आयुष्य जगताना... १ ते ५

         ह्या आयुष्याचा उद्देश तरी काय
आयुष्य जगताना...

        ह्या आयुष्याचा उद्देश तरी काय

आपला ना जन्म आपल्या हातात असतो, ना मृत्यु. मग आपल्या हातात असते तरी काय?

जसे जन्माला आलो तसे ह्या जगातून एक दिवस निघून जाऊ. पुढच्या दोन पिढ्या फक्त आपलं नाव लावतील, त्यानंतर कुणी आपल्याला विचारणारही नाही. हळू हळू घरांच्या पाट्यांवरून लुप्त होत आपण कुठे तरी तहसील च्या कार्यालयात एखाद्या गाठोड्यात पडलेल्या जुन्या, धुळाने माखलेल्या फाईलमध्ये कुठल्यातरी कुजलेल्या पानावर तेवढं आपलं नाव राहील...

ह्या धरेवरून निघून जाताना तेवढे आपण लोकांच्या डोळ्यात पाणी देऊन जावू...तेही काही क्षणा साठी... हो ना?

जन पळभर म्हणतील, 'हाय हाय!' मी जातां राहील कार्य काय।।

सगे सोयरे डोळे पुसतील। पुन्हा आपल्या कामी लागतील।।

उठतील बसतील हसुनि खिदळतील। मी जातां त्यांचें काय जाय।।

असे सगळ्यांचे होणार आहे....  उगाच सत्याला शब्दांची जोड नकोच

खरच ना साहित्यिक भास्कर तांबे ह्यांच्या ह्या ओळी मनाला आरपार छेदून जातात.

करोडो जन्माला येतात आणि कुणाला न कळता मृत्युही पावतात. आता ह्या क्षणाला किती नवीन जीव ह्या धरेवर जन्माला आली असतील माहित आहे का?

अहो एका मिनिटाला जवळपास अडीचशे ते तीनशे बाळ जन्माला येतात संपूर्ण जगात. किती हा आकडा!

आता विचार करा मरण्याचा दरही जेमतेम एवढाच ना? मग कोण आलं आणि कोण गेलं हे कुठे कुणाला समजलं!

हे तर आपल्याला माहीत आहे जो जन्माला आलाय तो मरणार नक्की. अमृत कुठे कुणी प्राशन केलंय! मग ह्या जरा मरणाच्या मध्ये जो काळ आपल्या हातात आहे तोच ओळखून आपल्या अस्तित्वाचे कारण शोधावे आणि तसे जगावे तर ते जगणे नाहीतर ते जगणे काय!

ह्या महान भूतलावर आपण काय नुसते ये-जा करण्यासाठी तर आले नसू... काय?

मी जपान मध्ये आता सतरा वर्ष होतील राहत आहे. उगवल्या सूर्याचा देश बरं का जपान. पण गंमत बघा तिथे मावळणारे कमी आहेत. गडबड झाली ना समजण्यात. तसे नाही, अहो ह्या देशात लोकं लवकर अस्ताला जात नाहीत. अर्थात लवकर स्वत:ला गुंडाळून घेत नाही. जोवर स्वत:च्या अस्तित्वाचा उद्देश सिद्ध होत नाही तोवर शोध सोडत नाहीत आणि एकदा का तो गवसला की मग जगणे सोडत नाहीत. झाली ना डबल इनिंग! एक आयुष्य आपल्यांसाठी आणि एक आपल्यासाठी जगताना इथले लोक बघितले की मग मा‍झ्या मायभूमीची आठवण येते.

To be continues…

@topfans @followers

पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, लिंक कॉमेंटमध्ये आहे.

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

लेखाच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव...

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

 

 

 

आयुष्य जगताना...

२.      ह्या आयुष्याचा उद्देश तरी काय

सुरवातीला मी जपानी भाषा शिकण्यासाठी इथल्या मोफत केंद्रात जात असायची. त्या केंद्रात शिकवणारे आणि केंद्र चालवणारे सर्व साठ वर्षाच्या वर होते. तरीही त्यांचा उत्साह बघून मलाच कसे तरी होत असायचे. त्याचं बोलणं, त्यांचं आनंदी असणं, हसणं, विदेशी लोकांना संस्कृती समजावून सांगणं आणि समजून घेणं हे सारे काही ते मनातून करत असायचे. समोरच्या बद्दल मान आणि स्वत:चा स्व सन्मान जपत जीवनाचा आनंद अनुभवणारे वयस्कर त्या केंद्रात बघितले की वाटायचे हा देश प्रगत आहे. कारण इथले म्हातारे  प्रगत आहेत, त्यांना बघून प्रश्न पडायचा ह्या लोकांना ह्यांच्या सुना मुलांच्या चुगल्या करायच्या नाहीत का? त्यांच्या आजवरच्या आयुष्याला कोसायचे नाही का? स्वत:चा मोठेपणा मिरवायचा नाही का? यांना मान नको?

