पहिला भाग इथे वाचा https://www.manatalyatalyat.com/2021/06/blog-post_15.html
मोह… 'द टेम्प्टेशन’ भाग २
रागिणीने आणून दिलेले पोहे खात मोहन म्हणाला, "बघ, तुझी चिंता मिटली. नाश्ताही मिळाला आणि जेवणही तयार होतंय. मग चल ना, बेडरूममध्ये. माझ्यासाठी तर अजूनही रात्र तरुण आहे... आणि तू अशी दूर दूर आहेस!"
"तू ना... वाया गेलास अगदी! काम कर आधी."
"हो कामचं तर करायचं आहे. ", मोहनने मिश्किलपणे डोळा मारला.
"जाऊ दे, तुझ्याशी बोलणं म्हणजे ना... मी आवरते. तू ही आवर... "
मालिनी आणि मोहन सामान लावण्यात गुंग होते. मोहन मध्ये-मध्ये मालिनीला छळायचा आणि मालिनी हसत त्याला हुलकावणी द्यायची. तोच रागिणीने परत बेल वाजवली आणि बाहेरूनच म्हणाली, "जेवायला चलताय ना? "
"अहो, तुम्ही उगाच त्रास घेतला हो", मोहन दार उघडत म्हणाला. आणि तिला बघून परत गुंग झाला. कदाचित तिच्या चेहऱ्या वरच्या तेजाने तो जरा शाहाराला होता. दार उघडताना तिचा झालेला हलकासा स्पर्श त्याला मोहून गेला. कसल्यातरी आंतरिक सुखाची अनुभूती त्याला झाली. लगेच मागे झाला. हसला आणि मालिनी पुढे आली.
"त्यात काय! मीही येईल तुमच्याकडे स्वयंपाकघर लागलं की जेवायला, आधी तुम्ही चला बघू."
मोहन हे ऐकताच भानावर आला. आणि काहीसा स्वत:ला सावरत घरात येऊन बसला. रागीणीच्या गालावरच्या खळीत तो अटकला होता. तिच्या पाठमोऱ्या शरीराची लचक त्याला क्षणभर लचकवून गेली होती.
मालिनीने स्वतःला आवरलं आणि दोघेही रागिणी कडे पोहचले, रागीनीच घर उत्तम लागलेलं होतं. ती घरात एकटीच होती. मोहनने भिंतीवर लावलेले फोटो बघत विचारलं, "मिस्टर कुठे आहेत? "
"ते बाहेरगावी, फिरीतीची नौकरी असतो त्यांची, घरी आठवड्यातून दोन दिवस असतात."
"आणि मुलं ? "
"अजून तरी नाही हो!" रागिणी जरा हिरमुसल्या नजरेने बोलली. कदाचित नको असणारा प्रश्न होता हा तिच्यासाठी.
नकळत रागिणीने वालाच्या शेंगांची भाजी केली होती जी मोहनला खूप आवडतं होती. मग काय दोघेही स्तुति करत जेवले. दोघांनाही रागिणीकडे नवीनपण जाणवलचं नाही. ओळखी आताचीच होती पण जुनी वाटत होती. दोघांनाही रागिणीसाठी जरा सहानुभूती वाटत होती. नवराही घरी नसतो आणि मुलही नाहीत, किती कंटाळत असेल ना रागिणी ह्या विचारात दोघेही शांत झाले होते.
हळूहळू रागिणीची मालिनीकडे येणं जाणं वाढलं होतं. जणू त्या पक्या मैत्रिणी झाल्या होत्या. रागिणीचा नवराही घरी असला कि मोहनशी बोलायचा. मस्त चौघांची मैफल बसायची. राजेश घरी असला की जेवणं एकाच घरी होत असायची, दोन्ही घरात घरोबा होता आणि विश्वासही. भराभर दिवस जात होती.
