डेडिकेशन- "द कॉर्पोरेट लॅडर"
सुहासला सोडण्याचं दुःख तिला जाणवत नव्हतं. ती घरी आली, तेव्हा सत्यजित घरी होता... वहिनीने मुद्दाम त्यांना बोलायला मोकळीक दिली. चहा देऊन ती निघून गेली. समृद्धीने अलगद विषय छेडला, “सत्यजित, तू मनाने खूप गोड आहेस रे, पण मी तुझ्याशी लग्न करू शकणार नाही... हे बघ मला माहित आहे तुझ्या मोठ्या भावाने मला घोसला कंपनीमध्ये इंट्रोड्यूस्ड केलं होतं. दादाचं बोलणं झालं आहे त्यांच्याशी, तू आवडतोस पण मी ना....”
सत्यजीत शांत ऐकत होता... त्याने दीर्घ श्वास घेतला. म्हणाला, “ ठीक आहे.... मलाही तुला असे बांघून ठेवायला आवडणार नाही... तू आवडतेस मला. लग्न करण्याची इच्छा आहे माझी पण त्यासाठी तुही तयार हवी ह्या विचारांचा मी नक्की आहे. माणूस आवडणे आणि त्याच्यासोबत आयुष्य काढण्याचा निर्णय घेणे ह्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत असे मला वाटते... ती भावना मनातून यायला हवी... असो...ओढून पुढे जाण्यापेक्षा आपण थांबलेलं बरं... दादाला काय सांगायचे ते मी बघेन...”
समृद्धी अगदीच मोकळी झाली... डोळे मिटून ती बसली होती तर सत्यजितने प्रश्न केला, “सुहासशी बोलणं झालं का तुझं मग?”
आता मात्र तिचा श्वास परत अडकला, तिने डोळे उघडले, “अरे, तुला माहित होतं तर....”
“हो, मी तुला त्याच्यासोबत मागच्या गल्लीत तुला सोडताना बघितलं होतं... मग जरा माहिती मिळवली... तुला आवडतो का तो तसा... म्हणजे लग्न? मी बोलू घरी?”
समृद्धी त्याच्याकडे बघत होती,आणि हसली, “अरे मी त्याला आजच ब्लॉक केलं आहे.... आता मला जरा निवांत हवा आहे. आता अजून कुठल्या रिलेशनशिप मध्ये अडकायचे नाही आहे... काय होतं ना स्वतःचं... मी सांगू शकत नाही”
“ओके, चील... मी समजू शकतो. कधी बोलावं वाटलं तर बिनधास्त कॉल कर.”
तो उठला तशी समृद्धी म्हणाली, “तुझ्या लग्नाला नक्की बोलाव मला...”
तोही हसला, म्हणाला,” लवकर मॅनेजर हो आणि पार्टी दे....”
दोघांनी हातांची मूठ एकेकांना मारली. तो निघून गेला. ती त्याला बाल्कनीतून बाहेर जाईपर्यंत बघत राहिली... आजचा दिवस खूप मोठा वाटला तिला... किती प्रकरणं तिने मार्गी लावले होते. ती आज मोकळी होती. दादा वहिनीला कसे हाताळायचे हेही तिने ठरवले नव्हते आणि ठरवायचेही नव्हते...
--
ऑफिसमध्ये समृद्धी लवकर आली होती. ती स्वतःचं वर्कस्पेस नीट लावत होती. तेवढ्यात मंजिरी कॅबिनमधून बाहेर आली. दोघींची नजर भेटली. एक क्षण शांतता होती दोघींत.
“गुड मॉर्निंग, मॅडम,” समृद्धी म्हणाली, अगदी स्थिर आवाज होता तिचा.
मंजिरी थोडी स्तब्ध झाली, तिला आधीची रडकी, गोंधळलेली समृद्धी आठवली आणि आज किती वेगळी दिसत होती ती ह्या विचारात मंजिरी गोंधळली. ती काही क्षण तिच्याकडे पाहत राहिली आणि हळूच म्हणाली,
“गुड मॉर्निंग, समृद्धी… आणि, कालचा रिपोर्ट परफेक्ट होता.”
