बीइंग नारी... “जेव्हा आई होणं अवघड होते!” © उर्मिला देवेन भाग ३६

 बीइंग नारी... “जेव्हा आई होणं अवघड होते!” © उर्मिला देवेन

भाग ३६ 



११ मार्च २०११, उगवला उर्वीसाठी खूप मोठा दिवस होता तो, सकाळी ती मोठ्या उत्साहात उठली. आकाशची तयारी करून देत त्याच्या मागेही लागली होती. दोघेही सोबत निघणार होते. उर्वी नंतर दुसर्‍या दिशने हॉस्पिटलला जाणार होती आणि आकाश ऑफिसला.

आकाशने सीमेन सैंपल घेवून डबा उर्विला दिला, नर्सने सांगितल्या प्रमाणे उर्वीने तो काखेत शरीराच्या तापमानात राहावा म्हणून ठेवला आणि दोघेही निघाले.

उर्वी पोहचली आणि तिने सीमेन सैंपल काऊंटरला दिलं. आणि वाट बघत बसली.

दहाचे अकरा वाजले, पण तिला बोलवत नव्हते, शेवटी तिचा नंबर आला, डॉक्टर बदलला होता. त्याने तिची फाईल लॅपटॉपवर काढली. तिला सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आहेत म्हणून सांगितलं. सगळं परत समजावून सांगितलं. आणि सीमेन तयार होत आहे म्हणून सांगून वाट बघायला सांगितलं.

उर्वी परत वाट बघत राहिली, परत एक तासाने तिला बोलावलं, अल्ट्रासाऊंडला घेतलं,

फॉलीकलची साईज उत्तम आहे म्हणून सांगितलं. आणि सगळी तयारी झाली की बोलवतो म्हणून परत वाट बघायला सांगितलं.

आता उर्वीच्या पोटात दुखायला लागलं होतं, अर्थात फॉलीकल, स्त्रीअंडाशयातून निघणार ह्याची तिला चाहूल झाली होती, सगळ्या गोष्टी लागून आल्या असचं तिला वाटत होतं.

अडीच वाजायला आता पाच मिनिट राहिले होते, तिला आत बोलावलं, पोजिशनला घेतलं आणि कॅथेटरच्या मदतीने स्पर्म आतमध्ये सोडले. तिला दहा मिनिट तिथेच पडून राहायला सांगितलं. नंतर नर्सने तिला खाली घेतलं. आता तिचं कॉन्सिलिंग होतं, नंतरची सगळी खबरदारी आणि प्रोसेससाठी, तोच मोठा अलाराम वाजला, भूकंपाचा. उर्वी दचकली होती पण तिकडे सर्व नॉर्मल होतं. नर्सने तिला बाहेर वाट बघायला सांगितलं. उर्वी परत बाहेरच्या  मोठ्या हॉलमध्ये बसली, जवळजवळ पावणेतीन वाजले होते, आणि तिला अचानक चक्कर आल्यासारखं वाटलं. समोरचं सगळं फिरत आहे असा भास झाला. तिने नर्सकडे बघितलं, आणि नर्स म्हणाली, भूकंप आहे. तिथेच बस. काही वेळात सगळं शांत झालं, उर्वीने काचेतून बाहेर बघितलं, सगळं सुरळीत सुरु होतं.

तोच तिला आकाशचा फोन आला,

“उर्वी, कुठे आहेस?”

“मी अजूनही हॉस्पिटलमध्ये.”

“झालं का सर्व?”

“हो आताच, पण आता खूप मोठा भूकंप आला ना?”

“हो, खूप मोठा... आणि सुनामीची वारानिंग आहे. तू लवकर घरी निघ. सगळे ऑफिस सुटत आहेत. मीही निघत आहे.”

“आता जरा इकडे अर्धा तास थांबते, कॉनसीलिंग आहे. मग निघते.”

“बर, सगळं ठीक ना, तुला काही त्रास?”

“काही नाही… “

“सगळं समजून घे. आणि निघ.”

अर्ध्या तासाने उर्वी हॉस्पिटलमधून निघली. तोपर्यंत जपानच्या भूतलावर सुनामीने हाहाकार माजवला होता. ओसकामध्ये काहीही नव्हतं, पण दुपारी लागलेला झटका भयंकर होता.

