मी आधुनिक सावित्री आहे.


 


आराध्याची पाहिलं वटपौर्णिमा, घरात अगदीच सुंदर वातावरण, सासू तशी खमक्या स्वभावाची पण चालवून घेणारी कारण सून लाडाची होती तिच्या. अनिकेश तिला लग्नाच्या तब्ब्ल १५ वर्षाने झालेला. मग त्याचंच लग्न सर्व घराण्यात उशिरा झालेलं. सासू प्रत्येकाच्या सुनीच कौतुक बघून होत्या आणि आता तिच्या सुनेची पहिली वटपौर्णिमा येवून ठेपली होती.

आराध्या पेक्षा सासूलाच नवल होतं सुनेच्या पहिल्या सणाचं. तसं अनिकेशच लव्ह कम अरेंज लग्न, आराध्या MBA , आणि नौकरी शोधत होती. उद्या वटपौर्णिमा म्हणून सासू खूप हौसेने सर्व करत होत्या. दुपारी सासूची मैत्रीण घरी आली, आराध्या काकूंसाठी चहा घेवून आली आणी तिथेच बैठकीत मॅगझीन चाळत बसली,.

काकू तिला म्हणाल्या, "काय सुनबाई पहिली वटपौर्णिमा ना? तुला तर जन्मो जन्मी हाच नवरा हवा असेल! नाही का? "

सासू आणि काकू हसायला लागल्या.

आराध्या अगदीच मॅगझीन मधून डोकं बाहेर काढत म्हणाली, "नाही रे बाबा ! एक जन्म पुरा कि एका माणसासोबत, पुढचा जन्म वगैरे मला माहित नाही. ह्याच जन्माची सोबत सुंदर असू देत." सासू आणि काकू दोघीही परत हसल्या आणि काकू परत म्हणाल्या, "मग काय दीर्घ आयुष्यासाठी कर, त्याच्या प्रगतीसाठी कर, कर कि मौज मस्ती!"

आराध्या मॅगझीन बंद करत म्हणाली, "दीर्घ आयुष्यासाठी वडाला प्रदक्षिणा मारू? आणि त्याच्या प्रगतीसाठी मी उपवास करू? हे तर अनिकेशनेही करावं ना माझ्यासाठी. त्याला नकोय का मी सुधृढ आणि दीर्घ आयुष्यवत्ती?"

सासू आराध्याच्या गालाला हात लावत म्हणाल्या, "बाळा, आपली परंपरा आहे हि, तुला बाहेर जायच नसेल तर मी घरी आपल्या बागेत सर्व तयारी करून देते ना ..." मग त्या काकूंशी बोलायला लागल्या, "मग काय? माझी एवढी नाजूक, सुंदर सून ह्या गर्मीत कशाला जाईल? आता सांगते ह्यांना येताना वडाची फांदी तोडून आणायला."

आराध्या हसली, "आई, काहीपण! पण मी वटपौर्णिमा करावी! नाही? माझा सक्त  विरोध आहे असं फांद्या तोडायला?"

काकू तिला उत्तेजित होवून म्हणाल्या, "अग, कर कि! मस्त जरीकाठाची साडी घाल, लग्नातले दागिने घाल, तुला असं नटलेले बघून अनिकेश परत प्रेमात पडेल कि तुझ्या." आणि मग सासूने काकूला टाळी दिली.

आराध्या जरा लाजलीच आणि म्हणाली, "हे आवडेल मला करायला पण त्यासाठी मी हाच दिवस का निवडू? माझा वाढदिवस आहे आणि अनिकेशचा लवकर येतोय. तेव्हा करेन ना असं. नुसत्या त्या वडाच्या झाडाला प्रदक्षिणा/फेऱ्या मारण्यासाठी एवढा नट्टा करण्याची काय गरज? खरं तर वडाच्या झाडाला मी कधीही प्रदक्षिणा मारू शकते आणि मारायला पाहिजे. मी लहापानापासून बघते आहे, वर्षभर त्या झाडाकडे कुणी ढूंकूनही बघत नाही आणि ह्या दिवशी चक्क नटून त्यालाच हळदी कूंकुवाने नटवतात. वडाच्या झाडाखाली ऋषी मुनी बसायचे ते त्यापासून मिळणाऱ्या स्वच्छ आक्सिजन मुळे, त्याच्या दाट सावलीत मन शांत करायला आवडेल मला, वडाच्या पारोम्ब्या जमिनीला येवून भिडतात आणि परत नवीन वृक्ष तयार होतो. किती शिकण्या सारखं आहे त्या झाडापासून पण त्यासाठी त्याला धाग्याने बांधणं... पटत नाही."

