बीइंग नारी... “जेव्हा आई होणं अवघड होते!” © उर्मिला देवेन
भाग ४५
उर्वीची तयारी सुरू झाली होती. रोज दुपारी ती एनजेक्शन घ्यायची आणि मग काम, एवढ्या महिन्याने आल्याने कामही खूप असायचे. त्यात आकाशसोबत सासरी राहणं, सासूची नुसतं लहान सहान गोष्टी साठी चीडचीड करणं. तसं तिला टेस्ट ट्यूब बेबी समजवून सांगणं कठीण होतं, आकाशने काय सांगितलं असेल त्याचं त्याला माहीत. कारण अजूनही आपल्याकडे अशी ट्रीटमेंट अस्तित्वात आहे हे माहीत नाही, आणि माहीत असली तरी विश्वास बसू शकत नाही. बाळ कसं उदरच्या बाहेर तयार होवू शकतं हे संपूर्ण शास्त्र समजणं कठीण आहे. सार समजण्यासाठी त्या विचारांपर्यंत जावं लागतं आणि तेवढी तयारी नसते. आपल्याकडे लोकं तर्क आणि अंदाज बांधून भाष्य करतात. आणि म्हणूनच कदाचित आपल्या समजात गुप्तता पाळली जाते.
सारं काही सुर होतं. त्याच महिन्यात तिच्या मधल्या भावाचा साखरपुडा होता. त्याचाही प्रेमविवाह, आता साखपूडयाची तारीख काय उर्वी आणि आकाशला विचारून तर निघणार नव्हती. उलट तिकडे असून गेले नसते तर अजून काय काय ऐकायला मिळालं असतं काय माहीत. कुणाला ही फिकर नव्हती की उर्वी ट्रीटमेंटसाठी आली आहे. बस अपेक्षा होत्या, की तिने त्यांची वेळ काढून न्यावी, नवीन पाहुण्यांसामोर मिरवता यावं.
उर्वी विचारलं, तर बाबा म्हणाले,
“आता मुलीच्या बाबांना हीच तारीख हावी आहे. शिवाय शनिवार आहे. सुट्टी असते. आणि मुलगा काय ऐकणार आहे आमचं! बघ जमवा तुम्ही, आता असे प्रसंग काय नेहमी येतात.”
प्रश्न होता, उर्वीच त्याच दिवशी आयव्हीएफ करून सकाळी परतणार होती. बहिणीच्या लग्नाला आली नव्हती, मग इथे राहून जर भावाच्या साखपूडयात आली नसती तर नुसते चिपकवून असलेले नाते ही तुटले असते.
तिने आकाशला सांगितलं, तर तो म्हणाला, “ठीक आहे येतोय ना आपण त्याच दिवशी इकडे, जरा उशीर होईल, घरचंच आहे. थांबतील ते आपण येईपर्यंत. काळजी करू नको.”
उर्वीच इंजेक्शन घेण सुरु होतं, स्थूलपणा वाढत होता. सुयांच्या रोज टोचल्याने मागचा भाग दुखत असायचा. आणि मग अल्ट्रासाऊंड मध्ये दहा फॉलीकल जवळपास उत्तम दिसले. तिने HGC शॉट इकडेच घेतला. आणि मग दोघेही निघाले. आता पूर्ण दोन दिवस त्यांच्या हातात होते. उर्वीने शॉपिंग तिकडेच केली. ती चालतांही तिच्या पोटात दुखत असायचं. पण नुसता बाऊ करून तर तिला चालणार नव्हतं, आणि असं करून आपणच स्वतःला आजारी करतो असचं तिला वाटायचं. नॉर्मल राहिल्याने ट्रेस राहणार नाही हेच डॉक्टरने सांगितलं होतं.
त्या दिवशी तिचे एग्स काढल्या जाणार होते. पोट नुसतं फुगल्या सारखं होतं, नसा ताणल्या सारख्या वाटत होते. दहा एग्स आणि तेही मोठ्या साईजचे तयार झाले होते. तिची वेळ बाराच्या जवळपास होती. आणि सकाळी फारसं काही खायचं नव्हतचं. दोघेही हॉस्पीटल मध्ये पोहचले तर आज परत १२ स्त्रियांची ती प्रोसेस होती. गेल्या गेल्या त्याच्या हातात पेढे आले, उर्वीने विचारलं तर, तो म्हणाला,
“माझ्या बहिणीला १७ वर्षानंतर बाळ होणार आहे, आजचं चौथा लागला, सगळं ठीक आहे. आशीर्वाद द्या.”
