बीइंग नारी... “जेव्हा आई होणं अवघड होते!” © उर्मिला देवेन
भाग ३७
कधी कुठला विचार आपल्याला कुठे घेवून जाईल सांगता येत नाही.
तसचं कुठे आणि काय घडेल हेही विचार करता येत नाही....
विचारात उर्विला वस्ती आठवली, तिथल्या लहान लहान मुली आठवल्या,
“किती वयाच्या असतात त्या बायका, काय वय असते त्याचं, वीस वर्षात तीन चार मुलं होतात... च्यामारी, शेवटी वय आलं... पण मग इथे सायन्सने प्रगती केली. पन्नास साठ वर्षाच्या बायकांनाही मातृत्व मिळालंय... म्हणजे मात आहे, बस प्रयत्न हवे... चला परत फर्टिलिटी डायटवर.”
आपल्या हिरव्या पालेभाज्या, ब्रोकली, पत्तागोभी ह्यात व्हिटॅमिन सी, फॉलिक अॅसिड मुबलक प्रमाणात असते. लायकोपिन जे स्पर्म काउंट वाढवण्यासाठी उपयुक्त आहे ते टोमेटो असते करते. गाजर ह्या आहारात उपयुक्त मानलं जातं ते बीटा केरोटीनमुळे.
नैसर्गिक रित्या अँटीऑक्सीडेंट मिळू शकतं ते फळांमुळे ज्यासाठी स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, रास्पबेरी. उर्वी अडकली, म्हणाली,
“फळही श्रीमंत आहेत. आपल्या साध्या बोरी, आवळा का नाही? तेही तर बेरीजच्या फॅमिली मध्ये येतात.”
मग जरा अजून वाचलं तर समजलं, त्यात तर ह्यापेक्षा उत्तम सगळं आहे.
डाळिंबला लीबिडो वाढवण्यासाठी खास सांगितल्या जातं आणि जे व्हिटॅमिन सी युक्त आहे. एवाकाडो एक सुपरफूड मानल्या जाते फर्टिलिटीसाठी. ज्यात असणारं मोनोसैच्युरेटेड फैट स्त्रीबिज वाढीसाठी उत्तम मानल्या जाते. हयात व्हिटॅमिन ई आणि फायबर असतात, ज्याचा आहारात वापर फर्टिलिटी फूड म्हणून असायला हवा. एकदम सवस्त आणि मस्त असलेली केळी व्हिटॅमिन बी६ आणि पोटेशियमने संपन्न असतात, ज्याने हार्मोन्सना संतुलित राखता येतं. ओमेगा ३ फॅटी अॅसिड, फॉलिक अॅसिड आणि व्हिटॅमिन डीचे प्रमाण भरघोस आढळते.
पेन थांबला, “अरे, आणि मी तर अंडी बंद करते. खायला मागे पुढे बघते... आपली जुनी माणसं म्हणतात अंडी गरम असतात, गर्भ पाडतात... अय्या, काय खरं नी काय खोटं, माझ्यासारख्या असुलेल्या मनाने काय आणि कुणाच खरं समजायचं. जावूदे, आपलं सायन्स जिंदाबाद... मी तर सगळं खाणार आता.”
डाळी आणि कडधान्ये आहारात हवेच, कारण आयरन और प्रोटीनच्या कमतरतेमुळे ऑव्यूलेशन प्रक्रियेत अडथडा येवू शकतो.
आता ड्राई फ्रूट्स आणि नट्स ज्यात खजूर, अंजीर, किशमिशला रोजच्या आहारात समवेश करावा कारण ह्यात सेलेनियम असतो जो ऐंटिऑक्सिडेंट आहे, जे फ्री रैडिकल्स थांबवून स्त्री बीजांची क्वॉलिटी वाढवतो. भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, काळे, सफेद तीळ हयात जिंक अधिक असतं. अक्रोड, बदाम प्रोटीन युक्त असतं. ह्या वेतिरिक्त फर्टिलिटी डायट मध्ये दही, ऑलीव्ह ऑईलवापर असावा. अद्रक, दालचिनी सारखे सुपर स्पाइस हर्बल चहासाठी वापरावेत....
उर्वी उठली आणि परत दालचिनी चहा करायला गेली. आता किचनमध्ये ती फक्त काय काय आहे आणि काय आणावं लागेल ह्याची बेरीज वजाबाकी करत होती. तर आकाश आला.
“काय ग काय सुरु आहे, काय म्हणाले डॉक्टर.”
“बोलावलं आहे बाराव्या दिवशी, औषधी दिल्या आहेत ह्या वेळी.”
