जोडीदार तू माझा.. भाग ४३

 


 

जोडीदार तू माझा.. भाग ४३

अनुच्या मनातला `पण`, तिलाच कोरत होता, मनात म्हणाली,

“काय विचार करते मी, आई त्यांच्या जागी योग्य आहेत. आपण कसं शिरलोय घरात, चोरून मग चोरून राहूया जरा, काय बिघडेल काही दिवस.... मन जिंकण्यासाठी जरा हरुया काही वेळ...”

ती परत खोलीत शोधत होती, पण काय तिला काहीच उमगत नव्हतं, तोच राणी खोलीत आवाज शिरली,

“अनु वहिनी, दिसलं का मेहंदीच पुस्तक?”

“अह, हो शोधते.” अनु काहीतरी शोधण्याचा बहाणा करत म्हणाली.

“काय शोधता, हे काय इथेच तर ठेवलं म्हणून सांगितलं मी, तुम्ही पण ना.”

राणी ते समोरच्या कपाटातून उचलत म्हणाली.

अनुने सारं काही खोलीत सोडून दिलं आणि राणीसोबत बाहेर आली. राणी आणि अनु समोर हॉलमध्ये येवून बसल्या, डिझाईन बघत होत्या तोच भीमा काका आणि त्यांची बायको आले, भीमा काका दारातूनच ओरडत आले,

“राणी.. ये राणी. घे रे बाळा तुझी आवडती पाणी पुरी घेवून आलोय.”

राणी धावत गेली आणि तिने पिशवी घेतली. भीमा काका परत ओरडले,

“अरुण कुठे आहेस रे बाबा? हे बघ आलो आम्ही लग्नाला आजपासूनच.”

आरती बाहेर आली, अहो या या, अरे म्हणजे यायलाच हवं, आता बघा घरात कसं मस्त वाटत आहे, ये ग गायत्री, तुम्ही सामान वरच्या खोलीत ठेवा, मी सगळ्या वरच्या खोल्या नीट केल्या आहेत. ”

भीमा काकाने परत आवाज दिला,

“अरुण कुठे आहेस रे?”

आरती म्हणाली, “सांभाळा तुमच्या मित्राला, काय बळबळ सुरु आहे माहित नाही, धड उत्तर देत नाही मला...”

“अरे वहिनीसाहेब समजून घ्या, त्याच्या मुलीचं लग्न आहे... होतो माणूस जरा भावूक.”

“भावूक? पिऊन बोलल्या सारखे बोलत आहेत ते.”

“अरे माझ्या शिवाय कसा काय ह्याने ताल जमवला, मित्रा विसरलास का रे मित्राला, आलो रे मी आता बसू दोघ दुखं वाटत...” भीमा काका ओरडून म्हणाले.

सुनीता, भीमा काकाची बायको जरा तोंड मुरडत म्हणाली,

“हुमम आम्ही वनवास करतो ना तुम्हाला?”

“जावूदे सुनी, चोरांच्या उलट्या बोंबा, तू फ्रेश हो, लाडू बांधायचे आहेत आपल्याला. घरी पाहुण्यांना नाश्त्यासाठी.” आरती म्हणाली.

अरुण आतल्या खोलीतून बाहेर आला, आणि त्याने भीमा काकाला आलिंगन दिलं,

“अरे मित्रा बऱ झालं तू लवकर आलास, नाहीतर तुझी वहिनी माझा छळ करते रे... कामासाठी, सारखं ओरडत असते माझ्यावर, आता मी काय काय बघायचं रे, हिला की माझ्या त्या ओ माय...”

अरुणचं बोलणं मध्येच काटत भीमा काका म्हणाले,

“अरे येत आहे का आराध्या मॅडम, ओ माय गॉड वाली... मजा मग.”

हो येत आहे आमच्या मॉडर्न सालीसाहेब, एक हे अगदीच परंपरा आणि सगळं बघणारी आणि एक ती अरु, एकाच आईच्या मुली आहेत कि काय मला तर शंका आहे.”

आरती स्वयंपाक खोलीत जात ओरडली,

“असं, ती लहान आहे, माझ्यात आणि तिच्या बारा वर्षाचा फरक आहे. उगाच काही बोलू नका.”

अरुण हळूच भीमाच्या कानात म्हणाला, “बघ रे बारा बारा वर्ष, सासरे भारी मजेदार होते तर....”

दोघेही हसायला लागले. भीमा जोरात म्हणाला,

“चल, काही काम आहे का सांग मला. करू मिळून.”

