आज कोर्टाच्या पायऱ्या चढतांना, अचानक सुमीच लक्ष त्याच पायऱ्या आनंदाने उतरणाऱ्या एका नवविवाहित जोडप्यावर पडलं. प्रत्येक अँगलने फोटो घेत होते दोघेही. सोबत फारसं कुणी मोठं दिसत नव्हतं. मित्र मैत्रिणी दणादण फोटो घेत होते. त्या छोटाश्या घोळक्यात आनंद ओसंडून वाहत होता. आणि सुमी एकटीच होती.
बघून सुमीला तिचे दिवस आठवले, तिनेही पळून जाऊन लग्न केलेलं, दोन मैत्रिणी हिच्या आणि दोन मित्र त्याचे लग्न लावून देण्यापासून तर संसाराची घडी बसेपर्यंत सोबत होते. मग त्याचेही संसार सुरु झाले. आणि उरले हे दोघे, सुमी आणि सुरज. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे. एक भाड्याची खोली घेतली होती. सुरजचा छोटासा जॉब होता. दोघचं मस्त जमायचं. लग्न घरच्यांच्या विरोधात मग फारसं कुणी भटकायचं नाही. वर्ष मस्त सोनेरी दिवसात आणि चंदेरी रात्रीत गेले.
आता सुमीला घरात कंटाळा येत होता मग तिनेही जॉब शोधायला सुरुवात केली. तीही शिकलेली, गणितात गोल्ड मेडल. जिथे पहिला इंटरव्हिए दिला तिथेच सिलेक्ट झाली. सुरजपेक्षा जरा जास्त पगार होता तिचा. सुरजलाही खूप आनंद झाला होता. कॉलेजमध्ये प्राध्यपिका म्हणून जॉइन केलं होतं तिने, कदाचित सुरज ह्याच भ्रमात होता कि मास्तरीन आहे अजून काय, मुलांना शिकवणं आणि घर, एवढंच काय ते तीच जग. पण तसं झालंच नाही सहा महिन्यात तिने phd साठी स्वतःला रजिस्टर केलं. तिचा व्याप वाढत गेला. कॉलेजनंतरहि ती तिच्या गाईड सोबत असायची, नवं दहा वाजेपर्यंत सोबत चर्चा होत असायच्या आणि तिचे सर तिला घरी सोडायला यायचे. सुरुवातीला सूरजला तिचा अभिमान वाटत गेला. वर्ष भरात तिला कॉलेज मध्ये डिपार्टमेंट हेड केलं होतं.
सुमी सुरजचं सर्वच मनातून करायची, त्याचाही पगार वाढला होता, आता सुमी कमावते आहे म्हटल्यावर त्यानेही स्वतःला भक्कम करण्यासाठी मॅनेजमेंट आणि इतर कोर्सेस केले. चॅलेंज घ्यावं म्हणून मोठं मोठया पदासाठी इंटरव्हिए देऊ लागला. उत्तम तयारी होत नाही म्हणून त्याने नौकरी सोडली. सुमीनेही त्याला साथ दिलीच. सुरज घरी सहा महिने होता आणि त्याला प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून नौकरी लागली. आता दोघेही भक्कम कमवणारे होते.
त्या दिवशी हळूच सुमी सूरजच्या कानाशी, “सुरज आपण आता चान्स घायचा ना रे, झालेत कि तीन वर्ष, ती आणि मी बऱ्यापैकी सेटल आहोत, बाळ हवंय रे आता, आणि अजून किती दिवस आपण आपल्या लोकांशी दूर राहणार, नातवाच्या ओढीने येतील ना ते.”
“काय म्हणतेस तू, माझी आताच पोस्टिंग झाली आहे, तुझं PHD अजून बाकी आहे, ते पूर्ण कर आधी...“
“होईल रे सर्व...जरा आयुष्यात PHD करूया ना... आता आई व्हावास वाटतं रे...माझ्या गाईड सरांचा नातू एवढा गोड आहे ना ....तुला सांगू!”
“आणि त्याला सांभाळणार कोण? तू आणि मी तर सतत बिझी असतो.”
“बोलावू ना आपण तुझ्या आईला नाहीतर माझ्या आईला... येतील रे ते नातवाच्या प्रेमापोटी... मुद्दलीपेक्षा व्याज जास्त प्याराचं असतं रे.”