“असं, घ्या मग, माझ्यासाठी काही. आणि हा काय पसारा आहे?”
“अरे फर्टिलिटी डायटवर लेक्चर ऐकून आली आहे. म्हणून सगळे ड्राई फ्रूट्स असे नेहमीच्या ठिकाणी काढून ठेवते. आणि हा उद्यापासून पोहा आणि उपमा काही मिळणार नाही. एक ग्लास दूध आणि एखाद फळ मिळेल नाष्ट्याला. सोबत काही ड्राईफ्रूट्सपण मिळतील तुला, चार पाच वाजता खायचे.”
“अजून काही.... आता काही भेटणार आहे की हेच ऐकू...”
तो खोलीत कपडे बदलायला गेला, आणि उर्वीची डायरी बघून म्हणाला,
“काय ग, परत कविता करायला लागलीस काय?”
मग त्याने वाचलं, “हे काय लिहित आहेस... पुस्तक काढण्याची तयारी काय?”
“नाही रे, आपल्याला काही नाही आणि काय पुस्तक काढायची, बसं लिहून ठेवते, वेळ जातो माझा.”
“मग लॅपटॉपवर लिही ना, हि काय जुनी डायरी वापरात आहेस.”
“अरे हो, लिहिते मी... पण असचं रे आपलं, बाकी काही नाही.”
“ठीक आहे, ते युनिवर्सिटीमधून काही आलं का?”
“नाही, अजून तरी नाही.”
“कर काहीतरी लवकर मग भूक लागली, आणि आज काय ती भूक भागणार नाहीच ना...
उर्वी खोलीतून हसत निघून गेली, आणि आकाश ओरडला,
“बंदी लावून ठेवली आहे माझ्यावर. किती अत्याचार ना... बायकोवर प्रेमपण करता येत नाही... माझी तीच कॉलेजवाली गर्लफ्रेंड मस्त होती, काही बंधन लावत नव्हती. बायको यार...”
उर्वीही ओरडली, “प्रेम काय तेच असते... ये इकडे मदत कर... हेही प्रेम आहे.”
दोघांनी मिळून स्वयंपाक केला, म्हणजे आकाश नुसता इथे येवून काढून ठेवलेले सुखे मेवे खात होता आणि उर्विला छेडत होता.
उर्वीने ह्यावेळी खूप मेहनत घेतली होती, सगळं नियमित सुरु होतं. आता तिची शॉपिंग सगळी तशीच असायची, कुठे काय मिळेल काय खाल्याने काय होतं सगळं बघून ती सामान घेत होती.
आकाशच तर तिने सगळं रुटीन बदललं होतं. एक्यूपंक्चरही उर्वी करून आली होती. डॉक्टरने दिलेल्या पाच दिवसाच्या मेडिसिन तिच्या घेवन झाल्या होत्या. ठरल्याप्रमाणे ती हॉस्पिटलला जावून आली, सगळं व्यवस्थित होतं, ह्यावेळी फॉलिकल उत्तम होते. दोन तर खूप मोठ्या साईजचे होते. तिला HCG शॉट दिल्या गेला, आता ३६ ते ४८ तासात ओव्हूलेशन होणार होतं, डॉक्टरने वेळ सांभाळून उर्विला पुढची तारीख आणि वेळ सांगितला. दोन दिवसाने परत सीमेन घेवून उर्विला जायचं होतं. उर्वी सगळं पाळत होती. शिवाय आकाश शिलाजित घेत असायचा, उर्वीच्या सांगण्यावरून.
आदल्या रात्रीच उर्वीच्या पोटात दुखायला लागलं,
“आकाश दुखत आहे रे.”
“म्हणजे येत आहेत ते बाहेर.... कुठल्या बाजूला?”
“डाव्या.”
“ठीक आहे ना, उद्या आहे अपॉइंटमेंट…”
“पण ही फर्टाइल विंडो जास्त काळ नसते. मला भीती वाटत आहे.”
“मग करायचं का?”
“काही समजत नाही... आता केलं तर मग उद्या सकाळी स्पर्म जास्त नसणार ना, आणि त्या डॉक्टरांना समजतं मग.”
“झोपं तू काळजी करू नकोस, उद्या गेल्या गेल्या डॉक्टरांना सांग तसं.”
उर्वी विचारात झोपली, सकाळी तिने बेसल बॉडी टेम्परेचर मोजलं,
“आकाश अंदाज बरोबर होता माझा, झालंय ओव्हूलेशन...”