त्या एका वाक्याने जणू त्यांच्या मधला ताण कमी झाला होता पण ताण मंजिरीचा कदाचित वाढला होता.
समृद्धीने नुसती हसून मान हलवली. मंजिरी तिच्या कॅबीनमध्ये आली, मनात अनेक विचार गोंधळ घालत होते. समृद्धीचा आत्मविश्वास तिला कमकुवत करत होता. मला का फरक पडत आहे हा विचार तिला त्रास देत होता. दीड वर्ष जास्त झालं होतं फक्त समृद्धीला इकडे पण तिच्या असल्याने मंजिरी अस्वस्थ होत होती. हिला आता पोझिशन देऊन जरा वेळ बिझी कारावे असा विचार तिच्या मनात आला. तिने समृद्धीला बोलावले, समृद्धी आली तेव्हा अजूनच प्रसन्न दिसली मंजिरीला. तरीही स्वतःला आवरत ती म्हणाली,
“तू प्रेझेन्टेशन अप्रतिम तयार केले आहे, “माधव खूप इंप्रेस झाला आहे.”
ती थोडी दचकली, “खरंच?”
“हो. आणि मला वाटतं, पुढच्या प्रोजेक्टमध्ये तो तुला कोऑर्डिनेटर म्हणून काम करायचे आहे. साविने तुला केटी दिली आहेच, आणि तू सगळं लवकर शिकून घेते आहेस... मला विश्वास आहे तू हाताळशील.”
समृद्धी हसली आणि परत म्हणाली, “धन्यवाद! पण मला माधवसरांचे कामही काही दिवस बघायचे आहे.”
मंजिरी दचकली, कुठले काम हे तिला काही वेळ समजले नाही, तर समृद्धी म्हणाली, “ते माधव सर बोलले होते की जुलीचे काम काही दिवस बघ म्हणून... बसं तेच. काही विशेष नाहीच. मी करेन. काळजी नको...”
मंजिरी नुसती स्मित हसली, समृद्धीने कॅबीनमधून आली आणि कामाला लागली. मंजिरीला आता माधवची वाट होती. कामाच्या व्यापात माधवचं असं काय सुरु आहे हे तिला कळत नव्हतं. त्यालाही ती पुरेसी ओळखून होतीच.. आणि आजच्या पिढीवर तिला खूप काही विश्वास नव्हता. माधवचा प्रश्न जिथेही आला तिथे तिने कुणाची चालू दिली नव्हती पण समृद्धी काही वेगळी होती. तिच्या कामातील डेडिकेशनमुळे ती नेहमी सर्वानाम्ध्ये वेगळी वाटायची.
तिच्यासोबत बराच स्टाफ जॉईन झाला होता, त्यातला काही मंजिरीच्या भीतीने तर कुणी कामाच्या व्यापाने सोडून गेला होता. जो उरला होता तो मंजिरी भिऊन काम करत होताच. त्यात काही मुलीही होत्या ज्या माधवच्या कधी नजरेतही आल्या नव्हत्या. पण ही माधवच्या नजरेत यावी असं काय हिच्यात आहे हे मात्र मंजिरी शोधत असली तरी तिला दुसरं गवसत नव्हतं.
माधव कामात व्यस्त असल्याने आणि मंजिरी सध्या नवीन प्रपोजल तयार करत असल्याने त्यांच्या भेटी होत नव्हत्या. उलट समृद्धी माधवचं शेडूल बघत हिती आणि त्याच्या संपर्कात होती.