रागिणीच्या लग्नाला १५ वर्ष झाली होती, पण पाळणा हलला नव्हता. तसा रागिणीत काहीच दोष नव्हता. राजेश तिचा नवरा, त्याला शुक्राणूची कमतरता होती डॉक्टरांच्या मते, ट्रीटमेंट सुरु होती पण काही फरक पडत नव्हता. प्रत्येक महिना लाल होतं होता आणि रागिणीचे डोळे लाल करून जात होता. काहीसं रागिणीला कळलं होतचं की तिला राजेश कडून मुल होणं शक्य नाहीच आणि तिने ते स्वीकारलं होतं, पण राजेशच खूप प्रेम होतं रागिणीवर. गावात लोकांची टोमणे ऐकून त्रासली होती रागिणी मग दोघे शहरात उपचाराच्या बहाण्याने आलेले इथेच स्थिरावले होते. रागिणी मातृत्वासाठी झुरत होती. आणि राजेश बातमीची वाट बघत असायचा. दोघेही एकमेकांना सांभाळत राजा राणीचा संसार सुखाने करत होते.
त्या दिवशी खालच्या माळ्यावरच्या घरी सातवा महिना होता, मालिनी रागिणीकडे आली, "रागिणी ताई चलता ना तुम्ही? खाली बोलावलं आहे, माझी काही फारशी ओळखी नाही, तुम्ही सोबत असाल तर अवघडल्या सारखं वाटणार नाही."
रागिणी तयारही नव्हती, जरा नाराज आवाजात म्हणाली, "तू जाऊन ये, मी जात नाही सहसा अश्या कार्यक्रमात."
"का हो?"
"काही नाही गं, मी आई नाही ना झाली अजून मग मला वाडीत टाकलं आहे ह्या इथल्या बायकांनी. बोलता बोलता टोमणे मारतात गं, आणि माझ्या मागेही मला वांझ बोलतात. मागच्या वेळी एका घरी मोठी नटून-थटून आवडीने गेले होते तर मला सुंदर वाळवंट म्हटल होतं एकीने. शेती काही उगवणार नाही म्हणत हसत होत्या साऱ्या... आता नको वाटतं मला कुठे जायला, हेही नको म्हणतात जाण्यासाठी, मी एक दिवस जाते आणि मग बरेच दिवस मनाचं दुखणं घेऊन बसते. आजरी असते मग आठवडा आठवडा विचाराने."
"नाही हो, अस काही नसतं. होईल बाळ तुम्हाला. कुणा कुणाला उशिरा मातृत्व प्राप्त होतं. तुम्ही नक्की आई होणार आणि मग हेच लोकं गुण गातील तुमचे. जाऊ द्या मीपण नाही जात मग असल्या लोकांकडे."
"नाही गं, जा गं, तुझी ओळख होईल सर्वांशी, मलाही सांग गमती जमती."
रागिणीने फोर्स केला आणि मालिनी सातव्या महिन्याच्या कार्यक्रमाला गेली. मालिनीच्या मनात रागिणीच्या दु:खाने बोचणी केली होती. आता तिनेही आई होण्याचं निश्चित केलं होतंच.
रागिणीची मैत्री मालिनीशी येवढी वाढली होती की रागिणी तिचा बाजारही आणून द्याची, स्वतःच्या कामासोबत तिचेही लहान-सहान कामे करायची आणि मालिनीला तिची खूप मदत होतं होती. तिला उशीर होत असला की ती मोहनसाठी चहाही रागिणीला करायला सांगायची. मोहन आणि रागिणीमध्येही बरंच बोलणं होतं असायचं. दोघांमध्ये एक नातं निर्माण झालं होतं ज्यात ओढ होती. मोहन वेळ काढून घरी लवकर यायचा आणि रागिणीशी बोलत बसायचा. दिवसभर काम केल्यानंतर तिच्याशी बोलण्यासाठी तो अस्वस्थ असायचा. रागिणीलाही मनातल्या वेदनेला कुरड्यापासून जरा निवांत मिळायचा.
मग पुढच्या भागाची उत्सुकता वाढली आहे ना... लवकरच मनातल्या तळ्यात पेजवर पोस्ट होईल
प्रस्तुत कथा ‘व्हॉईस… अंतरमनाचा 2022’ ह्या कथा संग्रहातून...
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव...
नावासह शेअर करायला हरकत नाही. कृपया C/P करू नये, लिंक शेअर करा. कृपया लेखणीची आदर करा!
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो साभार ai
0 Comments