जोडीदार तू माझा... भाग३८

 जोडीदार तू माझा...  भाग३८


 

अचानक एकमेकांचा सहवास लाभल्याने अंकित अनु एकमेकात गुंतले होते. कसबसं स्वत:ला मनाच्या आणि मेंदूच्या लढाईतून सुटवलं आणि मनावर मेंदूने शेवटी विजय मिळवला आणि अंकितने स्वतःला आवरलं, दोघेही काहीसे लाजले, काहीवेळ शांत झाले, भावनांना आवर घातल्या नंतरची ती जाणीव काहीशी नाराज होती पण मनांना कदाचित कळत नव्हतं कि त्यांनी त्याच्या भावना का गोठवल्या असाव्या...

सहज काही क्षणात दोघानां कळलं कि ह्यात काय लाजायचं… हे व्हायचंच पण आता हि ती वेळ नाही. हळूच अंकितने अनयाच्या हाताला स्पर्श केला आणि अनया स्मित हसली, अंकितने हळूच तिची हनुवटी धरिली, परत ओठं माथ्यावर टिपले आणि म्हणाला,

“प्रेम एक मदिरा आहे, चढते  ग, गटकन काय गिळायची… जरा हळू हळू मजा घेत प्रेमाच्या नशेत असावं, आणि ही मदिरा ना जेवढी जुनी होतं जाते तेवढी ती चविष्ट होतं जाते... तू बघितलंस ना आई बाबांना, प्रेम जितकं जून, नातं तेवढं घट्ट.. हळू हळू प्रेमात मिलन झालं कि आपल्यात काही नवीन राहणार नाही तेव्हा....”

अनयाने अंकितच्या ओठांवर बोट ठेवलं,

 "हुम्म्म.... मिलन अभि आधा अधुरा है…. मिलन अभि आधा अधुरा है .... "

"चला आता माझी अनु शोभतेस तू ... "

"अरे… म्हणजे! आहेच मी! "

 "काल पासून शोधत होतो माझ्या अनुला...आता गवसली, अहो राणीसरकार... भावी सत्ताधारी आहात आपण ह्या मोहिते निवासाच्या ... माहित आहे ना मोहित्याकडे घरच्या बाईची चालती आहे... मी लहान होतो तेव्हा आजीचा निर्णय अंतिम असायचा... आता आई म्हणले ती पूर्व दिशा आहे... आणि पुढे तू दिवसाला रात्र जरी म्हणशील ना तरी मी मान हलवेल... आणि गुमान गुप्प बसेल. "

"हे, काहीही रे... तू कुठे?"

"अरे लाजली...लाजली... आयला काय ही खडी यार... इथेच बुडालो आम्ही ... अशी राहा मग बघ घरातले तुझ्या मागे कशे राहत नाहीत ते.."

"तुझं आपलं काहीही..."

अंकितने अनयाला जवळ घेतलं,

"अग... प्रेम परीक्षा नसतेच... ती तर धुंदी असते ... प्रेमाची खरी कसोटी तर आता सुरु झाली आहे... आता आपल्याला दाखवून द्यायचं आहे कि आपलं किती प्रेम आहे दोघांवर ... आज वर वर स्वीकार झाला आहे आपला आणि उद्या तो आपल्याला मनापासून नोंदवायचा आहे... तुझ्या माझ्या प्रेमाला मान मिळायला हवा, नुसता स्वीकार नाही... आपल्या दोघांमुळे कुठलंच नातं कुजायला नको ग, कारण कुठलही नातं कुजलं तरी वास येईल आणि त्याचा त्रास नकळत आपल्या नात्याला होईल. आपल्याला प्रत्येकाच्या मनाच्या गाभाऱ्याचा वेध घायचा आहे. मला माहित आहे आई तुझ्याशी नीट वागत नाही.. आणि वागणारही नाही जोपर्यन्त ती तुला ह्या वास्तूत नाही तर तिच्या मनात नांदवणार नाही...  तुझी कसोटी आहेच पण माझी तर भारी कसोटी आहे. मला आई आणि तू दोघीही प्रिय आहात... तुझ्याशिवाय मी अपुरा आहे आणि आईवाचून हे जीवन काय! तू माझ्या सोबत उभी आहे पण ती मला माझ्या पाठीशी हवी आहे... मी तुझाच आहे आणि राहील.. तेव्हा मला साथ दे."

