जोडीदार तू माझा भाग ४५
अनु अंकित आज भेट झाली, गप्पा झाल्या आणि अनु मनातून फ्रेश
झाली. तोच सानू आता हॉलमध्ये आली,
“ये शेंबड्या टाईम संपला रे तुझा, आपल्या आपल्या कैदीत निघा
आता.”
“काय ग तायडे, आई ऐकेल तर ओरडेल ना... कैद काय म्हणतेस!”
“जेलर आहे ती, म्हणले तसं गुमान वागायचं, तिकडे आपले
सरसेनापती थरथर कापतात तिला मग आपण काय...”
“तायडे!”
“अरे हो विसरले होते मी तू चमचा आहेस आईचा....”
“ते जावूदे, मी काय म्हणते...”
तोच ती गालात हसणाऱ्या अनुला बघत म्हणाली.
“काय ग तू का हसतेस....”
“अहो ताई ते सरसेनापती....
“अग आपले बाबा....”
“असं, ये अजिबात हसायच नाही बाबांना आणि आईच्या समोर त
नाहीच, आणि अनु काय हे, बघ स्वतःला, बोलून कशी गोड दिसत आहे.... पण सॉरी ग....”
“अहो ताई, काही नाही, बऱ्याच दिवसांनी बोलले ना, मग जरा
हलकं वाटलं मला...”
“हुम्म, चला आपल्या आपल्या कामाला
निघा, वेगळे वेगळे व्हा आता... भेटण्याचा टाईम संपला. आता काही वेळात आराध्या
मावशी येईल.”
आणि मग राणीही तिथे आली, राणीची मेहेंदी मस्त रंगली होती,
बाळूने तिच्या मेहेंदीचे सुंदर सुंदर फोटो काढले, चौघांनी मिळून मजा करत फोटो
घेतले. सानू अनुला म्हणाली, “आता घरात मावशी येत आहे, तर जरा सगळं जपून, तसं
मावशीला माहित झालंय आणि तिच्या नंतर कुणालाही माहित होणारा नाही आणि व्हायलाही
नको हा आईचा ऑर्डर आहे. मी हा मानत नसले तरी आईचा शब्द घरात शेवटचा असतो हे लक्षात
असू द्या तुम्ही दोघं. अनु तू आजपासून माझ्या सोबत राहायचं माझी मैत्रीण म्हणून.”
“हो ताई, माझी बहिण येईल कदाचित लग्नाच्या दिवशी.”
“मग जमलं, घरात तू माझ्यासोबत राहायचं माझी मैत्रीण म्हणून
आणि लग्नाच्या दिवशी मी बिझी असली तर तुझ्या बहिणीसोबत...”
“काय बाळू, आवरा स्वतःला. लग्नापर्यंत... मग तुमचा उडवू
मोठा बार.... आई म्हणाली आता आतमध्ये सुनी काकीला... तिच्या खूप इच्छा आहेत रे...
म्हणजे होत्या... काही नाही, करू आपण झक्कास काहीतरी... पण आता अंतर...”
अनु ऐकून खूप खुश झाली होती, गाल पार गुलाबी झाले होते
तिचे. तिचे ते गुलाबी गाल ओढत सानू म्हणाली,
“आणि बाळू हिला फोन घेवून दे आजचं, म्हणजे काही असलं तर ती
तुझ्याशी बोलेल, तिलाही एकटेपण वाटणार नाही.”
“हो दी, मी आताच म्हणालो हिला, हिचा लाचा ही झालंय म्हणे,
मी निघतो दहा वाजता माझी काही काम आहेत, करतो आणि घेवून येतो सगळं, तुला काही हवं
असेल तर सांग.”
अंकित राणीला म्हणाला, “ये नवरीबाई तुझी काही लिस्ट आहे का.
सांगून दे... काही शेवटची इच्छा वगैरे असेल तर... आता काय बाबा तुम्ही सावंत
वाड्यात राणी म्हणून जाणार... मग आमच्या कडून काही लहान सहान हवं असेल तर बोला
राणीसाहेब.”
“हो ना आहेच, येतांना झीप्स घेवून ये”
अंकितने मोबाईलमध्ये लिहून घेतलं. आणि सर्व हसायला लागल्या.
“अरे अरे, अनु... असा नव्हता ग माझा भाऊ... अरे शेंबड्या ती
तुला गप्प राहण्यासाठी झीप्स घेवून ये म्हणत आहे ती, काय हे! असं... असं होतं
लग्नानंतर माणसांचं म्हणून बाया बोलतात....” सानू हसत म्हणाली.
