सोपं नाही Being a नारी....
स्वतःच्या अस्तित्वाला जपत,
ती जीवघेणी लढाई लढण्याची सारी खुमारी...
तारेवरची कसरत असते सारी,
आजच्या काळात अस्तित्व जपत
कठीण आहे हो Being a नारी,
तरीही घेते ती भरारी...
नमन तुला शत-शत नारी!!
आणि उर्वीने नारीला नमन करून लेखणी हातात घेतली...
मातृत्व! जगातलं सर्वात्म वरदान स्त्रीच्या वाटेला आलं आहे. अर्थात त्याचं ती तिच्या प्रेमाने सोनं करते. पण माझ्यासारख्या काही स्त्रीयांना ते सहजासहजी मिळत नाही. तो काळ खूप काही शिकवून जातो, अनुभव येत जातात, नाती उमगतात... नि मग सगळं नितळ झालं की आनंदाची बरसात होते... पण होते, विश्वास ठेवा. बस आपली इच्छाशक्ती आणि मनातला विश्वास स्वतःवर कायम असायला हवा. मग बघा ती बरसात बरसायला कुठल्या नभाची गरज पडत नाही...
तो त्रासाचा काळ असतो, त्यात आपुलकीची गरज असते, पण गरज पडावी आणि आपसूक कुणी यावं असही होत नाही, समाज दुषणे लावतो, नातेवाईक टोमणे देतात. कटुंब साथ देत नाही... कधी कधी तर आपण आपल्याला साथ देत नाही...
आपल्या समाजात मातृत्वावर असंख्य रचना आहेत. आईची माया, तिचा त्याग सारं डोक्यावर घेवून मिरवत असतो आपण. अर्थात, ती त्याची मानकरी आहे. त्या वेगळं, आपण एखाद्या स्त्रीच्या शापितपणावर म्हणजे कधीच आई न होवू शकणाऱ्या स्त्रियांवर सुद्धा बोलून मोकळे होतो. काव्य, कथा भरभरून लिहितो.... दुःखाचा तो झरा अश्या शब्दाने शब्दबद्ध असतो कि आपल्या काळजातील झराही पाझरतो...
पण मला प्रश्न पडतो कधी मातृत्व शापित असू शकतं का? प्रत्येक स्त्रीमध्ये आई असते, आता तिने बाळ जन्माला घातलं पाहिजे अगदी असचं नाही... ह्यापलीकडे जावूनही अनेक स्त्रीयांनी मातृत्वाची परिभाषा बदलली आहे. सुस्मिता सेनने लग्न न करता दोन मुली दत्तक घेतल्या... हा, आता ती सेलिब्रिटी आहे तिने हा आदर्श मांडला, जगाला दिसली, पण अश्या अनेक स्त्रिया आहेत ज्यांनी अनेक आदर्श समजापुढे मांडले. काहींनी बाळ दत्तक घेतले, काहींना बाळ दत्तक घेतल्या नंतर झाले, काही महान झाल्या, काहींना महानता नको होती. काही समजाचा आदर्श झाल्या तर काही समजासाठी लपून राहिल्या, काही दिसल्या, काही नाही, काही आजही आहेत, अश्यांना अनेक वंदन... त्या आहेत म्हणून समाज मातृत्वाच्या नवीन व्याखेला समजू शकला. त्यांच्या सामाजिक दृष्टीकोणाने मातृत्वाची अनंत सीमा आखली आहे...
पण आपण कधी स्त्रीची ही मातृत्वासाठी असेलली लढाई उचलून धरत नाही. पाच, सात, दहा, बारा... किंवा एकवीस वर्षाने एखाद्या स्त्रीला मातृत्व येत असेल, तर ती स्वतःही तिची लढाई आनंदात विसरते... साहजिक आहे. पण ती लढाई कुणाच्यातरी वाचण्यात आली तर तिच्या सारख्यांना किती बळ मिळेल हे सांगायाला बळाची गरज पडणार नाही. तिचा आत्मविश्वास कायम असेल कुणावर नाही... तिचा तिच्यावर!!!
आपण स्त्रीयांचा हा त्रासाचा काळ, अगदीच मोजक्या शब्दात मांडून मोकळे होते, “अथक प्रयत्नानंतर तिला मातृत्व लाभलं....” बस संपलं... पण ते प्रयत्न का होते? काय होते? तिची तळमळ काय होती? ती कुठल्या थराला जावू शकत होती... तिची मानसिकता, तिची हिंमत, तिची लढाई... ह्या एवढ्या शब्दात फक्त?
