बीइंग नारी... “जेव्हा आई होणं अवघड होते!” भाग ३१

 बीइंग नारी... “जेव्हा आई होणं अवघड होते!” भाग ३१ 

© उर्मिला देवेन

----

मन,

ज्याच जळतं त्याचं त्यालाच ते कळतं...

नाहीका?त्याच जळणाऱ्या मनाला शांत करण्याचे मार्ग उर्वी शोधत असायची.

एक्यूपंक्चरला एक पर्यायी इलाज म्हणून डॉक्टर सांगतात. हार्मोन्सच्या स्थिरतेसाठी...मग ह्या मार्गाने जायचं तिने ठरवलं होतं.

वेळ झाला होता उर्वी नवीन उमेदेने निघाली एक्यूपंक्चर क्लिनिकला, तिकडे पोहचली, त्यांच्याकडे पोंप्लेट होते त्यात बघून तिने तिला कशासाठी एक्यूपंक्चर कारायचं आहे हेही सांगितलं. तिची सर्व माहिती त्यांनी घेतली. सारं कसं पाठ झालं होतंच. ओपॉइनमेंट घेतली. आठवड्यातून एकदा करायचं होतं तिला एक्यूपंक्चरचं सेशन, त्यांनी तर तिला एक्यूप्रेशर करण्याचा पण सल्ला दिला. ट्रेस रिलीफसाठी उत्तम असतो असही सांगितलं. मुख्य म्हणजे तो डॉक्टर आंधळा होता. तरीही एक्यूपंक्चरचा डॉक्टर होता, उर्वीशी बोलतांना तिला जाणवलं सुद्धा नाही, त्याने काळा चष्मा लावला होता. पण अलगत त्याने हळूच टेबलवरचा पेन चाचपत घेतला आणि उर्वीच्या लक्षात आलं, वाटलं कसा करत असावा, पण ओपॉइनमेंट त्याच्याकडे इतक्या होत्या कि तिची त्याला अॅडजस्ट करतानाही अवघड जात होतं. पण उर्वीच्या बोलण्याच्या सुरुने कदाचित तिची गरज त्याच्या पर्यंत पोहचली होती.

उर्वी घरी आली, आज परत ती खुश होती, नवीन आशा तिच्यात निर्माण झाली होती. परत तिने एक्यूपंक्चरबद्दल माहिती काढली, आता तिला महित झालं की एक्यूपंक्चर साधारण एक जोड इलाज म्हणून जास्त उपयुक्त ठरतो, त्यासोबत आययूआय (IUI)किंवा IVF ची ट्रीटमेंट लाभदायी असते.

उर्वीने विचार केला, पण ही ट्रीटमेंट महाग असते, मन नाराज झालं, मग तिने खूप माहिती मिळवली, आणि लक्षात आलं, एक नैसर्गिक इलाज म्हणूनही आपण एक्यूपंक्चरला बघू शकतो. बस ती खुश झाली,

वाटलं, कॉलेजनंतर किती पायपीट झाली माझी, काय काय नाही सहन केलं, घरच्यांशी वाद, नौकरीसाठी तगमग, आई कीटकीट करते म्हणून ह्याच्या त्याच्या घरी राहणं, कुनासोबतही जुळवून घेणं, आई बाबांनी कधी नातेवायकांच्या घरी राहिले नव्हते, पण उर्वीने कुणालाच सोडलं नव्हतं, तिला गरज पडली कि हमखास त्यांची घरी जायची, राहायची, कधी इंटरव्ह्यूसाठी तर कधी आकाशला भेटण्याचा बहाणा. कुणी राहू द्यायचं तर कुणी बहाणा काढून अलगत नाही म्हणायचं. पण सगळे जुळले होते तिच्यासोबत, काका म्हणजे बाबांचा सख्खा भाऊ, म्हणाला होता,

“तुझा बाप कधी आला नाही, आता वेळ आली तर मुलीला पाठवलं...”

तिनेही उत्तर दिलं होतं, “का रे काका, मला लहानपणी तूच उचलून गावात फिरत असायचा ना, मी आज गाव फिरून आले मग काय ठेवणार नाहीस...”

किती तो त्रागा, लग्न झालं, सासूने कुठलंच कारण ठेवलं नव्हतं ज्याने उर्वी निघून जावी... ते तर भलं हो तिचंच... आकाशला सात समुद्रापार नौकरी लागली. नाहीतर ती कदाचितच राहिली असती. आताही तिला कमांड हवी असायची तिथून, पण... तेवढं आकाशला कळतं आणि तिला परत धीर मिळत होता.

त्यात एवढी शिकलेली, पण घाल चुलीत आणि लाव लाकडं अशी अवस्था, तीच्या मागून शिकणाऱ्या, मोठं मोठ्या कंपनीत होत्या, सगळं सुरळीत सुरु होतं त्याचं. सासू नाहीतर आई मुलं सांभाळायला. त्याचं करिअर उठत होतं.