असो तो विषयच वेगळा आहे. त्यावर अर्धविराम देऊन पुढे जाऊया... कसं आहे ना विषय ओढला तर कुठल्या कुठे जाईल...

त्यातल्या त्यात जवळपास सर्वच वयस्कर मंडळी दिवसभर कुठे ना कुठे छोटी मोठी नोकरी करत असत, हे मात्र नवल. कुणावर अवलंबून नव्हतेच ते, आणि त्यांचा ह्यासाठी कुणावर आरोप नव्हता हे त्याहून नवल.

केंद्रात जाण्यासाठी मला दोन स्टेशन जावे लागत असायचे, म्हणजे रेल्वे वापरावी लागत होती. त्या दिवशी मी माझा वर्ग पूर्ण करून परत येत होते. शेजारी एक म्हातारा बसला होता. सहज माझ्याशी बोलला,

“कुठल्या देशातून आहेस तू?”

मी उत्तर दिले, “इंडिया !!”

आणि तो भारताबद्दल बोलू लागला, त्याला ताजमहाल माहित होता, त्याला मुंबई माहित होती. केरलाही त्याने मला वर्णन करून सांगितला, बोलता बोलता म्हणाला,

“तुझ्या आजोबाच्या वयाचा आहे मी.”

मलाही राहवले नाही मी सुद्धा वय विचारले, तर म्हणाला,

“नव्वद पूर्ण होती ह्या महिन्यात.

मी काही बोललेच नव्हते, मी तर नुसती पंचवीस वर्षाची होती. त्याच्याकडे बघून ते माझ्या वडिलांच्या वयाचा वाटले होते. आणि माझ्या आजोबांना ह्या वयाचे मी बघितले नव्हते.

मी विचार केला, माझ्या कडे तर एवढ्या वयाचा माणूस पलंगावरून उतरणार नाही. घरात बसून राहील जगला तर आणि घरात बडबड करत राहणार हे मात्र वेगळं. पण हे आजोबा तर आज गोल्फ खेळून आले होते. हे लोक एवढे जगतात तरी कसे हा प्रश्न मला त्यावेळी पडला होता. आज बऱ्याच वर्षाने इथली संस्कृती समजली, रहाणीमान जरा कुठे उमगायला लागले, इथल्या लोकांची जगण्याची कला कळायला लागली आणि मग प्रश्नांची उत्तर मिळणे सुरू झाले.

To be continues…

 

आयुष्य जगताना...

३.      ह्या आयुष्याचा उद्देश तरी काय

आता आयुष्याचा उद्देश म्हणजे नेमके काय. आपण लहान असतो तेव्हा पूर्णपणे आपण पालकांवर अवलंबून असतो. आपला स्वत:चा काही असा उद्देश नसतो. आईवडील जे करतील तेच आपल्यासाठी संपूर्ण असते. पण जसे जसे मोठे होत जातो आपल्या आयुष्यात लहान लहान उद्देशांच्या पायऱ्या आपण चढत जातो. उद्या काय करायचे आहे हे जवळजवळ निर्धारित असते, अभ्यासात उत्तम असलो तर मार्ग मिळत जातो आणि आपण तसे घडत जातो. अभ्यासात भोपळा असलो तर मग तसे मार्ग आपण काढतो पण जगणे सोडत नाही. लग्न झाले तर मग जोडीदाराशी जुळवून घेण्यात, नाती जपण्यात आयुष्याचा काळ धावत असतो. मग मुलाचं करण्यात आपल्याला आपला जीवनाचा उद्देश दिसतो. तारेवरची कसरत असते आई वडीलांची. आई सकाळ पासून तर रात्रीपर्यंत घडीच्या काट्यांवर धावत असते तर पिताही मुलांच्या भविष्यासाठी तेवढाच तत्पर असतो. तरीही ते दिवस आयुष्याचे सोनेरी दिवस असतात कारण चंदेरी केसांची चाहुल नसते.

