बीइंग नारी... “जेव्हा आई होणं अवघड होते!” © उर्मिला देवेन भाग ४३

 बीइंग नारी... “जेव्हा आई होणं अवघड होते!” © उर्मिला देवेन

भाग ४३ 



---

उर्वीच्या मनात प्रचंड कोलाहाल होता. पण जरा दिलासा मिळाला होता मॅडमशी बोलून, निदान सर्वच लोकं आपल्याबद्दल वाईट बोलत नाहीत हे तर तिला माहित झालं होतं पण विषय बदलला की बोलत असतील ना हेही ती जाणून होती.

“आकाश बोलू का?

“बोल.”

“मला आयव्हीएफ करायच आहे.”

“म्हणजे टेस्ट टयूब बेबी?”

“हो...”

“कुठे?”

“आपल्या भारतात करूया ना, तिकडे फर्टिलिटीची ट्रीटमेंट जबरदस्त आहे. इकडे मला रोबोट सारखं वाटते सर्व.”

“जगातल्या अतिशय प्रगत देशात आहेस तू. इथे अतिशय प्रगत पद्धतीने आणि सुरक्षित असतं सगळं.”

“हो, मान्य आहे, इथे सकसेस रेट पण खूप आहे, पण इथे खूप वेळ लागतो, त्यांच्या स्टेप्स समजायला आणि खूप असं मशीन सारखं वाटतं मला, म्हणजे हे सगळं शेवटी आहे तेच, आता निसर्ग साथ देत नाही म्हटल्यावर मशिनी आल्याच, पण नको, इथे आपलं ऐकत पण नाहीत रे.”

“तसं नसतं, त्यांना आपल्यापेक्षा जास्त कळत असतं. आणि एकदा तू हॉस्पिटलची पायरी चढली की आपण आपलं राहत नाही.... आता इथेही लोकं करतात ना ट्रीटमेंट.”

“हो मी काय नाही म्हणते का, पण आपल्याकडे पण खूप सक्सेस रेट आहेत. जगातला पहिला आयव्हीएफ झाला त्याच्या अगदीच तीन महिन्यात आपल्याकडे पहिला IVF झालेला, बस जगापुढे वेळ लागला यायला. आपल्या लोकांच्या मनस्थितीमुळे.”

“असं, बरच वाचलेले दिसते. झाली आहे डाउनलोड बुक, दिसलं मला तू पे केलेलं... पण सगळीकडे सारखंच असतं उर्वी, ह्या अश्या प्रोसेस मध्ये होणारी प्रगती सगळीकडे पसरते, इथे कशी फसवणूक होणार नाही.”

“पण लवकर काय ते लवकर सांगत पण नाहीत ना, आणि आपल्याला त्यांना विचारायला पण अवघड जाते.”

“आपल्याला घाई असते म्हणून असं वाटते, ते त्यांच्या ठिकणी बरोबर असतात.”

“आणि मी माझ्या ठिकाणी...”

“आता काय बोलणार. ठीक आहे. तू फीसचा विचार करत आहेस का, तर तुला सांगतो, जेवढी आपण भारतातल्या सर्वात प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये मोजू ना, तेवढीच इथे मोजावी लागेल.”

“हो, बघितली आहे मी.”

“मग?”

“आकाश”

“ठीक आहे... आता तू म्हणशील तसं. म्हटलं ना स्त्री हट्ट, ज्याच्यामुळे महाभारत, रामायम घडलं मग आता तुझ्यामुळे हे आयव्हीएफ आयन घडायला काय हरकत आहे. सारी दुनिया एक तरफ आणि बायकोची इच्छा एक तरफ...”

“काय रे सारखं मला म्हणत असतोस, मला काय कळत नाही तुझ्या भावना...”

“असं, मग आज आहे काही चान्स...”

आकाशला चिंता होती ती उर्वीची, तिला तिकडे असं आपुलकीने वागवणार कुणीच नव्हतं. तो तिला आताच्या परिस्थिती एकटं सोडू शकत नव्हता. ती काय करेल ह्याचा त्याला अंदाज नव्हता. तिची मानसिकता पार विस्कटली होती. आणि तिच्या मनाविरुद्ध तो जावू शकत नव्हता. त्याने तिच्याशी बोलता बोलता आयव्हीएफ बद्दल माहिती काढली. आणि म्हणाला,

“करूया, आता कुणाशी बोलली तू?”