भीमा काकाने अरुणाच्या गळ्यात हात घातला आणि दोघेही अंगणात तोरणं लावण्यावर बोलत वरच्या माळ्याच्या पायऱ्या चढत होते. राणी आणि अनु डायनिंग वर बसून पाणी पुरी खात मेह्दीची डिझाईन निवडत होत्या. आई सुनीसाठी कॉफी ठेवत होती आणि सुनी लाडवाचं सारन झाऱ्याने परतत खाली बसली होती.

घर हळूहळू सज्ज होत होतं लग्नासाठी.

सावंत वाडा:

माहिते निवासात जसे लग्नाचे वारे वहात होते तसेच सावंत वाड्यातही लग्नाचे हलके वारे वाहायला सुरुवात झाली होती. राजनला रागिणीने तिच्या आणि रोहित बदल सांगितलं होतं. रोहित ISI ऑफिसरची परीक्षा पास होता आणि त्याची पोस्टिंग लवकरच होणार होती, रागिणी आणि रोहित ISIची तयारी करतांना एकत्र आले होते, आणि मैत्री प्रेमात हळूच शिरली होती. राजनने ठरवलं होतं की रोहितची पोस्टिंग झाल्यावर घरी रीतसर सांगून रागिणीच लग्न मोठ्या थाटात करायचं आणि त्याला राणीने सहमती दिली होती.

सावंत वाड्यात रोषणाई होती, मनामनात लग्न शिरलं होतं, राजनकडलंही हे पाहिलं लग्न होतं. राजनची आई राणीच्या घरी येण्याची आतुरतेने वाट बघत होती. तिने आज पारंपारिक दागिने काढले होते, तिने सुनेसाठी आणि मुलीसाठी दोन वाटण्या करत दागिने वेगळेवेगळे केले,

“ह्हुम्म, ही पारंपारिक पुतळ्याची माळ राणीला आणि हा कमरबंद माझ्या रागीनिसाठी, कधी करते ही मुलगी लग्न काय माहित, राणी आली आणि तिने हा कंबरबंद घालण्याची इच्छा दाखवली तर... नको बाई आधीच ठेवू दे मला वेगळं, माझ्या मुलीसाठी.”

विचारत राजनच्या आईने दागिने राणीसाठी वेगळे केले. राजनचे बाबा तिथेच खोलीत पेपर वाचत होते,

“अग आजकालच्या मुली काय हे पारंपारिक दागिने वापरतील, आणि आपण काही नवीन पण केलेत ना सुनबाईसाठी तसे रोहीनिसाठीपण करू ना.”

“अहो हो, पण कधी कधी घालायला काय हरकत आहे, मी वापरतेच ना?”

“तुझं काही वेगळे आहे ग, ये पण ती नथ देवू नको हा कुणाला, ती तुझ्याच नाकात मस्त दिसते, आणि घाल ती लग्नात, कशी हेकेखोर सासू शोभशील...”

आणि ते गाणं म्हणायला लागले,

“ओ मेरी जोहर जबी... तुम्हे मालूम नाही...”

“काय हो तुमचं आपलं नेहमीचच,..आणि मी काय म्हातारी नाही झाले... आहेच मी तशी..”

“आहा आह... काय दिसतेस ग तू लाजली म्हणजे, ये पण ती नथ घालून तर दाखव आता... किती दिवस झाले तू घातली नाहीस..”

बाबा हातातला पेपर बाजूला ठेवत म्हणाले.

“काय हो, सून येणारं आहे आणि हे काय!”

“सून! मी तर मुलगी म्हणून घ्यायला जाणार आहे राणीला, आणि बघ माझ्या हाताखाली कसं तिला ट्रेन करतो, माझी कंपनी तिला चालवायची आहे ना!”

“ह्ह्म्म तीच चिंता आहे, अहो तिला जमेल ना? हा एवढा मोठा डोलारा सावंतांचा... मला बाई भीतीच वाटते, तिची बहिण कशी लात मारेल तिथे पाणी काढेल अशी आहे पण ही, चुई मुई वाटते हो.”

राजन सहज खोलीत शिरला, त्याने काही शब्द एकले होते,

“अग आई सगळ्या सुरवातीला अश्याच असतात, तू आहेस ना तिला शिकवायला... तुझ्या हाताखाली कर तयार तिला.”

“अरे राजन वाईट मानू नको पण आम्हाला दोघांना चिंता वाटते रे... आपला केवढा पसारा आहे... तिला जमेल ना? घर, तिचं कॉलेज आणि सावंतच्या पारंपारिक परंपरा चालवत बिजनेस शिकायचा आहे तिला.”

“शिकले ग, कशाला काळजी करतेस...”

“तसं नाही, मी आहे सोबत पण... आमची आपली मनात धुक धुक बाबा.”

“करेल ग, मी आहे ना, तिला सांभाळून घ्यायला, तू हताश होवू नकोस, माझ्या पसंतीवर जरा विश्वास ठेव. तुझ्या राजाची राणी येत आहे...”

