नेपोटिझमची पारंपरिक कीड, फेव्हरेटिझमचा साथ आणि असतें एका गँगचा डोक्यावर हात.

नेपोटिझमची पारंपरिक कीड, फेव्हरेटिझमचा साथ आणि असतें एका गँगचा डोक्यावर हात. 
हल्ली खुपचं वारं वाहतं आहे ते फेव्हरेटिझमच .. आता हा काही त्याचा नव्याने जन्म नाहीच, चमचेगिरी केली, स्तुतीची उधळपट्टी केली कि हमखास तुम्ही समोरच्याचे फेव्हरेट होता. सोबतीला त्याचा भाऊ हि समाजात चांगले पाय रोवुन बसलाय ज्याला भाईचारा म्हणतो ..अहो तोच नेपोटीझम ... गुणवंत आणि हुशारांना डावलून स्वतःच्या मुलांना, नात्यात लोकांना,  अगदीच जवळच्यांना पुढे करणं काही जुनं नाहीच हो! काहीस चुकीचं पण नाही. ते नसलं तर नातं कसं असणारा..नातं नात्याला ओढतच... पण टॅलेंट काही तर चीज असतं रावं!
सध्या तर गटबाजी जास्त जोरात वाढली आहे, ग्रुप मध्ये बसून गुमान गुप्प राहून, वचक अगदीच मोजच्या शब्दाने बसवायची, चमचेगिर करणाऱ्यांची मसले सोडवत ग्रुपच्या बाहेर असणाऱ्याला त्रास द्यायचा तेही अगदीच हुशारीने.
काय विडंबना आहे, जे लोकं ते अगदीच ह्या सर्व गोष्टीसोबत आधीच आहेत तेंच सुशांत सिंग राजपूत साठी न्याय मागत आहेत. म्हटलं तर कॅम्पेन चालू आहे. अहो सहज आहे हे, सभोवताली घडणारा किंवा आपणच घडवून आणणारा भाईचारा, फेव्हरेटिझम, गँगबाजी आपल्याला दिसत नाहीच, मग हा ग्लॅमलर विश्वातला दिसला?
सुशांत उत्तम घरचा होता, आता तो नेपोटीझमचा बळी होता कि आणखीन काय ते तर त्या ग्लॅमलर विश्वालाच माहित रे बाबा.. त्याने आत्महत्या केली कि त्याचा खून झाला हे तर कळेल किंवा वेळेनुसार त्यावर धूळ पडेल, कुणाला माहित.. आपण आपलं सामान्य लोकांच बोलूया ना!
पण तो तेवढ्या दूरचा सुशांत त्याच्याबद्दल काय काय वाटतं आपल्याला ह्याला मागच्या पंधरा दिवसापासून वाचून आता काहीच वाटत नाही असचं झालय, अर्थात मीही त्यातलीच हा ...मलाही तो पवित्र रिश्ता पासून आवडायचा... नाहीतर मलाही तुम्ही अनफेव्हरेट कराल ... आणि नकळत फेव्हरिझमचा हात धराल.
असो, तर मुद्दा हा, तो दूरचा,आपल्या नात्यातला ना गोत्यातला.. त्याच्या अश्या मृत्यूने आपल्याला हादरवून गेला. आता त्याची कीर्ती महान होती हा वेगळा भाग बरंका!
पण आपल्या गल्ली गोळ्यातले, ऑफिसमधले, नात्यातले किंवा ओळखीतले कितीतरी सुशांत आहेत हो! बळी जातात नेपोटीझमच, फेव्हरेटिझम, गँगबाजीला  ...हो सर्वच अगदीच मरणाला पत्करत नाहीत पण.. आहेत जरूर ...
