बीइंग नारी... जेव्हा आई होणं अवघड होते... भाग ४०

 

बीइंग नारी...  जेव्हा आई होणं अवघड होते... भाग ४०
तो सूरेख क्षण ज्यात आपली काळजी दुसऱ्याच्या नजरेत दिसते... आणि आपलं प्रेम अजरामर होवून जातं

बसं.....असचं एक नातं असतं...

नातं तुझं नी माझं, ना रक्ताचं ना गोत्याच

तुझ्या माझ्या धमन्यानंमधून वेगाने वाहतं...

परतीच्या प्रवासात दिघेही काही तासासाठी मुंबईत थांबले होते. बराच वेळ होता, आकाश उर्वी बोलत बसले होते,

उर्वी, “आकाश तुला काय सांगितलं होतं रे डॉक्टरने ऑपरेशन रूममध्ये?

“उर्वी खूप कसंतरी वाटत होतं मला तिकडे, राहून राहून वाटत होतं का करतोय आपण? का नाही राहू शकत दोघंच? कशाला हवीत मुलं? काय देणार आहेत आपल्याला? आपण काय देतोय आपल्या आईवडीलाना? तुला तिकडे ऑक्सीजन लावलं होतं आणि माझा ऑक्सीजन कमी झाला होता. मला आधी हे माहित असतं ना तर मी कधीच तुला करायला परवानगी दिली नसती.”

“आकाश, शेवटचा इलाज ना, तुला माहित आहे. मी आईकडे होती तेव्हा, एका काकूला भेटायला गेली होती. त्यांनी वर्षभराआधी लॅप्रोस्कोपी केली होती. सात महिन्याच्या प्रेग्नंट आहेत त्या. त्यांनी खूप वेळ केला करायला. पंधरा वर्षानंतर केली त्यांनी, खूप खुश होत्या.”

“असेल ग, पण मला नाही आवडलं, पण तू म्हणतेस तर बघू आपण, झालं तर ठीकच ना. आणि आता नाही झालं तरी मला पर्वा नाही.... अडॉप्ट करूया. खूप मुलं असतात ज्यांना खरच मायेची गरज असते. आपण मुलांसाठी जसं तळपळत असतो तसे तेही तळपळत असतात. आणि आपण कधी काळी विचार केला होताच ना... मग काय हरकत आहे. त्याच्या आल्याने आपल्यालाही झालं तर?”

“हो, पण आपण प्रयत्नच केले नाही असंही वाटायला नको ना. आणि ह्या पुढल्या तीन वर्षात जर झालंच नाही तर मग मी नाही अजून वाट बघू शकत. मी नाही गुंतून राहू शकत. मला खूप काही करायचं आहे. मी जास्त वाट बघितली तर मी राहणार नाही आकाश, हे पागलपन मला कुठेतरी थांबवायचं आहे. तुला माहित आहे, मला असं घरी बसून राहवत नाही...

“पण ह्याच पागलपणात तुला काही झालं तर? ती पण तर पागल आहेस, एखाद्या गोष्टीच्या मागे लागली की सोडत नाहीस, काहीच पर्वा नसते तुला. मी आहे इकडे लक्षात ठेव.”

“मला माझ्या पागलपणाची सीमा माहित आहे... पण हार मानणार नाही, जगासाठी नाही मला माझ्यासाठी आई व्हायचं आहे.”

“मला माहित आहे ग, म्हणूनच मी तुला बोलत नाही, आणि काय ग मी तुला कुठेच जावू देणार नाही... तू एकटी नाहीस... तुझ्यासोबत मी पण वांझ आहे असं समज ना... राहू दोघं... आपण दोघेही वांझ आहोत.”

“काहीही काय रे, आणि लोकं काय म्हणतील?