“हुम्म... कीट नव्हतं का आपल्याकडे?”
“नाही रे, किती आणले होते. संपले सारे. आणि आता आपण हे करत होतो ना...”
“अजून काही खूप वेळ झाला नाही, स्त्रीबीज २४ तास असतात जिवंत...”
“माझे माहित नाही ना, कमी वेळ राहत असतील तर वाट लागली रे...”
“काही होणार नाही, चल पटकन आवर, मलाही मिटिंग आहे. सोबत निघूया.”
उर्वी नेहमीप्रमाणे आकाशच्या मागे लागली, आकाशलाही आता सवय झाली होती. उर्वीची तळमळ त्याला दिसत होती. हे सगळं लवकर थांबावं असं त्याला वाटत होतं. त्याने सीमेन काढून उर्विला दिलं. दोघेही निघाले. तिने गेल्या गेल्या काऊंटरला सीमेन दिलं आणि बसली वाट बघत. वेळ मोजत होती, रात्रीपासून अजून काही २४ तास झाले नव्हते. पण....
तास झाला, पण तिला बोलावणं आलं नाही, शेवटी तिने जावून विचारलं. तर सीमेन सैंपल रेडी होत आहे म्हणून सांगितलं. एवढं मोठं हॉस्पिटल होतं, कितीतरी पेशंट रोज आययूआय आणि आयव्हीएफ करत होते. कुणी कुणाच नव्हतं. सगळे लॅपटॉपवर बघून उत्तर देत असत. सगळी सिस्टम होती, मनाचा खेळ कुठेच नव्हता. वेळ पाळत सगळे वेळेलाच विसरत होते. वाट बघून उर्वीची वाट लागली होती, रडायला आलं होतं तिला, तर तिला बोलावलं, आज परत डॉक्टर नवीन होता, हे तर उर्वीला अजिबात आवडत नव्हतं, त्याने उर्विला अल्ट्रासाऊंडला घेतलं. उर्वीने तिथेच म्हटलं,
“ओव्हूलेशन इज ऑलरेडी ओवर राइट?”
“यस, लेट्स डू इट नाऊ...”
उर्वी मनात चिडली होती वाटलं, “तू सांगू शकतोस काय स्त्रीबीज अजून जिवंत आहे कि नाही...”
ती काही बोलणार तर तो म्हणाला, की कदाचित दोन्ही फॉलीकल रेप्चर झालेत. ट्विन्स होण्याचे चान्सेस असू शकतात.
उर्वी मनात, “एकच पाहिजे, आधी टाक.”
त्याने लगेच कॅथेटरच्या मदतीने सीमेन सैंपल आत गर्भाशयात सोडलं. हसत ऑल द बेस्ट म्हणाला.
पंधरा दिवसाच्या प्रोजेस्टेरॉनच्या टॅब्लेट घेवून काही वेळ आराम करून उर्वी घरी परत आली. बाकीची काय ते खबरदारी घ्यायची होती ते तिला माहित होतं. आता तर तिला खूप काही माहित झालं होतं. पीएचडी जोरावर होती.
नंतरच्या काळात काय खायच, काय करायचं सगळं ठरलं होतं. पंधरा दिवस लोटले, आणि आता उत्सुकता वाढली. पण ती आली आणि सगळं वाहून घेवून गेली. हा धक्का खूप काही सांगून गेला उर्वीला, टाइमिंग खूप महत्वाच असतं, आपलं कुठे टाइमिंग चुकलं हेच तिला कळत नव्हतं.
आकाशशी लग्न व्हावं म्हणून प्रत्येक देवासमोर साखळं घालतांना, ती म्हणत असायची,
“बसं, अजून काही नको, मला आकाश हवा...”
पण आज तिला ते आठवून वाटायला लागलं, आपण आकाशला आपल्या आयुष्यात मागून घेतलं, मग अजून काय मिळणार, कुणाची साथ नाही, आणि कुणी असं आपलं नाही.
आकाश काही दिवसात धक्यातून सावरला. पण आता उर्विला धास्ती भरली होती. तर आकाश तिला म्हणाला,
“अग माझ्या ऑफिसमधल्या एकाला तिसऱ्या सायकलमध्ये राहिलं. तिसऱ्या सायकलमध्ये राहण्याचे खूप जास्त चान्स असतात... आपली बॉडी तयार झालेली असते.”
उर्वी उतरत्या स्वरात म्हणाली, “हुम्म, सगळ्याच मेडीसीन मध्ये असच म्हणतात, तीन महिन्यात गुण येतो म्हणून... आता पर्यंत काय नाही केलं.”