“अरे ते ज्योति मॅडमला ओळखतो ना तू?”

“कुठे भेटल्या तुला?”

“फेसबुकवर….”

“हुम्म... काय म्हणत होत्या?

“त्यांना मुलं झालीत IVF मध्ये. जुडे!”

“मग, आता तुलापण तिकडेच करायचं आहे का IVF?”

“हुमम...”

आकाश विचार करत राहिला, त्याने उत्तर दिलं नव्हतं. खूप वेळाने म्हणाला,

“मुलं आपलंच असावं हा अट्टाहास कशाला ग?”

“तसं नाही, माझ्याही मनात तोच विचार आहे, पण मी प्रयत्नच केले नाही असं कसं?

“करत आहेस ना?”

“मग अशीच कधी पर्यंत राहू, कशात मन लागत नाही, तू पूर्ण सुख पायाशी आणून ठेवलं आहेस पण मला ते मनातून भोगता येत नाही.”

“काहीही बोलू नकोस.”

“मरेन रे मी अशी, खुडत... नाही होत आता सर्व सहन, ह्या काही वर्षात झालं नाही ना तर मग मी मनातून काढून टेकन. जगेल एकटी. खूप काही करण्यासारखं आहे. पण मला स्वतःला तर बघू दे मी अजून कशी आहे ते. काय आहे माझ्यात? मी का अशी आहे.?”

“मला माहित आहे ना तू कशी आहेस, मग कशाला अजून बघायचं आहे.”

“माझी स्वतःही ही लढाई आहेच ना, माझ्या अस्तित्वाचाही प्रश्न आहे हा, स्त्रीत्व पणाला लागलं आहे.”

“तर? सिध्द काय करायचं आहे आणि कुणासाठी करायचं आहे?”

“माझ्यासाठी, मला स्वतःला सिध्द  करायचं आहे. माझी घुमतट आहे, मलाच मार्ग काढावा लागेल. मी जोपर्यंत हात टेकत नाही मी मागे येणार नाही...”

“आणि प्रत्येक वेळी खचतेस आणि मला मारतेस ते?”

बराच वेळ दोघात निशब्द शांतता होती. मग आकाश दीर्घ श्वास घेत म्हणाला,

“तुला नाही म्हणणं म्हणजे अजून झाग्ड्याना आमंत्रण, स्त्री हट्ट कसा असतो हे मला तुझ्या मुळे माहित झालं. काढ माहिती. करूया...”

उर्वीला विश्वास होत नव्हता आकाश एवढ्या सहज हो म्हणाला म्हणून. ती त्याच्या मिठीत शिरली.

“उर्वी तुझ्या आनंदासाठी मी काहीही करेन पण तुला त्रास होतांना मी बघू शकत नाही, खचणार नसशील तर पुढे हो, मी नेहमी तुझ्या सोबत आहे. अगदी तू दत्तक घेतो म्हटल तरीही. तुझा प्रत्येक निर्णय मान्य आहे मला. बस तू मला आधीसारखी जबरदस्त, हेकेखोर, स्वतः जगणारी, माझ्यावर प्रचंड प्रेम करणारी, स्वतःहून जास्त विश्वास माझ्यावर ठेवणारी हवी आहे.”

आता उर्वीचे अश्रू आकाशच्या छातीला लागायला लागले, तीच्या केसांना कुरवाळत, तिला तो म्हणाला,

“काय आज, जेवायला काही मिळणार काय?”

“ब्राऊन राईस, बीट योगर्ट सॅलड, बोईल एगज्, व्हिजिटेबल सूप आणि जवसची चटणी ब्राऊन राईसवर.”

“अरे यार, भाजी पोळी आणि आपला बासमिती राईस करत जा ना कधी कधी, उद्या वांगे कर. तसही इकडे तो बासमती तेवढा मिळतो, मला तर सोनामसुरी, एच. एम.टी आवडते, संपले का ते?”

