बीइंग नारी... “जेव्हा आई होणं अवघड होते!” भाग ३०

 बीइंग नारी... “जेव्हा आई होणं अवघड होते!” © उर्मिला देवेन

भाग ३०

---


आता सर्वकाही करून झालं होतं, स्वतःचा तिचा अभ्यास सुरु झाला होता,

दिवसभर एकटी होती, आज दिवसभर तिने लिहून काढलं,

जसं शेतकऱ्याला धन्य मिळाव्यासाठी सर्वच गोष्टीची गरज असते. तसचं काहीसं आपलंही, बीज हवं असतं उत्तम, ते अंडाशयातून मिळतं. तसं वातावरण हवं असतं जे गर्भाशय तयार करत असतं. जमीन हवी असते जिथे ते बीज रोवल्या जावू शकेल आणि वाढीला लागेल.


आता अंडाशय म्हणजे ओव्हरी, ज्या दोन असतात. यातली एखादी जरी काही कारणास्तव काढून टाकल्या गेली तरीही स्त्री गर्भ धारण करू शकते. दुसऱ्या ओव्हरीच्या मदतीने तेही नैसर्गिकरित्या.

आपल्या ह्या अति महत्वाच्या शरीरातील अंगाबद्दल कितीस माहीत असते आपल्याला! चेहरा सोडून आपण स्त्रिया दुसऱ्या अंगावर लक्ष देत नाही, खूपच झालं तर वजन कमी करण्याच्या मागे असतो.  

भ्रूणावस्थेपासून सोबत असणारं आणि मुलीचा जन्म झाल्यावर त्या कोवळ्या जीवात म्हणजे त्या लहानश्या शरीरातील अंडाशयामध्ये जवळपास दहा लाख बीजांडे असतात. जशी मुलीची वाढ होतं जाते त्याचं प्रमाण कमी होतं जातं आणि मासिक पाळी सुरू होईपर्यंत जवळपास तीन लाख पर्यंत शिल्लक राहतात. पूर्ण वाढ झालेल्या स्त्री शरीरातील अंडाशय हे बदामाच्या आकृतीचा फुगीर व लांबट असा गोल असतं, प्रत्येक अंडाशय हे साधारणपणे लांबी ३ सेंमी. रुंदी १.५ सेंमी. जाडी १ सेंमी. असतं. साधारण स्त्रीच वीस ते पंचवीस वर्ष वय हे प्रजननासाठी योग्य मानल्या जातं. आश्चर्य वाटेल ह्या वयात सुद्धा फक्त तीनशे ते चारशे बीजांडेच प्रजनन प्रक्रियेसाठी सक्रीय भाग घेतात. अर्थात तेवढेच बीजांड फक्त अंडाशयात परिपक्व किंवा बाहेर येण्यास सक्षम असतात.

स्त्रीच बाह्य सौंदर्य हे संपूर्णपणे ह्याच अंडाशयाच्या कार्यावर अवलंबून असतं, धक्का बसला ना? स्त्रीच स्त्रीपण ह्यानेच असतं.

अहो हेच अंडाशय इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन मुख्य होर्मोंसचे स्त्रोत आहे. ज्यामुळे स्तन, शरीराचा आकार, आवाजातलं मार्दव, दाढीमिशा नसणं, मासिक चक्र आणि गर्भधारणा हे सगळं गुंतल्या जातं.

ह्याचा आकार सुद्धा वयानुसार बदलत असतो बरका... शिवाय बीजांड तयार होतांना ह्याचा आकार ५ सेंमी पर्यंत वाढतो. आणि प्रौढ अवस्थेत तो सुकळून जातो.

लिहून पेन ठेवला आणि उर्वीने दीर्घ श्वास घेतला, मनात वाटलं,

“आपलं तर वय निघून गेलंय योग्य बीजांडच, मग करा आता प्रयन्त. प्रयत्नाशियाय कसं मिळणार जे हवंय ते.”

बराच वेळ विचार झाल्यावर वाटलं, “ह्याची टेस्ट पण असणार ना? करावी लागेल का? पण वयाच्या चाळीस वर्षात सुद्धा मुलं होतात कि बायकांना. जावूदे, नको तेवढा विचार. म्हणूनच लोकं बीजांड काढून फ्रोझोन करून ठेवतात हल्ली. पण ते कुठे आपल्याकडे आहे एवढं. असलं तरी हाय सोसाईटी मध्ये होतं.”

