आयुष्य जगताना...
6 ह्या आयुष्याचा उद्देश तरी काय
इकडे जपानी लोकांच आयुष्य
सुद्धा आपल्या सारखं कष्टमयच असतं, त्यांनाही निसर्गाने सगळं काही आपल्यासारखं
दिलं आहे पण तरीही ते आनंदी जगतात हे कोडं मला आता कुठे कळत आहे...
त्या दिवशी यामामोतो सान
कडून तिच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्याची संधी मला मिळाली होती. प्रगत देशातील
जोडपं आणि दोन टोकाच्या विचारांची माणसं एकत्र आल्यावर जे होतं तेच तिच्या संसारात
होत होतं. शिक्षण जेमतेम असल्याने नवऱ्याने टाकलं तर वाट लागणार हे तिला माहीत
होते. पण त्याच्या सोबत राहणे असह्य झाले आणि तिने सोडचिट्टि घेतली. शिक्षण तीचं
जेमतेम, म्हणजे प्रगत देश असला की लोकं काय डॉक्टर आणि इंजिनियरच नसतात हो. इकडे
दहावी बारावी पास अंशी टक्के लोक मिळतील. आणि म्हणूनच काय ती बेरोजगारी नाही इकडे.
अर्थात प्रत्येक कामाला महत्व आहे. जावूद्या काही नाही इकडे जरा लोकं प्रॅक्टिकली
विचार करतात. आपल्या आवडीचा व्यवसाय करतात आणि मजेत जगतात. असो!!
यामामोतो सान मुलीला शिकवले आणि मुलीने तिच्या पसंतीच्या
मुलाशी लग्न केले. ती सुखात होती. आता यामामोतो एकटी पडली होती. मिळेल ते काम करत ती आयुष्य काढत होती. तिच्या नजरेत तिच्या भावनेत कधीच कुणासाठी आरोप
नव्हता, मुलीने तीचं करावं हा भाव तर मला
तिच्या शब्दांत कधीच जाणवला नाही. तिच्या मुलीच्या वयाची होते मी म्हणूनच
काय की तिला माझ्याशी बोलायला आवडत होते. तिच्याशी बोलताना एक वेगळीच मनात ऊर्जा
निर्माण व्हायची.
बोलता बोलता मला ती बोलली
होती, तिला शिकायचे आणि शिकवायचे होते, पण आयुष्याच्या धक्का बुक्कीत नाही जमले,
आता साठ वर्षात तिने स्वत:ला सेनसेई म्हणून स्वत: साठी उभ केलं होतं. सेनसेई
म्हणजे शिक्षक, इथेही स्त्री पुरुष भेद नाही. शिक्षक शिक्षका असे काही नाही,
सगळ्यांना सेनसेई असाच मान. असो!!
आता ती जपानी गवर्नमेंटने
योजलेल्या उपक्रमातून विदेशी
लोकांना जपानी शिकवायची, तेही विनामूल्य, आहे ना स्तुतिपर. ह्या वयात तंगीत दिवस
काढूनही स्व खर्चाने केंद्रात येवून विदेशी लोकांना भाषा आणि संस्कृति शिकवणे हयात
तिला आनंद मिळत होता. आयुष्याच्या पहिल्या इनिग मध्ये राहून गेलेली स्वप्न परत
नव्याने जगत होती ती. ओठावर कधीच शब्द नव्हते, की मनात खंत. होती ती राहून
गेलेल्या सर्व स्वप्नांची पूर्ति करण्याची इच्छा आणि जिद्द. परकीय लोकांना आपलेसे
करत त्यांना जपानी शिकवण, देशासाठी काम करणं आणि आनंदी राहणं हा तिच्या जीवनाचा
आता एकमेव उद्देश होता. सारं काही मागे टाकलं होतं तिने तरीही भूतकाळातून शिकून
पुढे जात होती.
आयुष्य जगताना...