मुलं मोठी झाली कि मग त्यांच्या कॅरिअर मध्ये व्यस्त होतात. हळू-हळू आईवडीलांची जागा जोडीदार घेतो आणि आई वडील परत मुलांमध्ये स्वत:ला बघत व्यस्त होता. अश्यातच मग चंदेरी केसांची चाहुल लागते आणि कधी वयाची पन्नासावी येवून ठेवते कळत नाही. हल्ली तर पंचवीस तिशीत चांदीचे केस दिसतात पण खरी चाहुल तर त्याच वयात असते. असो!!!

आता आधी सारखे चाळिशीच्या उंबरठ्यावर असे काही नाही बरं का, कारण आजकाल लग्नच मुळी तीस पस्तीस वर्षात होते मग मांडा गणित! सगळा संसाराचा गाडा ओढता ओढता होतोच पन्नास पंचावण वर्षाचे. बघता बघता मग साठावी लागते, ह्यातही काही जवळचे दूरचे गळायला लागतात. मग ओढाताण सुरू होते ती आरोग्याची...

किती हा प्रवास... ह्यात कुठे आपल्याला आपल्या साठी वेळ मिळतो... आणि जेव्हा वेळ मिळतो तेव्हा काहीच नाही आपल्याकडे करायला हे उगाच मानत येत असते... आणि ह्याच विचारात आयुष्यात खूप काही करायचे राहून गेले ह्या भावनेत मृत्यूचे आमंत्रण आपण स्वीकारायला तयार असतो...

कदाचित जगता जगता आयुष्य आपले आपण आपल्याला शोधणे विसरून जातो आणि मग जगण्याचा उद्देश गवसणे कठीण होते...

आपण आयुष्यात अनेक स्वप्न बघतो पण तेच स्वप्न जाण्याची कला गवसणे म्हणजे आयुष्याचा उद्देश हो...

आता जास्त दिवस जगणारे करतात तरी असे काय असा विचार मनात आला असेल ना...

अहो त्यांच्या कडे जाण्याचा उद्देश असतो, तो पूर्ण करण्यासाठी ते जगतात, मनातून जगतात आणि आयुष्य परिपूर्ण जगतात...

आता तो उद्देश शोधायचा कसा हा प्रश्न पडला ना....

यामामोतो सानला मी सतारा वर्षाआधी भेटले होते. यामामोतो तिचे नाव, आता सान म्हणजे सरनेम नाही, तर श्रीमान/श्रीमती असा अर्थ होतो.

जपानला नावामागे सान हा शब्द लावतात, आता इथे स्त्री पुरुष असा भेद नाही बरका... स्त्री किंवा पुरुष एखाद्याला संबोधतांना ते सान हा शब्द लावतात. अर्थात त्यांना मान देवून बोलल्या जाते उलट ह्यात लहान मोठं असं काही नाही. फक्त लहान मुलं सोडली की  सगळे ह्या सान शब्दाच्या जाळ्यात आले. ह्या सानच्या घोटाळ्यात मला तर त्या व्यक्तीला परस्पर भेटल्या शिवाय समजाचे नाही कि ती व्यक्ती पुरुष आणि कि स्त्री, म्हणजे अजूनही समजत नाही. पण चालायचं...

To be continues…

@topfans @followers

पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, लिंक कॉमेंटमध्ये आहे.

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

लेखाच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव...

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

 

 

आयुष्य जगताना...

४.       ह्या आयुष्याचा उद्देश तरी काय

यामामोतो सानला पहिल्या भेटेत मी चाळीसच्या जवळपास समजले होते. चेहऱ्यावर मेकअप, केसांचा कट, पायात हिल्स, शॉर्ट घालून माझ्या जवळ आली होती ती. तिच्या गोऱ्यापान सुंदर रेखीव रुपासमोर माझी पंचिसवी पार पडली वाटली होती मला. ती मला जपानी शिकवणार होती. पहिल्या दिवशी दिलखुलास गप्पा केल्या आम्ही. तिला जरा इंग्रजी येत असल्याने मला हायस झालं होतं. बोलता बोलता मला तीचं तिने वय सांगीतलं, मला तर धक्का बसला होता. ती त्या वर्षी साठची होणार होती.

