आई पटकन म्हणाली होती, हिला राग खूप लवकर येते. सारखी चीडचीड करते आम्हाला तर...”
तो काय म्हणाला होता आता तिला आठवलं, अश्वगंधाचा काढा करून घ्यायला सांगितला होता त्याने, म्हणाला होता, ज्या स्त्रियांना जास्त राग, ताण, चिंता अश्या समस्यांना सारखं समोर जावं लागते त्यांना आम्ही अश्वगंधाची मूळ पाण्यात उकळून प्यायला सांगतो, मन शांत होते.
“हुम्म, अजूनही मन शांत झालेलं दिसत नाही माझं, महिना जास्त होईल आता हे सगळं करून. चला मिळेल आपल्यालाही गुण... वाट बघण्याशिवाय करू काय शकते मी.”
वाट बघण्यासारखी मोठी शिक्षा नाही...
आयुष्यभर आपण कसली ना कसली वाट बघत असतो...
पण ही वाट आपली कधी वाट लावून टाकते कळत नाही....
“माझंही असं होणार काय रे देवा... देव आहे तरी कुठे ह्या जगात... आईवडीलात असतो ह्या भूतलावर पण आपल्याला त्यांचे आशीर्वाद लाभलेच नाहीत कदाचित, ना आकाशची आई एक शब्द सुखाचा बोलत, ना माझी आई... वचका धरल्यासारखी वागणूक असते.... जावूदे आपण उभं केलंय... आता भोगा...”
त्रिफळा म्हणजे तीन फळांच मिश्रण, आवळा, हिरडा आणि बेहडा ह्याचं विशिष्ट प्रमाणात केलेले मिश्रण म्हणजे चूर्ण. हे तिन्ही फळ आपल्या आपल्या गुणांसाठी आधीच आयुर्वेदात त्याचं महत्वाच स्थान पक्क करून आहेत. हजारो वर्षा पासून हे मिश्रण मनुष्य जीवनात विविध समस्यांवर वापरल्या जाते.
उर्वीला आठवलं, “हो, माझ्या घरीही असायचं हे, ह्याचं त्रिफळा सिरपपण घरी असायचं, गॅस, पित्त साठी आई वापरत होती, नंतर तिने मला आणि माझ्या बहिणीला ही रक्त शुद्धीसाठी दिलेलं होतं.”
“अर्थात त्रिफळा चूर्ण खाल्ल्यास, हार्मोन्स संतुलित राहतात आणि मासिक पाळीच्या दिवसात त्रास जाणवत नाही…”
“जावूदे, मी तीन बॉटल घेवून आली आहे, पण अजून सुरु केलं नाही, आकाशला बोलली जेवणानंतर घेत जा म्हणून तर म्हणतोय चव चांगली नाही. घश्यात अडकते, किती फायदे आहेत ह्याचे. शरीर शुद्धीकरण म्हत्वाच आहेच ना. फोर्स नको. आपण आपलं सुरु ठेवायचं. तो बाकीच गुमान घेतो हे काय कमी आहे माझ्यासाठी.”
अजून बऱ्याच आयुर्वेदिक औषधी तिच्या कपाटात होत्या, डायरी बाजूला ठेवली आणि तिने कपाट उघडलं, त्यात चंद्रप्रभा वटी तिला दिसली, विचार शिरला, “काय नाव असतात ह्या अश्या औषधीच, अर्थ दगडाला असतो त्यात... चंद्रासारखी चमक ज्याने येते ती वटी म्हणजे चंद्रप्रभा वटी.”
तिने ती बॉटल उलटून बघितली, त्यातली सामग्री वाचली, जवळपास २० जडीबुटीने बनली होती ती, त्यातल्या काही तर उर्वीला माहित होत्या, रोजच्या वापरत असणाऱ्या, काळी मिरी, सुंठ, धने, सेंधानमक, तेजपान.