गावाच्या पारावरून रेल्वे आली कि धावत बघायला येणारा अरुण, अगदीच पाच वर्षाचा होता तेव्हापासून रेल्वेत काम करावं ह्या विचाराने अभ्यास करायचा. मातीच्या रेल्वे बनवता बनवता त्याने चक्क गावात रेल्वेच मॉडल चालवून तहसिलीत नावं मिळवलं, रेल्वेत मोठ्या पदावर काम मिळावं म्हणून दहावीपासून तयारी सुरु केली, कसं तरी घरच्या भाकरीत त्याने  पॅलिटेक्निक कॉलेज पूर्ण करून उत्तम मार्क्स मिळवले. गावात माहिती मिळत नाही म्हणून न परवडणारा खर्च आई वडिलांवर थापून तो शहरात रेल्वे च्या परीक्षेसाठी राहत होता. उत्तम दर्ज्याचे  कोचिंग नव्हतंच पण हुशारी एवढी कि कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देईल आणि समोरच्याला पटवूनही सांगेल.  त्या वर्षी रेल्वे इंजिनिअरच्या परीक्षेचा फॉर्म त्याने भरला. पहिली परीक्षा तो टॉप दहात पास झाला, वडिलांनी दिवसभर विकल्या काड्यांचे पैसे त्या दिवशी पेढ्यात उडवले आणि गावभर वाटले. आता त्याची अंतिम मुलाखत होती. अरुणच स्वप्न पूर्णत्वाला येणार होतं. आई वडिलांच्या कष्टाचं चीज होणार होतं. तडजोड करून मुलाखतीसाठी कपडे जोडले आणि अरुण मुलाखत जोरात देऊन आला. पंधरा दिवसात कॉल येणार आणि तो शहरात रेल्वे इंजिनिअर म्हणून रुजू होणार हे पक्क्च होतं. पंधरा दिवस जुडवा जुडव करण्यात गेले पण काहीच कळांलंच नाही, महिना गेला, दोन महिने गेले. मग अरुणला काळजी वाटली तो चौकशी साठी फिरू लागला, लहान गावाचा, ना कुणी ओळखीच होत ना कुणी सोबत घेवून फिरणारं, ऑफिसच्या बाहेर बसून साहेबांशी बोलण्याची वाट बघत असायचा, घरी परत जाण्याची इच्छाही होतं नव्हती, आत्महत्या करावी असा विचार राहून राहून येत होता, तरीही जिद्द होती कारण कळावं, मग परत अभ्यासाला लागू पण तेही कळेना.
वर्ष गेलं, आईवडिलावर भार होवू नये म्हणून शहरात वाटेल ते काम सुरु केलं. आता गावात आला कि लोकं त्याला चीडवायचे, टोमणे ताणायचे.. कुठूनतरी एक दिवस कळलं कि त्याच्या मुलाखतीती त्याला आतमविश्वास नव्हता म्हणे आणि अरुण पार कोसळला, योग्य तो कॅन्डीडेड मिळाला नाही असं दाखवून त्याची जागा सहा महिने रिक्त राहिली होती आणि मग २०० नंबर वर असलेल्या मुलाची नेमणूक त्याच्या जागेवर झाली होती कारण तो त्या मुलाखातीतल्या प्यानल मधल्या कुणाचा तरी मुलगा होता म्हणे. अरुण घरी आला आणि गुमान एकटाच रडत होता, क्षणात स्वपन मातीमोल झाले होते, परत परीक्षा द्याण्याची इच्छा नव्हती त्याची. अशांत असाच नदीत किनारी बसलेला, काय करावं सुचत नव्हत त्याला, अचानक गावातल्या शाळेतल्या गुरुजीने पाहिलं आणि धावत आले, जरा भीतीच वाटली त्यांना, म्हणाले, "अरुण शाळेत शिक्षकाची जागा आहे, मी तुलाच शोधत होतो, चल तुझ्या नावच लेटर काढतो, ये उद्यापासून. शाळेसाठी काम कर आणि आई बाबानाही सांभाळ." अरुणने त्यांचे पाय धरले आणि आणि खूप रडला, त्याला सावरत ते घरी घेवून गेले.
