बीइंग नारी... “जेव्हा आई होणं अवघड होते!”
© उर्मिला देवेन
भाग ३३
---
आता उर्विला एक्यूपंक्चरसोबत जरा मोठी ट्रीटमेंट घ्यायची होती, ज्याने एक्यूपंक्चरचा फायदा होवून रिजल्ट मिळेल. तिने माहिती काढणं सुरु केलं. आययूआय (IUI) आणि आयव्हीएफ(IVF) ही ट्रीटमेंट आपण एक्यूपंक्चरसोबत घ्यावी असं तिने ठरवलं. आयव्हीएफ खूपच महाग आहे आणि अजूनतरी आपण तिशीच्या आत आहोत ह्या विचाराने तिने आयव्हीएफला मनातच थांबवलं आणि आययूआयवर विचार केला. आययूआयकमी खर्चाचा आणि नैसर्गिक उपचार आहे म्हणून तिने मग आययूआय करण्याचा निर्णय घेतला.
ओसाका मध्ये हॉस्पिटल शोधून काढलं, खूप प्रसिध्द हॉस्पिटल होतं ते. फीस पण खूप होती. आता आकाशला म्हणायचं कसं हा प्रश्न होताच. पण तिने ठरवलं होतं, आता आपण प्रयत्न करून काही होत नाहीच आहे, तर घेववूया मदत सायन्सची, नवीन तंत्रज्ञानाची.
पण आकाशला सांगण्यासाठी तिला अजून माहिती हवी होती. तिलाच प्रश्न पडला होता का करायचा आपण आययूआय, उत्तर मिळालं होतं, कारण इकडे असं डॉक्टर स्वतः सांगणार नव्हते की तुम्ही हे करा ते करा. हा आपला चोइस असतो, उच्च ट्रीट मेंट घेवून लगेच रिजल्ट मिळवायचा आहे की बेसिक प्रोसेस मधून जात आरामशीर वेळ घालवायचा आहे. पण उर्विला अजून थांबणं कठीण झालं होतं, तिची नाती दावावर लागली होती, आकाश बोलत नसला तरी कुठतरी मनात खुडत होता, घरी तो एकुलता एक होता, आणि त्याची आई त्याला सतत उर्विला सोडून दे म्हणून मागे लागली असायची. तशी ती कधी डायरेक्ट त्याला बोलत नव्हती, पण मार्ग खूप होते, आकाशला तेच सांगण्याचे. तोही आता कंटाळला होता.
इकडे उर्वीकडेही परिस्थिती काही वेगळी नव्हती, आई बाबा त्यांच्या वतीने मदत करत होते पण त्यांना त्यांच्या मुलीच्या निवडीवर आजही प्रश्न होता. त्यांनी जणू मनात ठरवलं होताच दोष काही आपल्या मूलीत नाहीच. आताही जारी तिने आकाशला सोडून दिलं तरी तिला योग्य मुलगा मिळू शकतो अशी भावना त्यांच्या मनात होतीच. गप्प होते ते उर्वीमुळे. कारण त्यांना उर्वी अडवत होती. तिने जरा जरी आईवडिलांची बाजू घेतली असती तर काय झालं असतं हे तिला माहीत होतं. उलट आकाशने सोडून दिलं आणि आई वडिल साथ देतील हयात किती खरं होतं हेही माहीत नव्हतं, लग्न लावून दिलंय तुझं तू बघ असं म्हणून ते आधीच मोकळे झाले होते. त्यांना आकाश कधी पटलाच नव्हता आणि आता तर तो त्यांच्या वर झाला होता तर नजरेत काही वेगळ्याच भावना असायच्या. आकाशच बोलणं, त्याच वागणं सगळं वेगळं होतं, सरळ मुद्दा तो मांडायचा, पटलं नाही तर नाही म्हणून मोकळा व्हायचा. सामाजिक कार्यात भाग घेणारा होता. जमिनीवरून उभा झाला होता मग मातीला विसरला नव्हता. सामाजिक कार्यात त्याचा सहभाग वाढत होता. विदेशात राहूनही त्याच्या गावात त्याचा गाजावाजा असायचा. खुद्द उर्वीच्या गावात त्याला लोकं ओळखायचे. समाजकार्यातील मोठ मोठी लोकं त्याचं नाव घेत असत. उलट उर्वीच्या घरी सामाजिक कार्यात फारसा रस कुणाला नव्हता मग कधी विचार जुडले नाहीत त्यांचे आकाशसोबत. किंवा मनात त्यांना आकाशबद्दल कुतूहल, कौतुक वाटत असेलही पण अहंकार बोलू देत नसावा. म्हणून त्या नात्यात दरी आजही कायम होती.
