जेव्हा ती चंडिका होते.त्या दिवशी ऑफिस मधून निघायला शांताला उशीरच झाला होता. साधारण रात्रीचे ९ वाजले असतील. ऑटोतून उतरून ती घराकडे जाण्याऱ्या रस्त्यावरून आपल्याच नादात चालली होती. काहीतरी बॅगमध्ये चाचपत होती. 

घराकडे जाणारा रस्ता अगदीच सामसुम झालेला होता. किड्यांचा आवाज कानात पडत होता. समोरच्या रस्त्या वरचा दिवा बंद-सुरु होत होता. मुख्य रस्त्यापासून पाच मिनिटे घरापर्यंत चालावं लागत होतं. तिची ती रोजचीच वाट होती पण आज तिला परतायला वेळ झालेला. 

अचानक मागून सायकल वर येणाऱ्या एका तरुणाने तिच्या शरीराच्या मागच्या भागाला घाणेरडा स्पर्श केला आणि निघून गेला. तिने त्याला रागातच जोरात म्हटलं 

"थांब, ये थांब, तुला आया बहिणी नाहीत?"

तो कसला थांबतोय, जराही मागे न वळून बघता, वेगाने पळाला. तिचा मात्र जीव कातावून गेला होता. ती त्याला अंधारात ओळखू शकली नाही. रागात आणि बडबड करतच ती घरी अली. घरी सर्वच  जेवणासाठी तिची वाट बघत होते. तिने घडलेला प्रकार सांगितला पण कुणीच फारशी प्रतिक्रया दिली नाही.

सासू म्हणाली, "असं कुणीच करू शकत नाही, मी सर्वच पोरांना चांगली ओळखुन आहे. काहीही बोलू नको, उशिरा यायचं आणि मग हे असं ..."

सासरे म्हणाले "तू का उशिरा आली? बाईच्या जातीने वेळेत यायचं घरी, जावूदे, जेव आधी, उशीर झाला आहे."

पतीदेव बोलले "तू घरी आलीस ना, जावू दे. नंतर बोलू."

तिच्या आतला होणारा गोंधळ काही कमी होत नव्हता. मनातून जातच नव्हतं. झोपेपर्यंत तिचं एकच सुरु होतं,

"का?, कशासाठी?, ..... आणि मी तर दोन लेकराची आई आहे, माझ्यासोबतही, काय भेटलं त्याला असं करून?, कुणाचा मुलगा होता तो?, आपल्या कॉलोनीतला होता कि बाहेरचा?"

मनातल्या गोंधळांनी आणि स्वतःलाच पडणाऱ्या प्रश्नांनी वैतागून गेली होती. कडा पलटून पलटून पार झोपमोड झाली होती. रात्रभर विचार आणि झोपही झाली नव्हती म्हणून ती सकाळी सारखी प्रत्येक गोष्टीसाठी चिडचिड करत होती.

मनातला राग व्यक्त करता येत नव्हताच. स्वतःतल्या कमजोर स्त्रीत्वाचा आभास तिला राहून राहून खुपत होता. ऑफीस मध्ये, नातेवाईकांत, माहेरी, मेत्रीणींत सर्वांमध्ये तिने हा विषय मांडला, पण काही फायदा झाला नाही. सगळ्यांचं उत्तर जवळपास सारखच. 

मनात होणाऱ्या घुसमटीने तिची सारखी छोटछोट्या गोष्टीसाठी चिडचिड चालूच होती. त्या नादात तिने सासूशी भांडणही केलं. पतिदेवांचा रोषहि पत्करला. मुलांवरही सारखं रागावणं चालूच होतं त्यामुळे सासऱ्यांनीही तिला चांगलं रागावलं होतं. 

पंधरा दिवस लोटले, पण तीच काही मन धाऱ्यावर नव्हतं. रस्त्यावरच्या, घरीयेणाऱ्या प्रत्येकाकडे ती त्याच नजरेने बघत होती कि, "तो हा तर नाही! नाही जरा उंच होता, पोरगाच होता..."

