आठ वाजले होते तरी अमृता आज उठली नव्हती, इकडे हॉल मध्ये सर्वांची तारांबळ उडाली होती, सासूबाई सारख्या मुलाला फोन करत होत्या पण तो काही उचलत नव्हता. त्याची सुट्टीच होती आज मग झोपला होता मस्त. पण अमृताला ऑफिस होतं तरीही ती उठली नव्हती, सासू ममताने मग मुलीच्या खोलीत डोकावलं तीही अजून झोपली होती. ममता तिच्या जवळ गेली, तिला उठवायला लागली, तर मनु तिला झोपतच म्हणाली, "आई मी काल रात्रीपर्यंत बोलत होते ग सुधीरशी, तुला तर माहित आहे त्याचा आणि आपला वेळ काही जुळत नाही."
"हो ग बाई झोप, माझी लाडाची राणी... " ममताने तिला कुरवाळत परत अंगावर चादर ओढून दिली आणि काहीही न बोलत खोलीतून निघाली, मनुच लग्न जुळलं होतं आणि जावई अमेरिकेत होता.
ममताने आता स्वयंपाक घरात पाय ठेवला, तोच अमृताने तिच्या खोलीच दार उघडलं आणि तीही स्वयंपाक घरात शिरली, तिला बघताच ममताने मान मुरळली, अमृता म्हणाली, "आई काल ऑफिसच खूप काम होतं, झोपायला दोन वाजले मला, सॉरी जरा उशीर झाला, तुम्ही व्हा बाजूला मी करते आता पटकन सर्व."
"हो, पण, तुला कळत नाही का? बाबांना नाश्त्या नंतर औषधं घ्यायची असते, सून आहेस ह्या घरची, हे घर तुझी जवाबदारी आहेचं ना?"
"अहो आई, काम खूप झालं हो, मग डोळे उघडलेच नाही आणि आज हे सुट्टीवर मग अलाराम लावलेला नव्हताच...."
ममताने फ्रीज मधून औषधी काढल्या आणि पाणी घेवून स्वयपाक घरातून निघून गेली. अमृताला ऑफिसलाही जायचं होतं तरीही तिने नाश्ता तयार करून प्रत्येकाच्या जवळ पोहचवला. तिला स्वतः नाश्ता करायला वेळही नव्हता मग ती तशीच धावत निघाली, जातांना परत सासूने टोकलं, "ओढणी नीट घ्या, आता सून आहात आपण, जरा भान असू द्या आणि लवकर या आज."
नंतर त्या जवळ आल्या आणि अमृताला म्हणाल्या, "तुला कळत नाही का ग? सून आहेस तू ह्या घरची, समोर सासरे बसले आहेत आणि तू हि अशी ओढणी घेऊन समोरून येत आहे. काही मानपान असतो की नाही, तुझ्या आईने काही सांगितलं नाही का? "
अमृताने गळ्याला चीपकलेली ओढणी जरा नीट केली आणि हसतच निघून गेली. तिलाही प्रश्न पडला होता कि बाबांच्या वयाचे सासरे मग कसलं काय. तिच्यासाठी वडिलांसारखेच, वडिलांसारख कौतुक करतील तर किती छान होईल ना नातं...पण विचार मनातच सोडले तिने आणि तो विषय सोडून दिला.
पण जेव्हाही तिला वेळ मिळत होता ती सासऱ्यांच करायची, कधी त्यांच्यासाठी पुस्तक आणून देत होती तर काही मी केसांना मसाज करून देवू का म्हणून उगाच विचारायची, बाबा अकाली वारले होते तिचे मग ती बाबांना त्यांच्यात बघायची पण सासूला ते अजिबात आवडायचं नाही. ती मात्र तिला नेह्मी बोलायची, "तू सून आहे ह्या घरची, मान ठेवत जा आमचा, अशी बेधडक वागू नको .."
आणि काय काय ते ... अमृताने तिच्या नवऱ्याशी म्हणजे अमितशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तोही म्हणायचा, "जाऊदे, सून तर सून...आणि आहेच ना तू सून मग कशाला मुलगी होण्याचा प्रयत्न करतेस."
दिवसं जातं होती आणि अमृता सगळं मॅनेज करत संसार आनंदाने करत होती. नणंदेच लग्न झालं आता घरात सासू सासरे आणि हे दोघच होती. पण अमृतासाठी सुनेच्या मर्यादा संपल्या नव्हत्या त्या वाढतच होत्या. सासूने तर सून आणि मुलीतली दरी स्वतःच वाढवली होती. त्या घराने अमृताला ती सून आहेस ह्या घरची हे तिच्या अंतरंगात बिंबवलं होतं. दोन वर्षाने तिला मुलगी झाली. मुलगी वाढत होती तसं तशी अमृताची जवाबदारी वाढत होती.
दहा वर्ष लग्नाला झाली होती आणि सासू सासरे म्हातारे झाले होते, आता त्यांना प्रत्येक कामात अमृता लागत होती. त्यातच अचानक सासऱ्यांना अर्धांग वायूने ग्रासलं आणि त्याचं अर्ध शरीर काम करत नव्हत. डॉक्टरांनी सासऱ्याना बेडरेस्ट सांगितली होती. अमितने अमृताला समजावलं, "सुन पण मुलगीच असते, आणि तुला बाबांची सेवा करायची होती ना, कर आता..."