“कुणाला पर्वा असते, इथे तुझ्या आणि माझ्या घरच्यांना मला आपली कधी पर्वा दिसली नाही, सतत खेचले असतात. वयाने मोठे झाले पण अजूनही विचार शेणात आहे. मुलांच्या मर्जीला मान देवू शकत नाही मग कसले ग पालक! मला असं व्हायचं नाही. आणि असं असेल तर मला मुलं जन्माला घालायचं नाही. सालं मुलांना त्यांची इच्छा नसते का, आपण कुठे खूप वाईट वागतो आपल्या आईवडिलांशी, इथे मुलं आईवडिलांना काटून टाकतात तरी ते भ्र काढत नाहीत तोंडातून आणि आपले आईवडील बघ... कधी काय चुकलं ना समजत नाही.”

“आकाश नको आता विषय, निघालोय आपण आपल्या दुनियेत... आता सगळं नीट होणार, सोमवार पासून ऑफिस जॉईन करायचं आहे. आणि आपला डायट तर आपण घेतोय, मी अजूनही खूप घेवून आले आहे. सुरु ठेवू ना आपले प्रयत्न, मला ना ह्या गोष्टीला असं मधेच सोडायचं नाही आहे. आणि मी जास्त वाट बघू शकत नाही, आता बाबाही म्हणत होते, कशाला तगमग करतेस म्हणून, कुणाकुणाला उशिरा होतात, बारा वर्ष, तर कुणाला वीस वर्ष... पण मी नाही थांबू शकत, कळते रे हा निसर्ग नियम आहे, वेळ काळ लागतो, सार कबुल पण आयुष्य एकदाच मिळते, असं फक्त मुलं होत नाहीत म्हणून मी वर्षो न वर्ष वाट बघत नाही काढू शकत, मी एकविसाव्या शतकातली नारी आहे, मला असं थांबून चालणार नाही.... निसर्ग वाट चुकलाय मला चुकायची नाही.... म्हणून प्रयन्त आकाश... करूया ना...”

“बर बाबा, तू राजी आहेस तर मी काय म्हणू, पण मी तुला त्रास होतांना नाही बघू शकत. सहनच होत नव्हतं मला, ऑपरेशन रूममधून बाहेर आलो, आणि गडबडलो होतो, तुझ्या आईनेच मला माझा हात धरला होता. आणि रतनला धावत जावून पाणी आणावं लागलं होतं. नंतर शांत बसून होती तुझी वाट बघत, तोंडावर पाणी झोकलं, तेव्हाच ठरवलं.... बस... आता नाही.”

“असं, मला नाही बोललं कुणी...

“जावूदे ना, नसेल सांगितलं...”

“तू एवढा कसा रे?”

“मी नाही आहे तुझ्यासारखा धीट, माझ्यात नाही धाडस, तुझ्यात धाडस होतं म्हणून मी इथवर आलो, मला तू हवी आहेस, मुलं नाही झाले तरी चालतील... मीच मुलगा आहे ना तुझा...

“असं, समजलं, चल वेळ झालाय... चेकइन करूया.”

 

विमान मुंबईवरून टेकऑफ करत होतं आणि उर्वीच्या मनात असंख्य विचार उडत होते, ती आकाशात होती आकाशसोबत. नवीन उमेद जन्माला आली होती. आता सगळं ठीक होणार हे मनात पक्क झालं होतं. विमान ओसाकामध्ये लंड होत होत आणि उर्वी आणि आकाश मात्र प्रेमात अजूनच उंच झाले होते.

सगळं रुटीन उर्वीने बदललं होतं. जे खायला हवं तेच खाण्यात असायचं. उर्वीच ऑफिस सुरु होतं. ती रोज स्वतः आनंदी ठेवत होती, कसलाच विचार नव्हता. रोज गाणी ऐकत ऑफिसला जाणं आणि येणं. घरी आकाशच प्रेम आणि मस्ती... पहिल्या दोन पाळ्या येवून निघून गेल्या...उर्वीला आतून कोरून गेल्या होत्या पण तिची आशा अजून कायम होती.