तसंही स्त्रीच्या कार्याची आणि तिच्या त्यागाची दखल आपला समाज घायला आजही मागे पुढे बघतो. इतिहासात हीरे दडले आहेत पण त्यांना चमक कधी भेटली नाही. आणि मग ह्या अश्या लढ्याची कोण काय दखल घेणार.
असो, पण ही लढाई आजच्या काळात दहात एका स्त्रीची आहे, हि स्त्रीच्या त्या प्रवासाची लढाई आहे ज्यात पण ती गरीब आहे कि श्रीमंत हे मापु शकत नाही, पण अस्तित्वात आहे. आपण अस्तित्वात नसणाऱ्या, काल्पनिक आणि भावनिक विचारांना आणि मनस्थितीला डोक्यावर घेतो पण अश्या रोज आपल्या नजीक सुरु असणाऱ्या लढाया आपण कितीश्या मनात आणतो. आपला एक शब्द त्या स्त्रीला नवजीव देवू शकतो पण आपण.... दोष काढून सोडून देतो.
अश्या स्त्रिया आजच्या समाजात जास्त आहेत, ज्या आजच्या नारी आहेत, त्यांना मातृत्व हवं आहे, त्यांच्या काळाची गरज असेत. त्या शापित नसतात पण जीवघेणी प्रतीक्षा त्यांच्या वाटेला येते. त्या बोलत नाहीत, मनात झुरत असतात. अश्या विषयावर बोलल्या जात नाही, आपला समाज किंवा स्वतःत्याही असा विषय पुढे आणत नाहीत. मग हा असा विषय अजूनही पाहिजे तेवढा लेखणीतून उतरवल्या जात नाही. मीही विसरले होते... पण आज परत मनाने दस्तक दिली आणि त्या वाट बघण्याच्या खेळातून मी वाटेने भटकून आले.
स्त्रीच आयुष्य म्हणजेच एक संघर्ष आहे आणि त्यात मातृत्वाचा संघर्ष म्हणजे अस्तित्वाचा, हाच संघर्ष होता माझा माझ्यासोबत, मी माझी लढत होते,
मी त्यातून घडले,
मीच खचले, मीच उठले.
पुन्हा नव्याने जागे झाले...
माझी मी मलाच उमगले...
नव्याने ह्या जगाला भेटले...
आणि स्वप्न खेचून दारात आलं, माझ्यासाठी, जिथे सर्वांनी हात टेकले होते तिथे मी अजूनही हातपाय चालवत होते. पूर्णपणे हरलेली बाजी मी जिंकले आणि बाजीगर झाले....
ह्यासाठी मला कुणी पुरस्कार द्यावा असं नाही, ही काही माझ्याच एकटीची लढाई नाही... माझ्यासारख्या अनंत स्त्रियांची आहे. ह्या माझ्या प्रवासावर कुणी टिप्पणी करावी असा हा नाही... ते एक ध्यास पर्व होतं, त्याला वाचून स्वतः उभं व्हावं स्वतःसाठी... इथे इच्छा आपली असते, आणि निसर्ग परीक्षा बघता असतो, पण आपण मागे यायचं नसते.
---
लग्नानंतर दोघांनाही मुलं हवंच होत. तब्बल सात वर्षाच्या विविध ट्रीटमेंटनंतर, आम्ही कंटाळलो होतो. आता शरीर नको म्हणत होतं. आणि मेंदूने त्याचे वेगळे गणित मांडायला सुरुवात केली होती. बसिक, औषधी, ऑपेरेशन, आययूआय, आयव्हीएफ सारं काही करून मन थकलं होतं. आपण जन्माला आलोय ते जन्माला घालण्यासाठी नाही आपला उद्देश नक्की वेगळा आहे हेच मन मानत होतं. मनाला समजवत राहायची की असे कीतीतरी लोक असतात ज्यांना मुलं होत नाही... दत्तक घेवूया....पण, पण मीच का? हा प्रश्न कायम निरुत्तर होता.
शेवटी नवऱ्यासोबत खूप वार्तालाप झाल्यावर ठरवलं मुलं हो वा ना हो, मी प्रयत्न करणारच हेच माझं ठरलं होतं. आणि IVF सगट सारं फेल होणे म्हणजे मी आईच होऊ शकत नाही असं नाहीच ना, बाळाला जन्म देणे म्हणजे नुसतं मातृत्व नसतं ती तर सुरुवात असते. आणि इच्छा असेल तर मग मार्ग कमी नसतात, अगदीच शून्यवर आलो तरीही.