उर्वीला कंटाळा आला आता ते फेसबुक बघून, भीती भरली होती मनात, वाटत असायचं,

“कुणी काही विचारलं तर काय सांगायचं. आता तर जवळपास सगळ्या मैत्रिणी सोशल मिडियावर आहेत. सुरुवातीला माझं लग्न झालं होतं तेव्हा तरी नव्हत्या...”

बरोबर तर होतं, सुरुवातीला दिवसं नवलाईचे असतात, सोशल मिडियाची गरज पडत नाही, मग मुलं झाले कि अजून काही महिने त्यात आणि कौतुकात जातात... तीन चार वर्ष अशी निघून गेली कि ती मग घरची राणी होते... मग पाय बाहेर पडतात. शिक्षण असतच, आयुष्यचे तीन चार वर्ष फक्त स्वतःसाठी देवून ती नव्याने नवीन जवाबदारी सांभाळायला तयार असते. शियाय वेळात नातवाचं सुख घरच्या वडिलधाऱ्यानां लाभलं असते, सून, मुलगी प्रिय होत जाते. नाती गुंततात, नवऱ्यासाठी ती फक्त त्याची बायको नसते, त्याच्या मुलांची आई असते, सासू सासऱ्यांसाठी ती आता नातवांची आई असते, सगळी नाती सुरेख नात्याच्या गुंत्यात अडकत त्याची माळ बनते. तिच्यामुळे आता एकत्र आले असतात सर्व. तिच्या असल्या नसल्याने खूप फरक पडणार असतो. आणि हेच हवं असतं स्त्रीला स्वतःला उभं करण्यासाठी.

खरच, कुटुंबाच प्रेम हाच सर्वात मोठा आशीर्वाद असतो,

मन परत नाराज झालं, पण परत उभं राहिलं, नवीन वाटेवर चालणाऱ्याच्या सोबत कुणीच नसतं.... वेगळेपणाची वाट काटेरी असते आणि ते काटे आपल्या जवळचे पसरवतात....

पल्या आयुष्याची शाळा हेच आपल्या जवळचे घडवून आणतात... आणि आपण घडत जातो.

पण तरही आपल्यांनी समजून घेतलं तर... किती मोठा भार कमी होईल....

उर्वीला वाटायचं, “आपण प्रत्येक ठिकाणी मातीच खाल्ली, आकाश तेवढा वाट्याला आला, पण, त्याचं मन बदललं तर? मी तर एकटी पडेल, सर्व आताच मला काहीही भाव देत नाही मग काय खाक देतील... सासू तर सासुच बनून राहिली तिने कधी मला मनात नांदवलं नाही... जावूदे, आपणच कदाचित तिच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही.”

जुने लोकं म्हणायचे, नाती सर्वांच्या संमतीने जुळून यायला हवी नाहीतर आयुष्यभर मनस्ताप असतो, नात्यांना गुंफून ठेवणे कठीण आहे. आपण बाहेरच्या जगाला सहज आपल्या सोबत घेऊ शकतो पण घरच्या नात्यांना गुंफण अवघड... सर्वांमध्ये राहून एकटं पडणं ह्यालाच म्हणत असावं...

आणि ह्याचा मनाला नाही म्हटलं तरी त्रास होत होताच ना... आणि साहजिकच मग हे असं वाट्याला येणार.... तिनेच लढाई सुरु केली तिलाच ती लढावी लागणार होती. मनावर खूप आघात झाले होते, कुठलीच बाजू सुटली नव्हती, कितीही मेंदू सारंकाही झुगारून नवीन दमाने कामाला लागण्यासाठी मनाला तयार करत असला तरीही त्या मनाची तळमळ त्याला माहित होती.

उर्वीच मन परत मनात बोललं, “इथे मन आणि मेंदू सतत भांडत असतो... आणि परिणाम मी बघत आहे... नाहीतर प्रयत्न कमी नाहीत माझे.... पण अजूनही करणं बाकी असेल... म्हणून ही वेळ वैरीण झाली आहे माझी... चला कुठेतरी हा ताण कमी करावा, निदान मनातून गोष्टी जात नसल्या तरी काही वेळेसाठी तरी जातील एक्यूपंक्चर घेत असतांना, आपल्याच कृत्यामुळे आपल्याच होर्मोन्सने दगा दिलाय आणि कार्य करणं थांबवलंय कदाचित, निदान त्या एक्यूपंक्चरच्या सुया टोचल्याने ते कामी लागतील...”