हॉस्पीटल मध्ये रोजचं पेढे वाटल्या जायचे. लोकं डॉं माधवला देव मानायचे. उर्वीसोबत असणार्या बायकांना तिने विचारलं, तर कुणाची पहिली, कुणाची दुसरी, तिसरी सायकल होती, एकीची तर बारावी सायकल होती.
काही वेळाने डॉ ऑपरेशन रूम मधून बाहेर आले, उर्वी आणि आकाश विदेशातले, आणि बऱ्या पैकी सर्व समजणारे. मग डॉ उर्वीजवळ आले,
“सो रेडी, दहा एग्स आहेत. गुड. पहिल्या सायकललाच चांगला रीस्पोनंस आलाय.”
तेवढ्यात एका माणसाला ऑपेरेशन रूममधून बाहेरच्या खोलीत शिफ्ट करत होते. उर्वीची नजर पडली,
“डॉ हे...”
“हुम्म्म.... तुम्ही लकी आहात, आकाशच्या सीमेनचा प्रोब्लेम नाही, इट्स गुड. धिस इज सर्जिकल स्पर्म रिट्रीवल प्रोसीजर, जसं तुझे एग्स कलेक्ट करणार आहोत ना तसं पुरुषांच्या सीमेन मध्ये स्पर्म नसतात तेव्हा ही बायोप्सी करून आम्हाला काढावे लागतात. आणि मग फ्रोजन करून ठेवावे लागतात. यू बी रेडी, आय हॅव टु गो, लेट्स मीट इन द ऑपरेशन रूम. ऑल द बेस्ट.”
आता बराच वेळ आकाश आणि उर्वी मध्ये शांतता होती. फक्त मन संवाद घालत असावे. आणि उर्विला बोलावण्यात आलं, परत तो हॉस्पिटलचा झगा आणि तिचं मनातली तळमळ, ह्या पुढे नको म्हणणारी. तेच हृद्याच धडधडण, तिची हुरहूर, बाहेर कठोरपणा आणि मनात अंनत भीतीने काटे उभे राहिलेले, जे दिसत नव्हते पण तिचे तिला बोचत होते. कुणाची पर्वा नाही, बस आपणच आहोत ह्या मिजासात उर्वी ऑपरेशन रूम शिरली.
सर्व टीम परत रेडी होती. आणि आकाश सुद्धा. सर्व त्याच्याशी बोलत होते, सगळ्यांना उत्सुकता होती त्याच्या कामाबद्दल जाणून घेण्याची. ऍनेस्थेसिया दिल्या गेला आणि हळू हळू सगळं ऐकायला येणं बंद झालं.
प्रोसेस सुरु होताच सगळं शांत झालं होतं, आकाशला मॉनिटरवर दाखवत डॉक्टरने सर्व एग्स काढले. दहा पंधरा मिनटाची प्रोसेस होती ती. एक्स्पर्ट होते डॉक्टर. नंतर उर्विला बाहेरच्या रूमध्ये शिफ्ट केलं आणि आकाशला सीमेन सैंपलसाठी सांगितलं.
उर्विला जाग आली तेव्हा आकाश चहा आणि बिस्कीट घेवून होता. काहीच बोलला नाही. लावलेली सलाईन परत बदलल्या गेली. ती संपेपर्यंत तसंच पडून राहायचं होतं. आजूबाजूला अजूनही बायका होत्या. आकाश जरा वेळाने बाहेर गेला. नर्सला सांगून गेला की झालं की बोलवा म्हणून.
उर्वी मात्र तिकडे होती, सगळ्या बायका त्या बेडवरही बोलत होत्या. प्रत्येकीला आशा होती. त्या तेवढ्या ठिकाणी उर्वीला मोकळेपणा दिसला. कारण सगळ्या एकाच कारणासाठी जमल्या होत्या.
एक तर म्हणाली, “आता खूप त्रास होता मला, दर वेळी हे सगळं करतांना.”
तोच दुसरी म्हणाली, “तुम्हाला राहिलं होतं ना मागच्या सायकल मध्ये. राहील मग आता. डॉक्टरने औषधी बदलली होती ना तुमची.”