मी दत्तक बाळासाठी वाटही बघतच होते. इथेही वाट बघावी लागणार होती. सहा महिने ते वर्ष तरी लागणार होतं आमचा नंबर लागेपर्यंत. तोही काळ माझ्यासाठी बोचत होता,
वाटायचं, बाळ हवंय पण इथेही प्रतीक्षा... म्हणजे ज्याला बाळ हवंय त्याने किती संयम बाळगायचा...
पण तेवढीच इच्छाशक्ती मजबूत झाली होती. जगातल्या सर्व ट्रीटमेंट माझ्यासाठी संपृष्टात आल्या होत्या पण माझी मी अजूनही बाकी होते. मनातली इच्छा मनाला कोरत असली तरी तेवढीच मजबूत करत होती. ह्या प्रतीक्षेच्या काळात परत एकदा आपण आपल्या इच्छाशक्तीला जार्गुत करावं असंच मी ठरवलं होतं.
हुशार होते, करियारिस्ट होते, नाकावर तोरा मिरवत असायचा माझ्या करियरचा, पण ह्या मार्गात माझी हुशारी फुस्स झाली होती. मग जरा मोकळेपणा वाटावा म्हणून नव्याने जॉबचा विचारच पुढे ढकलला, करिअरमध्ये अपडेट राहता यावं म्हणून नवीन कोर्सेस सुरु केले. स्वतःवर लक्ष दिलं, माझं जसं शेडुल केलेलं होतं मी तसंच सुरू ठेवलं, उत्तम जेवण, रोज व्यायाम, घरगुती हर्बल टी, मनाला येईल ते करणं, स्वतःचे छंद परत सुरु केले. फक्त स्वतःवर लक्ष द्यायला लागले होते. वाचन अजूनच वाढलं होतं. मॅगझीनसाठी लिहणं आणि ते सर्व केलं ज्यांनी मी आनंदी राहील. आकाश आणि मी दोघही सोबत भटकत असायचो. जिथे आनंद मिळेल ते करायचो. मनातली इच्छा बोलत नसले तरी ती मनात तीव्र होत चालली होती. माझ्या ध्येयाच्या मागे मी लागले होते. आकाश खुश होता कारण मी खुश होते.
मधल्या काळात भारतात जावून आले, तिकडेही फिरत असायची, फ्लॅटच पजेशन मिळलं होतं. आता कुणाची कटकट राहिली नव्हती. महिनाभर राहून मित्र मैत्रिणीना भेटून आले होते. कोण काय म्हणेल ह्याची पर्वा सोडली होती. कुणी विचारलं तर उत्तर न देता पुढे जाण्याचं मी शिकले होते. घरी आणि बाहेर लोकं म्हणत असायचे तिला आता बाळ काही होणार नाही. ती वांझोटी आहे, किती तिची ट्रीटमेंट झाली! काय प्रोब्लेम आहे सांगतही नाही... पण समोर कुणाची हिंमत होत नसायची. नातेवाईक, सखे सोबती, मित्र मंडळी संगळ्यांमध्ये मीच ती होते जिला समाजात सन्मान नसतो. मी चुप्पी साधली होती, काय आहे ना, अश्या वेळी आपल्या मनात आणि हृदयात काय सुरु असतं हे सांगायला शब्द नसतात.
बहिणीचा सातवा महिना होता. सगळं आटोपल्यावर मी सगळे झोपले असतांना हळूच तिच्या पाळण्यावर बसून झुलून आले होते. पण आता अश्रू नव्हते... त्यांनी डोळ्यांची साथ कधीच सोडली होती...
कुणी म्हणायचं आम्हाला सेक्स लाईफ जगता येत नाही तर कुणी म्हणायचं जमत नसणार. मी ऐकून न एकल्यासारखं करत बेश्रम झाले होते. समोरच्या नजरा खुपत असल्या तरी त्यांना काटण्याची नजर माझ्या कडे आपसूक आली होती. भावाच्या बायकोला दिवस गेल्याची वार्ताही आली होती, पण आता काही वाटावं अशी मी राहिले नव्हते.
