जोडीदार तू माझा भाग २२

 भाग २२



वळण आयुष्याला खूप महत्वाच असतं,

आयुष्य वळणा वळणाने वळत जातं,

आयुष्याच्या त्या वळणांवर आपला जोडीदाराची सोबत म्हणजे.

प्रत्येक वळण हवसं....

नाहीका!


घरचे सर्व बाहेर जेवणासाठी निघाले होते. इकडे बाळूने बाईक घेतली होती, कर्जाच्या रकमेसाठी सानू ग्यारंटर राहिली होती, कर्जाचे कागद पत्र आठवड्या भरात तयार होणार होते आणि बाईकची डीलीव्हरी आता होणार होती. बाळूच्या चेहऱ्यावर अतोनात आनंद होता आणि सानू त्याच्या त्या बाईकच्या गोष्टीत सर्व विसरली होती. त्याने बाईक समोर बघताच सानूला मिठी मारली. आणि चाबी तिच्या हातात द्यायला सांगितली. सानूने ती गाडीची चाबी परत अंकितच्या हातात दिली,

“बाळू आता गाडी आलीय, गाडीवर ती बसणारी पण येवू दे लवकर...”

बाळू नजर रोखून बघत राहिला, त्याला धक्का देत सानू म्हणाली,

“आणि काय रे... काय लपवतोस? मी तुला खरच बघितलं आहे तिच्या गाडीवर...”

“ताई, सांगणारच होतो मी तुला...”

“जावू दे... पण मला आज बसवशील ना तुझ्या बाईकवर...”

“म्हणजे, तो तर तुझा हक्क आहे...”

“नाही रे, माझा हक्क नाही... माझ्यावरच तुझं प्रेम फक्त.... नात्यात हक्क नकोत. हा हक्क शिरला की प्रेम मरतं राज्या...”

“तू असा हक्क मागत नाहीस ग, तुझ्या कार्याने तो तुला मिळतो... म्हणून तो हक्क, आणि प्रेम म्हणशील तर तुला शब्दात काय सांगू,  बसं आधी, तुझ्या आशीर्वादाचा हात ठेव.”

आणि त्याने किक मारली.

“माझ्या पहिल्या गाडीवर माझी बहिण पहिल्यादा बसली ह्या पेक्षा दुसरं ग काय मला...”

“आयला, पहिली गाडी... म्हणजे अश्या किती घेणार आहेस रे तू?”

“अरे... तू बघ.... मरसडिज घेतो कि नाही... आणि त्यातही तुला बसविण आधी...”

अंकित रमला होता बाईकमध्ये आणि त्याच्या तिच्यात, मनात तर त्यालाही वाटत होतं कधी तिला सांगतो म्हणून... पण आज सानूदीचा दिवस होता त्याच्या सोबत.

गाडी वळत होती सानूच्या आणि अंकितच्या गप्पांसोबत, अंकित बोलत सानूशी होता पण  प्रेमात होता तिच्या, त्याचा मानतच संवाद सुरु होता तिच्याशी. आणि सानूने परत छेडलं,

“ये बाळू मला कुठे बसवशील रे... तुझ्या त्या मरसडिजमध्ये? तुझ्या बायकोला बसवशील रे...”

अंकित अजूनही तिच्यात होता, तर परत सानू म्हणाली,

“तुझ्या त्या स्कुटीवालीला भेटवून दे मला...”

“तायडे, तू ना पक्की जासूस आहेस, सर्व कळते तुला, तू काय स्वतःचे जासूस सोडले आहेस का ग?”

“मग, घरात म्हणूनच तर दरारा आहे माझा... हमसे कुछ छुपता नही... हम तो बसं नजर से भाप लेते है.”

बोलता बोलता दोघेही रेस्टॉरंट समोर येवून पोहचले सुद्धा, घरचे सर्व बाहेरच उभे होते. नवीन गाडी बघून छकुली आनंदाने ओरडली,

“दादा, मला एक चक्कर फिरवून आण ना रे.”

