बीइंग नारी... “जेव्हा आई होणं अवघड होते!” © उर्मिला देवेन
भाग ४८
----
आनंदाच्या क्षणात आठवणीने अलगत शिरकाव केला होता…
कंठ दाटला होता अन पाझर मनाचा फुटला होता.
कशी मांडू ही कथा, प्रश्न माझा मला पडाला होता
उत्तरातही आज साठवणींचा मोकळा झरा भेटला होता...
२०२२ –
उर्वीच्या कानात आकाशचा आवाज घुमत होता,
“उर्वी उर्वी, काय सुरु आहे, झोपली का?”
आकाश मुलींच्या खोलीबाहेर उभा होता. उर्वीच्या नजरेसमोरून जणू जवळपास दोन दशक धावले होते. ती उठली, आणि गरगरली. आकाश धावत आला,
“काय ग काय झालंय?”
“अरे जरा गरगरलं?”
“असं! मी तर काही केलं नाही, काही न्यूज आहे का?”
उर्वीने आकाशचा हात धरला, चिमटा घेतला आणि खोलीतून बाहेर आली,
“काय रे! तुला दुसरं सुचत नाही. तेच कारण असतं का?”
“नाही म्हटलं मागच्या वेळी तुझं तेच डाव्या बाजूला दुखत होतं आणि मी आपलं काही मानत नव्हतो ना...”
“तू कधी ऐकतोस काय माझं... नालायक झाला आहेस आता...”
“ये नालायक कुणाला म्हणतेस ग, दोन मुलींचा बाप आहे मी... सर्टिफिकेट आहेत माझ्याकडे, तेही दोन दोन, आता बोल...”
“हुम्म्म, तरी समजत काहीच नाही, तेच तुझी टीम वाढली आहे ना.”
“मग! मला तू समजतेस ना मग झालं...”
“तेच करत आहे आता...”
“काय ग आलीस का आतापण तुझ्या त्या त्राग्याच्या नदीत डुबकी घेवून, माझ्यावर ओरडत आहेस ते, भूतकाळात शिरून आलीस की माझी कुठे रहातेस तू...”
“असं, किती बदमाश आहेस रे तू... त्यातही मी तुझी होते आणि.... ह्या तुझ्या अफाट पसरलेल्या साम्राज्यातपण तुझी आहे.”
“अबे... बस.... दे आता शिव्या.... असे फुलं बरसतात ना माझ्यावर तू अशी बोलली की ...”
“हुम्म्म...”
“उरू.... कॉफी कर ना ग, आज सोबत घेवू.”
“बारा वाजलेत, झोपायचं नाही का?”
“माझे नेहमी वाजले असतात तुझ्यामूळे..”
“अजिबात मिळणार नाही... झोप आता गुमान.”
“अजून एक मिटिंग आहे, US टीम सोबत...”
उर्वी अजूनही विचारात होती, तीने कॉफीच पातेलं मांडल, तोच आकाश मागून येवून बिलगला,
“मुली झोपल्या आहेत. माझ्याकडे अर्धा तास आहे... गरम कॉफी आणि तू.... काय मग...”
“गप्प बस ना रे... एकतर तुझे ते दोन जासूस, कुठून काय घेवून येतात आणि कसल्या चौकश्या करतात काय सांगू... मला म्हणतात मी मजा केली तुझ्यासोबत... तिला जन्माला उशिरा घातलं.”
“मग! केलीस तर... आपला हनिमून होता यार... आताही करत आहेस मजा!! मी तर अजूनही हनिमूनवर आहे. आपला तर वेळच बारा नंतर सुरु होते, त्या आधी तर तू ममा असतेस मुलींची... मग काय म्हणतेस!”
“गप्प बस... घे कप घे... “
“देत असशील तर बसतो... गप्प!”
“घे कॉफी घे, अजून काही मिळणार नाही समजलं...”
उर्वी गप्प होती, तर आकाश तिला म्हणाला, “जावूदे ग, मोठ्या झाल्या की कळेल...”