उर्वी एकटी पडली होती. कुणाशी फारसं बोलत नसायची. तिचं कुणी ऐकून घेणारं असं कुणीच नव्हतं. माहेरी गेली कि आई तेवढी तेवढ्या वेळेपूर्ती मागे असायची. नाहीतर फोनही तिने कधी स्वतःहून उर्वीला केला नव्हता. उलट तिच्या बहिणीशी ती रोज बोलायची. दोन दिवस जरी तिचा फोन येवून गेला नाही तर आईला काळजी होत असायची. आणि हे ती उर्विला सांगत असायची, कसं वाटत असेल तिला हेही कधी ध्यानात घेत नव्हती हे मात्र तिला कळत नव्हतं कि कळून वळू द्यायचं नव्हतं काय माहित. बाबाने तर कधी शब्द स्वतः उर्विसाठी काढेलेच नव्हते. मनात वाटत असावं त्यांना पण बोलून दाखवल्याने काही होवू शकते ह्याचा अंदाज वयाच्या त्या वळणावर नसणे न कळण्यासारखं ना... बहिण तिच्या सासरी आनंदी होती, आणि भाऊ त्यांच्या दुनियेत.
इकडे सासरी खूप मोठा परिवार होता, पण आकाश त्याच्या आईला आता एकटाच होता. तिच्या अपेक्षा होत्याच ना, नात्यात सर्वाना मुल झाली होती. पण उर्वी अजूनही तशीच होती... ती अजूनही फक्त आकाशची बायको होती. तिच्याशी सासरचे फार कमी बोलत असत, शिकलेली, आणि आकाशची सात वर्ष प्रियसी असलेली उर्वी नुसती कुतूहलचा विषय असायची तिकडे. त्यातले नागपुरात राहणारे बरेच नातेवाईक उर्विला आधीपासून ओळखायचे. उर्वी आणि सासूच्या मध्ये सुरु असणारी कुरकुर त्यांना माहित होती, जी सासुनेच गावभर आणि अंगभर केली होती. पण कधी उलट बोलले नव्हते, कदाचित उर्वी कळाली होती त्यांना. आणि सासू माहित होती. तेवढच ते समाधान असायचं उर्विला. पण उर्विला आता त्या लोकांमध्येही जाणं नकोस असायचं, सगळं नको नको ते सासूने पेरून ठेवलं असायचं, गावात कुणीही जरी भेटलं तरी नजर खाली असायची उर्वीची,
मागे एकदा ती सासरी गेलीली आणि सहज सासूसोबत बाजारात गेली होती तेव्हा तर एका बाईने सासूच्या समोर तिला म्हटलं होतं,
“शिकलेली मुलगी आहे, सासूला काय भाव द्यायची! आता आपल्यातली असती तर काही अपेक्षा, पोराले समजाले पाहिजे ना. काय व पोरी तुले समजत नाही. सासूच्या अपेक्षा नाहीत काय. पोरगा हाय तिचा, एकुलता एक. अन तू कवा पर्यंत रायातस अशी...”
उर्वीला काहीच समजलं नव्हतं, पण ओघ कळाला होता. नंतर तिने सासरी गेल्यावर गावात फिरणं टाळलंच होतं.
अश्या अनेक गोष्टी होत्या, ज्यात उर्वी फसली होती. एकटी पडली होती. उलट तीच मन तिला खात होतं, एवढी शिकलेली, लाथ मारेन तिथून पाणी काढण्याची धम्मक ठेवणारी गडबडली होती म्हणून... इथे तर तिलाच पाणी पाजण्याची वेळ होती, पण तसंही कुणी पुढे येत नव्हतं.
विचारत उर्वी खंबीर झाली, “नाही मला करायचं आहे. मी म्हणणार आकाशला...”
आता प्रत्येक वेळा आकाशच्या मागे लागणे हेही अवघड होतं, कारण रिजल्ट मिळत नव्हता. पैसा खर्च होत होता आणि मानसिक ताण वाढला होता ते वेगळं. त्याला सांगायचं म्हणजे आता उर्वीची तयारी हवी होती. लग्नाचा वाढदिवस झाला होता, आणि त्या दिवशी आकाश तिला म्हणाला होता,
“तुला काय गिफ्ट हवंय ते सांग.”
उर्वी बोलली होती, “काय हवंय, सगळंच तर दिलंय तू. बघ कुठे आलोय आपण सोबत.”
तो, “तू सोबत होतीस म्हणून झालं हे, तुला कधी मी साध कुठलं गिफ्ट दिलं नव्हतं ना, आज सांग तुला काय हवंय... एक कर, ह्या वेळी भारतात गेलीस की तुझ्यासाठी राणीहार घे... कितीही माहाग असाला तरी काही हरकत नाही.”
उर्वीने त्याला हसून होकार दिला होता पण आज तिला वेगळं गिफ्ट हवं होतं. तिच्या लक्षात आलं आणि तिने तयारी सुरु केली.
का करायचं आपण आययूआय?
बेसिक सर्व औषधांचा कोर्स झालेला पण गूण येणे, ओव्युलेशन यौग्य व्हावं म्हणून केलीली संपूर्ण औषधी आणि साल्याची ट्रीटमेंट होऊनही हातात काहीही न लागणे. सेक्ससाठी ओव्युलेशनची वेळ पाळूनही गर्भधारणा न होणे. ज्या कपल्समध्ये इनफर्टिलिटीचे काहीच कारण सापडत नाही अश्याना ह्या ट्रीटमेंटचा सल्ला दिल्या जातो. काही एंडोमेट्रियोसिसच्या केसमधेही हे सांगितल्या जाते.