सगळ्या बायकाच्या नजरेत आशा होती, तोच एक स्त्री खोलीत आली, तिच्या सोबत मागच्या सायकल मध्ये असणारी एक स्त्री खोलीत होती, आनंदाने आत आली, तिला तिसरा महिना लागला होता,
“ताई, काळजी करू नका, माझी तर चौथी सायकल होती, कांटाळलो होतो आम्ही, करणारपण नव्हतो, सरांनी खूप जोर दिला आणि मग त्यांच्या विश्वासावर आम्ही ही सायकल केली. देव माणूस आहे डॉक्टर.”
तिला बघून सगळ्या आनंदी झाल्या होत्या. ती पेढे ठेवून निघून गेली.
एकीच झालं होतं. मग तिची सलाईन काढून टाकली नर्सने, ओटीपोट पाण्याने भरून असल्याने, टॉयलेटला जाण्याची घाई होती तिला, ऑपिरेशनच्या आधी पाणी प्यायला सांगतात, मग पोट अगदी भरून असतं. ती टॉयलेटला गेली. आणि लगेच एक म्हणाली,
“हिला आता राहायला हवं ग, किती मानसिक ताण आहे हा, नवऱ्याला स्पर्म नाहीत, दर वेळी दीर येतो सोबत.... त्यापेक्षा डोनर, माहित नसणार शोधायचा ग... काय करणार.... प्रेशर असते घरचं, वंशाचा दिवा हवाय म्हणून. कसेतरी तयार होतात एवढा खर्च करायला.”
तेवढ्यात एकीची आई आली, तिची मुलगी होती, अजून काही तिच्या लेकीला शुद्ध आलेली नव्हती. तिला बघून एक म्हणाली, “काकू सगळा खर्च तुम्ही केला काय हो?”
“हो बाई, तिच्या घरचे टाकून देणार होते. डॉक्टरच नाव खूप ऐकलं आहे. मग आम्ही आलो इकडे. माझ्या पोरीत काहीच दोष नाही. राहील तिला. मी आताच आले डॉक्टरला भेटून.”
तिच्या जावयाने डोकावलं आणि ती गप्प झाली.
उर्वी सगळं ऐकून सुन्न झाली होती. कदाचित आकाशचा अनुभव सुद्धा माणसांमध्ये राहून असाच असले असं तिला वाटत होतं. तो खोलीत आला तेव्हा त्याचे डोळे पाणावले होते. उर्वी उभी झाली आणि गरगरली, त्याने पकडलं,
“ठीक आहेस ना, की अजून थोडा आराम करतेस. मी खाली जेवणाचं बघून आलोय.”
“ठीक आहे. जावूया मग, तू बाहेरच थांब, मी येते कपडे करून.”
दोघेही निघाले, आता दहा एग्स होते पण त्यापैकी पाच फर्टिलाइजेशनसाठी काढणार असं एमबऱ्योलॉजिस्ट म्हणत होता हे आकाशकडून उर्वीला समजलं होतं. आता त्यांना वाट होती, कधी डॉक्टर त्यांना एम्ब्र्यो ट्रांसफरसाठी बोलावणार ह्याची. आज एमबऱ्योलॉजिस्ट त्यावर काम करणार होते.
उर्वी आकाशचा हात धरून हॉस्पिटलच्या पायऱ्या उतरत होती. तर तिची नजर झाडाच्या खाली असलेल्या बाकावर बसलेल्या स्त्रीवर गेली, खूप रडत होती ती. उर्वीने तिथून जाणाऱ्या नर्सला विचारलं, तर ती म्हणाली,
“मॅडम, त्याचा रिझल्ट नेगटीव्ह आहे. मी जाते त्याच्याकडे. इथे सगळेच ह्या दुखातून जातात पण शेवटी कधीतरी आनंद असतो पेशंटच्या चेहऱ्यावर. पण काही पेशंट रडत जातात घरी. दुखं होतं आम्हालापण, नातं जुळून जातं ना पेशंटसोबत ह्या साऱ्या ट्रीटमेंट मध्ये.”
आकाशने उर्वीच हात घट्ट केला. आणि तिला घेवून गेला. दोन दिवसानंतर म्हणजे तिसर्या दिवशी, एम्ब्र्यो गर्भशयात ट्रांसफर होणार होते. सकाळी उर्वी आणि आकाश हॉस्पिटलला पोहचले. त्याच सोबत असणार्या आजही होत्या. नजर ओळख तर झाली होती. एमबऱ्योलॉजिस्टने आकाश आणि उर्वीलाही बोलावून एम्ब्र्यो दाखवले. तसं उर्वी बोलली होती दाखवायला. सूक्ष्म माक्रोस्कोपमधून त्यांनी बघितले.