“नाही रे, त्यांना कळावं म्हणून नाही रे, ही माझी लढाई होती. आपल्या आईवडिलांनी जी चूक केली निदान मी ते करणार नाही... त्यांना कळावं म्हणून कधीच नाही... ती माझी इच्छा होती. माझी ओढ होती, माझ्या अस्तित्वाचा प्रश्न होता. आपल्याला हवं होतं पालकत्व.... त्यांना का ऐकवायचं? आणि का म्हणून ऐकवायचं? मी सहन केलेल्या त्रासाची गाथा त्यांना का म्हणून ऐकवायची... त्यांनी हट्ट नव्हता धरला.... ती आपल्या काळाची गरज होती. आपण केलेल्या कष्टाची परतफेड त्यांनी का करावी? एकदा ह्या पालकत्वाच्या प्रवासात शिरलो की आपण आजन्म पालक होवून राहतो... तिथे मोबदला नको.... ज्यांनी मागितला ते कुठे त्याच क्षणापासून पालक असतात! मग आपले आईवडील तेच करत होते ना... हा जर आपल्या मुलींनी त्याची कदर केली तर ते बक्षीस असेल आपल्यासाठी... आणि नाहीच केली तरी आपलं पालकत्व कधीही संपणार असेल...”
“मग कशाला विचार करतेस ग? किती सुनवतेस ग.... एवढासा बोललो मी, चुकलं माझं माझ्या राणी.”
“पण कधी कधी मी फिरून येते त्या वाटा, आज वाटतं आपण किती भोगलं. मग अलगत मुलींच्या मिठीत सारं विसरून जातं. बघ ना लाडो आता नव वर्षाची होईल.”
“हो ना, आणि छोटी तर सरप्राईज होती आपल्यासाठी, किती नवसाने मोठी जन्माला आली...”
“नवसाने?”
“माझा होता ना ह्या देवीचा...”
“गप्प रे... पण आज आठवलं की वाटतं, विश्वास स्वतःवर असावा लागतो, लाख जमाना सोडेल पण आपण सुटायचं नसतं... माझ्या त्या प्रयत्नाने मी आई झाले, बघ ना कुठलीच ट्रीटमेंट कामी आली नव्हती, पण माझी मला मी केलेली ट्रीटमेंट लागली रे, माझं असं म्हणणं नाही की सगळ्या ट्रीटमेंट चुकीच्या आहेत. सगळ्याच उत्तम आहेत, हजारो स्त्रियांसाठी आशेचे किरण आहे... पण माझ्या सारख्या काही असतील, धाराशाही झालेल्या त्यांना मी म्हणेन जिथे सर्व संपलं ह्याची जाणीव होते तीच नवीन सुरुवात असते... नव्या पर्वाची....
म्हणूनच सुरवात ज्याचा कधीच अंत नसतो, आणि अंत हीच सुरवात असते!
“व्हा... व्हा... सालं बायको एक नंबर आहे माझी... किती केलंय तरी चेहऱ्यावर दिसत नाही. दिसतो तो फक्त तुझा देखणा चेहरा..”
“असं... तू आज काहीही म्हण, बस माझ्या नावाचा जप करत, आज काही ही देवी तुला पावायची नाही.... आणि आपण केलंय रे सगळं...”
“आपण? तू... एक नारी म्हणून तुझी तळमळ किती होती. तुझी नजर तुलाच चोरत असायची. मी तर माघार घेतली होती पण तू घेतली नव्हतीस, हा जरा दाखवत नव्हतीस, पण मला समजत होतं तुझं.”
“असं, काय समजत होतं रे?”
“तू! तुझ्यातला आत्मविश्वास जो माहित नाही तू दर वेळी कुठून आणायची ते. हरली नाहीस, आणि शेवटी दोन मुलींना जन्म दिलास, बाळ दत्तक घेणार होतीस, आज मुलासाठी काम करतेस, लोकांना मदत करतेस, कुणाला काही लागलं तर स्वतःहून सांगतेस. स्वतःची शाळा काढलीस, PMS सारख्या विषयावर लिहितेस.... स्वतः NGO चालवतेस. एका कॅपनीची मालकीण आहेस. तुझ्या नवीन आयुष्याची सुरुवात आता कुठे झाली आहे.”