सासू अगदीच अगतिक पणे म्हणाल्या, "ते तुझं काय माहित नाही, सर्व करता आपणही करायचं, एक दिवसाची गोष्ट ती, आपल्या नवऱ्यासाठी एवढं तर करूच शकतो, सावित्रीनं तर नवऱ्यासाठी यमाशी भांडण केलं होतं. आणि तिचाही नवरा तिची स्वतःची पसंत होताच कि! तिने नवऱ्यासाठी काय काय नाही केलं! आपण साधी पूजा करू शकत नाही का ?"

आराध्या हसली, "आई मी सावित्री नाही, आणि सावित्रीला माहित होतं सत्यवान मरणार आहे ते, आणि कदाचित तिला तेच करता येत असेल त्या काळानुसार. आताच्या युगात कोण कधी जाणार हे माहित नसतं आणि यमाला कुणी बघितलंय. मी आधुनिक सावित्री आहे. मी खूप काही करू शकते माझ्या नवऱ्यासाठी."

"आता मला वडील नाही, माझ्या आईने वटसावित्री केली नसेल का ? आईला बाबांच्या हातून मार खाताना बघायची ना तेव्हा आईला खुप बोलत होते मी, कि ती हे उपवास का करते म्हणून, जेव्हापासून कळतं  होत तेव्हापासून आईशी सतत भांडत होते मी कि, बाबांना  नशा मुक्ती केंद्रात घेवून जावूया म्हणून. आधुनिक सावित्रीच हे व्रत तू कर असं म्हणून म्हणून थकले होते मी. एवढं सगळं करून जन्मो जन्मी हाच नवरा मिळावा ह्यासाठी तिची धडपड मला बघवत नव्हती. आठवीत असताना वडील वारले माझे, आणि आईने कायमचा अबोला धरला, भावाने घरं सांभाळल. पाठ्वणीच्या वेळेस आई फक्त एवढं बोलली, आधुनिक सावित्री हो. महान सावित्री होवू नकोस, ती तर तिच्या सुनेलाही वटपौर्णिमा करण्याचा आग्रह करत नाही. माझ्या दोन्ही वहिन्या त्यांना जमलं तर करतात एक हौस आणि कॉलोनीतल्याच सर्व बायकांना भेटण्यासाठी म्हणून...नाहीतर करतही नाही. माझे भाऊ माझ्या वहिन्यांना त्या आधुनिक युगातल्या स्त्रिया आहेत आणि त्याच्या कडे अनेक मार्ग आहेत स्वतःला सिद्ध करण्याचे असच सांगत असतात. आणि तोच गुण मला अनिकेश मध्ये दिसला, म्हणून मला तो आवडतो .."

"त्याच्यासाठी मला जगायला आवडेल, त्याची काळजी घ्यायला आवडेल, त्याच्या मागे नाही त्याच्या सोबत उभं राहायला मला आवडेल, तो चुकला तर त्याला थांबवायला आवडेल, त्याची सल्लागार व्हायला आवडेल. त्याच्या वंशाला वडासारखं नवीन नाती वाढवत बहरवायला आवडेल. पतिव्रता नाही तर अर्धांगिनी व्हायला आवडेल. मला सावित्री नाही... आधुनिक सावित्री व्हायला आवडेल .. आणि मुख्य म्हणजे मला ते रोज करायला आवडेल...त्यासाठी एकच दिवस का ? मला त्याला रोज प्रेम करायला आवडेल..."

सासूने तिच्या डोक्यावर हाथ ठेवला आणि काकू निशब्द होवून तिला बघत राहिल्या, त्यांना स्वतःची नवऱ्याने टाकलेली मुलगी आठवली, जिने लग्नाआधीपासूनच हे व्रत मोठया उत्साहाने केलेलं पण नवऱ्याची आधुनिक सावित्री बनू शकली नव्हती. 

सासू जरा हिरमुसल्या होत्या पण आराध्याच म्हणणं पटलं होतं त्यानां, कुठेतरी व्रत वैकल्य करण्यात खरी सावित्री बनणं राहून गेलं होतं त्याचं. नवऱ्याला डॉक्टरांनी शेवटची वॉर्निंग देवूनही ते गुटखा सोडत नव्हते आणि सासू त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाला प्रदक्षिणा मारत होत्या, नेहमी पूजा करत असायच्या पण आज त्यानीं सुनेचं बोलणं ऐकून आधुनिक सावित्री होण्याचं ठरवलं होतं.