माधवने तिला आपला शेड्यूल बघण्याचं काम दिलं होतं पण ते काम फक्त कॅलेंडर अपडेट करणं एवढचं नव्हतं तर त्याच्यासोबत मीटिंग्स, प्रेझेन्टेशन, आणि क्लायांटच्या भेटींसाठी ती त्याच्यासोबत राहू लागली होती. समृद्धीला सोबत ठेवताना माधवलाही आनंद मिळत होता. काही भेटींमध्ये ती खूप औपचारिक वागली, पण हळूहळू, प्रत्येक चर्चेनंतर, प्रत्येक ड्राईव्हनंतर, काही गोष्टी जरा कमी झाल्या... दोघात पंचवीस वर्षाचा फरक होता, ती तरुण आणि तो चिरतरुण.... कधीकधी उशीर झाला की तो तिला घरी सोडत असायचा तर कधी लवकर निघायचे झाले तर घ्यायला गाडी पाठवत असायचा.
हळूहळू समृद्धी माधवसोबत फिरते ही वार्ता ऑफिसमध्ये चर्चेचा विषय झाली होती. लोकं तर तिला दुसरी मंजिरी बोलत असत. समृद्धीला मात्र ह्यामुळे काहीही फरक पडत नव्हता. माधव तिला बॉसम्हणून आवडत होता... तिच्यासाठी रिलेशनशिप असं काही म्हत्वाच नव्हतं. समृद्धी बोलताना वागताना तिच्यात कधीच जाणवत नव्हतं की ती बॉसच्या बॉससोबत असते. सगळ्यांनी सांगितेलं काम ती करत असायची.
उलट मंजिरी अधिक अस्वस्थ झाली होती. समृद्धीची चूक शोधण्यासाठी तिने रुद्रला बोलावून घेतलं,
“रुद्र समृद्धी तू दिलेलं काम करते की?
रुद्र प्रामाणिक होताच, त्याने सरळ उत्तर दिले, “मॅडम समृद्धी कधीच कामचुकारपणा करत नाही. तिला नाही जमले तर ती आधीच बोलून अधिक वेळ मागून घेते. मला काहीच प्रॉब्लेम नाही.. शी इज गुड... मॅडम, काही प्रॉब्लेम आहे का?”
मंजिरीकडे उत्तर नव्हते, “नाही… प्रॉब्लेम नाही. पण थोडं बघा, बघायला हवं असं वाटतंय.”
“मॅडम काय?”
मंजिरी आता गोंधळली, “काही नाही तिचं वर्कलोड जास्त होते की काय असे वाटले.” माजीरीच्या उत्तराने रुद्र जरा सुखावला. तिला आजही स्टाफची काळजी आहे हे बघून स्मित हसत निघून गेला.
मंजिरी मात्र अधिक तणावात आली होती. ती कॅबीन मधून जोशात निघाली आणि नेहमीच्या जागी सिगार ओढायला गेली.
मंजिरीचे लक्ष टेरेसच्या खिडकीतून खाली गेले. समृद्धी आणि माधव एकत्र क्लायंट मीटिंगहून परतत होते. कार थांबली, माधवने छत्री उघडून तिला दिली, तो झपझप चालत लिफ्टकडे निघाला. त्याने लिफ्टही समृद्धीसाठी थांबवली. त्या दृश्याने मंजिरीच्या चेहऱ्याचे भाव अगदीच बदलले. तिच्या मनाला वेदना होत होत्या.
मंजिरी माधव येताच ती कॉन्फरन्स बोलावली, सगळे बसले असताना मुद्दाम तिने समृद्धीला तिला काहीही माहित नसलेला भाग समजवायला सांगितला, समृद्धीही नुसती स्मित हसली, तिला जेवढ माहित होतं तेवढ तिने सर्वाना सांगितलं आणि परत मंजिरीला प्रश्न केला... हे सगळं असं घडत होतं जणू ती ह्यात पारंगत होती. माधव हे नुसतं बघत होता. मंजिरीचे बोलणे झाल्यावर माधवने सर्वानासमोर समृद्धीचे कौतुक केले,
“समृद्धी तू रिपोर्ट अप्रतिम केला होतास. ऑनेस्टली, मी एवढा तपशील कुणाकडून अपेक्षितच करू शकत नव्हतो. हनीवेल कंपनीला तुझं डीटेलिंग भयंकर पटलं आहे.... “
“मंजिरी, मेक शुअर समृद्धी शुड लीड थिस न्यू असाइनमेंट.”