“अरे, हे तर रोजच्या वापरणीत आहे, मग हे तर मसाल्यांमध्ये येते, मग मासाल्याही पथ्य का म्हणून... मी दालचिनीच्या चहावर एक आर्टिकल वाचलं होतं, त्यात तर लिहिलं होतं कि दालचिनी फर्टिलिटी बूस्टर म्हणून अतिशय लाभदायी ठरते. म्हणजे काय खर आणि काय खोटं...”
वाटलं, “ह्या औषधी माहित होवू नयेत म्हणून कदाचित ही पथ्यची प्रथा आली असावी... आपण डोळे मिटून आयुर्वेदावर विश्वास ठेवत पथ्य पाळतो आणि हेच असतं त्याच्या बऱ्याच औषधीमध्ये.”
मग तिला वाटलं, कदाचित अतिरेक होवू नये म्हणून असावं...
“म्हणून ऍलोपैथी पुढे आहे आयुर्वेदापेक्षा, ज्यात पथ्य नसते. सगळं ओके असते. मग परत आपण आयुर्वेदाकडे वळतो ते का? मी पण विश्वास ठेवते. आयुर्वेद आपलं काम करतं हळूहळू... आणि ऍलोपैथी लवकर. माझ्या सारख्याला तर सगळंच हवंय, कुठून काय होईल आणि मला गुण देईल काय माहित...”
दिवस तिचा विचारत निघून गेला. पुढचे काही महिने, आयुर्वेदिक काळात गेले तिचे, पण काहीच गवसलं नाही. उलट प्रत्येक महिन्याला, तेच तेच ओव्हूलेशन टेस्ट, बेसल बॉडी टेम्परेचर मोजणं, आणि मग आकाशच्या मागे असणं, सगळं कसं मशीनसारखं झालं होतं, ह्यातून जरा बाहेर निघावं म्हणून शिनिवार रविवार दोघं फिरायला जात. त्यातही ओव्हूलेशन नंतरच्या दिवसात आशेने आकाश उर्वीला जपत असायचा. तीही काळजी घ्यायची. सगळं माहित होतं कि पथ्य असं काहीही नसतं पण तरीही तिचं सुरु असायचं, अंडी खायची नाही, गरम वस्तू खायच्या नाही, धावायचं नाही. असं बरच काही करूनही, काहीच होत नव्हतं. स्वतःच्या शरीराला समजूनही ती ह्या ठिकाणी अडाणी झाली होती.
सगळी सुख जवळपास तिच्या वाट्याला येत होती, पण हे एकचं सूख दूर पळत होतं. काहीच सुचत नसायचं तिला. सगळं घरात असून त्या सर्व गोष्टीला अर्थ वाटत नसायचा. एकांतात समजवायची, असे अनेक लोकं असतील मग काय जगायचं नाही, पण मग वाटायचं आकाशचा काय दोष, तोही माझ्यासोबत वांझपण भोगत आहे. स्वतः ची घृणा वाढत होती. वाटायचं लग्नाअगोदर सोबत होते दोघे, तेव्हां कधी दिवस गेले असते तर किती बऱ झालं असतं ना, पण दोघेही भेकाड होते, कधी सीमा सोडून सीमा लांघली नाही, प्रेम मात्र सीमेच्या पार केलं दोघांनी. आता उर्वीला तेही दिवस आठवत असायचे. त्यांच्यासोबत असणाऱ्या एका कपलला लग्नाआधी दिवस गेल्याने लग्न करावं लागलं होतं. तिचा मुलगा आज नव वर्षाचा होता. तिला तर शोभतही नव्हता.
त्या दिवशी सहज आकाश म्हणाला,
“संदेश आणि सानिकाच्या लग्नाचा वाढदिवस नंतर येतो काय ग? नेहमी तिच्या मुलाचा वाढदिवस आधी असतो.”
“तुला का रे प्रश्न पडला?”
“मी आज सानिकाचा प्रोफाईल बघितला, आणि वाटलं.”
“अरे तुला माहित नाही का... ती लग्नात सात महिन्याची प्रेग्नेंट होती.”
“अच्छा, अरे हो, विसरलो होतो मी, चायला आपलं असं झालं असतं तर हे आता भानगड राहिली नसती. तेव्हां कसं वय होतं. म्हणजे आताही आहे, पण... च्यामारी, घाबरत होतो यार आपण असं खुलेआम करायला हवं होतं, पर्वा न करता... तेव्हां राहीलच असतं.”
