आठ दिवसापासून सुमंतच्या आईची सारखी किरकिर सुरु होती,
"मी काय बायको नव्हतेच काय? जिथे तिथे बायकोला घेवून जाण, तिच्यासाठी नवनवीन वस्तू घेणं, एखाद आईसाठी आणावं ना, आशीर्वाद लागतील माझे, जरा तिला काही बोललं तर राजाची स्वारी आमच्याशी भांडायला तयार, मी पण नवी नवरी होते ना .. काय हो?"
सुमंतचे बाबा पेपर मधून डोकं बाहेर काढत, "हो..हो .. नक्कीच तू पण सून होतीसच ना? काय बोलावं आजकालच्या मुलीनां?"
आई, "मग काय ? जेव्हा तेव्हा बायकोचा वकील बनून तयार होतो, मला सांगतो मोठं मोठ्या गोष्टी, उगाच बोलत जावू नको म्हणे तिला."
बाबा, "हो ना, मी तर असं नाही केलं... नाही? .. आईशी भांडलो नसतो तर तुझं अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण झालं असतं? दोन लेकरांवर ऑपरेशन केलं नसतं तर निदान माझ्या आईची नातीची इच्छा अपूर्ण राहिली नसती, बिचारी माझी आई तशीच गेली देवाघरी .... आईचा रोष पत्करून तुला कामात मदत केली नसती तर तू नौकरी करूच शकली असती? तुला माझ्या वागण्याचा खूप अभिमान होता... नाही का ग"
बाबा अगदीच हिरमुसल्यागत, "माझंच चुकलं... माझंच अनुकरण करतोय हा सुमंत."
मग बाबा हात जोडत, "माफ कर मला"
आई, "अहो हे काय? मला असं..."
बाबा तिचं न ऐकता, "काय नाही ग...पश्चाताप होतोय मला, जीव कासावीस झाला तुझे हाल बघून..."
असं म्हणत बाबा खोलीत जावून निवांत बेडवर आपण खुपच स्वतःवर नाराज आहोत असं दाखवत पडून राहिले. तेवढ्यात सुमंत आणि शशी बाहेरून हसतच आत आले. आल्या आल्या सुमंत आईच्या हातात गरमागरम जिलेबीचा पुडा देत म्हणाला,
"माझ्या गोडश्या आईसाठी गोड गोड जिलेब्या"
आणि तो किल्या हलवत त्याच्या खोलीत शिरला. थोड्याच वेळात शशी खोलीतून बाहेर आली आणि स्वयंपाक घरात कामाला लागली, सासूबाईने फक्त भात मांडून ठेवला होता, शशी फ्रीजच दार उघडत म्हणाली, "भाजीला काय करायचं आई? मला तर काही सुचतच नाही."
तेवढ्यात सुमंत स्वयंपाक घरात आला आणि म्हणाला, "अरे... आईने भाजी केली नाही!!"
" काय आई...वाटलं होत तुझ्या हातची भाजी... खायला भेटेल ... हमम.. आता खूप वेळ झाला ...पाटवळ्या नाही बनणार ..",
मग शशीला बोलत, " ये शशी ,चपात्या टाक पटपट ,मी ढाब्यावरून भाजी घेवून येतो. बाबांना खूप आवडते तिथली चव."
आज मात्र सासूबाई गप्प होत्या, गुमान जेवून खोलीत गेल्या. खोलीत शिरल्या शिरल्या, बाबा लगेच बोलले,
"बघ ना, बायकोला त्रास होवू नये म्हणुन भाजी बाहेरवून आली आज... अजून पुढं काय बघायचं बाकी आहे कुणास ठाऊक? परमेश्वरा किती चुकलं रे माझं... हि चूक कशी सुधारू मी आता."
सासूबाई मात्र गुमान झोपल्या, त्यांनी अबोलाच धरला होता बाबांशी, दुसऱ्या दिवशी सकाळी बागेत काम करतांना आईच्या बोटाला इजा झाली, बाबा पटकन धावत आले आणि बोटाला फुंकर घालू लागले आणि हळूच म्हणाले, "बर का ... आमची आजही तेवढीच नजर असते तुमच्यावर... आजही तेवढंच प्रेम आहे आमचं, अगदी तुम्ही सासूबाई झालात तरी."
तेढ्यात शेजारचे गुरुजी बडबड करत गेट मधून आता आले, आणि सुमंतवर ओरडायला लागेल, "तुला तुझी गाडी बरोबर चालवता येत नाही का रे? माझ्या मुलीची रांगोळी मिटवलीस. "
त्यावर सुमंत घरातून बाहेर येत म्हणाला, "अहो काका, रांगोळीवरून गाडी घेतली नसती तर तुमची नातं गाडीखाली आली असती. ती रस्त्यावर खेळत होती"आणि आत निघून गेला.