“हो ना, बघ ना, आपल्या बरोबरीच्या लोकांची मुलं किती मोठी आहेत आणि मी आज तिथे आहे. जे मी दहा वर्षाआधी करायला हवं होतं ते मी आज करते. कधी कधी वाटते मी आयुष्याचे दहा वर्ष गमावले की काय....पण वाटतं नाही, खूप काही शिकले मी... जे त्यांच्याकडे नाही. माझी पीएचडी पूर्ण झाली.”
उर्वी हसली....
“मला तर तू आता काही वर्षाआधी परत तशीच गवसली जशी कॉलेजमध्ये होतीस.... तुझी स्त्री म्हणून मातृत्वासाठी त्रागा खूप होता... पण भारी होती ती तुझी भरारी.... नमन तुला माझ्या नारी....”
आकाशने हात जोडेल आणि तिला उचलून घेतलं.
“किती भारी झालीस ग....”
“तू आपलं बघ, ते पोट आत घे आधी. सारखं मध्ये येते मला मिठीही मारू देत नाही नीट.”
आकाशने उर्विला खाली ठेवलं... आणि पोट आत घेऊन बघत होता...
“बस बस... जा तुझ्या मिटिंगला, आणि संपव लवकर....”
“म्हणेज चान्स आहे...”
आता तिने समोर असलेली सोफ्यावरची उशी त्याला फेकून मारली...
आकाशने ती झेलली, तो उठून त्याच्या खोलीत जाता जाता म्हणाला,
“गुंतून राहू नकोस, भावना लेखणीतून उतरव... बीइंग नारी म्हणून तू हे करावं असं मला वाटतं... निदान तुझ्या सारख्या कही स्त्रीयांची उमेद कायम असेल तुला वाचून. इच्छाशक्ती आपल्या इच्छेला आपल्या समोर उभं करते उर्वी. यू आर द बेस्ट एक्झॅमपल.”
“हुमम... “
आकाश त्याच्या खोलीत निघून गेला. उर्वीने तिची किचन आवरत राहिली... आणि मग परत तिच्या भूतकाळात शिरली...
दुसऱ्या आयव्हीएफ फेल नंतर ती तुटली होती. आकाशचा फोन आला तेव्हा ती त्याला राहून राहून म्हणत होती, “आता मी थकले आकाश.. मी थकले...”
पण त्याला ऐकायला जात नव्हतं, मागून जोरात मालगाडी येत होती.. आवाजाने तिला काही सुचत नव्हतं.
आकाशचे शब्द कानावर पडले,
“तू आधी जिथे आहेस तिथून बाहेर ये.. निघं.. उर्वी निघं... तू रेल्वे ट्रकवर आहेस. गाडी येत आहे... “
तो जोरात ओरडला आणि उर्वी रेल्वे ट्रक वरून खाली आली, नंतर दुसऱ्या ट्रकवरून केव्हाच ओरडणारा माणूस तिच्या जवळ आला,
“काय हो ताई, कशाला जीव देताय...”
आता मात्र आकाशने ते ऐकलं...
“उर्वी तू कुठे आहेस? काय प्रकार आहे? मला कळेल का?”
उर्वी तिथून निघाली, ती तिकडे कशी आली होती तिलाही माहित नव्हतं, ती गडबडली, आणि म्हणाली,
“मला माहीत नाही, मी कशी आले, मी जाते आधी रूमवर, मग बोलू...”.
“नाही, फोन सुरु ठेव तसाच.”
उर्वी चालत राहिली, नंतर तिने ऑटो केला आणि ती गेस्ट होऊसला आली.
रूमध्ये गप्प बसली होती. आकाश तिला म्हणाला,
“तिकीट बुक केली आहे... तू आताच्या आत्ता निघ तिथून नागपूरला. मी बोलतो डॉक्टरसोबत.”
काही वेळाने त्याने परत फोन केला, “मी काही आश्रमात फोन केले आहेत. तू भेटून ये तिकडे गेल्यावर. आपण बेबी दत्तक घेवूया... आपण तिकडे सोबत आलो की परत बऱ्याच ठिकाणी जावून येवू.”
“हुम्म्म....”
उर्वी दुसर्या दिवशी नागपूर आली, आईकडे आली, शांत होती... तर आकाशने परत फोन केला
“हा तुझा भाऊ कशाला मला अभीनंदन देतोय ग? तू काही लपवत आहे का माझ्यापासून.”