नवरात्राचे दिवस सुरु झाले आणि सगळी कडे धामधूम सुरु झाली. कॉलनीतली तरुण पोरं वर्गणी गोळा करायला जेव्हा तिच्याकडे आली, तेव्हा तिने प्रत्येकाला उलट सुलट प्रश्न विचारून स्वतःची शाहनिशा करून घेतली, पण काही कळेना कि, कोण तो, त्या दिवशीचा.....

कॉलोनीतल्या दुर्गा देवीचं दर्शन घेऊन ती नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी साधारण रात्रीच्या त्याच वेळेवर कॉलोनीतल्या बायांसोबत परत घरी येत होती. चार-पाच मुलांचा एक ग्रुप रस्त्याच्या कडेवर गप्पा करत हसत होता. 

आणि...... तिच्या कानावर ते शब्द पडले, "आयला कसली भारी मज्जा येते ना हात लावायला. तू पण करून बघ, कुणाला कळणार नाही, आणि मुली आणि बाया कुणाला सांगत पण नाहीत, जाम मज्जा येते."

कुणाचाही विचार न करता ती त्या मुलांच्या अगदी जवळ जावून उभी राहिली, आणि बोलली 

"चल, आत्ता हात लावून दाखव असेल हिम्मत तर"

 बोलताच क्षणी पायातली नोकदार सॅन्डल तिने हातात घेतली आणि तिच्यातली चंडिका जागृत झाली. पडेल तसं तिने त्याला झोडपायला सुरवात केली. तिच्या शेजारच्या काकूही तिच्या सोबत होत्या. जेव्हा त्या काकूला कळलं कि तो त्यांचा मुलगा आहे. तेव्हा तिने शांताला थांबविण्याचा प्रयत्न केला. पण ती काही थांबेना. आणि तिने ठरवलं कि ती त्याला पोलिसांच्या ताब्यात देणार म्हणून. त्या काकूला काहीच कळेना, तेव्हा त्या सरळ शांताच्या घरी धावत गेल्या आणि तिला थांबवा म्हणून तिच्या घरच्यांना विनवणी करू लागल्या.

तेवढ्यात शांताने त्या मुलाला झोडपतच कॉलोनीच्या परिसरात आणला. गच्च गर्दी जमली होती. दुर्गाच्या घरचेही सगळे बाहेर आले. तिची सासू तिला लगेच म्हणाली "अग बाई, तो माझ्या मैत्रिणीचा मुलगा आहे, अंगाखांद्यावर खेळलाय तो माझ्या, तुला काहीतरी गैरसमज होतोय. तो नाही करणार अस. तू थांबते कि नाही."

शांता मात्र सासूचं काहीही ऐकण्याच्या नादात नव्हती. तिच्यात तर चंडिका शिरली होती. हा सगळा प्रकार पाहून कॉलोनीतल्या दोन मुलीही शांतासोबत त्या मुलाला मारायला लागल्या. त्यांच्या सोबतही असंच घडलं होतं. पण, सांगणार कुणाला?

त्या मुलींचं एकूण शांतातली चंडिका आणखीनच उग्र झाली. शेवटी तिनी त्या मुलाकडून वदवून घेतलच. त्या मुलाने ते सर्व मान्य केल कि, तोच आहे जो येत्या जात्या स्त्रियांना आणि मुलींना मागून शरीराला हात लावतो. हे एकल्यावर सर्व लोक शांत झाले. शांताला बोलणारे तोंड क्षणात हाताने झाकल्या गेले. कुणीच काही बोलेना. शांतामधली चंडिका मात्र शांत होत नव्हती. तिने मोबाईल हातात घेतला आणि पोलिसांना फोन लावला. तेवढ्यात त्या मुलाची आई म्हणजे शेजारची काकू तिच्या पायावर डोकं ठेवून माफी मागू लागली. पण चंडिका शांत होतच नव्हती.


हा सर्व प्रकार शांताचे पतीदेव दुरून बघत होते. त्यांना मनोमन स्वतःची चूक कळली, तीनशे चारशे लोकांत त्यानीं तिच्या समोर येऊन माफी मागितली. "मला माफ कर, मी समजूनच घेतलं नाही. तुझ्यावर विश्वास ठेवून तेव्हाच या गोष्टीच छडा लावायला पाहिजे होता. कदाचित ह्या दोन मुली त्या मानसिक त्रासातून गेल्या नसत्या".