३. ह्या आयुष्याचा उद्देश तरी काय
यामामोतो सान कडे जगण्याची
उमेद होती. तिला शिकवायचे होते त्यासाठी ती वेळ काढत होती, मग अनेक देशातल्या
लोकांशी बोलणं आलं, नवीन शिकणं आलं. त्यासाठी तिच्या जीवनात अनेक गोष्टी घडत
होत्या आणि ती त्या जगत होती. दोन खोल्यांच्या भाड्याच्या घरात एकटी राहत असायची,
मीच तिला बोलले होते, माझी मूल झाली की राहायला ये माझ्याकडे, पण ती हसली आणि मला
मूल लवकर व्हावं म्हणून प्रार्थना करू लागली होती. तिला तिच्या आई वडीलांचे घर
होतं, मुलीचं घर होतं पण तरीही ती एकटी राहत होती. ही एकटी का राहते असे मला नेहमी
वाटत होते पण आता कळते ती एकटी राहून जगत होती. आपल्याकडे असे एकटे राहणे म्हणजे
दया पदरात पडते, आपुलकीची भाषा वाट्याला येते पण असे मला तरी तिच्या सहवासात
तिच्यासाठी कधी जाणवले नाही. शंभर वर्ष जगली तर ही के करेल असा प्रश्न मला पडत
असायचा आणि मी तो छेडला सुद्धा तर बोलली, वृद्धाश्रमात राहायला काय हरकत आहे. तिथे
राहूनही मी माझे सर्व काम करू शकते. बस मी हात टेकले.. ह्याला प्रगत विचार म्हणतात
कदाचित.... वृद्धाश्रमात राहणे आपल्याकडे चुकीचे समजल्या जाते, मलाही तसेच वाटत
होते, अजूनही वाटते पण तरीही प्रश्न पडतो, वृद्धाश्रमात हा
मार्ग असू शकतो. तिने ओल्डएजहोमचे नाव घेतले आणि तशी मी बोलले,
“तुम्ही तिथे अजूनच
एकट्या पडाल ना, त्यापेक्षा मुलीकडे जा, नाहीतरी माझ्या घरी या राहायला मी इकडे
राहिली तर?”
तिने हसत उत्तर दिलं,
“माझी सोय आणि सोबत तिथे योग्य असेल. सरकारी मदतीने आणि जवळ असलेल्या पुंजीने मी
राहील तिकडे आनंदात. सगळे सुख दु:खाचे सोबती असू आम्ही, उलट कामाला बाया असतात,
अंघोळ, सु-शी सगळं करताना नर्स असेल सोबत. औषध, बिपी, शुगर सगळं वेळेवर चेक होणार,
अस माझं कुणी करणार आहे का? मी तर पैसे जमा करत आहे माझ्या म्हतारपणासाठी.”
काही उत्तर नव्हते
माझ्याकडे. अजून कुठलं म्हतारपण येणार होतं, साठची तर ती आताच होती, पण तिच्या
साठी ती आज जगायला लागली होती.
वृद्धाश्रमात ही
संकल्पनाच माणसाला हादरवून टाकते, एकटेपणाची जाणीव देते पण प्रगत देशात तसे नाही
कदाचित, इकडे स्वत: लोकं ओल्डएजहोममध्ये राहायला येतात. आता सगळेच येतात असेही
नाही, सगळ्या विचारांची माणसं जगाच्या पाठीवर सगळी कडे आहेत. काहींना पर्याय नसतो
तर काही स्व आनंदाने राहणं पसंत करतात, पण वृद्धाश्रमामात राहणे हे इकडे काही वाईट
मानल्या जात नाही.
To
be continues…
@topfans
@followers
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's
app ग्रुपही
जॉईन करू शकता, किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता. लिंक कॉमेंटमध्ये आहे.
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
लेखाच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार
उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव...
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
आयुष्य जगताना...
४. ह्या आयुष्याचा उद्देश तरी काय
यामामोतो सानची मैत्रीण
ईचीरो सान तिच्या नवऱ्या बरोबर राहत होती. मुलीने अमेरिकन मुलाशी लग्न केले होते.