गर्भाशय, स्त्री जननांगचा अतिशय महत्वाचा भाग आहे. जो संपूर्ण स्त्री जननांगाशी जोडला असतो. जो गर्भासाठी योग्य असं वातावरण निर्माण करतो आणि प्रसूती प्रक्रिया घडवून आणणे ह्याचं कार्य असतं., साधारण त्रिकोनी रचनेच, पेरूच्या किंवा नासपतीच्या आकाराच असतं. जे साधारण ७.५ सेंमी. लांबीच, ५ सेंमी. रूंदीच आणि २.५ सेंमी जाडीच असते.  जेव्हा गर्भाशय पुढे झुकलेले असते तेव्हा त्याला अँटीव्हर्टेड म्हणतात किंवा जेव्हा ते मागे असते तेव्हा त्याला रेट्रोव्हर्टेड म्हणतात. गर्भाशयाच्या झुकण्याचा बाळाच्या जन्मावर कोणताही परिणाम होत नसतो. पण गर्भाशयाचा आकार मात्र चुकला कि बोंबला.

उर्वी क्षणभर विचारत पडली, वाटलं, “फरक पडत नसतोच, पण माझं असेल का? नसेल... आता एवढ्यांदा गर्भाशयाची चाचणी झाली आहे. काहीच नसणार, नाहीतर बोलले असते ना डॉक्टर.”

तिने परत पेन हातात घेतला,

आता हे तीन तोंडी गर्भाशय, ज्याची दोन वरची तोंड बीजांडवाहिनी(फैलोपियन ट्यूब)ला जोडली असतात. आणि ह्याच मार्गाने फलित झालेलं बीज खेळत खेळत गर्भाशयात शिरत असतं. खालचं तोंड, ज्याला गर्भाशयग्रीवा(cervix) म्हणतात. जे बाहेरील योनिमार्गाशी जोडल्या गेले असते. ओबड धोबड भाषेत सांगायचं झालं तर हे गर्भाशय स्त्रियांमध्ये लघवीची थैली आणि गुदाशय यांच्यामध्ये स्थित असते.

बीज झालं, वातावरण झालं, आता राहिली योग्य जमीन. जमीन सुपीक असायला हवी ना?

उर्वीला आठवलं, डॉ मानसीने एंडोमेट्रियमची तपासणी केली होती. आणि हीच एंडोमेट्रियम म्हणजे, जमीन ज्यावर बीजांड वाहिनीतून फलित झालेलं बीजाच वास्तविक रोपण इथेच होतं. आणि त्यांची पुढची नव महिने ह्याच गर्भाशयाच्या धरणीवर जातात. मग ही जमीन सुपीक असणे अति गरजेच असतं.

फलित स्त्रीबीज गर्भनलिकेतून गर्भाशयात येईपर्यंत गर्भाशयाच्या अस्तराची(एंडोमेट्रियम) वाढ होऊन सहा ते चौदा मि. मि. इतके जाड होते. आणि हेच अस्तर स्त्रीबीज फलित झालं नाही तर मग गळून पडते आणि पाळी येते. अर्थात दर महिन्याला ही जमीन तयार होतं असते. आणि ही जर सहा मिमी पेक्षा कमी असली तर स्त्रीबीज फलित होवूनही गर्भ टिकत नाही. म्हणजे सारी मेहनत फुस्स... अर्थात स्त्री प्रजनन इंद्रियाचा प्रत्येक भाग कार्यश्रम असायला हवा. म्हणून म्हटल्या जातं प्रत्येक महिन्यात निरोगी जोडप्यांना सुद्धा फक्त ३०% चान्स असतो.

“च्यामारी, आणि आमच्या सारख्यांच काय मग! इथे तर कुठे काय झालंय हे अजूनही कळत नाही.”