पतीच्या तोंडून माफीचे दोन शब्द एकूण शांता अतिशय शांत झाली. एवढ्या दिवसापासून साठवून ठेवलेले अश्रू ढसाढसा वाहू लागले. थोडयाच वेळात सर्व लोकांनी तिच्यासाठी टाळया वाजवल्या. आणि प्रत्येक स्त्री आणि मुलगी शांताचे आभार मनात होती. पोलीसहि आले आणि त्या मुलाला घेवून गेले.

झाल्याल्या प्रकारांनी सर्वच कॉलोनीतले लोक हादरून गेले होते. नवरात्रात चक्क वास्तविक चंडिकेचे रूप बघितलं होतं सर्वानी. कुणी आभार प्रगट करत होत, तर कुणी शाबासकी देत होत. सासू आणि सासऱ्यांना गर्वाची अनुभूती होत होती. सासूने झटकन तिच्या मैत्रिणीचा हात झटकत सुनेला मिठी मारली. पतिदेवांच्या डोळ्यात पाणी होत पण अश्रू शांताचे वाहत होते. थोड्या वेळात सर्व परिसर रिकामा झाला, शांताच्या नवऱ्याने तिला हात धरून घरी नेलं.

आपल्याच कॉलोनीतला मुलगा, आपल्याच नजरीतला, आपल्याच अंगाखांद्यावर लहानाचा मोठा झालेला, आपल्याच बायका-पोरींना असं काही करतो आणि आपण आपल्याच लेकी-सुनींना गप्प राहायला सांगून त्यांनाच दोष देत असतो. आणि आपल्यालाच हे सांगण्यासाठी एखाद्या शांताला चंडिका व्हावं लागतं. तेव्हाच आपल्याला कळत. कि, आपण चुकलोय हि गोष्ट सर्वाना कळली होती.

आपल्या समाजाच खरं रूप हेच आहे. जो पर्यंत एखादी शांता, चंडिका बनत नाही ना, तोपर्यंत आपल्याला कळतच नाही. स्वतःसाठी स्वतःलाच चंडिका बनावं लागतं. जेव्हा एक स्त्री हि स्वतःसाठी उभी राहते, त्याच वेळेस ती सर्व स्त्रियांचं प्रतिनिधित्व करत असते. मग ती कुठलीही गोष्ट असोत.

स्त्रीला कुणीच समजून घेत नाही, कारण काहीही असो, आणि ते कारण सर्वांना तेव्हाच कळतं

जेव्हा ती चंडिका होते ....

स्त्रीचा मान हीच विजयादशमीच्या सणाची शान.... खुद्द रामाने रावणाला स्त्रीच्या मनासाठी मारलं आणि रावनानेही सीतेला त्याच्या मानासाठी हेरलं होतं... हा दोघात फरक होता ... पण लढाई स्त्रीत्वासाठी होती...मग आपण दसरा का साजरा करतो हे तरी ध्यानात घेवूया... स्त्रीला मान देवूया ..नवरात्रातच नव्हे तर प्रत्येक क्षणाला...


विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा


व्हर्जिनिटी एक कडू सत्य !!! वाचन- प्रसाद रमेश ढाकुलकर (मराठी अभिनेता)

Dr. Prakash Baba Amte फेम प्रसाद ढाकुलकर ह्याच्या दर्जेदार आवाजात कथेची प्रस्तावना कवितेच्या माध्यमातून मांडली आहे... नक्की बघा...

व्हर्जिनिटी एक कडू सत्य...

कालांतरापासून चालत आलेलं.

कळलेलं... न कळलेलं…

पूर्ण प्रस्तावना कवितेच्या स्वरुपात खालील लिंकला बघा, कथा लवकरच आपल्या समोर येत आहे प्रीती संदीप ह्याच्या सुमधुर आवाजात मनातल्या तळ्यात youtube channel वर.
©️उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

धन्यवाद! 🙏🙏

(फोटो साभार  गुगल )

माझ्या नवीन कथेसाठी/ लेखासाठी माझ्या पेज लाही लाईक करू शकता https://www.facebook.com/manatlyatalyat/

-------------------------

Post a Comment

0 Comments