“बर, फ्राइड वांगे, अँड ओत्स चपाती... मग... आणि ते तुझे आवडते तांदूळ कधीच संपले.”

“दे काही तरी... पैसा नव्हता तरी भाजी पोळी भेटत नव्हती आणि आता पैसा असून हे असलं खावं लागते. काय तर हेल्दी डायट. घे पटकन भूक लागली मला. आणि ते ब्राऊन राईस की काय ते लाल, गुलाबी, काळे तांदूळ तर नाहीत जे तू कुठल्या तरी गावातून आणले होते, कचरा खाल्यासारखे वाटत असायचे... तुझ्या भीतीने खात होतो.”

“नाही नाही, संपले कधीच, आणि त्याला देव तांदूळ म्हणतात, खूप आयर्न असतं त्यात. गुड फूड. आपल्या जिभेला कसं मऊ मऊ खाण्याची सवय पडली आहे.”

“हो हो, पुराण झालं का सांगून, तू ना खरच पुस्तक काढ....”

दोघेही आनंदात परत नव्या प्रवासाच्या दिशेन वाटचाल करणार होते. सायन्स युगातील सगळ्यात मोठी आणि महाग ट्रीटमेंट आयव्हीएफ(देस्ट टयूब बेबी) ज्या द्वारे स्वतः बाळाला जन्म दिल्या जावू शकतो.

जर नैसर्गिक पद्धतीने आणि सर्व प्रकारच्या औषधी आणि प्रोसेस वापरूनही कुणी कंसीव्ह होत नसेल तर तिथे एक वैज्ञानिक उपचार आहे, ज्याला टेस्ट ट्यूब बेबी(Test Tube Baby)म्हणतात. या टेस्ट ट्यूब बेबीमध्ये कोणतीही पद्धत चुकीची किंवा बेकादेशीर नसते. विज्ञान, ज्या काळात आपण राहतो त्याच्या प्रगतीने काही कपल दुर्मिळ असणारं पालकत्वाच स्वप्न पूर्ण करू शकतात.

आयव्हीएफ आणि टेस्ट ट्यूब बेबी हे एकच आहे. खरं तर टेस्ट ट्यूब बेबी हा एक गैर वैद्यकीय शब्द आहे. जो IVF किंवा इन-व्हिट्रो फर्टिलायझेशनसाठी हमखास वापरला जातो. आयव्हीएफ (IVF) ज्याला डॉक्टरी भाषेत इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन (In-Vitro Fertilisation) म्हणतात.

सामान्य नैसर्गिक प्रक्रियेत स्त्रीबीज आणि पुरुष बिजाच फलन शरीरत होतं आणि मग गर्भ वाढू लागतो, आयव्हीएफमध्ये ही फनल क्रिया बाहेर एका ट्यूबमध्ये घडवून आणल्या जाते आणि ते फलित झालेले अति सूक्ष्म भ्रूण(एम्ब्रॉय) स्त्रीच्या गर्भात सोडेल जातात.

उर्विला प्रश्न पडला होता, आणि मग हे फलित झालेले एम्ब्रॉय ट्रांसफर केल्यानंतरही गर्भ टिकून राहिला नाही तर... मनाने उत्तर दिलं,

“नाही नाही, आपल्याकडे दोन तीन टाकतात, इथे विदेशात एकच टाकल्या जातो उत्तम असलेला. तेही बरोबर आहे. इकडे दोन तीन टाकण्यासाठी परमिशन लागते वाटते, काय माहित. पण ज्योती मॅडम म्हटल्या होत्या त्यांचे तीन टाकले होते म्हणून. एक तर निदान राहिलंच ना. त्यांचे तर पहिल्या वेळी तीन राहिले होते म्हणे, मग एकाच गर्भाची वाढ नीट होतं होती तर बाकीचे दोन काढून घेतले. पण नंतर तो एक पण नाही राहिला, किती त्रास ना... पण आता आनंदी आहेत त्या. आपल्याला तर एकचं पाहिजे. मुलगी नाहीतर मुलगा.... स्वतःवर लागलेला कलंक मिटवण्यासाठी.”