उर्वीने पेन ठेवला. डायरी बाजूला केली. क्षणभर त्या डायरीवर हात फिरवला, म्हणाली,

“कधी काळी कविता लिहायची मी, आज काय लिहिते आहे... टप्पा असतो आयुष्याचा, रोबोटिक्सवर पीएचडी करायचं सोडून काय करत आहे. माझ्या बरोबरीच्या कुठे पोहचल्या आज, मुलं झालीत नौकरी करत आहेत, माझी गाडी काही पुढे जात नाही. आपल्या नशिबी निसर्ग नियम लागलाच नाही, दोन शरीराचं मिलन झालं पण तिसऱ्या जीवाची उत्पत्ति काही झाली नाही, आता निसर्गाचा नियम काम करत नसला कि मग आपण का करत नाही म्हणून मागे लागतो.

निसर्ग जसा सगळं आपल्याला सांगतो. भूक लागते, लघवी लागते. झोप लागते, शिवाय सगळ्या शरीराच्या क्रिया उत्तेजित होतं असतात त्या त्या वेळेनुसार आणि प्रत्येक गोष्ट आपसूक होतं नाही, ते एका क्रियेच्या माध्यमातून होते. जी घडत जाते, वेळेनुसार, शरीराच्या नियमानुसार... मग ही एकचं क्रिया का घडत नसावी, स्त्रीबीज आणि पुरुषबीज मिलनानंतर पुढे का वाढ होतं नसावी...

आचार्य अग्निवेश लिखित चरकसंहिता  हा आयुर्वेदाचा एक प्रसिद्ध ग्रंथ आहे. यामध्ये मानवी शरीराशी संबंधित तत्त्व, लक्षणे आणि अनेक रोगांचे उपचार वर्णन केले आहेत. त्यातल्या शरीर स्थान अध्याय 4 श्लोक 5 मध्ये लिहिलं आहे.

“शुक्र शोणित जीव संयोगे तू खलू कुक्षिगते गर्भ संज्ञा ”

अर्थात गर्भाचा अर्थ, पुरुष बीज (शुक्र) स्त्रीबीज (शोणित) ज्याच्या संयोगाने चेतना (जीव) निर्माण होवून जो स्त्रीच्या कुशीत विराजमान होतो ह्यालाच गर्भ म्हणतात.

अर्थात गर्भधारण ही क्रिया होत नसेल तर ह्या क्रियेत कुठेतरी कमी जास्तपण आहे. आणि ही सर्व नैसर्गिक क्रिया आहे. ज्यासाठी वेळही महत्वाचा असतो.

उर्वीच्या बाबतीत सर्व नीट होत, बीज ही तयार होत होते, ते फुटून बाहेरही पडत होते, गर्भ नलिका बंद नव्हत्या आणि गर्भशायच अस्तरही सुपीक होतं... मग कदाचित निसर्गाला वेळ हवा असावा... ह्या निर्णयावर उर्वी पोहचली होती.

मनाला शांती मिळावी आणि ट्रेस रेलीफसाठी तिने एक्यूपंक्चर करायचं ठरवलं, तसं जपानमध्ये एक्यूपंक्चरला विशेष महत्व, तिने स्वतः एक्यूपंक्चर क्लिनिक शोधलं, आणि नेमकं घराजवळ मिळालं, संध्याकाळी, आकाश आला, त्याच्या कानावर टाकलं, तो तर कधी नाही म्हणत नव्हता.  

“जावून ये, माहिती काढ. मला हरकत नाही.”

“तू येशील का?

“नाही ग, जवळच आहे, तू जा, नाहीच झालं तुझ्यानी तर मग मी येईल. पण मी जरा बिझी आहे ह्या नवीन प्रोजेक्टमध्ये.”

उर्वी जरा नाराज झाली, तर म्हणाला, “उर्वी प्रयत्न कर, खूप शिकता येईल. आता अजून काही वर्ष आपण आहोत इकडे. शिक लोकांशी बोलणं, जमेल तुला, तुझ्या अभ्यासाचा सराव होईल.”

उर्वीने नाक तोंड मुरडत होकार दिला. तर आकाश हसला, म्हणाला,

“जमत नाही तुला, ते नाक मुरडणं.”

उर्वीने त्याच्या तोंडावर उशी फेकली, आणि मग दोघांची ती रात्र परत रंगून गेली.