उर्वी मनात विचार करायला लागली, “एंडोमेट्रियोसिस, नाही आहे मला, माझं गर्भाशय उत्तम आहे. त्याच्या अस्ताराची वाढ पण योग्य होते. कुठे काही आढळलं नाही हिस्टेरोस्कोपीमध्ये आणि एचएसजीमध्येही. मला खूप असा पाळीच्या दिवसात त्रास पण होत नाही, हुश्ह... काही माहित नाही बाबा, पण मला नाही हे. नाही तर केवढा त्रास असतो कुणाकुणाला पाळीच्या दिवसात, पण मला काय मानसिक त्रास कमी आहे, निदान त्यांना काही त्रास असतो म्ह्णून गर्भधरणा होतं नाही, पण इथे तर काही कारण अजूनतरी माहित झालं नाही, झालं तर निदान तशी ट्रीटमेंट तरी घेता आली असती. असो....”
तिने अजून माहिती काढली तर कळालं, की, बहुमतांशी जिथे स्पर्म काउंट कमी असणे किंवा ते गतिशील नसणे ह्या करणात आययूआय उपयोगी ठरतो.
“च्यामारी, हे तर कारण नाहीच माझ्या केस मध्ये, मी असं म्हंटल तर आकाशला कसं वाटेल, पण बाकीचे कारण आहेत ना... तो काही नाही म्हणायचा नाही.”
आता तिला अजून एक कारण सापडलं, ग्रीवा श्लेम (सर्व्हायकल म्यूकस). तिला आठवलं, टोकयो मध्ये असतांना त्या डॉक्टरने ही टेस्ट केली होती, त्यावेळी उर्वीला काहीही एवढं कळत नव्हतं. पण तिला आता आठवलं होतं, पाळीच्या बाराव्या तेराव्या दिवशी तिथल्या डॉक्टरने एगची साईज चेक करतांना हि टेस्ट केली होती. त्याने सर्व्हायकल म्यूकसची यौग्यता तपासली होती.
उर्वीने आणि आकाशने आदल्या दिवशी इंटरकोर्स केल्या मुळे त्याला स्पर्म सुद्धा त्यात दिसले होते, आणि त्याचं कॉन्फ्रोमेशनही त्याने तिच्याकडून घेतलं होतं, स्मित हसत त्याने परत दुसर्या दिवशी बोलावलं होतं.
“सर्व्हायकल म्यूकस उत्तम आहे असाच बोलला होता, रिपोर्ट पण असेल माझ्याकडे”
हे कारण पण स्त्रियांच्या नपुसंकतेच्या कारणांपैकी एक असू शकतं हे तिला आता कुठे माहित झालं होतं.
तिने तिची फाईल काढली, जुने रिपोर्टस बघितले, आणि तिला त्या टेस्टच नाव मिळालं, पोस्टकॉइटल टेस्ट (PCT), परत तिने दीर्घ श्वास घेतला.
“म्हणजे, योनीमार्गातून आतामध्ये येणाऱ्या पुरुष बीजांना स्त्रीबिजापर्यत वाहून नेण्यासाठी हे म्यूकसपण कारणीभूत असतं तर. ओव्युलेशनच्या अगोदरच्या दिवसात पानीनुमा म्यूकस निर्माण होतो जे हे कार्य करतो. नाहीतर पुरुष बीज कितीही उत्तम असले तरी जाणार नाहीत ना, आणि फलन होणार नाही. मग तुमचं सर्व उत्तम असून काही फायदा नाही. अगदीच छोटशी गोष्ट आहे ही. बापरे... भयंकर आहे उर्वी... नको पडून... किती कारण असतील ग, उगाच नाही लोकं बारा बारा वर्ष तप करत असतात, सगळं जुळून येण्यासाठी. टियमिंग, यार... साला आपला वेळच वाईट आहे.”
परत उर्वीच्या विचारांची सुई वेळेच्या काट्यांवर आली होती, मग हसली म्हणाली,
“माझी वेळ पण येईल, पण मी अशी नुसत्या त्या वेळेची वाट बघू शकत नाही. च्यायला दहा बारा वर्षाने मुलं झालं तर मी करू काय मग, घरी राहा आणि स्वयंपाक करा... नाही नाही नाही... मला मुल हवंय, मी हे आययूआय करणार. कुणीही विचारणार नाही मला दहा वर्षाने मी किती भोगलं म्हणून, जॉबसाठी गेले तर काय हे सांगणार त्यांना. अनुभव मागतात उर्वी, तू काय हा अनुभव सांगणार....”
उर्वीनेच्या मनाला काहीच सुचत नव्हतं, ती परत रडत राहिली, तिला असं स्वतःला खुडत ठेवणं आवडत नव्हतं.
येणाऱ्या प्रत्येक वेळेत संधी शोधणारी आज वेळेची वाट कशी बघू शकणार होती...
कथा क्रमशः
© उर्मिला देवेन
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो साभार गुगल
0 Comments