“मला नाही वाटत, मागे मी तुला न सांगता माझ्या आईला फोन केलेला, म्हणाली होती ह्यानंतर इथे फोनही करू नको म्हणून, त्यांनी तर सर्व शेती आणि घर माझ्या लहान भावाच्या आणि बहिणीच्या नावी केलंय... तुझा खूप राग आहे त्यांना. मी गया वया केली तर म्हणाली कि सोडतोस काय तिला... सोड आणि ये आईजवळ... बाबा तर जोरात बोलले होते, श्राद्ध केलंय आता ह्या जन्मात तरी मी त्यांचा मुलगा म्हणून जिवंत नाही त्यांच्यासाठी...आता तू बोल!”
सुमी परत सुरजच्या कुशीत शिरली, “मी माझ्या घरी जरा जाऊन येऊ का?”
“कधी त्यांनी तुझी चौकशी केली आजपर्यंत? नाही ग सुमी.... प्रेम करणाऱ्यांना नसतं ग कुणी...एकटेच असतात ते, जमाना लाखोंचा सलाम ठोकतो त्यांच्या प्रेमाला पण आपले साधं चौकशी करत नाहीत.” जरा हळवा झाला होता तो.
“आपण एवढे वाईट आहोत कारे....” सुमीने अश्रू पुसत म्हटल.
“नाही ग, जरा त्यांच्या मनाप्रमाणे वागलो नाही ना म्हणून... आणि हे एवढं छोटंसं कळायला त्यांना हा संपूर्ण जन्म जाईल, ते तिथेच राहतील आणि आपण खुप दूर निघून येऊ...असो, हे बघ मला अजूनतरी बाळ नकोय.”
“काय म्हणतोस रे! उगाच वय निघूनि जायचं आणि मग... आपण बाई ठेवू ना, दोघेही कमावतो...”
“बघ, तुझं तू ठरव ... आणि प्रिकॉशन बंद कर... निर्णय तुझा.... मला अजूनही वाटतं कि आपल्याला दोघानां सांभाळायला कुणीच नाही, तू आणि मी सक्षम असलो तरी एक पोकळी मनात आहे... आणि बाळाला संभाळण? अजून तरी मी तयार नाही.”
सुरज सर्व बोलून काही वेळात सुमीला कुशीत घेऊन घोरायला लागला, सुमीने त्याच्या कुशीतून अलगत स्वतःला सोडवलं, उठून बसली, विचारात पडली होती, आज लग्नानंतर तिला तिची चूक काय होती हे समजत होतं, पण एक मन आता माघार नको ह्या विचाराने तठस्थ होतं, “नाही, मला आता बाळ हवंय, बाई ठेवेल, जरा PHD थांबवेल..आणि सुरज आहेच ना, त्याचे आई बाबा माझ्यामुळे दुरावले असले तरी त्याने मला नाही दूर केलं म्हणजे तो आहेच माझ्यासोबत.” शेजारी झोपलेल्या सूरजच्या माथ्यावर तिने ओठं अलगत टिपली, हालचालीने परत सुरजने तिला स्वतःवर ओढलं. रात्र मंद पावलांनी पहाटेकडे निघाली होती.
सहा महिन्याने सुमीला दिवस गेलेत, सुरजही खूप खुश होता, सुमी सगळं मॅनेज करायची, तिने व्याप नको म्हणून phdच काम थांबवण्याचा निर्णय घेतला होता पण तिच्या सरांनी तिला सल्ला दिला कि तिने ते तसेच सुरु ठेवावे, ह्या काळात तिने तिचा थिसेस तयार करावा म्हणून त्यांचा सल्ला तिला पटला. कॉलेज, घर आणि बाळाचं आगमन सगळं सुखात होतं, पहिल्या दोन महिन्यात सुमीला सगळं मॅनेज करण्यात सुरजने काहीशी मदत केली. नंतर त्याला अचानक त्याच्या प्रोजेक्ट मध्ये जास्त वेळ द्यावा लागत होता, सुमीलाही त्रास वाढत होता. आता घरात सूरजची किरकिर वाढायला लागली होती, “तुला म्हटलं होतं मी आता बाळ नकोय म्हणून, तुला माहित आहे ह्या प्रोजेक्ट साठी किती लोकं प्रयत्न करत होती, मला... मला मिळालाय तो, मग मी जराही लक्ष दिलं नाही ना तर माझ्या ऑफिस मध्ये सर्वांना बोलायला एक कारण मिळेल. तू नौकरी सोड ग... जाऊदे, मास्तरीणच तर आहेस...”
“सूरज! मी प्रोफेसर आहे आणि सोबत डिपार्टमेंट हेड, मास्तरीण काय म्हणतोस... “
“तेच ते.. आता बाळ तुला हवं होतं ना ..माझ्याकडे वेळ नाही.”
