भिंगरी_“द_रिव्हेंज”_(भाग ३)

 


जया पैसे मिळतील ह्या आशेने स्वप्न बघत एका कोपऱ्याला चिपकून बसली होती. मन मुलापर्यंत जावून आलं होतं आणि मेंदू पैसे कधी हातात पडतील ह्यावर लक्ष ठेवून होतं.

बटाटाभाईने आतमध्ये येवून गुण्या भाईला सांगितलं, “भाई, अस्सल गावराण माल पाठवला आहे जग्या ट्रक वाल्याने. काय म्हणता, चाखताय का?”

“अरे साला!! अपुन के तरफसे खोका भेज दो उसको, कामाचा माणूस साला तो, बराबर ओळखतो बटा, अन त्या गावरण रुपाला पाठव आतामदी.. साल्या ह्या मेकअप लपेटलेल्या चिकण्या काय बिन कामाच्या नाही.” गुण्या भाई जोशात म्हणाला.

बटाटा भाई गुण्या भाईच्या जवळ गेला आणि कानात म्हणाला, “भाई ही जयंतची घरवाली हाय.”

“कोण जयंत बे?”

“भाई, तोचं ज्यानं मागल्या वर्षी, तुमच्या आईटमचा खून बघितला होता. आणि अपुने त्याले त्याच्या घराजवळच्या विहिरीत फेकला होता.”

“अबे... तो काबे, आयला...एवढी सुंदर बायको हाय काबे त्याले, गुण्या भाई खिडकीतून जरा जया कडे हळूच डोकावत म्हणाला,

एक नजर त्याने तिला तारलं आणि परत मोठा श्वास घेत म्हणाला, “बिचारी बे, कसा बे तू, आण तिले माह्या जवळ, असा सोन्याने सजवतो. दे पाठवून आत मध्ये.”

“जी भाई, पण जरा जपून, लय गरजू वाटते भाई, प्रेमानं घ्या तिले. बापा बिन पोर पोसत आहे बिचारी. काळीज नाजूक झालंय कदाचित. दोन मुलं आहेत म्हणे तिला” बटाटा भाई काळजीत म्हणाला.

“अबे मेरेकू शिकवता क्या बे, ये लडकी लोग को हटा इधरसे... मस्त माहोल बना, अन पाठव तिले,  अन काय बे मुलगी हाय का तिले.”

“भाई लय लहान हाय तिची पोरं अजून...तुम बी ना..कूच बी...”

“जाऊदे, होवू दे मोठी..मग बघू तिले बी आता मायले त बघू दे आधी काय बे, म्या जरा पोट खाली करून येतो. अन सून, एक पेक बनव जबरदस्त वाला.” गुण्या भाई वाश रूम मध्ये जात बोलला.

गुण्या भाई वाशरूम मध्ये निघून गेला आणि बटाटा भाईने खोली साफ करायला लावली. तो बाहेर आला तेव्हां, जया एका कोपऱ्यात बसून  कुठेतरी पोहोचली होती. तो दिसताच, भानावर आली,जागेवरून उठली आणि हात जोडून म्हणाली,

“अजी पैसे देता ना जी, पोरं वाट बघत हायती. जावूद्या मले, लय वेळ होईल बघा मग. दुकाम बिन बंद होत्यात लवकर.”

“अवं हो, म्या मोठ्या भाईले सांगाले गेलो होतो, जयंतच ऐकून सुन्न झाले ते, भेटायचं म्हणतात. पाय घे भेटून, मदत बिदत करत्याल त.म्हणजे म्या आपला सांगतो तुले, म्या ओळखत होतो जयंतले.”

“अवं पण म्या कशी...राहूद्या जी, मले माह्या कामाचे पैसे द्या, म्या जातो.”

“जाय ग बाई, एखाद मोठी मदत करतील तुले, तुहे दिवस चांगले जातील, आपला भाई लय मोठे मोठे काम करतो... जावा तुमी आत मध्ये. पाच मिनटाच काम.”

“असं म्हणता, पण मले भीती वाटते जी, पैसे द्या जी म्या जाते. अमी गरीब माणूस, काय करायचं नाय मले. आजच्या नी पोर जेवली क उद्याची उद्या जी.”

तोच गुण्या भाईने जोरात आवाज दिला, “अरे नाही म्हणत असेल तर जावू दे तिला, बिचारीचे पोरं वाट बघत आहे, मी तर तिच्या मुलाच्या शाळेच्या खर्चासाठी बोलत होतो, आपण उद्या पाठवून ठेवू रक्कम, जावूदे बाईला. उगाच थांबवू नकोस बे, समजत नाही का तुले रे. जानेदे ना.”

जया ह्या आवाजाला फसली आणि म्हणाली, “नायजी तसं नाय....”

बटाटा भाईने नजरेने तिला आत जाण्याचा इशारा केला. आणि ती सरळ खोलीत जरा दचकत, भीत भीत आत गेली.

ती आत शिरातच बटाटा भाईने दार बाहेरून लावून घेतलं. जया घाबरली.

आतून खूप वेळ पर्यंत तिच्या ओरडण्याचा आवाज येत होता. तासभराने दार उघडल्या गेलं. हातात दहा हजाराची गड्डी घेवून ती बाहेर आली. ती दिसताच बटाटा भाई म्हणाला,

“उद्या यायचं हाय तुला नाहीतर तुझी अख्या गावात बदनामी करू आम्हीं... गुमान वाड्यावर यायचं आणि आपला मोबदला घेवून जातं जा. तुह्या पोराले शहरात शाळेत टाकतो म्या, अन पोरीलेबीन, दरवषी यायचं बुलावा देत जावू तुले. आता आमचा मुक्काम दोनच दिवसं हाय तेव्हा ये उद्या. निघ आता, अंधार पडत हाय. कुणी बी पायल नाय तुले, आणि काय बिन झालं नाय, जा गुमान, कर मज्जा.”