दुसऱ्या दिवशी सासूने छान तयारी केली आणि साऱ्यांना आवाज दिला, सासऱ्यांना वाटलं कि सासूबाई नेहमीप्रमाणे त्या मागच्या वडाच्या झाडाची पूजा कण्यासाठी जात असणार आणि त्याना स्कुटरने सोडून मागत असणार. पण आज सासूने टॅक्शी मागवली होती. हे पाहून सासरे दचकलेच. 

सासू म्हणाल्या, "मी आधुनिक सावित्री व्हायचं म्हणते! चला, बसा टॅक्शीत, अपॉइंटमेंट आहे डॉक्टरांची, गुटखा बंद करायचा आहे तुमचा, सारखे खोकलत असता. नातवांना खेळवायचं आहे कि नाही तुम्ही असे जोर जोराने खोकललेना तर नातू जवळ यायचा नाही तुमच्या. आणि मग सून बाईला परत दोष देत फिरणार आपण, मुलाला जवळ येवू देत नाही म्हणून."

आराध्या आणि अनिकेश खोलीतून बाहेर आले, आराध्याला सुंदर सासूने आणलेल्या साडीत बघून सासू खुप खुश झाल्या, आणि तिला म्हणाल्या, "सुंदर दिसते आहेस, पण तुला अगदीच मी म्हणते म्हणून वटपौर्णिमा करण्याची गरज नाही."

त्यावर अनिकेश म्हणाला, "आई मी माझ्या सावित्रीला माझ्या नवीन प्रोजेक्टच प्रेझेंटेशन साठी घेवून जातोय आणि मला खात्री आहे ह्या सत्यवानासाठी ती हे उत्तम करेलच. आणि हा... आम्ही दुपारी बाहेर जेवणार पण रात्री तू तोच स्वयंपाक शिकव हा आराध्याला जो तू नेहमी ह्या दिवशी करते, मला आवडतो तो."

आराध्या घरातून निघतांना सासूला म्हणाली, "आई मी वडाच्या झाडाची रोप घेवून येईल आपल्या घराच्या बाहेरच्या रस्त्याच्या कडेला लावूया आपण. नाहीतर आपल्या समोरच्या पिढीला वडाच्या झाड कळणारही नाही. त्याला वाढवताना वडाच्या झाडाखाली फिरावं हे शास्त्रीय कारणही सिद्ध होईल आपलं आणि हा, वडाकडेही जावून येईल संध्याकाळ पर्यंत, खूप घाण झाली असते, एखाद्या झाडाला स्वच्छ करण्याचं मनाला समाधान मिळेल आणि तुमचा हेतूही सिद्ध होईल कि तुमच्या सुनेने तुमच्या मुलासाठी वडाला पुजलं पण जरा वेगळ्या मार्गाने आणि मलाही त्या वडाखाली रमतांना अनिकेशवरच  प्रेम त्या वडाच्या झाडासारखं गर्द आणि भव्य करण्याची प्रेरणा मिळेल "

दोघेही स्मित हसल्या आणि मग आराध्या स्वतःची साडी आवरत सासूच्या आणि सासऱ्याच्या पाया पडली. 

आजची आधुनिक सावित्री आपल्या सत्यवानाला घेवून निघाली होती प्रगतीच्या मार्गावर आणि सासूला पक्की खात्री झाली होती सुनेवर. मागेच त्याही सासऱ्यांना घेवून दवाखान्यात निघून गेल्या आधुनिक सावित्रीच व्रत पूर्ण करण्यासाठी.....

वटसावित्रीच व्रत करावं कि नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न.. प्रत्येकाचा हेतू वेगळा असू शकतो पण एक सावित्रीच पौराणिक व्रत करतांना आधुनिक सावित्री व्हायला कधीच विसरू नका.. 

माझ्या नवीन लेख/कथेसाठी पेजला लाईक करायला विसरू नकाच https://www.facebook.com/manatlyatalyat ..  

पेज लाईक करायला इथे क्लिक करा. मनातल्या तळ्यात

©उर्मिला देवेन

धन्यवाद!!

--------------------------------------------

सदर लेखाच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.

Post a Comment

0 Comments