“पण बाळ दोघचं आहे, तुला माझ्यासोबत निदान हॉस्पिटल मध्ये यावं लागेल...”
“माझी मिटिंग आहे तू घेऊन जा त्या तुझ्या सरांना... नको त्या ठिकाणी सल्ला देतात ना!”
“सूरज, वडिलांसारखे आहेत ते माझ्या... होहो जा नाही गरज तुझी.. नेणार मी त्यांनाच ... तू जा रे मोठा आला प्रोजेक्ट मॅनेजर... घर आणि नौकरी मॅनेज करून दाखव मग म्हणेल तुला.”
सूरजने हॉस्पिटलची फाईल बॅग मधून काढून तिच्या समोर आदळली आणि निघून गेला.
सुमी आज एकटीच हॉस्पिटलमध्ये चेकअपला गेलेली, डॉक्टर तिला कहीदा म्हणाले, “तुमचे मिस्टर नाही आले का, मला त्यांच्याशी काही बोलायचं होतं”
पण सुमीने काही बायी कारण सांगून टाळा टाळ केली, शेवटी डॉक्टर तिला म्हणाली, “बाळ नाजूक आहे, काळजी घ्या, हा महिना जरा जपा स्वतःला, तुमच्या मिस्टरांना सांगा मला कॉल करायला.”
सुमीने डॉक्टकरांना होकार दिला आणि निघाली, मनात बोलता बोलता थेट बाळपर्यँत पोहचली, “बाळा स्वतःला जपायला शिकावं, आयुष्याच्या वाटेवर आपण नेहमी एकटेच असतो... आपल्यालाच हव्या असतात सर्व गोष्टी मग आपल्यालाच करावं लागतं ... तू स्वतःला सांभाळ हा.”
मनाच्या हळव्या कोपऱ्याने माहेरची आठवण केली, करावा का आईला फोन म्हणून मनातच रिंग वाजली, तिने फोन उचलला, आजही आई ह्या नावाने सेव्ह केलेला नंबर तसाच होता, रिंग गेली, कुणी उचलला नाही, परत लावला परत तेच.... कुणी उचलत नव्हतं... सुमी थकली, म्हणाली, “माझी रिंग ऐकायला जात नसावी.. दूर झालीय ना मी .....” प्रयत्न सोडले आणि कामाला लागली. सूरजला फोन करून सांगावं असं बऱ्याचदा झालं पण तिलाही त्याचा राग आला होता.
इकडे सुरजची मन लागत नव्हतं, कहीदा त्याने फोन हातात घेतलेला पण नंबर क्लीक केलाच नाही.
दोघेही अहंकाराने माजले होते, मी स्वतःच करू शकतो ह्या नादाने ग्रासले होते. मी हा भाव शिरला होता. खर तर नकळत दोघात हा तिसरा शिरला होता.
सूरजने घरी आल्यावर जराही सुमीला काही विचारलं नाही आणि सुमीने स्वतःहून त्याला सांगितलं नाही. पंधरा दिवस असेच गेलेत आणि अचानक सुमीला ब्लीडींग सुरु झालं, सूरजला कॉल करूनही त्याने तो उचलला नव्हता आणि तिने तिच्या सरांना फोन केला, सर अगदीच धावून आले आणि त्यांनी तिला ऍडमिट केलं. बाळ वाचलं नाही आणि सुमी अर्धमेली झाली होती. सूरजला कळताच तो धावत हॉस्पिटलला आला तेव्हा डॉक्टर त्याला खूप रागावले. स्वतःत तुटलेला, सुमीवर खूप राग येत होता त्याला.
सुमीला पूर्वरत करण्यात तिच्या वडिलांसारख्या सरांनी खूप मदत केली पण सूरज मात्र तुटत गेला, सुमीला मनोमन वाटायचं कि सूरज येऊन मला माफी मागेल पण तसं कधी झालंच नाही. आणि सूरजला वाटायचं कि नको म्हटलं होत तरीही हिने जिद्द केली आणि स्वतःला सांभाळू शकली नाही उलट तीच काही चुकलं हेही ती मान्य करत नाही, मला सांगायला हवं होत ना.. तिच्याने होत नव्हतं तर मी काही तरी केलं असतं तर आज बाळ असतं ....
दरी वाढत गेली, घरात दोघेच असतांना बोचणारी शांतता असायची, एकमेकांसमोर असून शब्द फुटत नव्हते, मनात अळ्या बसत होत्या आणि आता सुमीला जगणं असह्य झालं होतं. त्यातल्या त्यात सुरजच्या आईची तब्येत फारच गंभीर आहे हि वार्ता आली आणि सूरज मनातून हादरला, आता आईकडे ओढला गेला.