त्या दिवशी ती तिच्या कॉलेजच्या मैत्रिणीसोबत बोलत होती, त्याच्या बॅचमध्ये तीचं लग्न सर्वांत आधी म्हणजे फायनलची परीक्षा झाल्या झाल्या झालं होतं. तिलाही नव वर्षाने मुलगा झाला होता. लॅप्रोस्कोपी नंतर. हे एकल्या वर तर उर्वीला हायसं झालं, तिच्याशी बोलून जणू तिला काही मिळालं होतं, बोलण्याच्या ओघात केतकी म्हणाली,

उर्वी कुंडलीपण बघून घे, आपण उगाच प्रयत्न करत असतो. जेव्हा लिहिलं असते ना तेव्हाच होते. मला तर लग्ननंतर सांगितलं होतं कि नव वर्षाने पुत्र योग आहे म्हणून.... पण मी आपली धावत होती पिसाळल्यासारखी, काय काय नाही केलं आणि बघ, लग्नाचं नववं वर्ष संपलं आणि नंतरच्या पहिल्या महिन्यात मी कन्सीव केलं... तुही बघ... असंच काही असणार. काय ओढताड होते ना जीवाची काय सांगू, तुला तर माहित आहे. पण आता कसं वाटतं आपण वाट बघायला हवी होती... पण तुझं म्हणणं ही खरं आहे, वाट बघवत नाही ग... मी गेले आहे ह्यातून... पण तरीही तू बघून घे, आपल्या मनाला तेवढा दिलासा असतो. अजून काही नाही.”

आता मनात हे नवीनच खुड घुसलं होतं उर्वीच्या, तशी ती कुणी काहीही म्हटल तर  नाही म्हणत म्हणत करायची. आशा अजून काय, तसा कुंडलीवर तींचा विश्वास नव्हता. पण लागली आईची मागे.

तिचं खूप काही सुरु होतं, आकाश प्रगती करत होता. त्याचा पसारा वाढत होता. काहीच कमी नव्हती आता दोघांना. पण उर्वीच्या मनात असलेली जखम मात्र दर महिन्याला परत हिरवी होतं असायची. तिचा रुटीन ठरला होता, सगळं आता कसं लाविश झालं होतं.

लॅप्रोस्कोपी नंतर आता तीन महिने झाले होते, डॉक्टर मानसीने दिलेल्या औषधी संपल्या होत्या. आता उर्वीची काळजी वाढत चालली होती, अजून काही तिला गुण आला नव्हता.

विचारात होतीच, “सगळं बरोबर आहे, डॉक्टर काय ओव्हूलेशन ह्या एका प्रक्रीयेसाठी औषधी देतात. बाकीसाठी तर अजून काही नाही, दुसरा त्रासच नाही. असता तर निदान त्याचा उपचार करता आला असता.... असो, आता वाट बघण्याशिवाय काहीच नाही....”

पाळीचा तोच बारावा दिसव येवून ठेपला, आणि उर्वीने नेहमीसारखं स्वतःला ओळखणं सुरु केलं, म्यूकस बघून झाला होता, ओव्हूलेशन कीटने तिने फर्टाइल विंडो ओळखली होती, आणि मग नेहमीचं तिचं पोटात दुखणं सुरु झालं होतं. ऑफिसमध्ये होती, तिने आकाशला फोन केला, तो मिटिंग मध्ये होता, फोन उचलून म्हणाला,

आकाश, “काय ते अर्जंट तेवढं बोल.”

उर्वी, “आज घरी तू वेळेवर पाहिजे.”

फोन कट.... आकाशला कळालं होतं. त्याला अजून काही सांगण्याची गरज नव्हती. सातच्या आत त्याला घरी हजर होणं गरजेच होतं.

उर्वीतर सहापयंत घरी येवून जायची. उशीर तो आकाशला व्हायचा. आकाश आला तेव्हा म्हणालाही,

“काय ग हल्ली ना तू मला मशीन सारखी वागवतेस... कालच...

“तुला बोलले होते मी करू नकोस म्हणून, पण तुझं आपलं सुरु होतं... अजून अकरावा दिवस आहे...”