मनात प्रयन्त सुरु होते, पण आता ते दिसण्यासारखे राहिले नव्हते. हळूहळू माझ्या मांडीवरचे आणि पोटावरची इंजेक्शनमुळे पडलेली डागही कमी होत होती. IVF सारख्या मोठ्या ट्रीटमेंटमुळे मुरूमाने डागाडलेला चेहरा परत सुरेख झाला होता. मी परत जगायला लागले होते. सगळ्या ट्रीटमेंट मधलं शास्त्रातलं शास्त्र माहित झालं होतं, म्हटलं तर माझ्या ह्या विषयावरच्या पीएचडीचे थीसेस आता लिहून संपले होते. एवढी ट्रीटमेंट झाली होती कि मी स्वतःला नक्कीच कळली होती. म्हणूच माझा विश्वास आहे कि आपण स्वतःला जेवढं ओळखतो ना तेवढं कुणीच ओळखू शकत नाही, डॉक्टर सुद्धा नाही, आपल्या शरीराच्या हालचाल आपण अगीद्च ओळखू शकतो. शेवटी डॉक्टरही प्रयत्नच करत असतो. आणि माझ्याबाबतीत मला मिळालेले सर्व डॉक्टर उत्तम होते. त्यांनी त्यांच्या प्रयत्नांची कसोटी कुठेच कमी पडू दिली नव्हती, पण तरीही मी मात्र खाली हाताने परतली होती.
मातृत्वाची वाट बघत राहणं पटत नव्हतं, मागे वळून बघितलं तर मी त्याच्यामागे काय काय नाही केलं होतं... तरीही यशासाठी वाट बघत राहणं जमत नव्हतं... आणि यशाची मजा तेव्हाच असते जेव्हा तुम्ही धाराशाही झालात हे जाहीर झालं असतं....
इच्छाशक्ती, आत्मविश्वास आणि समर्पण ह्यातच सर्व दडलेलं असते. बस त्याची जाणीव आपल्याला हवी... तिचं मला माझ्या प्रवासातून मिळाली होती... सर्वांनी हार मानली पण मी मानली नव्हती... हा मनाला सज्ज केलं माझं मातृत्व अफाट करण्यासाठी, समोर जे येईल ते स्वीकारण्यासाठी.
इथे रोज माझी पैज माझ्याशी होती. माझा नाकावरचा तोरा कधीच गळून पडला होता. पण तेवढाच आत्मविश्वास शिरला होता. आता विश्वास स्वतःवर होता, दुसऱ्यावर नाही. जिथे आशा सुटली असते तिथेच आत्मविश्वास कामाला येतो. स्वतःमध्ये सकारात्मक उर्जेचा वास असला की नकारात्मकता नुसती दस्तक देवून उलट्या पावलाने परत जाते, आणि आपण परत उभे होतो.
माझ्यावर कोण विश्वास ठेवणार होतं, डॉ. सुभाषला त्याचा IVFसिद्धांत जगासमोर आणण्यासाठी किती धडपड करावी लागली, पण शेवटी प्राण गमावले.... त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर सिनेमा आला.... पण ते हयात असतांना त्यांच्याकडे ते सांगतांना पुरावा नव्हता... मी काही डॉ. सुभाष सारखी महान नव्हते, पण माणूस म्हणून नुसती मदत करायची असायची, माझंही असचं होतं. माझ्या सारख्या कुणी दिसल्या की आपसूक तोंडातून निघायचं, तू हे केलंस का, इथे जा, ही ट्रीटमेट कर... पाळीबद्दल सांगण, शरीराबद्दल सांगणं, हे कशाला खातेस, काही होणार नाही असलं पथ्य पाळून... पण माझं कोण ऐकणार होतं, माझ्याकडे काय होतं. कुणीतरी तर मला म्हणालं होतं, “तू तर खंडीभर ट्रीटमेट केल्यात, तुला काही मिळालं.” “तिच्या पोटी अजून बाळ नाही आणि आपल्याला काय सांगते.” “वांझोटी कुठली, उगाच माझ्या सुनेला काही बाई सागते.” “परमेश्वराचा प्रसाद असतो तो.... ती नास्तिक आहे तिला नाही कळायचं.” “तिच्याशी बोलूही नकोस, स्वतः बघ म्हणावं आधी, आली मोठी.”
मला बाळ होणार हे मी नक्की केलं होतं, पण बोलत नव्हते. कारण बोलून आता अर्थ उरला नव्हता, वागून आता त्रास करून घायचा नव्हता.
आणि मग माझा आत्मविश्वास जिंकला, सहा महिन्याच्या काळात पाळीने मला तिच्या नाना तऱ्हेने छेडलं होतं, पण मीही रोज उठून उभी होत होती. आणि मग ती थकली....
सहा महीने लोटले होते... आणि त्या जुलै महिन्याची पाळी चुकली होती. मीही लक्ष दिलं नव्हतं. पण पाळी दहा दिवस वर गेली होती. आता मात्र मला शंका आली, आता कीटपण घरी नव्हते. कंटाळा करत मी जावून आणावं लागलं होतं. टेस्ट केली तेव्हां मन घट्ट करून होती...