घरासमोर गाडी थांबली आणि मावशी आवाज देत घरात शिरली,
“ताई मी आले ग, ओ माय गॉड, किती बदललय सर्व, अग बाई हे
चाफ्याचं झाड किती वाढलंय, आणि हा गुलमोहर
अगदी बाल्कनीपर्यत पोहचला, हा आंबा, यंदा आंबे आले असेल ना. हा गोड्निंब तर कसा,
पूर्ण डोलारा पसरलाय ह्याचा. आणि हा मनी प्लांट मीच लावलं होतं ना, मागे आली होती
तेव्हा. ओ माय गॉड, किती पसरलंय हे, सुरेख
दिसत आहे. रंग मस्त चढवला आहे भिंतींना, व्हा हुम्म्म
आता नवीन पिढी उभी होत आहे ना... ”
तिच्या येण्याने घरातले सर्व बाहेर आले, अरुणाने आल्या
आल्या अराध्याला मिठी मारली मग, मुलाला उचलत म्हणाली,
“हा सोहम ना? मोठा झाला ग.”
सोहम पटकन म्हणाला, “माय नेम इज सॅम बडी मॉम.”
“हो रे, सॅमच पण मला बाई सोहम आवडतं म्हणायला. मी नाही
म्हणार तुला सॅम वगैरे...”
“बडी मॉम.... तुझे गाल ओढू का?”
तेवढ्यात सानू आणि राणी बाहेर येत म्हणाल्या,
“पण आम्ही म्हणू तुला सॅम म्हणू, काय!”
राणी हसत म्हणाली, “नवरीचा लहान भाऊ पाच वर्षाचा आहे.... मग
मजा बाबा तुझी लग्नात. जाम त्रास द्यायचा
जीजुला, काय रे. तुचं देवू शकतोस. बाकी सगळे तर मोठे आहेत.”
गेटमधून अरुण आणि भीमा काका आराध्याच सामान घेवून घरात येत
होते, भीमा काका म्हणाले,
“आल्या आल्या हिने आम्हाला हमाल बनवलं मित्रा, अजून काय काय
करावं लागेल काय माहित... ओ माय गॉड!”
अरुण, “हो आता तोच वाचवू शकतो आपल्याला, आरती, सुनी आणि
आराध्या... हा तिगडा जमलाय... आपली मिळून वाट लावणार... आता आपल्याला ह्याच्या
पासून अस्मित बुवा नाहीतर तो गॉडच वाचवू शकतो.”
“कधी येतोय तुझा साउथ इंडिअन डोंबळा साळभाऊ... त्यालाही
घ्यायला जावं लागेल का?”
“अरे हट्ट... मी नाही जात त्याला घ्यायला... येईल आपणहून...
इथे उभा राहिल गेटवर... उद्या पहाटे येणारं आहे.”
“ते बऱ झालं! पण त्याला वाईट वाटणार नाही ना?” म्हणत भीमा
काकाने सर्व बॅग्स आतमध्ये ठेवल्या.
“तो आहे रे, काहीही बोललं तर समजून घेतो, त्याला असा खूप
मान द्यावा लागत नाही, म्हणून मला आवडतो तो... आणि आपल्या ह्या अश्या अरुला
सांभाळतो ना...”
“हो रे, जावई हवा तर असा, आपल्या अरुनेही सारंकाही प्रेमाने
सांभाळून ठेवलं आहे.”
आणि परत कानाजवळ येवून म्हणाला,
“त्याला सांगितलं ना घेवून ये म्हणून? तिकडली इंग्लीश
वाली.., आपली नेहमीची.”
“ते काय सांगावं लागत नाही त्याला, तो ऐकटा येत आहे म्हणजे
पूर्ण तयारीने येत आहे, आपल्यालाच इकडे शानदार अरेंजमेंट करावी लागणार आहे.”
“चल मग, वरची गच्ची मी आज साफ करून घेतो... तो थांबेल ना
लग्नानंतर की लगेच बँगलोरला निघेल.”
“नाही नाही, त्याचं पूर्ण प्लानिंग असते, दोन दिवस
माझ्यासोबत काढेल तो, मला माहित आहे, आमचं दोघाच गुपित आहे ते, तसा मी आरतीच्या
बोलण्यातून अंदाज घेतला आहे... चिंता नाही... येतोय डोंबळा फुल तयारीत... तू लाग
कामाला, मला आज काही काम आहेत बाहेरची. मग संध्याकाळ पासून हळद सुरु होईल आणि
निघता येणारं नाही. आणि तुलाही गच्ची साफ करायला वेळ मिळणार नाही, आताच सकाळी
आटोप.”