जया सुन्न होवून फाटकाच्या बाहेर आली, प्राण नसलेलं शरीर ओढत ती चालत होती, जोरात हंबरडा फोडला तिने, हातातले पैसे तिने रागात फाटकावर फेकून दिले आणि सुसाट धावत सुटली, वाटेत दमुन ती पडली, हातच्या मुठा मोकळ्या करत तिने श्वास मोकळा केला, पोटात भुकेने गोळा आला होता, नजर सोमारच्या डोलणाऱ्या गव्हावर पडली, कच्चे गहू झप झप ओरपले, तोंडात भरले, काही झोरयात टाकले. गहू तोडण्याच्या आवाजाने शेतधन्याने ओरडून आवाज दिला आणि ती पाठीला पाय लावत घरी आली.

कण्या गद-गद करत उकडत होत्या तशी तशी जया मनात उकडत होती. गरम कणी घोट्तांना हातावर उडून चटका लागला तिला आणि ती ताडकन भानावर आली.

मुलांना आवाज दिला. मुलांना कण्या ताटात वाढल्या,  तसा तिच्या मनातला कोलाहाला वाढला. निंबू काटलं आणि हाताला लागलं पण लक्ष नव्हतं, मीठ आणि मिरची खिचडीवर टाकतांना हाताला झोंबत होतं पण मनाला लागलेल्या तिखटापेक्षा कमीच होतं. मुलांनी मनसोक्त खिचडी खाल्ली तशी ती मनात तृप्त झाली दोन्ही मुलं मायच्या कुशीत निवांत झोपले. पण जयाच्या मनातला ज्वालामुखी पार तिच्यातच फुटत होता. तिला परत उद्या वाड्यावर जायचं नव्हतं पण पर्याय नव्हता. विचारात ती भावना शून्य झाली होती. तिच्या आंतरिक मनाचा केव्हांच खून झाला होता आणि शरीर बेसुध होवून मुलांकडे बघत होतं.

सकाळी अरुण उठला त्याला आई घरात दिसत नव्हती,  डोळे चोळत,माय माय करत तो बाहेर आला आणि बघून पार कोसळला. अंगणात असलेल्या कडूनिंबाच्या मोठ्या झाडाला त्याची माय लटकून होती. पोरं अनाथ झाली होती. लहानश्या अरुणला काही कळतही नव्हत, आईच्या पायाशी जावून तो रडला त्याच्या रडण्याने भावना उठली आणि तीही रडायला लागली, अरुण धावत शेजारी गेला आणि समोरच्या भानू दुकानंवाल्या काकाला घेवून आला.

सारी वस्ती नाराज झाली होती जयाच्या निर्णयाने. कुणी काही बोलत होतं तर कुणी काही, मिरची ठेकेदाराने गावात बोंब ठोकली होती ती वेगळीच. सांर गावं बोलत होतं पण मुलांना काय कळत होतं.

दोन निष्पाप जीवांना तर काहीच सुचत नव्हतं. भानू काका मदतीला होता तेवढच. अरुण बहिणीला कडेवर घेवून एका कोपऱ्यातून सांर काही बघत होता. मायच्या लटकलेल्या देहाला पोलिसांनी खाली काढलं आणि तो भावनेला घेवून धावला. तो रडत होता आणि त्याची बहिण भावना मायला बिलगून होती. भानुकाकाने दोन्ही पोरांना जवळ धरलं आणि बाजूला केलं.

पोलीस, नातेवाईक आणि सर्व येवून सहानुभूतीचे  तर काही तीरस्कारचे शब्द फेकून निघून गेले. बघता बघता माय माती झाली आणि सारच आटपून पंधरा दिवस झाले होती. दोघेच बहिण भाऊ घरात होती, कुणीही मदतीला समोर आलं नव्हतं. दया आली कि शेजारी पाजारी खायला काही आणून देत होते, पण आता तेही हळूहळू कमी झालं होतं. बहिण भाऊ भिंगरी खेळत आणि एकमेकाच्या कुशीत झोपत असत. भानू काका अधून मधून दोघांवर लक्ष म्हणून घरी येत, बायकोच्या लपून खायला देत असत.

मग अरुणने शाळा सुरु केली, रोज बहिणीसाठी खिचडी चोरून आणणं आणि तिला भरवणं त्याच काम झालं होतं. शाळेतली रोज मिळणारी खिचडी ह्यावरच ते दिवस काढत होते. आणि भिंगरी खेळत जगत होते. रविवार असला की भुकेने तडपडून जात असायचे. काहीवेळा तर तीन तीन दिवस उपाशी असायचे. समोरच्या भानू दुकानवाल्याला दया आली की तो बायकोला भीत भीत एखादा टोसचा पुडा द्याचा आणि त्याच्या सुट्या निघायच्या.

शाळा सुरु झाली की परत खिचडीवर जगणं सुरु होतं होतं. नंतर भानू काकाच्या मदतीने अरुणने भावनालाही शाळेत टाकलं, तीही शाळेत जायला लागली. रोज दोघेही भावंडांच खिचडी वर जगणं सुरु होतं. दोघही बहिण भाऊ मिळून एक डब्बा खिचडी रात्रीच्या जेवणासाठी वाचवून ठेवत असतं. दिवस खिचडीच्या वाटेवर उगवायचा आणि रात्र तिला खाऊन काढायचे.

पुढ काय काय होतं वाचायला विसरू नका...लवकरच पुढ्या भागात भेटूया.

©उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद!!!

सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव

Post a Comment

0 Comments