उर्वी घरी आली, आणि आराम करत होती. आकाशही आला,

जेवतांना, सहज बोलला,

“कोण जन्माला येत आहे माहित नाही, शरीरात शिरकाव केल्या केल्या उध्वंस सुरु झाला...”

“ये, काहीही काय रे, आपलं बाळ आहे ते.”

दोघेही रमले होते. जणू मानून चालले होते कि ह्या वेळी कॅन्सीव नक्की आहे.

दिवस सगळे मजेत जात होते. उर्वी सगळ्या खबरदारी पाळत होती. पंधरा दिसव उलटले होते. आता तिचं बेसल बॉडी टेम्परेचर पण वाढत होतं. तिला आशा होतीच.

हातात कहीदा प्रेग्नसी कीट घेतलं, पण हिंमत नव्हती. आणि मग दोन दिवसाने कंबरेच दुखणं वाढलं. उर्वीची आशा अजून वाढली. अचानक तिला दुखायला लागलं, आणि भरा भरा धारा लागल्या. लाल धारा खाली लागल्या होत्या आणि डोळे रक्ताने भिजून वाहत होते. सगळ्या आशा मावळल्या होत्या. आकाश घरीही नव्हता. त्याला कसं सांगावं हा प्रश्न उर्वीला होता.

एवढा खर्च करून काही हातात आलं नव्हतं. कुणाचा दोष कळत नव्हतं. सात वाजले तरी उर्वी आज बसून होती, क्षणात तिला स्वतःला संपवावंस वाटलं. आपण आकाशला कसलाच आनंद देत नाही ह्या ग्लानीने मन भरून होतं. मनात असंख्य विचार थैमान घालत होते. विचारांचं वादळ उठलं होतं, ती उध्वस्त झाल्यासारखी पडून होती.

रात्री नवच्या दरम्यान आकाश आला, उर्वीने दार उघडलं नाही म्हणून त्याने स्वतःकडे असलेल्या किल्लीने दार उघडलं. घरात अंधार होता. त्याने येताच लाईट लावले. उर्वी त्याला सोफ्यावर बसलेली दिसली,

“ये, काय झालं, का ग अशी बसली?”

उर्वी काहीच बोलली नाही...

आकाशला कळून चुकलं होतं. तोही शांत झाला, त्याने कपडे बदलले. बराच वेळ घरात शांतता होती. मग आकाश हळूच म्हणाला,

“हॅपी बर्थ डे झाला ना, होवू दे... अजून प्रयन्त करू आपण.

“तू कशाला काळजी करते, मी आहे ना, आपण अजून जावूया, अजून सायकल करूया, तसंही पहली सायकल हि ट्राय असते नुसता. आपल्यात काहीच प्रोब्लेम नाही ना, मग काळजी करू नको, अग विचार कर ज्यांना प्रोब्लेम असले ते कसे करत असतील.”

“अरे पण ते निदान त्याचा इलाज करतात, आपण काय करतो...”

“आपण नसल्याचा इलाज करतोय असं समज... उठ.... मला भूक लागली आहे.”

उर्वी उठली, पण तिचं मन तिला खात होतं, आपण अपराधी आहोत असं तिला वाटत होतं. आकाश तिला मागून येवून बिलगला,

ती रात्र आकाशने उर्विला सांभाळत काढली सकाळी परत तिच्यात नवीन उमेद उभी झाली होती. आकाशला नाष्टा भरवत होती. तर तो म्हणाला,

“बघ मी अजूनही लहान आहे. माझं एक काम होत नाही तुझ्याशिवाय. मला आधी सांभाळ, अरे आपण अजून लहान आहोत.... मोठे झालो कि मग मुलं होतील आपल्याला.”

उर्वी हसली, “तू पण ना, माहित आहे मला, जावूदे.”

उर्वी प्लेट घेवून स्वयंपाक खोलीत गेलीच तर आकाश परत ओरडला,

“सोक्स दे मला, आणि रुमाल पण पाहिजे.”

“अरे तिथेच तर काढून ठेवला आहे.”

“नाही दिसत.”

उर्वी गेली, आणि हातात सोक्स दिले,

“आता काय घालून पण देवू का, इथेच आहे. दिसत नाही.”