उर्वी हसली, “म्हणूनच लोकं असल्या ट्रीटमेंट करून लपवून ठेवतात, समाज आपला, अजून काय? मुलं होत नाहीत म्हणून दोष देत फिरतात, आणि असे ट्रीटमेंटनी झाले तर म्हणतात त्यांना होत नव्हतं ना सहजा सहजी, करताच येत नसेल.... वेगळेच आहेत, जरा थांबायचं ना, पैसा होता, अजून काय काय... असो त्यांच्या तोंडावर झाकण आपण लावू शकत नाही आणि आपली जखम आता मी लपवू शकत नाही.... ज्यांना जे बलायचं असेल ते बोलावं. मी तर करणार.”

लोकांचा विचार मनात शिरला, मन एकदम बोलून गेलं,

“आपल्याकडल्या लोकांमुळे भारताल्या पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीला जन्माला घालणाऱ्या डॉक्टर डॉ. सुभाष मुखर्जी ह्यांना मरण पत्करावं लागलं होतं. त्यांचा रिसर्च जगापुढे जवळपास आठ वर्ष आलाच नाही. डॉक्टर आपल्यासाठी काय नाही करत पण त्याचं यश असं गुंडाळून ठेवून काय मिळणार ना? आपली सिस्टम कारणीभूत होती आणि काही समाज, पण आजही काही टी॰ सी आनंद कुमार सारखे डॉक्टर आणि माणसं आहेत जे लपून असलेल्या त्यांच्या पेक्षा उत्तम गोष्टी समोर आणण्यासाठी मागे पुढे बघत नाही.”

१९८६ मध्ये जन्मलेल्या टेस्ट ट्यूब बेबीचे श्रेय डॉक्टर टी॰ सी आनंद कुमार त्यांना जाते. हर्षाचा(सुरुवातीला मानल्या गेलेली पहिली टेस्ट ट्यूब बेबी) जन्म झाला तेव्हा डॉक्टर आनंद ह्याच्या कार्याची खूप चर्चा झाली. समाज जरा पुढे गेला होता आधीच्या तुलनेत, लोकांना कळायला लागलं होतं एवढचं काय ते कारण असावं. शिवाय जगातल्या पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म १९७८ मध्ये इंग्लैंडमध्ये झाला असल्याने भारतात ही यशाची वार्ता स्वीकारायला तयार असावा. पण ह्याआधी म्हणजे १९७८ सालीच, जगातल्या पहिल्या ही टेस्ट ट्यूब बेबीच्या जन्मानंतर अवघ्या तीन महीन्यात भारताचा पहिला आणि जगातला दुसरा टेस्ट ट्यूब बेबीच्या जन्माला आलेला होता हे डॉ आनंदलाच काय पण जगाला आणि खुद्द भारताला माहीत नव्हतं.

अर्थात, आता पर्यंत जगातील दुसरी टेस्ट ट्यूब बेबी ही भारतातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी होती. आणि भारताची पहिली टेस्ट ट्यूब बेबी(हर्षा) ही खरं तर भारताची दुसरी टेस्ट ट्यूब बेबी होती.

१९९७ मध्ये जेव्हा डॉ आनंदच्या हातात जवळपास २० वर्षांपासून धूळ खात असलेल्या डॉ. सुभाष मुखोपाध्यायच्या काही नोट्स सापडल्या. त्या नोट्समध्ये आयव्हीएफ तंत्र आणि टेस्ट ट्यूब बेबी 'दुर्गा'चा उल्लेख आहे. त्यांच्या यशाआधीच आठ वर्षांपूर्वी भारताला आयव्हीएफमध्ये यश मिळाल्याचे पाहून कुमार आश्चर्यचकित झाले होते. तपासादरम्यान ते दुर्गाच्या आई-वडिलांना भेटले, भेटीदरम्यान त्यांना समजलं, की दुर्गा ही IVFबेबी आहे हे गुपित असावं हा त्याचा डॉक्टरांना आग्रह होता. आणि मग  आणि भारतातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी दुर्गा होती असा निष्कर्ष काढला.