बाळू छकुलीला घेवून एक राउंड मारायला गेलेला आणि सर्व रेस्टॉरंट मध्ये शिरले, छकुली म्हणाली,

“दादा आता तू वहिनी आणणार का रे? मग मला नाही बसायला मिळणार तुझ्या गाडीवर, तिचं बसणार तुझ्या मागे, मग तू ना मला मोठा राउंड घुमवून आण.”

अंकित हसला, “तुला सांगू छकुली वहिनीला आणायला मला खूप काही करावं लागेल ग, आता सुरुवात आहे, पण सांगू नको कुणाला, तुझी वहिनी मी पसंत केली आहे म्हणून, हे तुझ्यात आणि माझ्यातच ठेव.”

“ओके दादा, पण मला चॉकलेट हवी मी बोलेल तेव्हा. प्रॉमिस!”

“हो पिंकी प्रॉमिस!!”

अंकितने गाडी रेस्टॉरंटकडे वळवली.

इकडे रेस्टॉरंटच्या आत टेबल जवळ जाताच राणी अगदीच लाजत लाल झाली आणि सानूकडे बघून गालातल्या गालात हसायलाही लागली, सर्वाना आश्चर्य झालं होतं. राजन सर्वांची वाट बघत बुक केलेल्या टेबलवर बसला होता. सानू त्याला हाय करत म्हणाली, “बाबा मीच बोलवून घेतलं राजनला, आता तोही आपल्या कुटुंबाचा एक सदस्य होणार आहे आणि असा योग कमीच, जेव्हा आपण सर्व एकत्रित येतो. नाही का! मोठ मोठ्या समस्या आजकाल जेवणाच्या टेबलवरच सोडवल्या जातात...”

“काय हो राजन रावं!”

“हो ना ताईसाहेब.”

राणी सानूकडे बघत होती तर सानू परत हळूच म्हणाली,

“माझं बोलणं झालंय राजनशी, इथे नाही बोलणार सर्वांसमोर, तू नॉर्मल राहा. तुझ्या आवडीचे नुडल्स ऑर्डर केलेत, खा गरम गरम. उद्या पासून अभ्यासाला लागायचं आहे.”

राणी स्मित गालातल्या गालात हसत होती, राजन तिच्याकडे चोरून बघत बाबांशी बोलत होता, बाळू बाईकच्या गप्पा अंजली आत्याशी बोलण्यात मग्न होता. आई छकुलीला भरवत होती. सानू सर्वाना बघून खुश होती. तिची नजर सहज समोरच्या कॉम्पुटरवर पडली, मेसेज येत होते त्यावर, तिलाही आठवलं, मनात चुकचुकली, काय सानू, लिहायला हवं होतं ना, निदान धन्यवाद द्यायचा होता. नाही आहे तुझ्या कॅव्हरेज क्षेत्रात तो म्हणून काय फॉरमॅलिटी सोडून द्यायची.” विचारत तिने हात निंबूच्या वाटीत न धुता ताटात धुतला. बाबाच लक्ष गेलं,

“सानू, तू काय विचार करत आहेस.”

“काही नाही हो बाबा, जरा कामाचा विचार शिरला होता. घ्या तुम्ही, निघायला वेळ होईल मग.”

बाबाने आईला हळूच गप्प राहणायचा इशारा केला. सर्व आपल्या दुनियेत मग्न होते. आणि सानू दुरून सुमंतचा विचार करत होती.

दिवस भराभर जातं होते, सर्व बिझी झाले होते, सानू स्वतःला गुंतवत आनंदी होती. तसा सुमंत तिच्या मनातून निघत नव्हता पण ती स्वतःहून तो कप्पा बंद करायची, त्याच्याशी कामानिमित्य बोलणं झालं तरी आता ती मोजकं बोलायची. दोघांमध्ये असलेली दरी तिला कळाली होती. मेंदूने माघार घेतली होती तरीही मन ते घ्यायला तयार नव्हतं. मेंदू मनाला समजवायचा,

“समोरून काहीच नाही मग तू का मोहरतोस, आणि मन उत्तर द्याच माझा काही ठिकाणा नाही मी कुठेही शिरू शकतो. मोहरणं माझा गुणधर्म आणि थांबवण तुझा... बघू कोण जिंकतं.”