“हो रे राणीचं आहे ती. तसं नाही, पण आज कालच्या मुलींचं सांगता येत नाही... आणि मग चुली वेगळ्या व्हायला काय वेळ लागतो रे? आम्ही आपले म्हातारे माणस...”

“म्हातारे आणि तुम्ही? हे बघ आई, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना... मग आता तिच्यावर करायला शिक, मी काय मुलगा सदा तुझाच राहिल पण ती तुझी झाली तर मी कसा वेगळा होणार? कर कर विचार कर.” राजन आईचे गाल ओढत म्हणाला.

आणि परत मस्करी करत म्हणाला, “तू तिच्यावर प्रेम कर, मग ती मला सांगणारच नाही ना वेगळं व्हायला.”

आणि राजनचे बाबा हसायला लागले, मग जरा शांत झाले, जवळ आले आणि म्हणाले,

“हे बघ राजन आपण पुरुष समजतो कि लग्न झालं तर आपली जवाबदारी कमी होते, पण तसं नाही रे, उलट वाढते, आई आणि बायको दोघीही आपल्याला तेवढच प्रेम करत असतात. मग भेदभाव होता कामा नये, आई ही आयुष्यभर आईच असते आणि बायको क्षणाचीचं बायको असते आणि आयुष्यभराची आई... मग दोन आया ओढल्या जातात ना एकाच्या प्रेमात. म्हणून आपली जवाबदारी वाढते. दोघीच्या प्रेमाची स्पर्धा व्हायला नको हे लक्षात ठेव.”

राजन स्मित हसला आणि खोलीतून निघून गेला. राजनचे आई बाबा रमले होते गोष्टीत, हळूहळू ते त्याच्या लग्नात शिरले होते, लग्नाच्या गोष्टीत एवढे रमले होते कि विसरले होते लग्न राजनचं आहे म्हणून, भानावर येत राजनचे बाबा म्हणाले,

“सरू, लग्न आपल्या मुलाचं आहे ग, बघ किती दूर आलोय आपण आणि आता आपल्या मुलाचं लग्न आहे. किती उशिरा झाला ना राजन आपल्याला, बारा वर्षानंतर, मग लगेच रागिणी.. आणि हा सावंत वाडा बहरत गेला, आता राजनचे आणि रागिणीचे मुलं धावतील त्या भल्या मोठ्या वाड्यात आणि परत ह्या वाड्यातला कोपरा कोपरा खेळेल त्याच्या सोबत लुकाछुपी.”

“होणा, काल परवा पर्यंत माझ्या पदराला धरून चालणारा आता बायकोचा पदर टाचून देईल... माझ्या साडीच्या निऱ्यात लपणारा बायकोच्या निऱ्या सावरेल. मुलं लवकर मोठे होतात हो... आणि आपण लहान होतं जातो.” आई जरा भावूक झाली होती डोळे पाणावले होते तिचे.

“म्हणूनच लहानांनी मोठ्यांच ऐकायचं... कळलं का...? सासूबाई! राणी खूप भावूक मुलगी आहे, तिला घरात रुळायला वेळ लागेल, उलट बिनधास्त नाही, आपल्याला तिला मिळून शिकवायचं आहे. लहान होवून मोठेपणा जपायचा आहे.”

“आणि तुम्हाला ते चांगलं जमतं, मला घडवलं आता सुनेला उभा करा. मी आहे मागे तुमच्या. चला जावून या त्या डीजेवाल्याकडे, त्याला पेमेंट करायचा होता ना?”

राजनचे बाबा खोलीतून गेले आणि आई अजूनही त्या दागीण्यामध्ये गुंतून होती.

लग्न काय असतं नेमकं हे? का करतो आपण...? जन्मापासून ह्याच दिवसासाठी तयार होत असतो का आपण? अशे अनेक प्रश्न लग्न ह्या एका शब्दाने मनात रेंगाळत असले तरीही आपण लग्नासाठी तयार असतो... ते एक साथ हवी म्हणून, जोडीदाराची, हक्काची जिथे हक्कही हळूच शिरतो नात्यात आणि मग रागावणं, रुसणं क्षम्य होवून जातं. रागावण्या मागचं कारण जेव्हा न सागता कळत असतं आणि रुसणंही आनंद देवून जातं तेव्हा जोडीदार हा नावापुरता राहत नाही तर तो जोडीदार... तू माझा...होतो. आयुष्यात येणारी प्रत्येक नाती ही हळू गळून सुटत जातात पण एक नातं सोबतीने, सहवासाने आणि प्रेमाने घट्ट होतं जातं... ते असतं जोडीदाराचं नातं....

कथा क्रमशः

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...


Post a Comment

0 Comments