“काही तरी असेल ना, तू अशी राहल्याने ते होणार आहे का, उलट दूर जाणार... आपणही तेवढ्याच ताकतीने मागे लागायला हवं. चल उठ नेस्ट सायकलची तयारी कर...”
आकाशच्या सांगण्यावरून उर्वीने परत स्वतःला तयार केलं पण तिला आता काही आशा राहिली नव्हती. पण मन कुठे आशा सोडत नव्हतं. परत तेच सगळं तिने मन लावून केल...
तिसरी आणि मग चौथी सायकल सुद्धा फेल झाली, आता मात्र उर्वी स्वतःवर चिडली होती. तिला फेसबुकवरही राहवंस वाटत नव्हतं. सारखे मित्र मंडळी त्यांच्या मुलांचे फोटो टाकत असत. त्यात तिला आपण मागे राहिलो ही जाणीव खात होती. आता असह्य झालं होतं सारं, तिने डॉक्टर मानसीला फोन लावला, आणि सगळं सांगितलं, तर ती म्हणाली,
“कधी येते आहेस आता इकडे, तसं सांग. आपण लाप्रोस्कोपी करून घेवूया. म्हणजे काही प्रोब्लेम असेल तर तिथेच ऑपेरेट करता येईल. नवऱ्याला घेवून ये. राहील ग, एग्सची क्वालिटी महत्वाची असते, ओवरीजला पंचर करूया. आणि एगज् काऊंटपण बघूया. काही काळजी करू नको, ट्रेस घेवू नकोस.”
उर्वीने सगळं ऐकलं होतं पण ट्रेस घेण कसं सुटणार होतं....
त्यात आकाश अजून सायकल करूया म्हणून तयार होता... उर्विला सकाळी बोलला,
“अपॉइंटमेंट घेतली आहेस तर जावून ये आज हॉस्पिटलला, ह्यावेळी मीपण येणार, कधी बोलावणार ते सांग मला फोन करून...”
“नाही जायचं मला.... काय ते सगळं मशीन सारखं आहे. सारखं मला तुझ्याही मागे राहावं लागते.”
“मग तुला हवंय तर लाग ना मागे.”
“काय!”
“तुला नको?
“माझं काय...”
“अरे म्हणजे, मी काय माझ्यासाठी मागे लागली आहे.”
“उर्वी आता तू उगाच वाढवू नको... मीही तुझ्यासाठी करत आहे...”
“नको करून ना, आला मोठा तुझ्यासाठी करत आहे.”
“मग, कुणासाठी सुरु आहे हे सारं...”
“मला काय माहित... तुलाच प्रुव करायचं असेल ना, मी वांझ आहे म्हणून...”
“उर्वी मी असं काहीच म्हणालो नाही... कशाला शब्द देतेस तोंडात!”
“मी देते आणि तुझी आई म्हणते ते...”
“तिचं काय, तिला एवढं समजलं असतं तर गोष्टच नव्हती. आणि तुझ्या घरचे काही कमी नाही.
काल काय बोलत होती तुझी आई, आमच्या घराण्यात असा प्रोब्लेम कुणाला नाही... तुला तर म्हटलं होतं...”
“मग, म्हटलं तिने, तिलाही वाटत असेल ना.”
“मग माझ्या आईलाही वाटते...”
“असं, तू पण काही कमी नाहीस, असा उपकार केल्यासरखा काढून देतोस.”
“उर्वी, तूला काही माहित नाही...”
“चांगल माहित आहे. म्हणून तर सोबत येत नाहीस.”
“मला ऑफिस आहे. कमवायला नको, गमवायला लागतात ना…”
“असं म्हणजे मी तुझे पैसे खर्च करते. वाटलंच मला अजून कसा बोलला नाही.”
“उर्वी मला तसं म्हणायचं नव्हतं...”
“सत्य बाहेर निघते, समजलं मला... अजिबात बोलू नकोस. नकोय मला तुझं काही.”
“जावूये ग, कुठची गोष्ट कुठे घेवून जातेस तू.... मला निघायचं आहे. गुमान हॉस्पिटलला जा.
आकाश डब्बा न घेताच निघून गेला. उर्वी जाम जोर जोरात रडत राहली. अपॉइंटमेंटचा वेळ निघून गेला होता. काही वेळाने हॉस्पिटलमधून फोन आला, उर्वीने स्पष्ट सांगितलं, आम्ही जरा ब्रेक घेतोय.
कथा क्रमशः
© उर्मिला देवेन
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो साभार गुगल
0 Comments