“नाही रे काही नाही... ते आईला पक्क वाटत होतं की मला ह्या वेळी राहील. आणि तिने सर्वाना सागितलं होतं म्हणे म्हणून तो बोलत असेल. असं काही नाही.”
“हुम्म... मला वाटलं तू मलाच सांगत नाही आहेस. काय सुरु आहे तुझं समजलं नाही.”
“अजून काय सांगायचं राहिलं... मला उगाच आता त्रास देवू नकोस... तुला समजत नाही का?”
“नाही नाही मला वाटलं तू माझ्यासोबत मस्करी करत आहेस.”
उर्वी नाराज होती, मोडलीही होती पण अजूनही तिच्यात ओढ कायम होती. आकाशपण धक्का सहन करू शकला नव्हता. उलट उर्वीच्या भावाचा मेसेज त्याला काही सुचू देत नव्हता. त्यालाही कधी उर्वीचा राग येत होता तर कधी मन मानत नव्हतं... आपण काय असा गुन्हा केलाय जे आपल्या वाटेला असं सगळं येत आहे असचं दोघांना वाटत होतं. एवढं सगळं स्वबळावर मिळवलं होतं पण आयुष्यात मनशांती नव्हती. कुठे कमी पडलो ह्याची बेरीज वजाबाकी सुरु झाली होती दोघांची. दत्तक घेण्याचा निर्णय मनात आता घर करत होता. उर्वी अजून जास्त काळ वाट बघू शकत नव्हती आणि तिला असं तिच्याच नजरेत तुटलेलं आकाश बघू शकत नव्हता.
डॉक्टरच्या आग्रहाने तिने पुढे दोन IVF केले पण पुढच्या सायकल मध्ये तो नंतरचा पंधरा दिवसाचा वेटिंग पिरेड तिला खायला उठत होता... शेवटी नवीन हॅचिंग प्रोसेसचा वापर करायचा असं डॉक्टरने ठरवलं आणि मग शेवटचा चान्स तिने घेतला. एवढी वाट बघून परत तोच प्रवास सुरु झाला हार्मोनल इंजेक्शन, फर्टिलायझेशन, एम्ब्रयो ट्रान्फर आणि वाट पाहणे. स्वतःला एवढं जपायची कि सांगू नका, जरा बर नाही वाटलं कि तिला आनंद व्हायचा. ती स्वतःमध्ये गुरफटत चालली होती. कुणाचं भान नसायचं.
कसं ना ते सुख वेगळं असतं, काही दुखलं तरी आपण प्रेग्नेंटच आहोत असं वाटते, मळमळ वाटलं की मनाला भरारी येते. पाळीचा एक दिसव जरी चुकला तरी आयुष्यात परत येतो आपण... उर्वी हे सगळं करून थकली होती. पण प्रत्येक पंधरा दिवस संपले की रिझल्ट लागायचा फेल. सगळ्या स्वप्नांची माती झाली होती. अश्रू संपले होत आणि सगळी आशाही. प्रश्नांना उत्तर देतांना डॉक्टरची वाट लागली होती. शारीरिक आणि आर्थिक कुठलीच परिस्तिथी नव्हती समोर ट्रीटमेंट करण्याची. दोघांनी इथेच थांबण्याचा निर्णय घेतला होता. शेवटची हॉस्पिटलची पायरी उतरली तेव्हा कोण जाणे डोळ्यात अश्रू नव्हते तिच्या.
२०२२...
बेसिनचा नळ वाहत होता, तसे उर्वीचे अश्रु ओघळून खाली येत होते. तिने नळ बंद केला, अश्रु पुसले आणि घरात जुने लॅपटॉप शोधत होती... आकाश त्याची मीटिंग संपवून आला.
“उर्वी काय शोधत आहेस ग? आवाज होतोय, माझ्या मुली उठतील ना, हे कशाला जून लॅपटॉप काढले तू.”
त्याने त्याचा पहिला लॅपटॉप उचलला,
“उर्वी आपला पहिला लॅपटॉप, खूप मदत झाली ह्याची.... तुझ्या पफ फंड मधून घेतला होता आपण. फेकायची इच्छा होत नाही.”