“नाही... तू दिल्याशिवाय दिसत नाही. कळलं, मी असाच आहे. आधी ह्या मुलाला सांभाळ तू...”

आकाश निघताना, म्हणाला, “फोन कर हॉस्पिटलला सांग. आणि पुढची तारीख घे.”

“आकाश, आपण ह्या वेळी एक्यूपंक्चर  पण करूया का?”

“हो, पण तसं बोल नर्ससोबत. म्हणजे इकडे तुला सांगता येईल.”

“अरे, त्यांच्या हॉस्पिटलमध्ये पण एक्यूपंक्चर   सेंटर आहे. पण महाग आहे तिकडे...”

“पण तू इथे करत आहेस ना, बोलून घे ना, इकडे तू कशी कधीही जावू शकते, तिकडे एक तास जायला लागतो. इकडे सगळे तुझ्या ओळखीचे आहेत. अजून काय ते तुला करून देताता...”

आकाश बोलून निघून गेला. उर्वीने आणि आकाशने परत सायकल करायचं ठरवलं होतं. तशी तयारी सुरु केली होती. दरम्यान उर्विला ओसाका युनिवर्सिटीमधून कॉल आला होता.

ती खूप खुश होती. इंटरव्ह्यु देवून आली होती. तिचा रोबोटीक्सचा प्रोजेक्ट भाव खावून गेला होता. तिला लॅब मध्ये काम करायला मिळेल ह्याची शाश्वती झाली होती.

ठरल्याप्रमाणे दोघही हॉस्पिटलला पोहचले, डॉक्टने पाळीच्या सातव्या दिवशी बोलवलं होतं, त्याने अल्ट्रासाऊंड केलं. आज परत डॉक्टर नवीन होता.

ह्या एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमधली हीच गोष्ट उर्विला खटकत होती, आपण कसं एका डॉक्टरशी  एमोशनली  अटॅच होवून जातो, पण इथे प्रत्येक विजिटला डॉक्टर बदलत होते. सगळं प्रोफेशनल होतं. जसे रोबोट चालत होते.

डॉक्टरने तिला फर्टिलिटी बुस्टरच्या पाच दिवसाच्या मेडिसिन दिल्या. आणि बाराव्या दिवशी बोलावलं. आज त्याने तिला फूड कॉन्सिलिंगसाठी सांगितलं होतं. दोघंही उत्तम आहार ग्रहण करावा असं त्याचं म्हणणं होतं. शिवाय, एक्यूपंक्चर थेरपिस्टसशी बोलून सल्ला घ्यायला सांगितला, आज परत  पूर्ण दिवस  जाणार हे आकाश च्या लक्षात आला. आणि त्याने उर्वीला सगळ करायला सांगितलं. तो ऑफिससाठी निघून गेला.

उर्वीने सगळं केलं तसं तिला बरंच काही माहित होतं. पण एक एक तासाचे सेशन तिने पूर्ण केली. नोट्स काढल्या. आणि घरी परत आली.

वही घेतली, आणि लिहायला लागली होती.

आज तिला परत वाटायला लागलं होतं वय किती महत्वाच असतं, म्हणजे वेळ, एकदा वेळ निघून गेली की असं मग त्या वेळेच्या मागे धावावं लागतं. जशी आज ती धावत होती. योग्य गर्भधरणेचा काळ कधीच निघून गेला होता. आणि त्याला आता परत आणण्यासाठी तिचे प्रयन्त अगदीच काय खावं आणि काय नाही इथेन सुरु झाले होते. प्रजनन प्रक्रियते पुरुष आणि स्त्रीच दोघांचंही आरोग्य महत्वाच असतं.  दोघांचा आनंद महत्वाचा असतो. हे कुण्या एकाने होत नसते तरीही बोट स्त्रीवर येते हेही तितकेच खरे आहे.

उर्विला मनात दोन दिवसाआधीचा किस्सा आठवला, आकाश त्याच्या आईशी बोलत होता, ती म्हणाली होती, की ती कुठेतरी गोट्याच्या देवाकडे जावून आलेली आहे. जिथे ती आकाशसाठी गेली होती. म्हणाली होती, साऱ्या बायकों विचारतात तिला, आता उत्तर देत नाही ती. आणि आकाशही उर्विला सोडत नाही, मग नायलाज झाला आणि ती नवस बोलायला गेलेली.