तिला भारतीय संस्कृतिबद्दल जाणून घ्यायचे होते आणि मला जपानी. मग काय जमली आमची मैत्री. त्या वयात तिला माझी मैत्रीण होणे आवडले होते हेच मला नवलाचे वाटत असायचे .मैत्री मध्ये वायचे बंधन नसते हे आपल्याला माहीत आहे पण तरीही... आता पंचवीस वर्षाच्या बाईच्या गोष्टीत आणि तिच्या विचारात फरक असायला हवा होता पण मला कधीच तीचं वय आमच्या बोलण्यात आलं असं वाटलं नाही.  मलाच वाटायचं हिला जाणून घायचं असेल आपल्या संस्कृतिबद्दल, आपल्या बद्दल म्हणून जवळ येते, पण तरीही आपल्या भारतीय संस्कृतिची साठ वर्षाची बाई मला काय करायचं ह्या विचारात नवीन काही जाणून शिकण्याची आवड ठेवेल असं तरी मी अजून बघितलं नव्हतं. काय तर उठ बस करत एवढ्यात वयात मिळालेला अनुभवातून नको असलेले सल्ले  देणे हे आपल्याकडे मस्त जमतं. त्या वेळी मीच नवीन होते जपान मध्ये, म्हणून विदेशी असेच असावेत ह्या विचारात मीही कधी त्या विचारात पडले नाही. तिच्या वागण्या बोलण्याच नवल वाटत असायचे पण मी कधी ते मनात आणून विचारात आणलं नाही. त्या वयात काय आपण विदेशात राहत आहोत हेच मला भारी वाटत असायचे.

ती मला जपानी शिकवत असायची. हळू हळू ती खुलायला लागली की मी हे तर मला सांगणे आजही कठीण. मलाही तिच्याबद्दल खूप काही माहीत झाले होते. ती एकटीच राहत होती. नवऱ्याने सोडले होते तिला तीस वर्षा आधी. मुलगी लग्न होऊन टोकियोत राहायला होती. आता हीच कसं चालत असेल असा प्रश्न मला पडत असायचा पण आपली जपानी भाषेची बोंब, काय विचारता, आपण विचारायच एक आणि ती समजून काहीतरी वेगळं सांगायची असं होणार हे नक्कीच होतं. तरीही त वरून ताकभात असा माझा प्रवास सुरू झाला होता. सहा महिन्यात थोडीफार तुटक तुटक तर जपानी शिकले होते.

ती एवढं भरभरून आपल्या देशाबद्दल बोलायची. मी एक दिवस तिला घरी जेवायला बोलवायचे ठरवले, क्लास संपला आणि मी तिला आमंत्रण दिले, तिच्या सोबत तिची मैत्रिण सुद्धा सोबत होती. तिने मला तिच्या मैत्रिणीला सोबत आणू का असे नक्कीच विचारले असणार हे निश्चित पण मला कुठे एवढी जपानी येत होती. मी कधी हो बोलले मला माहीत नाहीच.

त्यात घरी आल्यावर अहोला सांगितलं तर ते म्हणाले की जपानी लोक असे घरी येत नाहीत, बाहेर भेटणे त्यांना योग्य वाटते. त्यांना तर माझ्या जपानी भाषेवर शंका होती की मी खरच त्यांना घरी बोलावले की काय बोलले. शेवटी त्यानाही अजून जपानी लोक कुठे उमगले होते. सोबत काम करणारे लोक कामपूरते बोलणारे आणि कसे समवयीन जास्त मग त्यांनी माझी काही खूप जास्त टांग खेचली नाही. आता तर मलाही मनात चुणचुण लागून राहिली होती की याममोतो सान येणार की नाही ह्याची.

To be continues…

@topfans @followers

पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता. लिंक कॉमेंटमध्ये आहे.

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

लेखाच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव...

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

 

 

 

 

 

आयुष्य जगताना...

५.      ह्या आयुष्याचा उद्देश तरी काय

यामामोतो सान आणि इचीरो सान दोघीही घरी वेळेवर पोहचल्या होत्या. हे मात्र कौतुकास्पद होतं. मी दुपारच्या जेवणचा वेळ दिला होता. त्यांनी अगदीच जसे मोठ्या आणि छोट्या घडीच्या काटयांचे मिलन बारावर झाले त्यांनी बेल वाजवली होती. नाहीतरी आपण बाराला बोलावले तर घरून बाराला निघतो. वेळ पाळणारे लोक उगवत्या सूर्याच्या देशात राहतात असे म्हणायला हरकत नाही.