“हुमम, अरे ह्यात आहेत का माझे ते सर्व बुक्स आणि सगळं लिहून ठेवलेलं... ह्याचा डेटा आपण ट्रान्सफर केला होता ना...”
“आपल्या लोडोने ह्यावर पाणी टाकलं होत, ह्याच्या बटणातर आधीच काम करत नव्हत्या, पण तुझ्या लाडाचा होता म्हणून तू वापरत होतीस... लाडोने पाणी टाकलं आणि हा निकामी झाला होता.”
“अरे हो.... पण मग ह्या दुसर्या लॅपटॉपमध्ये काही होतं, मी मेल मधून डाऊनलोड करून ठेवलं होतं, हा होतोय का सुरु... बघ ना...”
“ह्याला छोटीने वायर ओढून पाडला होता... आठवते?”
“पण ह्याचा डेटा तुला काढता आला होता.”
आत आकाश हसला, “तुला आठवते मागे आपल्या मुलींच्या रोबोटने पोट्टी केली होती टॉयलेटमध्ये. काय म्हणाल्या होत्या ते दोघी, त्यांचा रोबोट, पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड असं पोट्टी करतो... प्ल्श केलं होतं त्यांनी....”
“आता, कुठून लिहायला सुरुवात करू सांग, हे असे दोन कार्टून घरात फिरत असतात.”
“अबे दोन आयटी इंजिनीअरच्या मुली आहेत, मग त्यांचा रोबोट हेच खाणार ना... बघ काही दिवसांत माझी मुलगी ह्या घरातून चंद्रावर रोबोट उडवते... ती जन्मजात रोबोटिक्स शिकून आली आहे. आणि लॉजिक तर आपल्या छोटीच मस्त असते.”
“हुमम... ठेव तुझं तुझ्या जवळ. आणि तुझं तू ठरवून मोकळा होवू नकोस, त्यांना काय हवं ते त्या करतील. उगाच सल्ले देवू नकोस त्यांना. आणि तुझ्या मुली बापरे! डोक्याला ताप नुसता...”
“होत नव्हत्या तेव्हा काय कमी ताप होता, मला हा ताप मान्य आहे... इथे डोक्यावर जरी बसल्या ना तरी काही फरक पडायचा नाही....”
“हुमम, तू आणि तुझ्या त्या दोन मुली... मीच एकटी आहे इकडे... आकाश सांग ना रे कशी लिहू आता. ते वेळवरच सुचण आणि आता फरक असेल रे.”
“असायलाच हवा, तेव्हाच त्या वेळी आपण कसं वागलो हे मांडता येईल. त्या लिखाणात दुखः जास्त होतं पण आज तू तुझ्या ह्या नजरेने ते बरच काही मांडू शकतेस. ते वाचतांना तू हीरोइन झाली असती पण आज जे मांडशील ना त्यात सर्व बाजू येतील. आता जशी तू तुझ्या सारख्या स्त्रीयांना बघतेस तेव्हा स्वतःहून बोलायला जातेस, त्यांना सांगतेस, ट्रीटमेंट घ्या म्हणून बोलतेस, कुठली घ्याची ते सांगतेस. डॉक्टरकडून आल्यावर जेव्हा तुला त्या फोन करतात तेव्हा तू त्यांना समजवून सांगतेस. काय खायचं, काय प्यायच सगळं गरजेनुसार सांगतेस, तेव्हा तू खूप मोकळी वाटतेस. तुझ्या सांगण्यावरून कुणाला गुण आला तर तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद काही औरच असतो. मागे नाही का, त्या उषाला कितीतरी वर्ष मुल होत नव्हतं, तुझा पूर्ण अभ्यास तिच्यासोबत शेअर केला होता तू, तिचा आत्मविश्वास वाढवत होतीस. आणि तिला मुलगा झाला... तिचं सोडं, काय तू ओरडत होतीस... आजही ती भेटली कि तुला धन्यवाद देते... तुला वाटायचं ना तुझ्या ह्या अभ्यासावर कुणी विश्वास ठेवणार नाही म्हणून, पण आता ठेवतात ना.... तुझ्याकडे दोन दोन पीएचडी आहेत. तेही सगळ्या ट्रीटमेंट घेवून सुद्धा काहीही झालं नाही त्या नंतरच्या नैसर्गिकरीत्या मिळालेल्या.... अर्थात ट्रीटमेंट चुकीच्या होत्या असं नाही... पण त्यावरही एक ट्रीटमेंट असते, जी नसेल तर त्या साऱ्या काहीच काम करू शकत नाही, आत्मविश्वासाची.... न हरण्याची.... पॉझिटिव्हिटीची, जगाला विसरण्याची जी तू लोकांना देवू शकतेस. तू कुठलीच बाजू सोडली नव्हतीस, कितीतरी वेळा शून्यावर येवून तुझी सुरवात मी बघितली आहे.