तिनेही ते मनावर घेवून सासऱ्यांची जमेल तशी सेवा केली. पण काही दिवसांनी सासूबाई रस्त्यावर चालतांना पडल्या आणि पाय फॅक्चर झाला त्यांचा. आता त्याही जागून उठू शकत नव्हत्या. घरचं सर्व काम अमुतावर होतं, मुलीची परीक्षा जवळ होती. सासूबाई अमृताला म्हणाल्या, "अमृता, आता मनु दूर आहे आमची, मग तूच आमची मुलगी बाळा, बाबांना सु-शी साठी घेवून जात जा ग, त्यांना राहवत नाही अमित येईपर्यंत. आणि मी ही अशी... "
"अहो पण आई, मी? मी तर सून आहे ना?"
"हो बाळा, सूनही मुलगीच असते घरची."
समोर अमितही होता त्यानेही भर दिला, "हो अमृता, आई बरोबर बोलते आहे... आता तुझ्याशिवाय कोण आहे आई बाबांना, माझी नौकरी हि अशी, घरून निघतो सकाळी आणि परत येण्याची वेळ ठरलेली नाही... तू ss..घरी येतेस वेळेवर नाहीका?"
अमृता हसली, "अमित, मला कधीच हरकत नव्हती रे ह्या घरची मुलगी म्हणून राहायला पण ... मी ज्या दिवशी घरात पहिल्या दिवशी पाय ठेवला होता तेव्हा आई म्हणाल्या होत्या, सून आहेस तू ह्या घरची, मुलगी नाहीस, मी काहीदा बाबांमध्ये माझे बाबा शोधत होते आणि आईत माझी आई पण मला ते गवसलेच नाहीत. आईने मनुत आणि माझ्यात किती भेदभाव केला हे मी त्यांना सांगण्याची गरज नाही आणि ती ही वेळही नाही, आई मला म्हणायच्या सासरे आहेत ते तुझे, मान सन्मान असतो कि नाही...!
मला किती धावपड करावी लागत होती, नौकरी सांभाळून सगळं करावं लागत होतं पण आईने कधीच मुलगी म्हणून समजून घेतलं नाही. जरा उठायला उशीर झाला कि त्या मी कशी कामचोर आहे ह्याची जाणीव करवून मी सून आहे ह्या घरची म्हणून जवाबदारी सांगायच्या.... मला कुणीच समजून घेतलं नाही. मी तर स्वतःला ह्या घरची मुलगी समजायचे पण मला तो माझा समज आहे म्हणून गिळून टाकावा लागला.... माझी गरज होती तेव्हा मी ह्या घरची सून होती आणि आज गरज तुमची आहे तर मी मुलगी झाले..आता कुठे गेल्यात मर्यादा? गरज बदलली कि नातं बदलतं का रे?
त्रास होतोय मला हे तुम्हाला आता ह्या परिस्थिती म्हणायला पण माझा नायलाज आहे. मी मानून घेतलं आता कि मी सून आहे ह्या घरची... कारण मी सून आहे ना!
डोळ्यात अश्रू दाटून ती हॉल मधून निघत होती... पण तिचे पावलं थांबलीत, परत पलटली,
"आई माझ्या आईबाबांनी मला नेहमी संस्कार शिकवलेत... पण त्यांची कदर तुम्ही कधीच केली नाही. ते गेलेत पण त्यांचे संस्कार माझ्यात अजून जिवंत आहेत, घाबरू नका मी जमेल तसं बाबांच करेल पण मुलगी म्हणून कधीच नाही... कारण ती वागणूक तुम्ही मला दिलीच नाही... मी करेल पण सून म्हणून, एक कर्तव्य म्हणून ... कारण मी सून आहे ना! "
अमित हक्काबक्का झाला होता, काहीच बोलला नाही. सासू ममताला आज तिची चूक कळली होती आणि आज ती तो हक्क गमावून बसली होती अमृताला काहीही बोलण्याचा कारण तिनेच तिला ह्या घरची सून केलं होतं.
मित्र मैत्रीणींनो सून ही मुलगीच असते हे समीकरण आपल्या आपल्या गरजेनुसार बदलणारे आजही समाजात आहेत. परिस्थिती हातात नसते आपल्या, पण कुठल्याही परिस्थितीत नातं सोबत असावं म्हणून जरा सुरवातीपासून नात्यात ढील ठेवावी ...
मग कुठलीच सून असं उत्तर देणार नाही. ती सूनही असेल आणि गरज पडली तर मुलगीही, नाहीका!
बघा पटलं तर...
प्रतिक्रिया नक्की नोंदवा आणि पुढच्या कथेसाठी पेजला लाईक करा.
माझ्या कथा वाचण्या साठी तुम्ही मनातल्या तळ्यात पेजला लाईक करा . https://www.facebook.com/manatlyatalyat
तुम्ही ब्लॉग हि subscribe करू शकता.
एक मर्डर असाही ...चा अंतिम भाग इथे वाचा https://www.manatalyatalyat.com/2021/06/blog-post_10.html
फोटो साभार गुगल
©️उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद!!!
सदर लेखाच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.
2 Comments
Sundar katha n wastusthiti ahe hi aaj chya kalatli.
ReplyDeleteKhup chan same majya babtit ghadtay
ReplyDelete