जणू शब्द कानात घुमायला लागले तिच्या,

“काय बोलू आता, तू काय बी सांगत नाही. काय प्रयत्न बिन करता का तुम्ही. क बस पाहिजेच नाही. का तिले होणारच नाय. काल सुगी काकी आली होती, तिच्या सुनेच्या सातव्या महिन्याच्या कार्यकरमाचा नेवता घेवून. मागच्या वर्षी लग्न झालं तिच्या पोराचं.”

आकाश, “त्याच्यात आणि माझ्यात फरक आहे. त्याची बायको त्याच कामाची आहे. माझी नाही.”

“मग तुही वाली काय नुसती मटकासाठी हाय. काय बोलते ते, काय ते कपडे घालते, काय तिची ते फेशन, माह्या त नुसता अपमान करते. काय बाई मिळालं तुले काय मायीत. जावूदे आता. राहा सुखी, मले काय कराच आहे. तू अन तुही ते बायको.”

“मग झालं त... तू कशाला काळजी करते, अन माझी बायको मला वाटते ते घालते... तुझ्या आवडीचे कपडे घालणार नाही ते....”

“हो रे घेवून बस तिले डोक्यावर.... काय बाई आमच्यावेळी असं नव्हतं बापा.”

उर्विला आठवूनच हसू आलं होतं. तिला उर्वी नकोपण होती आणि नातूपण हवा होता... स्त्री होती ना, प्रश्न तिला विचारल्या जात असतीलच. मन तिचही दुखत असेल. तिलाही कळ लागत असेलच ना, तीही प्रत्येक महिन्याला वाट बघत असेल....

परत नजर तिची तिच्या वहीवर पडली, फर्टिलिटी डायट लिहून दोन रेषा तिने ओढल्या. आणि ग्रीन टी करायला गेली. कप घेवून बसली,

खरं सांगायचं झालं तर असं कुठेच वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध झालेलं विशिष्ट पदार्थ खल्यानेच  फर्टिलिटी बूस्ट होते. हेही तेवढच खर की उत्तम आहार हा प्रेग्नंट राहण्यासाठी महत्वाचा आहे.  कारण आपण जे खातो ते तेच आपल्या शरीराला लगत असतं आणि अर्थात आपलं खान पिन आपल्या शारीरिक वजनावर, रक्तावर आणि त्या मार्फत हार्मोन्सवर परिणाम करत असतं. आपलं राहणीमान आपल्याला दिली जाणारी वागणूक आणि आपला अवतीभवतीचा समाज सगळं काही जवाबदार असतं, एका स्त्रीच्या मातृत्वासाठी.

लिहिता लिहिता उर्वी हसली, मनात अलगत विचार शिरला,

“मग झोपडपट्टी राहणाऱ्या आणि दोन वेळच खायलाही न मिळणाऱ्या बायकांचं काय. ज्यांना नवरा रोज मारतो, अश्या बायकांचं काय... की हे असले सोंग फक्त पैसेवाल्यांच्या नशिबी असतात. नशीब कुठलं मग, नशीब जर ह्याच ठिकाणी माती खात असेल. रस्त्यावर भीक मागणाऱ्या त्या रस्त्याच्या शेजारीच राहणाऱ्या बायका तीन तीन मुलं घेऊन भीक मागतात, हात पाय जोडतात, त्यांना मुलं होतात मग सगळं आपल्या सारख्यांच्या माथे... इथे कुठे येतो मग फर्टिलिटी डायट? लोकांवर रेप होतात तेव्हा नसतो का टाइमिंग, मानसिकता, सगळ्या गोष्टी ना माझ्यासारख्याच्या नादी लागल्या असतात. ज्यांना मुलं नको असतं त्यांना ते रहातं, काय काय नाही, मुलींना तर लोकं सरळ पाडून टाकतात... जन्मेल्या मुलांना लोकं फेकून देतात... काय काय नाही ह्या जगात... पण ज्याला हवंय त्यांना मात्र डोळ्यातून रक्त पाडावं लागतं.”

खरं तर आहे... हा प्रश्न खाणारा आहे, बघा पटलं तर..  

कथा क्रमशः 

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल... 

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

फोटो साभार गुगल

Post a Comment

0 Comments