नवीन उमेदेने ती तयार झाली होती. सकाळी आकाश निघाला, आणि हीही एक्यूपंक्चर क्लिनिकला निघाली, दहाची वेळ तिला दिल्या गेली होती, जपानी लोक वेळेचे पक्के असतात, सकाळी आकाश निघतांना बोलून गेला होता,

“उर्वी,वेळच्या दहा मिनिटा आधी जावून वाट बघ तिकडे. उशीर करू नकोस. हे जपान आहे. इथे वेळ पाळली जाते.”

इकडे बरोबर ती दहा मिनिटाआधी जावून बसली, आज तिच्यासाठी त्यांनि इग्रजी बोलणाऱ्या नर्सची सुविधा केली होती. तिने सगळं नीट समजावून सांगितलं. उर्वीच्या पोटाच्या बेंबीच्या भागावर डॉक्टरने अलगत एक्यूपंक्चरच्या सुया रोवल्या, तिला बोलतांना गुंतून ठेवलं, जरा चूनचून जाणवली. आणि झालं.

नंतर त्याने तिची मसाज करून दिली. वेगळाच अनुभव होता. पुरुष डॉक्टर हे करत होता. पण तो आंधळा होता हे मात्र नवल. पुढ्च्या वेळी त्याने बरोबर पाळीच्या बाराव्या दिवशी यायला सांगितलं, आणि परत उर्वीच्या मनात आशेचा दिवा पेटला. ओव्हूलेशनच्या दोन तीन दिवसाआधी  एक्यूपंक्चर केल्याने उत्तम लाभ मिळतो हे तिने वाचलं होतं. दिवस आनंदात जात होते, त्या तिने एक दोन इंटरव्ह्यूही दिले. आशा तिथेही होती तिला.

त्या आठवड्यात आकाशची जपानी शिकवणारी(सेनसेई) टीचर घरी आली होती. तिनेही उर्वीच्या नजरेत मातृत्वासाठी ओढ वाचली होती. दोन दिवस मुक्कामाला होती, तसा आकाश तिचा आवडता विद्यार्थी होता. म्हणून ती त्याच्याकडे आली होती. तसे जापनीज लोकं कुणाची घरी राहत नाहीत. नातेवाईक त्यात गावात असेल तरीही ते हॉटेलमध्ये राहणं पसंत करतात. पण आपल्या भारतात राहून होती, मग आकाशचा आग्रह टाळू शाकली नाही. साठ वर्षाची होती, लग्न केलं नव्हतं, एकटी राहत असायची. इकडे ओसाका मध्ये मित्र मैत्रीणीना भेटायला आलेली. एका मैत्रिणीला भेटून आली आणि उर्वीसाठी शरीर गरम ठेवायची पिशवी घेवून आली, म्हणाली,

“तुझं शरीर कदाचित थंड झालंय, उर्जेची कमी आहे. इलेक्ट्रीक पिशवी कंबरे खाली ठेवून झोपत जा. त्याच टेम्परेचर अगदी नोर्मल ठेव. तुझ्या शरीराला ऊर्जा हवी आहे.”

तिलाही नवल वाटलं, “आपल्याकडे स्त्रीला थंड राहायला सांगतात, असो वातावरण असावं. इकडे फार थंडी आहे म्हणून असेल. पण इकडे लोकांना असले प्रॉब्लेम असतात कुठे. इथे तर प्रत्येक स्त्रीला दोन तीन मुलं आहेत. जर तिने लग्न केलं असेल तर.”

उर्वीने विचारलं तर म्हणाली, “त्या शरीर भागात रक्ताच प्रसरण योग्य व्हावं म्हणून हा गरमपणा हवाय. बाकी तुम्ही भारतीय गरम असता.”

उर्वी हसली, आणि तीही, पण अर्थ होता बोलण्यात, आकाशही तिथे होता, त्याने उर्विला रोखून बघितलं, आणि डोळा मारला. उर्विला मात्र अर्थ उशिरा कळाला, खरच तर होतं, आम्ही भारतीय डोक्याने गरम असतो आणि मग मन अशांत होतं. आणि अशांत मन उर्जेचा वापर करू शकत नाही.

ती सेनसेई येण्याच्या दोन दिवसाआधी उर्वीच आणि आकाशच परत भांडण झालं होतं, रागात उर्वीने स्वतःच्या हाताला आदळलं होतं. मुका मार लागला होता तिला. आकाश त्यावरही खूप चिडला होता, म्हणालाही होता, “मीच देतोना एक बुक्का. कशाला आदळतेस.”

नंतर भांडण तर मिटलं, कारण, कारण तर कुणाला कधी कळत नव्हतच भांडणाच, कधी त्याची आई तर कधी हिची आई, ह्यापलीकडे दुसरं कारण असायचं ते अज्ञात... हळूहळू अटकलेले दोन मन बोलणं सुरु करायचे आणि फाकलेलं पाणी परत जुळायचं.