भारतीय जेवणं तयार केले होते मी, नवल होतं त्यांना, तश्या त्या दोघी भारतीय जेवण रेसट्रोरेंट  मध्ये जेवून होत्या. पण तिकडे भेटतो तो नान आणि घरच्या जेवणात असते ती चपाती, कदाचित त्यांनी नान कसा बनवतात हेही बघितले असावे, मग त्या मला रेसिपी विचारायला लागल्या होत्या चपातीची,  आता ती सांगणे मला अवघड झाले होते आणि एवढी इंग्लीश त्यांना समजणे कठीण. आणि अहोने तर सारं माझ्यावर सोडून घरातून पळ काढला होता, त्यांची कधी नव्हे ती क्रिकेटची मॅच होती.  मग काय कणिक मळली तेही डिस्पोजेबल  प्लॅस्टिकचे हॅन्ड ग्लोज वापरुन पहिल्यांदा आणि चपात्या सुरू केल्या. तसे त्यांच्याशी बोलायचे काय हा प्रश्न मला होता पण कदाचित त्यांना नव्हता. दोघींनी चपात्या बेलत गप्पा केल्या. त्यांनाही कदाचित नुसतं जेवायलाच आलोय असे वाटले नसणार.

आता ती चपाती भाजीसोबत खायची कशी हा प्रश्न मी त्यांच्या चेहऱ्यावर बघितला होता. त्यांना शिकवता शिकवता मी दोन चपात्या फस्तही केल्या. मी त्यांना समजवून  सांगत  होते आणि त्या कशी खायची हे शांतपणे समजून घेत जेवल्या. त्या वयात तिची नवीन काही शिकण्याची जिद्द मला तेव्हाच खूप काही शिकवून गेली होती पण पंचवीस वर्षात कुठे काय समजतं हो! मला तिला चपाती हाताने खाता येत नाही ह्याच नवल जास्त होतं. त्यात मला चोपस्टीकने त्यावेळी खाता येत नव्हते हे मी विसरले होते. मोठ्या मिजासात तिला शिकवत होते आणि ती शिकत होती. भाजी चपाती अगदीच मान देत तिने तिच्या परीने पूर्ण प्रयत्न करून आनंदात खाल्ली होती. आठवलं की वाटते की चपाती खाण्याची एवढी पद्धतशीर पद्धत अजूतरी मला दिसली नाही. पूर्ण अभ्यास करून आल्या होत्या त्या घरी.

आजही तो त्या डायनिंग टेबल वरचा प्रसंग आठवला आणि तिने त्या दिवशी भेट दिलेलेली जपानी पद्धतीची लाकडांची सुरेख नक्षीकाम केलेली प्लेट मी काढून डायनिंग वर ठेवली, की सारं काही मनात सहज हिरवं होतं. मनाला वाटते किती बावळट  होते मी. मला किती किती येतं हे दाखवण्याचा बावळटपणा मांडला होता मी. स्वत:च कौतुक करवून घेण्याची हौस चढली होती.

जेवून त्यांना आनंद झाला होता. माझ्या घरून गेल्या नंतर तिला कामासाठी जायचे होते. एका दुकानात ती दोन तास काम करणार होती. नंतर समजलं की ती माझ्या घरी येण्या आधी सुद्धा सकाळी दोन तास काम करून आली होती. उलट तिच्या सोबत आलेली इचीरो सान तिच्या नवऱ्या सोबत राहत असायची. तिला काहीच कमी नव्हती. तिला परकीय संस्कृति जाणून घ्यायला आणि त्यावर अभ्यास करायला आवडत असे म्हणून काय ती त्या केंद्रात विदेशी पाहुण्याना शिकवायला होती. दोघींच्या बोलण्यात मला तुलना दिसली नाही की काही, एवढी शुद्ध मैत्री वाटत होती ती. यामामोतो सान जशी तिच्या साठी आनंदी होती तशीच ती स्वत: साठी सुद्धा होती. माझ्या मनातील विचारांचे चक्र तेव्हाच फिरले होते पण तरीही त्या दोघींनी त्या विचारांच्या चक्रावर जणू थाप मारली होती. 