बस उर्वीला आत उद्याची वाट होती, आकाश ऑफिसला निघून गेला, आणि हिने स्वतःला तयार केलं, आता तोडक्या जपानी भाषेत जावून विचारायचं होतं, कशाला काय म्हणतात हेही माहित करून घायचं होतं. तिने शोध सुरु केला. भाषेची माहिती तर घेतली, तशी ती रात्रीपासूनच वाचत होती आणि तेवढीच उत्साहित झाली होती, जणू तिच्या हातात आता जादू लागली होती. कळालं कि एक्यूपंक्चर आणि एक्यूप्रेशर थेरपी इन्फर्टिलिटीसाठीही केल्या जातं, बस सकाळपासून खूप वाचून झालं आणि तिने तिची डायरी काढली,

“च्यायला गुगल अंकलला काहीही विचारा उत्तर असतं त्याच्याकडे. पण नुसतं गुगलवर वाचून बोलता येत नाही, मग त्यासाठी कॉन्फेरेंसचे पेपर, डॉक्टरांची आर्टिकल, पुस्तकं वाचावे लागतात, हल्ली माझं तेच सुरु आहे.”

हसली, एवढा अभ्यास आधी बारावीत PMTला केला असता, तर आज डॉक्टर असते.

मग जरा नाराज झाली, म्हणाली, “मग आकाश कसा मिळाला असता?”

तोच तिला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, आठवलं कॉलेज मध्ये असतांना ती त्याला बोलली होती,

“मला डॉक्टर व्हयाच होतं, नागपूर मध्ये प्रवेश मिळाला नाही आणि मग पुढचे राऊंड केलेच नाही... नाहीतर मी डॉक्टर राहिली असती…”

“मी आलो असतो पेशंट बनून, तरीही तुला शोधलं असतं.”

आठवून उर्वीला पटकन हसू आलं. ती परत तीच्या अभ्यासात गुंग झाली,

एक्यूपंक्चर ही सुमारे 6000 वर्षां पूर्वीपासूनची चीनी पारंपारिक उपचार पद्धत आहे. मात्र ही चीनमध्येच उदयाला आली की नाही ह्यावर फारसं काही कुठे नमूद नाही. अर्थात त्याच्या निर्मितीवर अजूनही शोध सुरू आहेत. असो, शारीरिक समस्या दूर करण्यासाठी  एक्यूपंक्चरचा वापर केल्या जातो. ज्यामध्ये शरीरातील ऊर्जा संतुलित करून समस्येवर उपचार केले जातात. अर्थात कुठलीच औषधी दिली जात नाही यामध्ये, शरीरात ठराविक पॉइंटवर सूक्ष्म सुया टोचल्या जातात, अर्थात ही ट्रीटमेंटजर इन्फर्टिलिटीसाठी असेल तर मग स्त्रीच्या प्रजनन इंद्रियांशी संबंधित पॉइंटवर सारी ट्रीटमेंट असते. ज्यामुळे हार्मोन्सची पातळी आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत होते. आणि आपसूकच समस्यांचा इलाज होतो. ही अशी पद्धत नाही कि बस आज अनुभवली आणि उद्या इलाज झाला, शरीर वेळ घेत असतं ह्या प्रक्रियेत, अर्थात शरीर नैसर्गिक रित्या वेळ घेतच हे महत्वाच.

झालं, इथेही हार्मोन्सचा खेळ आला, आणि वेळेच साम्राज्य,

हि वेळ पण ना,

कधी आपली असते

कधी ती परकी होती

हे न सुटणार गणित

ती वेळच सोडवते.

पण आपण मानसं, ज्याचं हृदय धडधडतं आणि मन जी शरीरात नसून सुद्धा असतं हे मात्र वेळेसाठी वाट बघत नाही, आपण हातात हात धरून तर बसू शकत नाही... आणि उलट असंही, वेळ त्याचीच होते जो प्रयन्त करतो....

प्रयत्नाच्या वेलीला यशाची फुलं नक्की येतात आणि प्रयत्न केलीच नाही तर मग हीच वेळ वाकुल्या दाखवत हातातून सुटून जाते, आणि मग आपण परत हातात हात धरून बसतो...

ह्याच विचाराने उर्वी कधी स्वस्थ बसून नुसती तिच्या वेळेची वाट बघू शकत नव्हती...

कथा क्रमशः 

© उर्मिला देवेन

धन्यवाद !

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल... 

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

Post a Comment

0 Comments