मालती खूप हुशार होती, साधरण घरची पण बुद्धी तीष्ण, वळणदार, विचाराने वेगळी आणि लॉजीकल. स्व बळावर नौकरी मिळवली, पहिल्या दिवशीपासून ती तिच्या परफेक्ट आणि लॉजीकल विचाराने सर्वांमध्ये उठून असायची. ऑफिस मध्ये एक ग्रुप होता, ज्यात एक सुमन नावाची सिनिअर होती, जिला सर्व मान द्यायच्या, तिच्या मतानेच सर्व ऑफिसच्या बायका वागायच्या. तिला कुणी फारसं क्रॉस करत नव्हतंच पण मालती मिटिंग मध्ये लॉजीकली तीच मत बॉसला पटवून द्यायची आणि सुमनला शांत बसावं लागायचं, तो तिचा अपमान असायचा. सुमन मालतीचा राग करायला लागली होती, मालतीने कधीच तिची स्तुती केली नव्हती उलट योग्य ते योग्य आणि अयोग्य ते अयोग्य असच ती वागायची. तिला स्तुती सुमनं सुमनला वाहता आलीच नाही. हळू हळू मालतीशी कुणीही बोलत नसे, ती सकाळी यायची स्वतःच काम करायची आणि एकटीच असायची, आता हळू हळू ती एकटी पडली होती, स्वतःची चूक शोधात राहायची, गुरफटली होती स्वतः त. आता नवीन जॉईन करणारेही तिला अकडू, हेकड समजायला लागले होते, तिच्या एकटेपणाने तिला ऑफिस मध्ये यावंसं वाटत नव्हत पण घरची परिस्थिती म्हणून ती यायची. ऑफिसची घुसमट वाढत होती आणि ती आता पार गप्प झाली होती, मिटिंग मध्येही बोलायची नाही, स्वतःला सगळं कळूनही आपण गप्प राहतोय हे तिचं मन ऐकत नव्हत आणि मेंदू अशांत होत चालला होता. ऑफिसच्या बायकांनी तिला बॉयकॉट केलं होतं, आणि तिही स्वतः तून बॉयकॉट होत चालली होती. बुद्धीच्या जोरावर हव्या त्या दिशेकडे वळणारी आज दिशाहीन झाली होती. ऑफिस मध्ये नवीन प्रोजेक्ट सुरु झाला आणि काही दिवसातच मालतीने कंटाळून आत्महत्या केली.
अभिला लिखाणाची खूप आवड होती, अगदीच चौथीपासून लिखाण सुरु केलं होतं त्याने. तसं त्याच्या घराण्यात कुणी नावाजलेले लेखक नव्हतंच किंवा लेखकांचा विशिष्ट वर्ग समूह असणाऱ्या ग्रुपचा तो नव्हता. पण लिखाण असं जोर पकडत गेलं कि वाचणाऱ्याला ते प्रत्येक्ष समोर घडतांना दिसायचं. लिखाणाची भरपूर स्तुती होतं होती, लिखाणाला पंख फुटले होते आणि ते उंच आकाशी भरारी घेत होते. प्रत्साहांच्या शाहीने लेखणी बहरत होती त्याच्या कलेला वाचकांनी दाद भरपूर होती पण जेव्हाही पुरस्काराची वेळ आली तेव्हा त्याला तो कधीच मिळाला नाही.