बोलता बोलता यामा मोतो सान मला तू लकी आहेस असं बोलली. पण मला ती कीती लकी आहे हे कळायला पंधरा वर्ष लागली, आज आयुष्याच्या ह्या वळणावर वाटते मी कधी यामामोतो सेनसेई सारखी त्या वयात नवीन सुरवात करू शकेल का? आणि वाटतं जर केलीच नाही तर मग मी काय शिकले तिच्या सहवासात.

 

आयुष्य जगताना...

६.      ह्या आयुष्याचा उद्देश तरी काय

इकडे जपानी लोकांच आयुष्य सुद्धा आपल्या सारखं कष्टमयच असतं, त्यांनाही निसर्गाने सगळं काही आपल्यासारखं दिलं आहे पण तरीही ते आनंदी जगतात हे कोडं मला आता कुठे कळत आहे...

त्या दिवशी यामामोतो सान कडून तिच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्याची संधी मला मिळाली होती. प्रगत देशातील जोडपं आणि दोन टोकाच्या विचारांची माणसं एकत्र आल्यावर जे होतं तेच तिच्या संसारात होत होतं. शिक्षण जेमतेम असल्याने नवऱ्याने टाकलं तर वाट लागणार हे तिला माहीत होते. पण त्याच्या सोबत राहणे असह्य झाले आणि तिने सोडचिट्टि घेतली. शिक्षण तीचं जेमतेम, म्हणजे प्रगत देश असला की लोकं काय डॉक्टर आणि इंजिनियरच नसतात हो. इकडे दहावी बारावी पास अंशी टक्के लोक मिळतील. आणि म्हणूनच काय ती बेरोजगारी नाही इकडे. अर्थात प्रत्येक कामाला महत्व आहे. जावूद्या काही नाही इकडे जरा लोकं प्रॅक्टिकली विचार करतात. आपल्या आवडीचा व्यवसाय करतात आणि मजेत जगतात. असो!!

 

यामामोतो  सान मुलीला शिकवले आणि मुलीने तिच्या पसंतीच्या मुलाशी लग्न केले. ती सुखात होती. आता यामामोतो एकटी पडली होती. मिळेल ते काम  करत ती आयुष्य काढत होती.  तिच्या नजरेत तिच्या भावनेत कधीच कुणासाठी आरोप नव्हता, मुलीने तीचं करावं हा भाव तर मला  तिच्या शब्दांत कधीच जाणवला नाही. तिच्या मुलीच्या वयाची होते मी म्हणूनच काय की तिला माझ्याशी बोलायला आवडत होते. तिच्याशी बोलताना एक वेगळीच मनात ऊर्जा निर्माण व्हायची.

बोलता बोलता मला ती बोलली होती, तिला शिकायचे आणि शिकवायचे होते, पण आयुष्याच्या धक्का बुक्कीत नाही जमले, आता साठ वर्षात तिने स्वत:ला सेनसेई म्हणून स्वत: साठी उभ केलं होतं. सेनसेई म्हणजे शिक्षक, इथेही स्त्री पुरुष भेद नाही. शिक्षक शिक्षका असे काही नाही, सगळ्यांना सेनसेई असाच मान. असो!!

आता ती जपानी गवर्नमेंटने योजलेल्या उपक्रमातून विदेशी लोकांना जपानी शिकवायची, तेही विनामूल्य, आहे ना स्तुतिपर. ह्या वयात तंगीत दिवस काढूनही स्व खर्चाने केंद्रात येवून विदेशी लोकांना भाषा आणि संस्कृति शिकवणे हयात तिला आनंद मिळत होता. आयुष्याच्या पहिल्या इनिग मध्ये राहून गेलेली स्वप्न परत नव्याने जगत होती ती. ओठावर कधीच शब्द नव्हते, की मनात खंत. होती ती राहून गेलेल्या सर्व स्वप्नांची पूर्ति करण्याची इच्छा आणि जिद्द. परकीय लोकांना आपलेसे करत त्यांना जपानी शिकवण, देशासाठी काम करणं आणि आनंदी राहणं हा तिच्या जीवनाचा आता एकमेव उद्देश होता. सारं काही मागे टाकलं होतं तिने तरीही भूतकाळातून शिकून पुढे जात होती.  


Post a Comment

0 Comments