एमबऱ्योलॉजिस्ट, “फक्त दोन आहेत. तुम्ही बघू शकता, एक ८ सेल मध्ये डिव्हाईड झालेला आहे. आणि एक चार आणि पाचवा दिसतोय पण पूर्ण नाही.”
“हुम्म वन इज गुड, राइट!” उर्वी आनंदाने म्हणाली.
“यस, ऑल द बेस्ट.”
“बट दोन्ही इन्सर्ट करणार ना?”
“यस, आम्ही मिनीमम दोन करतो.”
“आणि मॅक्स?”
“तीन, तेही क्वालिटी बघून, पण एम्ब्र्यो खूपच असतील आणि उत्तम असतील तर मात्र आम्ही बेस्ट टू इन्सर्ट करतो आणि बाकी डिसकॉर्ड करतो, आणि जर पेशंटला फ्रोजन करून ठेवायचे असेल तर मग तेही करतो.”
उर्वी आणि आकाश खोलीतून बाहेर आले, फिंगर क्रॉस करून उर्वी होती. तोच तिचं नंबर आला. आता एम्ब्र्यो(सूक्ष्म भ्रूण) डिशमधून कॅथेटर मदतिने गर्भाशयात जाणार होते. उर्वीला पोजिशन घेताना डॉक्टर खुश होता आणि सर्वच.
“एंडोमेट्रियम इज गुड.”
“साने मॅडम, उर्विला एक आज प्रोजेस्टेरॉन इंजेक्शन द्या आणि बाकी मेडिसिन लिहून द्या.
“उर्वी ऑल गुड, ऑल द बेस्ट, परत येवू नकोस... मी माझ्या प्रतेक पेशंटला हेच म्हणतो. कळव मला.”
“आकाश आज थांबत आहात ना?”
“हो, उद्या सध्याकाळी निघू.”
“गुड, परफेक्ट. कॉल मी एनी टाइम.”
दहा मिनिट उर्वीला तिथे पडून राह्यला सांगितलं आणि मग नजीकच्या खोलीत तिला अर्धा तास लेटायला सांगितलं. IVF झालं होतं. बाहेर तयार केलेलं भ्रूण शरीरात आलं होतं, आज तिला ही भीती नव्हती की फर्टिलाइजेशन झालं नसेल म्हणून. आज तर बाळ आतमध्ये होतं, बस त्याने तग धरावा असचं वाटत होतं. सर्व अनादांत सुरु होतचं. दुसर्या दिवशी भावाचा साखापुडा होता त्याच्या बायकोच्या गावी. आकाशने गाडी केली होती, ते दोघे सरळ तिकडे जाणार होते.
सकाळी नागपुरात पोहचले, आणि हॉटेलवर आले, उर्वीला तयार व्हायला सांगून आकाश काही कामं आटपवायला निघून गेला. तसा साखरपुडा दुपारचा होता, म्हणून सगळं अवकाशात होतं. तसा आकाश उशिरा हॉटेलमध्ये पोहचला,
“काय रे समजत नाही का? जायचं आहे म्हणून.”
“आलो ना आता, किती काम असतात ग, सांग ना तुझ्या बाबांना जरा सिरेमनी लांबवा म्हणून.”
“असं, तुला समजायला हवं ना.”
“काही होत नाही, अर्ध्या तासाने. मी करतो फोन.”
आकाशने फोन केला, आणि ते निघत आहेत, दोन तासात तिकडे पोहचतील असंही सांगितलं. मुख्य कार्यकम थांबवा आम्ही येतोय असं बोलणं त्याचं झालं होतं.
तरी उर्वी बडबड करत होती.
“कशाला चीडचीड करतेस ग, तू शांत हो, नाहीच थांबले तरी येवू चेहरा दाखवून. मी माझं काम केलं आणि जरा थांबवू शकत नाहीत काय मुलाकडले आहेत ना. आपण एवढं सांभाळून जातोय ते तेवढं सांभाळू शकत नाही. अरे बोलता बोलता अर्धा तास निघून जातो.”
उर्वीची किरकिर सुरु होती कारण मिडीसीन मुळे तिची बॉडी सुजल्यासारखी झाली होती. ब्लाउजही होत नव्हतं. शेवटी आकाशने तिला जेवायला सांगितलं आणि तो बसला ब्लाउज उसवत. उर्वी हॉटेलमध्ये तयार झाली. दोघही निघाले.
कथा क्रमशः
© उर्मिला देवेन
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो साभार गुगल
0 Comments