त्या दिवशी तिला तो रागात म्हणाला, “निघून का ग जात नाही तू माझ्या आयुष्यातून... नुसता वीट आलाय, माझ्या बाळाला गीळलस आता माझ्या आईला तर काही वर्ष जगू दे."
“असं का? आतापर्यंत मी तुला साथ दिली आणि आता सर्व आल्यावर तुझ्या घरच्यांना तुझी आठवण झाली, तुझ्या आई बाबानी तर श्राद्ध केलं होतं ना तुझं, जरा म्हातारे झाले तर आठवण आली का पैसेवाल्या मुलाची? कुठे गेले त्यांचे मुलं जे जमीन आणि घर गिळून बसले आहे?”
“जास्त बोलू नकोस, माझ्या लोकांनी मला आठवण तरी केलं तुझं काय? तुला खरंच त्या लोकांनी जन्म दिला होता कि कचऱ्यातून उचलून आणलं होतं...”
कुणीही माघार घेत नव्हतं, अहंकाराने दोघेही चिंब होते, आणि त्याच ओलाव्यात सुरजने सुमीला डिवॉर्सची नोटीस पाठवली होती.
आज त्यांच्या केसची फॅमिली कोर्टात सुनावणी होती... सुमी एकटी होती आणि सूरज सर्वांमध्ये...
आज तिला त्या कोर्टाच्या पायऱ्या जड झाल्या होत्या गडबडली होती तर सरांनी हात धरला... म्हणाले, “पोरी अहंकाराने डोळे असून आंधळे झालात तुम्ही...एकदा माफी माग ग त्याची, तुझीपण चुकी आहे ना... हेड ऑफ डिपार्टमेंट असलं तरी डोकयावर घेऊन फिरायचं नसतं ग...”
“सर, पण त्याचा आता काहीही फरक पडणार नाही.. सूरजला हा डिवॉर्स हवाय.”
“आणि तुला... जिथे हा अंहकार शिरतो तिथे हार पदरी पडते...घे माघार, ऐक माझं...त्या चार भिंतीत तुझं काही कमी होणार नाही ग.”
“आता अजून काय सहन करू सर, एक त्याचा सहारा होता तोही आता त्याच्या घरच्यांचा झाला... मी खरंच माझ्या आईवडिलांना कचऱ्यात भेटली असणार...”
अहंकारात दोघांनीही डिवॉर्स मान्य केला...
सुमी धावत कोर्टाच्या बाहेर आली आणि निघाली होती... आता तिला सर्व गोष्टी आठवत होत्या, स्वतःच्या चुका दिसत होत्या... पण तरीही मन मागे वळून बघत होतं कि कदाचित सूरज आवाज देईल... पण तसं झालच नाही...
सुरजही धावतच तिच्या मागे आला पण थबकला, लपून तिला दूरवर बघत राहिला... पण समोर जाऊन बोलूच शकला नाही....
दोघांनाही वाटायचं कि समोरच्याने बोलावं पण वेळ निघून गेली आणि... अहंकार जिंकला.. एक नातं हरलं होतं.
पुढे सुमीने तिचं phd पूर्ण केलं पण कधीच नात्यात समोर जाऊ शकली नाही... सुरजचंही तसंच होतं, त्याची चूक त्याला मनात बोचत होती पण त्याने कामात आणि आई बाबांच्या सेवेत स्वतःला समर्पीत केलं होतं...
समाप्त.
कथा कशी वाटली नक्की सांगा, अहंकाराने नात्यात शिरकाव केला कि नातं एकत्र येत नाही... कदाचित कथेतले नायक नायिका जवळ यायला हवे होते असं आपल्याला वाटणार पण आरसा हाच आहे अहंकाराचा..... कथेचे नायक नैयिका मी एकत्र करू शकतेच पण खऱ्या आयुष्यात होतं नाही ना असं .... कारण ... जिथे अहंकार असतो तिथे नातं हरतं...
अश्याच कथा वाचण्यासाठी मनातल्या तळ्यात पेजला नक्की लाईक करा मनातल्या तळ्यात पेज
मनातल्या तळ्यात लवकरच घेवून येत आहे जोडीदार ... तू माझा .. एका वेव सिरीज च्या माध्यमातून ...जोडीदार लवकरच channel वर
©उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद!!!
सदर लेखाच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.
0 Comments