आणि दोन घट्ट रेषा दिसल्या, वाटलं भ्रम असावा, मग परत दहा मिनटाने बघितलं, तरही त्या होत्या... मला काहीच सुचत नव्हतं. तरीही ते आकाशला सांगितलं नाही. पाच दिवस ही एवढी मोठी गोष्ट स्वतःजवळ ठेवली. भीती होती, परत काही नसलं तर, आम्ही आता कुठे जगतोय आणि आकाशला परत त्रास व्हायचा.
शेवटी त्याला सांगितलं, तेव्हा तोही खूप असा एक्ससाईट झाला नव्हता. आम्ही मनाला घट्ट करून हॉस्पिटलला गेला. आणि पहिल्यांदा आम्ही आमच्या येणार बाळाला बघितलं होत. आनंद आणि काळजी दोनही सोबत होतेच.
डॉक्टरने चक्क ड्यू डेट सांगितली... आणि सगळं उत्तम आहे असा म्हणाला तेव्हा कुठे ते सगळं खर वाटलं. आकाशचे तर जमिनीवर पाय नव्हते. आणि मी त्याच्या सोबत आकाशात होते. आम्ही पालकत्वाच्या दुनियात अलगत पावलं ठेवलं होतं
मला दोन मुली आहेत हे मी त्या सर्वांना सागितलं ज्यांनी ज्यांनी माझी मनापसून ट्रीटमेंट केली, खूप आनंद झाला होता त्यांना, कारण आत्मविश्वास, इच्छाशक्ती आणि न हरण्याची ताकद हीच सर्वांत मोठी ट्रीटमेंट असते. जी हातून निघून गेलेली वेळ खेचून आणते... हेच सगळ्यांनी ओळखलं होतं.
आनंद आहे कि मला दोन्ही मुली आहेत. अगदी तीन वर्षात दोन मुली झाल्या आणि आमच्या घरट्याला शोभा आली. मी बाळ दत्तक घेतलं नाही पण बाळ आयुष्यात किती महत्वाचं असत हे जाणून होते. माझ्या मातृत्वाच्या प्रवासाने मला खुप शिकवलंय, आयुष्याचे प्रत्येक रंग दाखवले. मला बाळ होत नव्हतं तेव्हा मी प्रत्येक मुलांमध्ये स्वतःच्या बाळाला शोधायची. मातृत्व फक्त स्वतःच्या मुलांपूरतंच सीमित नसावं ते प्रत्येक मुलांसाठी असावं म्हणून माझं आयुष्य फक्त माझ्यापुरतं सीमित न ठेवता ते जगण्याचा हेतू बदलला.
दोन मुलीनंतर बाळ दत्तक घेण्याचा विचार सोडला पण मग मुलांसाठीची काम करण्याची सवय दत्तक घेतली. मी प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून सॉफ्टवेअर फील्ड मध्ये काम करते. स्वतःचा NGO काढला, लहान मुलांच्या शिक्षणासाठी काम करते खास करून स्लम भागातल्या आणि गावातल्या. माझी स्वतःची शाळा नक्सलवादी भागात गडचिरोली मध्ये आहे. जेथे मी गरीब आणि गरजू मुलांना विनामूल्य इंग्रजी शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे. शाळेचा सर्व खर्च मी स्वतः करते. तसेच माझ्या NGO च्या माध्यमातून वर्षभरात बरेच लहान मोठे मुलांसाठी आणि स्त्रियांसाठी प्रोजेक्ट राबवत असते. दर वर्षी १०० मुलांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न असतो. आणि माझ्या लेखणीतून सामाजिक प्रश्न मांडण्याचा आणि प्रोत्साहन देण्याचा नेहमीच प्रत्यन करत असते.
माझ्या मातृत्वाचे अनुभव कुणाच्यातरी कामी यायला हवेत म्हणून मी ते नेहमी गरजू स्त्रियां सोबत शेअर करण्यात मला आनंद येतो. मी समाधानी आहे की मी दोन मुलींची आई आहे पण माझ्या शाळेची मुलं बघितली कि मी आनंदाने भारावून जाते.
मला वाचण्यासाठी खुप धन्यवाद!!!
लेख पूर्ण झाला होता उर्वीने पेन ठेवला, ओघळून गालावर आलेले अश्रु पुसले आणि ती आकाशला आवाज देत तिच्या प्रेमाच्या दुनियेत शिरली.
समाप्त...
------------------------------------------------------------------------------------
कथेबद्दल जाणून घेण्यासाठी पुढचा मनातलं थोडं हा भाग नक्की वाचा!!
© उर्मिला देवेन
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
0 Comments