“काय माहित, राहिलं असतं कि नाही म्हणून... तसंही काय कमी कष्ट पडली आपल्याला, मग तर तांडव झालं असतं. आणि प्रलय आला असता.” उर्वी उतरत्या स्वरात म्हणाली.
“हो पण, शांतही झाला असता ना, ते काय, चार दिवस बडबड करतात लोकं, बघ ना पन्नासच्या वर कमेंट झाल्या तिच्या मुलाच्या फोटोवर आता काही वेळात, विसरले सगळे.”
“हो ना, ती स्वतःही विसरली असेल, तिने काय केलं होतं ते. जावूदे, आपण बोलूच शकतो, तिनेही सहन केलं असेलच ना. ज्याचं त्याला माहित असतं रे... आता आपल्याला आपलं माहित आहे. लोकांना आपण काय वाटतो सांगू शकत नाही.”
आकाश गप्प झाला, त्यालाही आता जाणवत होतं. तसं त्याचं उत्तर ठरलं असायचं, आम्ही हनिमूनवर आहोत.
पण हा प्रश्न पुरुषांना नाहीना विचारल्या जात. तो उठतो तो स्त्रियांच्या बैठकीत आणि बाहेर पडतोही तिथून. दोन पुरुष ह्या विषयावर गप्पा करतांना बघितले नाही कधी पण स्त्री मात्र फोनवर सुद्धा विचारल्याशिवाय रहात नाही. तसं बरोबर आहेच, कारण स्त्री म्हटलं, की प्रजनन आलंच. स्त्रीही बाई होते ती आई झाल्यावर. खर तर स्त्रीच्या ह्याच क्षमतेवर अख्खी दुनिया आहे. ती आहे म्हणून सारे आहेत. ती जन्म देवू शकते म्हणून जग आहे. मग हा मुद्दा स्त्रीच काढू शकते. पुरुष नाही...
बघता बघता २०१० त्याच्या अंतिम महिन्यात होतं, डिसेंबर महिना होता. थंडी खूप होती. जॉब शोधणं सुरूच होतं तिचं. त्यात तिची इंफेर्टीलिटी ह्या विषयावर सुरु असलेली नो गाईड नो डिग्री पीएचडी काही थांबत नव्हती. लिखाण सुरू असायचं, पुस्तकाचं वाचन सुरु असायचं, काय काय केल्याने दिवस राहू शकतात ह्याचा अभ्यास तिचा सुरु झाला होता. त्यातून नोट्स काढणं आपण कुठे कमी पडतो ह्याचा अंदाज घेणं, बापरे... जणू पुस्तक तिचं तयार होत होतं.
विचार करत स्वतःशी बोलायची,
“ह्यातून बाहेर आली कि नक्की पुस्तक काढणार, किती बायका असतील ना ज्यांना असं बेसिक नॉलेज नसणार. डॉक्टर ज्ञानी असतात, त्यांचा अभ्यास खूप सखोल असतो. कधी तर फारसं सांगताही नाहीत. पण सामान्य माणसांना ओबड धोबड भाषा समजते. मला जे समजत आहे ते नक्की मी सांगणार सर्वाना, एक नारी म्हणून मला ते पोहचवायचं आहे. पण... अजून मलाच काही मिळत नाही तर लोकांना काय ज्ञान सांगायचं...”
परत विचारांचे डोलारे खाली येवून झुकून जायचे तिचे,
“लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण, मग आपण आधी अंबलात आणूया. बघूया आपला प्रवास कुठवर आहे.”
ह्या विचारात स्वारी परत कामी लागायची. दोन हजारच्या काळापर्यंत जेवढी पुस्तक तिला इंफेर्टीलिटीवर मिळाली सर्व तिच्या फोल्डरमध्ये जमा झाली होती. मराठी, इग्रजी हिंदी, देशी विदेशी.
---
कथा क्रमशः
© उर्मिला देवेन
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
0 Comments