मग आई बोलल्या, "काय गुरुजी? उगाच कारण माहित नसतांना कुणावरही ओरडू नये."
आणि गुरुजी जाताच म्हणायला लागल्या, "काय आहे हे? उगाच कारणाच्या तळाशी न पोहोचतो कांगावा करतात लोक. माझ्या मुलावर असा कुणी आरोप केला ना तर तळ पायाची आग मस्तकात जाते माझ्या. माझा मुलगा असं काही करणारच नाही."
मग सासरे आईकडे बघतच बोलले, "जावुदेना, सुमंत आणि गुरुजी बघून घेतील. तू कशाला मध्ये बोलतेस?"
आई जोरात, "असं कसं?, माझ्या मुलाच काहीच चुकत नसतांनी ते गुरुजी उगाच किरकिर करणार आणि सर्व कॉलोनीत तसंच सांगणार आणि सगळे माझ्या लेकाबद्दल गैरसमज करून घेणार. मला काही करायचं नाही म्हणजे, माझं प्रेम आहे त्याच्यावर, त्याला उगाच कुणी बोललेलं आवडणार नाही मला."
आणि आता सासरे हसायला लागले आणि मिश्कीलपणे बोलत म्हणाले, " ग राणी, हेच सांगतोयना ना तुला मी, कि तुही कारण माहित नसतांना जेव्हा सुनबाईला उगाच किरकिर करते ना तेव्हा सुमंत तुझ्याशी ह्याच तिच्यावरच्या प्रेमापोटी बोलतो... कळलं?
कारण त्याच प्रेम आहे तिच्यावर. आणि ह्यासाठी आपल्याला नाराज नाही तर आनंदी राहायला हवं. ते दोघे एकमेकांचे पूरक होतील तेव्हाच ह्या घराला शोभा येईल...."
बाबा आई समोर येऊन, "तुझं तुझ्या मुलावर खूप प्रेम आहे, त्याच्यासाठी तू काहीही करशील, त्याची होणारी फरफळ तुला बघवणार नाहीच, तू त्याच्या प्रेमासाठी सर्वच करू शकतेस मग तो का नाही सुनबाईसाठी करू शकत? आणि त्याच्या प्रेमाच्या व्यक्तीला बोलशील तर त्यालाच दुखवशील ना राणी."
मग खुर्चीवर स्वतःचा आळस काढत,"मला तर आनंद आहे कि माझा मुलगा योग्य मार्गावर आहे."
आणि मग लगेच आईच्या कानात, "आणि तसही ह्या घरात सुनबाईची बाजू घेणारा कुणी तर हवं... नाहीतर सामना बरोबरीचा कसा होणार, म्हणजे मी तुझी बाजू आणि तो..." आणि ते जोरजोराने हसत होते.
शशी बाहेर आली आणि म्हणाली,"बाबा काय झालं? तुमची अँपॉईनमेंट आहे ना आज डोळ्याच्या डॉक्टर कडे. हे तयार झालेत, तुम्हाला सोडून देतो म्हणतात. नाश्ता करून घ्या बऱ."
त्या दिवशी आईने कुठलीच किरकिर न करता नाश्ता केला आणि सोबत जिलेबीही खाल्ली. वरून खुप छान केलास अश्याही बोलल्या. खरंतर त्या पोह्या मध्ये मिरची त्यांच्यासाठी जास्तच झाली होती पण तिखट पोहा सुमंतला आवडतो म्हणून त्या गप्प होत्या.
आणि सुमंतला प्रिय असणाऱ्या गोष्टींना बोलण्यात काही अर्थ नाही हि जाणीव त्यांना झाली होती.
प्रत्येक गोष्टीमागे एक कारण दडलं असतं, त्याच्या मुळाशी जावून ते शोधावं, आणि मगच प्रतिक्रिया द्यावी... नाहीतर हि जी जनरेशन गॅप असं म्हणतो ना ती वाढायला वेळ लागणार नाही. समजदारीच पाहिलं पावूल आपणच टाकावं तेव्हाच पुढची पिढी तसेच अनुकरण करणार...
कथा कशी वाटली नक्की कळवा!
माझं नवनवीन लिखाण सतत वाचण्यासाठी माझ्या पेजला लाईक करा. पेज लाईक तुम्ही वेबसाईट वरूनही करू शकता
👇 https://www.facebook.com/manatlyatalyat
सदर लेखाच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.©️उर्मिला देवेन
धन्यवाद!!! 🙏🙏
जोडीदार तू माझा कथेचा पुढचा भाग इथे प्रकाशित झाला आहे! नक्की बघा....
👇
0 Comments