पुरस्कारासाठी तो नेहमीच नॉमिनेट झाला पण हातात प्रशस्ती पत्र कधीच पडलं नाही, विडंबना होती ती ज्याच्या कलेला वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळायचा त्याला पुरस्कार कधीच मिळत नव्हता. वाचकाला मोहून टाकणाऱ्या लेखणीला पुरस्कार मिळू नये हा नेमका कुणाचा अपमान होता, त्या लेखणीचा, लेखकाचा कि वाचकांचा कोण जाने. पुरस्कार आणि सन्मानाचे पात्र तर काही विशिष्ट लेखकच असायचे. एक तर ते पुरस्कार आयोजकांचे नातेसंबधी असायची किंवा चापलुसिगार, हो हो मध्ये स्वतः चा हो मिळवणारे किंवा स्तुती उधळणारे. जसं जसं हे त्याच्या लक्षात येत गेलं तो टिप्पणी करायला लागला, ह्या सगळ्या पोकळ प्रक्रियेबद्दल तो बोलू पाहत होता आणि सुरुवात झाली ती त्याचा आवाज दाबण्याची मग आणि नेपोटीजम सोबत आता फेव्हरेटिझमलाही बळी पडला, आता त्याच्या लिखाणाला कुणीही प्रसिद्धी देतं नव्हतं. त्याला कुठं लिहिता येते का? कुणीतरी त्याला एखादा पुरस्कार दिलाय? असा टोणा हाणून त्याचा चारचौघात अपमान केला जाई. त्याच्या लिखाणाची शब्दांना बोलतं करणारी शाही गोठली होती. आणि लिखाण कायमचं मुकं झालं होतं. एक सुंदर रचनाकार स्वतः च्याच रचने मध्ये बंद झाला होता कधीही न खुलाण्यासाठी, वेडा झाला होता स्वतःच्या लेखणीच्या विचारात. एक सुंदर लेखक काळाच्या पडद्या आड कायमचा गेला होता.    

अरुणला जसे शाळेचे गुरुजी मिळाले आणि तो आजही जगतोय पण मालतीला अस कुणीच भेटलं नाही जो क्षणभर तिच्या जवळ येवून बसलं असतं नाहीतर एक हुशार जीवं गेला नसता. अभिच्या लेखनाला एखाद्या लेखकानेच जरा पुरस्कारापलीकडे जावून मैत्री करून त्याचं मन वाचलं असतं तर काळाला सुंदर लेखक मिळाला असता ...
पण आपण असं कधीच करत नाही ... आपल्या अवतीभवती अन्याय दिसतो आपल्याला, कुणाशीतरी भेदभाव होतोय हे जाणवतं पण आपण नाहीना बोलत....कुणीतरी ऐकट पडलंय हे जाणूनही आपण त्याच्याशी बोलत नाही, तो शहाणा आहे, अकडू आहे असं म्हणून त्याच्याकडे बघतही नाही आपण, कदाचित त्याच्याशी बोलल्या नंतर बाजू काही दुसरी असू शकेल हे कधी विचारात आणतच नाही आपण. एखाद्याला एखादा सह्नुभूती किंवा प्रेमाची विचारपूसही त्याला स्वतःला संपण्याच्या विच्रारापासून दूर करू शकते मग आपण ते माध्यम का होत नाही ....अरे गल्ली गोळ्यातला आणि समाजात खोलवर रुतलेला हा नेपोटिझम, फेव्हरेटिझम आणि दादागिरी ह्याने होरपळलेले कही सुशांत आपल्या मध्ये आहेत, आपल्याला ते सर्व सुशांत हवे आहेत जे बुद्धीच्या जोरावर उभे राहण्याची इच्छा ठेवतात पण हा नेपोटिझम, फेव्हरेटिझम आणि दादागिरी त्यांना मुका मार देवून मारू पाहते.....
कुणी सुशांत सिंग राजपूत होतो तर कुणी कंगना राणावत .. कुणी स्वतःची नाव स्वतः किनाऱ्याला लावतो तर कुणी तिचं  नाव घेऊन डुबतो .... बस .. आपण काय करू शकतो हे बघूया .... ह्यावर बोलूया आणि थांबवूया तेव्हाच एखादा समान्य घरचा मुलगा/मुलगी त्या वेगवेगळ्या क्षेत्रात उभं राहू शकले.
बघा पटलं तर आणि आपल्या अवती भवती असणाऱ्या अश्या सुशांतशी बोलण्याचा नक्की प्रयत्न करा किंवा अश्या वागणुकीला सहमत राहू नको, कदाचित आज सहमत असू आणि उद्या ते आपल्या मुलांसोबत घडलं तर ...विचार नक्की करूया ....
लेखाच्या प्रकाशनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव, विचार माझे शब्द माझे, शेअर मग नावासोबत करा.
©उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com



Post a Comment

0 Comments