“मग तू काय केलं.”

“काय, नाही म्हणू.... मग तुझा चेहरा पडतो... मला माहित नाही. मला आत हवंय...”

“अरे बापरे, बायको एकदम तयार आहे...

“हो आहे मी तयार मला काही लाज वाटत नाही, आणि तुझ्यासमोर का मी लाजू...”

“मी शॉवर घेतो, तू आवरून घे, म्हणजे जरा फील येवू दे ना ग, काय हे...”

“हो हो, तुला कधीही येतो, बस मी म्हटलं की तुझं हे असं सुरु होते. तुझा तो रोमान्स आणि माझं काय..

पाहिजे पाहिजे...”

आता उर्वी चिडली, “जातोस तू शॉवर घ्यायला की.... मी तिकडे येवू

“आयला मस्त आयडिया आहे, खूप दिवस झाले...

“मला पण ना, काहीही शब्द येतात, आणि तू ना, अरे आताच तर मागेच्या शनिवारी सोबत अंघोळ केलेली.”

“काय मस्त अंघोळ होती ती... मळ जमला असेल माझ्या पाठीवर आता.”

“आकाश वेळ होत आहे...”

आणि तीच वेळ उर्विला जावू द्यायची नसायची, दर महिना असाच जायचा, पण उर्वी आणि आकाश कधी भांडत तर कधी प्रेमाने सारं करत आशेने पुढे जायचे.

प्रेमाची बरसात होवून उर्वी आणि आकाश पडून राहिले, नंतर उर्वी पाय वर करून राहिली, नेहमीप्रमाणे आकाशने आवरून घेतलं...

आणि परत ते त्यांच्या विश्वात परत येत कामाला लागले, तिची रोजची धावपड, तेच चटनी सारखे झगडे, आणि मग प्रेमाची बरसात....

दिवस जात होते, ह्या वेळी उर्वीला पाच दिवस जास्त झाले होते, तिला मनात वाटायचं आपण टेस्ट करावी पण भीती होती काही नसलं तर, अजून उगाच धक्का बसायचा... आता बेसल बॉडी टेम्परेचर वाढत चाललं होतं. आकाश आता फारसं उर्वीला विचारत नसायचा. उगाच पाळीचा विषय तो टाळायचा.

आणि मग शनिवारी, दहा दिवस जास्त झाले होते...

आकाश झोपून होता, सुट्टी होती. उर्वी सकाळी उठली, मनात धाकधूक होती, तिने टेस्ट केली आणि किट दूर ठेवून दिलं. डोळे मिटून उभी राहिली... डोळे उघडले तेव्हा त्यावर दुसरी रेष पिंगट होती... उर्वीचे श्वास वाढले, तिने ती कीट उचलली, आणि खोलीत आली,

“आकाश उठ, बघ ना, अरे बघ ना....”

“काय ग काय आहे, झोपू दे.”

“अरे बघ ना... तू ना आता...”

आकाशने उठून कीट हातात घेतली, आणि चक्क ओरडला...

“हे कधी झालं...”

दोघांना आनंद झाला होता, शेअर कुणाशी करावा असं तर कुणी नव्हतं, शिवाय अजून सारं काही कन्फोर्म नव्हतं. त्याने लगेच जवळ असणाऱ्या गैनिकची अपॉइंटमेंट घेतली. दोघेही तिकडे गेले.

डॉक्टर अल्ट्रासाऊंड केली, आणि म्हणाला होता,

“कदाचित आताच इम्प्लांट झालेलं आहे, साईज अगदीच लहान आहे. तुम्ही दोन विकनंतर या. तेव्हा आपण पुढचं ठरवूया.”

आता आकाश आणि उर्वी खूप खुश होते. अजूनतरी त्यांनी कुणाला सांगितलं नव्हतं, पुढल्या दोन विक नंतर सांगूया असचं ठरावलं होतं त्यांनी...

कथा क्रमशः

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

 

Post a Comment

0 Comments