ती अमेरिकेत होती. मुलाला लग्न करायचे नव्हते पण तोही त्यांच्या सोबत राहत नव्हता. हे मात्र मला नवलाचे वाटत होते, मुलाच्या लग्न न करण्याच्या
निर्णयाला पालकांनी हसत स्वीकारले होते. मी सहज बोलले कि तुम्हाला हरकत नाही का
काही, तर ईचीरो सानने शांत मनाने उत्तर दिलं होतं,
“लग्न त्याला करायचे आहे
आम्हाला नाही. लग्न हा सर्वस्वी त्याचा निर्णय हवा. पुढे मागे त्याला वाटले तर तो
करेल पण आता त्याला करायचे नाही. तो आनंदी आहे मग आम्हाला अजून काय हवं.”
बापरे वाटलं होतं मला,
आपल्याकडे तर घराण्याचा वरीस बिरीस असं काही बोलून आणि काय काय धमक्या देऊन लग्न
करायला भाग पडतात पालक आणि लग्न झाले कि सुनेला कमी दाखवायला ते कुठेच कमी नसतात.
आता मला अजून खूप काही प्रश्न होते पण प्रश्न आत कोंबले, वाटलं मुलगा त्यांचा,
त्याचा निर्णय त्यांना मान्य मग मी का अजून उगाच प्रश्न करू...
अमाप पैसा होता दोघांकडे.
तिच्या नवऱ्याला टेकड्या, डोंगरं चढण्याचा
छंद होता, हाइकिंग हो. त्याला जपानचे सर्व डोंगर चढून त्याच्या नावावर रेकॉर्ड
करायचा होता. आता तो सत्तरचा होता आणि छंद कुठला तर डोंगर पायी पार करण्याचा...
आणि त्यात त्याला महारत ह्या वयात मिळवायची होती. काय तर तारुण्यात त्याला जमले
नाही, आता वेळ आहे मग निघाला डोंगर दऱ्या फिरत... छंद ऐकून मला तर हसायला आले होते
पण हसून कसे चालणार होते. नवल होतं की ह्या वयात त्यांनी असा विचार केला होता.
ईचीरो सान स्वभावाने खूप
मायाळू होती म्हणूच काय तर यामामोतो सान सारखी मनाने नाजुक पण कठोर स्त्री तिची मैत्रिण
होती. त्या दोघीत काहीच साम्य नव्हतं तरीही त्या मैत्रिणी होत्या त्यांच्या प्रगत
विचारांनी. मुख्य म्हणजे त्यांची मैत्री ह्याच केंद्रात झाली होती. म्हणजे बघा
आयुष्यभर मैत्रीसाठी आसुलेल्या मनाला अखेर मैत्रीही मिळाली ती आयुष्याच्या दुसर्या
इनिंगमध्ये.
यामामोतो सानच्या आयुष्याचा
उद्देश नुसता मुलीला वाढवणं आणि लग्न टिकवण्यासाठी वाटेल ते करण नव्हताच. मुलीमधे
गुरफटून आयुष्य सुद्धा तिने साठीत गुंडाळलं नव्हतं. तर त्याच आयुष्याची दुसरी
इनिंग ती स्वत: साठी जगत होती. तिला तिच्या आयुष्याचा उद्देश उतरत्या वयात गवसला
होता. मानधन न मिळवता तिने आयुष्यात वयाचे मानधन मिळवले होते. शिकवण्यासाठी सुरू असलेली
धडपड तिला रोज नव्याने आयुष्य देत होती. आता तीचं रहाणीमान प्रगत देशासारखं होतं
पण तरीही बोलण्यात साधेपणा होता. तिच्या आयुष्यात त्या वयात ध्येय होते.
आजही तिचे सोशल मिडिया
वरचे फोटो बघितले की तिचा जीवन प्रवास समोर उभा राहतो आणि मलाही नव्याने स्वत:साठी
जाण्याची उमेद नव्याने मिळते.