ओव्होल्यूशन आणि स्पर्म जेनेसिसवर संशोधन करणारे डॉ. सुभाष ह्याची बेला अग्रवाल, (भारतातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीची आई.) ही त्यांची पेशंट होती. बेलाच्या फॅलोपियन नलिका खराब झाल्या होत्या. आणि ती आई होऊ शकणार नव्हत्या. डॉ. सुभाष यांनी त्यांच्या टीमसोबत इन-व्हिट्रो अर्थात इन-लॅब फर्टिलायझेशन पद्धतीवर काम करण्यास सुरुवात केली. शेवटी ३ ऑक्टोबर१९७८ रोजी डॉ सुभाषला यश मिळाले. आनंदात भारताने जगातील दुसऱ्या टेस्ट ट्यूब बेबीची निर्मिती केल्याचे त्यांनी जाहीर केले. पण गोष्ट लपवून ठेवण्यात आपली सिस्टम यशश्वी झाली.

काही नवीन नाही, आजही बाविसाव्या शतकात अनेक ठिकाणी मुलींना जन्मापूर्वीच मारले जाते. आताही मुलं होतं नाहीत म्हणून समाजात बायकांना दोषी मानून टाकल्या जाते. मुलगा मुलगी भेद केल्या जातो, आणि तो काळ तर चाळीस वर्षाआधीचा होता. मग डॉ.सुभाष यांनी मुलीचे नाव 'दुर्गा' ठेवले पण डॉ. सुभाष ह्याच्या कार्याला जगासमोर आणण्यासाठी खूप प्रत्यन केले तरीही ते यशस्वी झाले नाहीत कारण त्याचं कार्य सिध्द करण्यासाठी ते दुर्गाला जगापुढे आणू शकले नाही. वैदकीय क्षेत्रात सुरु असणार्‍या राजनीतीमुळे त्यांना मुर्खात काढल्या गेलं.

खर तर विज्ञान जगतात ही धक्कादायक बातमी होती ती पण त्याला समोर आणल्या गेली नाही. ५३ दिवस भ्रूण शरीराबाहेर जतन करण्यात त्यांना यश आले होते ही किती मोठी गोष्ट होती संपूर्ण जगासाठी, त्यानंतर पुढच्या पाच वर्षांनंतर जगात कोणीही हे करू शकलं नव्हतं, अशी ती पद्धत होती. त्यांनी आयव्हीएफचे अतिशय सोपे तंत्र विकसित केले होते. त्याच्या तुलनेत इंग्लंडमध्ये जन्माला आलेल्या पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचे तंत्रज्ञान यापेक्षा किचकट होते. आणि बघा आज आयव्हीएफ प्रोसेस मध्ये वापरल्या जाणारं तंत्र सुद्धा डॉ सुभाषच्या पद्धतीच एडवांस वर्जन आहे. आयव्हीएफच्या शोधासाठी इंग्लंडमधील शास्त्रज्ञांना नोबेल मिळाले. आणि आपल्या लोकांनी डॉ सुभाषला दिला बहिष्कार, हेवा. तिरस्कार. भारतातील वैज्ञानिकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. त्याचा हा शोध बोगस ठरवून फेटाळण्यात आला कारण ह्या सर्व गोष्टीचा पुरावा म्हणून ते दुर्गाला जागासोमर आणू शकत नव्हते. तिच्या आईवडीलांना दिलेल्या वाचनात बांधल्या गेले होते.

डॉ आनंद ह्यांना हे माहित झालं आणि त्यांना स्वतःला वाटलं, जो मान ते घेवून फिरत आहे त्याचा खरा मानकरी तर जगातून कधीच निघून गेला आहे. त्या महान कार्याला सलामी म्हणून हे महान कार्य जगासमोर आणायचे असे डॉ आनंद यांनी ठरवले.१९९७ रोजी त्यांनी भारतातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचे श्रेय डॉ. सुभाष यांना दिलं आणि त्यांही स्वतः किती महान असल्याच दाखवून दिलं. आज जगाला आणि भारताला जी IVFची पद्धत माहित आहे ती डॉ सुभाष आणि डॉ आनंदमुळे....

कथा क्रमशः 

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल... 

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

फोटो साभार गुगल

Post a Comment

0 Comments