आज ती जापनीज सेनसेई उर्वीसोबत एक्यूपंक्चर क्लिनिकला येणार होती, तिला इंग्रजी येत होतं. दोघीही सोबत तिकडे पोहचल्या. तिनेही स्वतःची मसाज करवून घेतली होती. आणि उर्वीच एक्यूपंक्चर सुरु होत. परत बारीक सुया टोचल्या गेल्या आणि अलगत कढल्या गेल्या. शरीरांच्या पॉईंट्सला प्रेस करतांना डॉक्टरच लक्ष तिच्या हातावरच्या मुक्या मारावर पडलं, मूठ बंद केली कि करंगळीखालचा भाग हिरवा दिसत होता. सगळं सेशन झाल्यावर तो टीचर सोबत बोलत होता.

म्हणाला, “शरीरावर लागणाऱ्या माराचे प्रतिसाद खूप आतमध्ये असतात. आपल्याला वाटतं दुखत नाही किंवा बसलं पण ते तसं नसतं. आता उर्वी पडल्यामुळे तिला हातातला लागलं, दुखलं असेल, मनाला जाणवलं असेल, तिने ते मनातून काढून टाकलं पण तसं होत नाही. शरीर आतून त्याचा वेळ घेत असतं. आपल्याला ती जखम सुधारली असं वाटते पण तसं नसतं. मनाचही तसच आहे, एकादाच शरीर मान्य करेल आणि व्यवस्थित कामावर परत येईलही पण मनाला लागलेल्या जखमा भरायला वेळ लागतात. आपण आज जे सहन करतोय त्यात आपण भूतकाळात काय भोगलं हेही कारणीभूत असते. आणि मग शरीर तसं रिअॅक्ट होत असतं. आपण परत शरीराला दोष देतो.”

उर्वीला सारंकाही पटलं होतं, पण काय बदलू शकत होती ती. भूतकाळ बदलू शकत नव्हती. वाट बघण्यशियाय तिच्या कडे काहीच नव्हतं. शरीराने परत त्याच्या ट्रॅकवर यावं ह्यासाठी तिला अजूनही प्रतीक्षा करायची होती. सेनसेई परत निघून गेली. आणि उर्वीच्या आशा ह्या महिन्यात वाढल्या होत्या. एक्यूपंक्चर डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे तिला इंटरकोर्स करायचा होता आणि बाकीचे दिवस स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करायचा होता, नंतरच्या फेजमध्ये तिला एक्यूपंक्चर करायचं नव्हतं. त्याने तिला सांगितलं होतं पाळी आली तर ये आपण परत प्रयत्न करूया पुढच्या सायकलमध्ये. नाहीतर स्वीट घेवून ये आमच्यासाठी.

तिने तिची परत ओव्हूलेशन  विंडोव नीट ओळखून आकाशला सांगितलं, त्यानेही तिला प्रतिसाद दिला. आणि दोघेही नेहमीसारखे वाट बघत दिवस घालवत असायचे.

पण ती येण्याची चाहूल उर्वीला लागली, तिचं मन अशांत झालं, आकाशच लक्ष जेवतांना तिच्या चेहऱ्यावरच्या पिम्पीलवर पडलं, हसला,

“आला का हा?”

उर्वी रागातच म्हणाली, “हो, दिलीय दस्तक तिने तिच्या येण्याची. पण हे प्रेग्नन्सीच पण लक्षण असतं रे, दोन्हीकडे सारखे लक्षण असतात. मला तर काही सुचत नाही. दर वेळी हेच अनुभवते मी... ये आपण ह्यावेळी पण करायचं का?”

“अग पण, जरा थांब ना, ती आली का, झाला का हॅप्पी बर्थडे...

उर्वीचा पडलेला चेहरा परत खुलला, ती हसली,

“काय रे काय नाव दिलंस तू, माझ्या पाळीला हॅप्पी बर्थडे... म्हणतोस तू”

“मग, हॅप्पी बर्थडे असतोच ना तो, दर वेळी नवीन सगळं, मग बरोबर आहे.”

उर्वी परत आकाशच्या मागे लागली, “आकाश आपण अजून मोठी ट्रीटमेंट करायची काय रे?”

आकाश शांतपणे म्हणाला, “हो हो, तीही करू. पण जरा थांब...”

उर्वी आकाशला बिलगली

डिसेंबर गेल्यात होता, सगळीकडे पार्ट्या आणि नवीन वर्षाच्या आगमनाची तयारी होती. आकाश आज उशिरा येणार होता, उर्वी आणि आकाश पार्टी उद्या होती.

कथा क्रमशः 

© उर्मिला देवेन

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल... 

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

फोटो साभार गुगल

 

Post a Comment

0 Comments