To
be continues…
@topfans
@followers
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's
app ग्रुपही
जॉईन करू शकता, किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता. लिंक कॉमेंटमध्ये आहे.
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
लेखाच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार
उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव...
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
आयुष्य जगताना...
५. ह्या आयुष्याचा उद्देश तरी काय
“इकिगाई” हा शब्द काही
जगाला नवीन नाही. तोही दिला आहे तो ह्या जपानी लोकांनी, इथे लोक ह्या इकिगाईच्या
संकल्पने सोबत जगतात.
आता इकिगाई म्हणजे काय? हा
प्रश्न पडणे साहजिक आहे. मला तरी इथे हा शब्द इथे राहून समजला. खरं तर हे दोन शब्द
आहेत इकि आणि गाई, इकि म्हणजे
जगणे आणि गाईचा अर्थ कारण, अर्थात जगण्याचे कारण असा त्याचा अर्थ होतो. अर्थातच
आपल्या ह्या जगण्याचे कारण काय, आपल्या आयुष्याचा उद्देश काय हे मनाला विचारणारी
संकल्पना. आता इकिगाई काय आहे हे सांगणारे बरेच पुस्तक मिळतील पण मी इथे ह्या
लोकांमध्ये तो अनुभवत आहे. अवतीभवती वावरतांना तो मी इथल्या माणसांमध्ये बघत आहे. यामामोतो
आणि ईचीरो सानच्या आयुष्याच्या इकिगाईला मी नकळत भेटले होते पण तरीही समजणे अवघड
झाले होते.
सकाळी ऑफिसला जाण्याची
घाई असायची मला, तसा आमचा फ्लॅट स्टेशनच्या जवळ होता. कंपनीने दिला होता म्हणून तो
स्टेशनच्या जवळ होता नाहीतरी इकडे निवांत जगणारे दूर राहणं पसंत करतात बरं का!
स्टेशनच्या जवळपास राहणारा धावपळ करत पळणारा माणसांचा वर्गच वेगळा असतो, सगळे नवीन
तरुण लोक राहत असतात त्या ठिकाणी.. कदाचित... नवीन सुरवात करणारे.... असो!
मी ऑफीस निघण्यासाठी घाईत
असायची, अगदीच स्टेशन पाच मिनिटावर होते. जाताना एक पार्क लागायचा लहान मुलांचा.
सकाळी त्या पार्क मध्ये म्हातारे, व्यायाम किंवा हास्य क्लब करत तर दिसले नाही कधी,
कारण तो मुलांचा पार्क होता. मुलांनीच वापरावा अस काहीतरी.... तिकडे एक म्हातारा
रोज तो पार्क झाडायचा, झाडांची पाने अगदी चिमट्याने उचलून पिशवीत टाकायचा,
पार्कच्या नजीकचा रस्ताही तो साफ करत असायचा. माझा तो रोजचा रस्ता होता, मी दिसली की
ओहायो गोझाइमास म्हणत काही क्षणासाठी काम थांबवत असायचा आणि परत मी त्या वाटेवरून
निघून गेले कि त्याचं काम सुरू असायचं. ओहायो गोझाइमास म्हणजे सुप्रभात आणि तेही
तो अगदीच मान देत मान वाकवून बोलायचा. आता त्यालाही मी तसाच प्रतिसाद देत असायची,
जमत होतं तेवढं. प्रश्न पडायचा हा म्हातारा जवळपास तरी सत्तरच्या जवळपास असणार पण
रोज पार्कला झाडू मारतो. रस्त्याने येणारे जाणारे वाटेत आले की थांबतो आणि परत
कामाला लागतो. परतीच्या वेळी तो मला दिसत नसायचा.
To
be continues…
@topfans
@followers
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's
app ग्रुपही
जॉईन करू शकता, किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता. लिंक कॉमेंटमध्ये आहे.
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
लेखाच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार
उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव...
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
0 Comments