समृद्धी थोडं हसली, “धन्यवाद, सर. पण तुम्हीच सांगितलेले पॉईंट्स मी जोडले होते.”
सर्वांनी समृद्धीचे कौतुक केले. मिटिंग संपली आणि सर्व स्टाफ निघून गेल्यावर मंजिरीने माधवला प्रश्न केला,
“का? का तिने लीड करावे माधव, आपल्याकडे सिनियर स्टाफ आहे. ती अजूनही शिकते आहे?
माधव काही क्षण शांत राहिला. “ती खूप वेगळी आहे, खरं सांगायचं तर, ती खूप डेडिकेशन आणि एनर्जीने काम करते. तिचा कामावर फोकस आहे. त्यात खूप इन्फेक्शस आहे. ती काम करते तेव्हा काम करावं असे वाटते. तिच्यासोबत काम करणारे आनंदी असतात... रुद्र, सावी आणि तो सागर... आणि त्याचं काय नावं तो मंगेश इवेन ती शनाया... ह्यांच्याकडून काही ऐकलं का तिच्याबद्दल... मी तिच्यासोबत काम करत आहे....”
मंजिरीला क्षणभर बरं वाटलं पण जरा धक्काही बसला, माधव समृद्धीबद्दल असं बोलत होता... तो काय शोधत होता समृद्धीमध्ये तिला कळायला काही मार्ग नव्हता... अजून पुढे काही बोलणं तिला आता तिच्या आणि माधवच्या संबंधासाठी योग्य वाटले नाही. स्वतःला आवर घालत ती म्हणाली,
“तुझं निरीक्षण अगदीच बरोबर आहे... पण तरीही मी म्हणले ती अजून नवीन आहे रे.. आणि वर्कलोड वाढले तिला. माझी आपली काळजी बसं!”
माधव दीर्घ श्वास घेत म्हणाला, “त्यासाठी तू आणि मी आहोत ना तिला गाईड करायला... करेल ती.”
माधव निघणार तोच मंजिरी त्याला म्हणाली, “माधव आज घरी ये, महिने झाले आपण वेळ घालवला नाही सोबत.”
माधव थबकला, “मंजिरी, सुमित अमेरिकेवरून परत आला आहे आणि त्याच्या स्वागतासाठी आबासाहेबांनी पार्टी ठेवली आहे.”
मंजिरी माधवच्या पुढे येऊन उभी झाली,”सुमित आला आहे? आणि तू मला आज सांगतो आहेस?”
“अगं, आपलं बोलणंच कुठे झालं काही दिवसात, आज तू घरी ये...भेट त्याला.”
“अरे पण घरी आपलं बोलण होणार नाही... “
“हो, पण माझ्याकडे पर्याय नाही... आणि हा मी समृद्धीला सुद्धा बोललो आहे... ती भेटली आहे सुमितला, सुमितने बोलावले आहे तिला.”
“समृद्धी भेटली आहे सुमीतला?
“मंजिरी, अगं मी काल एअरपोर्टला गेलेलो, समृद्धी माझ्यासोबत होती.... ते जाऊ दे, मला वेळ होतो आहे. भेटू आपण घरी.”
मंजिरी विचाराने पार गोंधळली होती. तिलाच आता स्वतःला परत उभ करण्यासाठी डेडिकेशनची गरज वाटत होती...
to be continued...
आधीचे सगळे भाग पेजवर आणि साईटवर आहेत!
----पुढील भाग लवकरच....
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव...
नावासह लिंक शेअर करायला हरकत नाही. कृपया C/P करू नये, कृपया लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा वाचल्या जावी एवढीच इच्छा आहे.
@followers@topfanss #उर्मिलादेवेन मन माझे मराठी #marathi
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो by AI

0 Comments