 

सानूच्या मनाची आणि मेंदूची सुरू होती गुंता गुंत पण ती गुंतत नव्हती.

राणीची परीक्षा संपली होती. त्या संध्याकाळी राजन आणि पाहुणे घरी येणारं होते. लग्नाची पुढची बोलणी करायला, घरात गोंधळ होता. पाहुणे पोहचले तरी सानू अजून पोहचली नव्हती आणि आज परत पाहुणे आणि घरचे सर्व तिची वाट बघत होते.

बाबांना लग्नाची चर्चा सानूशिवाय करायची नव्हती, ते तिची वाट बघत होते. इकडे राणीला नीट तयार होता येत नव्हतं तीही सानूदीला आठवत होती. बाळू आज चौकात बाईक घेवून सानूची वाट बघत होता.

सानू ऑफिस मधून निघणारच होती तर समोरून तिला सुमंतचा कॉल आलेला, सानूच्या मनात कोलाहल वाढला, थांबलेल्या मनाने परत वेग घेतला, मोबाईल हातात होता आणि सानूचा मेंदू व मन परत भांडत होते. आधी घरी निघायचं ह्या नादात तिने फोन तसाच बॅगमध्ये टाकला. तरीही तो वाजत होता. हळुवार शांत सुटलेला वारा मनाच्या कप्यात शिरून मनाला शांत करत होता. आता मेंदूत राणीचा विचार सुरु होता. सुमंतचा फोन उचलायला तिचं मन आणि मेंदू दोन्ही तयार नव्हते. फोन वाजत राहिला. तिने ऑटो थांबवला आणि घरासाठी निघाली, चौकात उभ्या असणाऱ्या बाळूला ती दिसली आणि तो तिला घरी घेऊन आला. आज ती घरात येताच राजन स्वतः उभा झाला त्याच्या मागे त्याचे वडीलही उभे झाले होते.

“राजन, काका, तुम्ही बसा ना, मला जरा दहा मिनटे द्या.” ती तिच्या खोलीत शिरली.

खोलीत राणी पडका चेहरा करून सानूची वाट बघत होती,

“तायडे, किती वेळ लावलास ग! बाबा काहीच निर्णय घेत नाहीत, राजनकडले आजच टीका लावतो म्हणाले. आणि आई नाही म्हणत आहे. ती म्हणते कि टीका लावल्यानंतर मुलगी जास्त दिवस घरी ठेवत नाहीत, मग राजनचे बाबा साखरपुडा म्हणत आहेत.”

सानूने स्वतःच आवरलं, फ्रेश झाली, तर राणी परत म्हणाली,

“तायडे, तू बोल ना!”

“हो, हो गप्प हो आधी, राजन काय म्हणतोय? तुझं काही बोलणं झालं असेलच ना ह्यावर.”

“तो म्हणतोय मला काय हवं?”

“आणि तुला काय हवं?”

“ताई, तुचं सांग ना आईला...”

“काय सांगू?”

“ये, ताई असं काय ग करतेस? तुझं ऐकतात सर्व.”

“माझं ऐकतात?”

सानू जरा वेळ गप्प होती, तिने राणीची साडी नीट करून दिली. तिची पसरलेली लिपस्टिक बरोबर केली, केसं आवरून दिलेत. विचारत होती काय बोलावं म्हणून, आईचही बरोबर होतं. आणि पाहुण्या मंडळीचही, सानूला कुणाची मनही दुखवायची नव्हती पण मार्गही सुचत नव्हता, आता सानू काय करेल? कसं वळवेल सर्वांना बघूया पुढ्या भागात...


कथा क्रमशः 

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल... 

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

फोटो साभार गुगल

Post a Comment

0 Comments