“बापरे, किती बोलतोस रे...”
“मग काय आता बायको एवढी ज्ञान देते मग मला थोडंफार तर द्यायला हवं ना.... आता नाही आपली हिंमत हरून परत जिंकण्याची... पण जिंकणाऱ्या सलाम करू शकतो मी.... मी चुकलोच होता कधी कधी... लिही ग म्हणजे तू कुठे चुकली हेही दिसले ना.”
“हुम्म, तेच म्हटलं, सलाम ठोकून झालाय, अजून कसा तू बोलला नाहीस. माझी चुकी दाखवली नाहीस...”
“ये असं काही नाही.... मी आपला बघत होतो... तू बदललीस कि काय म्हणून... म्हणजे माझी उर्वी कशी ती चिडल्याशिवाय मजाच येत नाही यार लाईफमध्ये...”
“हुम्म, पण बरोबर आहे तुझं, आपली एक बाजू आपण मांडू शकत नाही. हा सर्वांचा प्रवास होता, हा त्याला मी लीड करत होते... बघ सुचलं मला... माझं ड्रीम बेलीच स्वप्न पूर्ण झालंय पण अजूनही खूप स्त्रीया ह्यातून जात असतील.... विसरतो रे आपण...”
“हुम्म जसं आपण लोडोच्या नादात छोटीच आगमन विसरलो होतो, ती तर डबल धमाका ठरली आपल्यासाठी, बरोबर तीन वर्षाच्या फरकाने झाली, पण तुझं सीझर झालं त्यावेळी. तू नेहमीच बरोबर होतीस ग.... मीच वेडा होतो.... अधून मधून साथ सोडून फुगून बसायचो... नाराज होत असायचो. तुझ्याशी बोलायचोही नाही.”
“चला समजलं एकदाच....”
“ये, माझ्या मुलींना सागेन हा, त्यांना आवडत नाही तू पपाला काही म्हटलेलं...”
“हुम्म... डोक्यावर बसवून ठेवलं आहेस ना..”
“मग काही हरकत आहे तुझी!”
“नाही रे, पण तुझी हरकत नसेल तर आता लॅपटॉप हाती घेवू?”
उर्वीने लॅप टॉप काढला, चष्मा लावला
आकाश, “आताच सुरु करतेस? मी ग, किती वेळचा आशेने वाट बघतोय तुझी.”
“बघ ना जरा... प्रतीक्षा कशी असते ते.... हा तोच तर प्रवास आहे... सुचलं रे मला... आताच सुचत आहे.”
“आता काय बोलणार.... मग उद्या?”
“हुम्म्म, गप्प बस... उद्या शनिवार आहे.... मी झोपणार, तू तुझ्या लाडाने वाया गेलेल्या मुलींना सांभाळ सकाळी... मला जेवढ्या वाजेपर्यंत जमेल मी निदान सुरुवात करते. आज भावना थांबवत नाही.... खूप दिवसाचं मनात आहे.”
आकाश उठला, “मी जातो आपल्या मुलींच्या खोलीत. तू कर सुरुवात...निदान हे संपल्यावर तरी तू त्या भूतकाळात शिरून येणार नाहीस.... हो मोकळी... मी आहे इकडे.”
आकाश खोलीत गेला आणि उर्वीला आज मोकळं व्हायचं होतं...
अंतिम भाग लवकरच....
कथा क्रमशः
© उर्मिला देवेन
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो साभार गुगल
0 Comments