इकडे सगळां महिला मंडळ राणीच्या खोलीत जमला होता, आराध्याने
अमेरिकेतून प्रत्येकासाठी काही ना काही आणलं होतं. राणी आणि सानूसाठी नेहमीप्रमाणे
तिने मेकअप कीट आणलं होतं. बाळूसाठी जाकेट अगदी त्याला हवं असं, आरतीसाठी आणि सुनितासाठी
बॅग्स. बॅग्स बघताच आरती म्हणाली,
“बऱ झालं आणलीस, तू आणलेली मागची आता जरा जुनी झाली होती,
कसं मनातलं ओळखतेस ग?”
आराध्या हसली आणि म्हणाली, “जीजू आणि भीमा दादाला जे हवंय
ते अस्मित आणणार आहे बरका... तो बोलाला मला, कि मी अन्नाचं गिफ्ट घेईल म्हणून मग
मी शोप्पिंग केली नाही जीजूची.”
सानू हसत म्हणाली, “अजूनही अंकल अन्ना म्हणतात का
बाबांना.?”
“मग... त्याचं तेच सुरु असतं, अन्ना को ये, अन्ना को ओ...”
बोलता बोलता अंजली आत्या खोलीत शिरली आणि आराध्याने तिच्या
हातात फॉरेनवरुन आणलेल्या क्रीम्स ठेवल्या, आणि म्हणाली,
“अंजू तुझ्यासाठी, रोज लाव बऱ... तुझ्यासाठी खास आणल्यात...
तुला आवडणार नाही पण माझ्यासाठी घे.”
आराध्या आणि अंजू दोघीही मैत्रिणी होत्या, आराध्या आरतीकडे
इंजिनिअरिंग करतांना राहायची तेव्हा दोघीत मैत्री झाली होती, अंजलीला अमितशी लग्न
करायचं होतं हे आराध्यालाच माहित होतं, त्यांच्या प्रेम विवाहा नंतर ती एकटी होती
जी खूप खुश होती पण आता तिला खूप वाईट वाटत असायचं. आराध्याच्या मनात एकच सल होती
कि ती अंजूला पळून जावून लग्न करण्यासाठी थांबवू शकली असती, जीजुला सांगू शकली
असती पण तिने ते अंजुच्या प्रेमापोटी केलं नव्हतं... नाहीतर आज परिस्थिती काही और
राहिली असती. अंजूच्या आजच्या स्थितीला ती काहीशी स्वतःला जवाबदार समजायची.
अंजलीने गिफ्ट घेतलं, “तू आणल्यास मग नक्की लावेल, पण ती
अंजू राहिली नाही ग आता...”
“राहिली नाही म्हणजे? तू तिचं आहेस, अजूनही... माझ्यापेक्षा
सुंदर...”
अंजली हसली, आणि तिने आराध्याला गच्च मिठी मारली. घरातलं
प्रत्येक नातं अनया दुरून बघत होती आणि समजत होती, मनातल्या मनात आईच्या घरच
वातावरण विचार करत होती. इथे नाती अधिक गुंतली होती तिच्या माहेरपेक्षा हे तिला
जाणवलं होतं. प्रत्येक पाऊल जपून आणि फुंकून टाकावं लागणार हे लक्षात येत होतं.
तिथेच भिंतीला टेकून उभा असलेला अंकित अनयाला न्याहाळत होता. ती हसली कि तो हसत
होता आणि ती विचारत शिरली कि तोही....
नाती अशीच असतात, गुंतलेली, मनात असेलली, त्यांना नेहमी
बोलून दाखवल्या जात नाही पण वेळ पडली कि मायेने जवळ घेणारी. जीवनाच्या प्रवासात
सगळे आपल्या आपल्या कार्यांत व्यस्त असतात मग अशी एक भेट सारं काही सामावून घेते.
आणि परत दूर गेलेले अलगत जवळ येतात.
कथा
क्रमशः
© उर्मिला
देवेन
urmiladev@gmail.com
कथा
वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!
कथेच्या
प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही
चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर
प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा
पुढचा भाग लवकरच.
स्टे
कनेक्ट, स्टे सेफ...
0 Comments