अनयाने अंकितच्या हातात हात दिला, दोघांच्याही नजरेत एकमेकांबद्दल आदर वाढला होता, घरात काय घडलं हे अंकितला आत्या कडून कळलं होतं पण अनयाने ते अंकितला जराही सांगितलं नव्हतं, आणि अंकिताला आताही अनयाच्या माहेरच्या मंडळींची काळजी होती हे अनयाला जाणवलं होतं. अंकितने, बसल्या बसल्या आलियाला मॅसेज केला, तर तिचा कॉल आला,

"हे आलिया, आई कशी आहे... "

आलियाचं नावं घेताच अनया बोलायसाठी हायसी झाली. अंकिताने फोन अनुला दिला. अनया फोनवर खूप रडली… आणि अंकित तिला सांभाळत होता. अनयाला आलियाकडून तिच्या घरातून निघून गेल्यानंतरची संपूर्ण परिस्थिती समजली होती. तिच्या आईने बाबांना पोलिसात जाण्यापासून थांबवलं होतं आणि शांतही केलं होतं पण ह्या सर्वांत तिचा बीपी लो झाला होता.  बाबा रागात बाहेर निघून गेले हेही आलियाने तिला सांगितलं होतं. बहिणीशी बोलून शांत झालेली अनया शून्यात हरवली होती. तिला अगदीच जवळ घेऊन अंकित बसला होता आणि  सानूचा फोन आला,

" दी कुठे आहेस ?"

"मी इथे कैलास सोबत आहे."

"कैलास! तो तुझा PSI मित्र, त्याच्यासोबत काय करतेस ?"

"अरे थांब जरा, आधी तू अनु सोबत असशील तर बाजूला हो, बोलायचं आहे."

अंकित उठला आणि अनयाला म्हणाला,

"चहा ठेव ना आपल्यासाठी."

अनया उठली आणि खाली आली, स्वयंपाक खोलीकडे वळली. तसा अंकितने परत सानूला फोन लावला,

“दी काय सांगायचं आहे तुला सांग ग लवकर, तू त्या कैलास सोबत काय करते आहेस?"

"तेच सांगते आहे, अनूचे वडील त्यांच्या काही मित्रांना घेऊन पोलीस चौकीत आले होते, योगायोगाने कैलास आज त्या चौकीत होता आणि त्याने अनयाच्या वडिलांच्या तोंडून तुझं नाव ऐकलं तर त्याने दखल दिली, ते म्हणे रिपोर्ट लिहायला आले होते तुझ्या विरुद्ध कि तू त्यांच्या मुलीला पळवून नेलस, पण कैलासच्या प्रश्नांची उत्तर देतांना त्यांनीच सांगितलं कि तुम्ही लग्न केलंय म्हणून मग कैलासने त्यांना समजावून सांगितलं कि तक्रार करून काही होणार नाही म्हणून. तुम्ही दोघेही १८ वर्षाच्या वर आहात आणि लग्न केलंय मग कुठलाच कायदा तुम्हाला थांबवू शकत नाही, आणि जो पर्यंत अनु तुझ्याविरुद्ध बोलणार नाही तोपर्यंत ते पोलीस काहीच कारवाही करू शकत नाही म्हणून"

"मग ग, केली का त्यांनी तक्रार ..."

"नाही रे... तेच तर सांगते आहे. मग ते पोलीस स्टेशन मधून रागात निघेल म्हणे... आणि कैलासने मला फोन केला, तुझ्या फोननंतर ह्याचा फोन आलेला आणि मी आता ह्यांच्यासोबत घरी येत आहे. म्हणजे तिकडे काही राडा नको आणि बाबांना, मी माझा आणि राणीचा लाचा आणायला सांगितला आहे तर त्यांना दोघानां घरी यायला खूप वेळ होईल. पण तू अनयाला ह्या पोलीस रिपोर्ट बद्दल काही बोलू नको."

 "नाही, नाही बोलत पण आधी तू ये घरी."

अंकित आता पुरता हादरला होता... आणि हॉल मध्ये फिरत सानूची वाट बघत होता. तो अनुला म्हणाला,

"अनु चहा जरा जास्त टाक दी आणि तिचा मित्र येतोय "

अनयाने स्मित होकार देत स्वयंपाक खोलीत विलायची शोध कार्य सूर ठेवलं, तोच गाडीचा आवाज आला, अंकित बाहेर निघाला,

"अरे कैलास दादा, ये ना किती दिवसांनी येतोय."

"हुम्म्म, यावं लागलं रे तुझ्यामुळे नाहीतर तुझी दी मला कुठे भाव देते. साधं कधी चहाला बोलावत नाही कि बाहेर कॉफीला हि कधी येत नाही माझ्यासोबत. "

"ये फ्लर्टीं... चल तुला मस्त चहा पाजते... कसा PSI झाला कोण जाणे… कि इथेही असंच केलंस..."

"ये तुला काय माहित आहे किती कष्ट करावी लागतात …"

"असं का... सांग बरं एखाद दिवस... तुझ्या त्या तिखट गोड गोष्टी मला."

"म्हणजे... तू तयार आहेस तर माझ्या सोबत डेटला यायला... आयला अंकित तुझ्यामुळे हा दिवस आला माझ्या आयुष्यात …"

आणि कैलासने अंकितला मिठी मारत अभिनंदनही दिलं,

"अभिनंदन सालेजी, आपने तो बाजी मारली, सीधा वरमाला पेहनाके घर ले आये, और हम अभिभि कतार मै ही है! कुछ टिप्स मिलेगी क्या?"

"ये दादा ... मस्करी नको रे... इथे जीव टांगणीला लागला आहे."

"अरे सालेसाहेब हमारे होते हुये ये हो… लानत है!"

"अरे ये फ्लर्टी... काय सूर आहे रे तुझं? सालेसाहेब वैगेरे ... " सानू म्हणाली.

"अरे दिलं को तसल्ली मिलती है आप काय जाणो, आता तू तर अजून काही हो म्हणत नाहीस मग करायचं काय मी... साला इकडे माझी आई पोरी बघायला लागली आणि तू काही केल्या हो म्हणत नाहीस. मी तर खिश्यात मंगळसूत्र घेवून फिरतो तुझ्यासाठी.... "

"तू बंद कर बरं आधी... कधी तर सिरिअस हो रे...."

कैलासने तोंडावरून हात फिरवला आणि तो गुमान शांत झाला  येऊन हॉलमध्ये बसला आणि सानू अनयाकडे गेली,

"काय! चहाचा मस्त सुगंध सुटलाय, चहा करता येतो वाटते तुला, घे लवकर, प्यावासा वाटतोय ग."

"हो ताई झालाच, घेते मी तुम्ही व्हा फ्रेश."

अनयाने कपाटात कपांची शोधाशोध केली. अंकितने येऊन तिला मदत केली,

"हे इथे नवीन कप असतात."

त्याने ते तिला काढून दिले. अनयाने चहा कपात ओतला आणि हॉलमध्ये घेऊन आली.

"अनु हा माझा कॉलेजचा मित्र आहे, कैलास वानखडे, PSI ऑफिसर." सानूने परिचय करून दिला.  

"हुम्म्म ... मित्रच आहोत अजून आम्ही... तुच्यासारखे नाही आमचे... मला तर मैत्रीवरच थांबावं लागतं की काय बाबा." कैलास मस्करी करत म्हणाला.

अनया हसली पण जरा दचकलीही कि अचानक PSI घरी कसा म्हणून, तिच्या चेहऱ्यावरचे भाव वाचत सानू म्हणाली,

"अग जरा माझं पासपोर्टचं काम होतं, आणि ह्याला काय माझ्याशी भेटायला बहाणा हवा असतो, एखाद्या कॉन्स्टेबलला पाठवलं असतं ना तरी चालला असतं पण हा स्वतः आला... "

 कैलास, "हो बाबा, एवढाच तर बहाणा भेटला मला हिला भेटायला नाहीतर हि कुठे मला संधी देते... “

आणि कैलास चहा प्यायला लागला. बराच वेळ सर्वांनी गप्पा केल्या, आणि नंतर सानूने जेवण ऑर्डर करून घरी मागवलं, आठ वाजत आले होते, मग हळूच सानूने अंकितला म्हटलं,

"जरा कॉल करून बघ ना हिच्या बहिणीला म्हणजे माझी सुटका होईल ह्या कैलासाच्या भंकस पासून."

अंकित उठला आणि बाहेर आला, त्याने आलियाला कॉल लावला तर कळालं कि बाबा घरी आहेत, चिडचिड सुरु आहे पण आईजवळ बसून आहेत. बाबांनी तिकडे येवून धिंगाणा घालण्याचा बेतही आईच्या सांगण्यावरून आता तरी थांबवला आहे पण त कधी काय करतील ह्याचा काही नेम नाही. आजचं तर आईने सांभळून घेतलं पण आता तुम्हाला दोघांना सांभाळाव लागेल असही ती बोलली. 

कथा क्रमशः 

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल... 

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

फोटो साभार गुगल

Post a Comment

0 Comments