पण तिने बहरण कधीच सोडलं नाही...

 


निसर्ग किती गोष्टी सांगू पाहतो आपल्याला. ऋतू येतात आणि निघून जातात पण खूप काही सांगण्याच्या प्रयत्नात नेहमीच असतात. आपण आपल्याच नादात जगत असतो. 

आता चाफाच बघाना, बिचारा एकटाच बहरत असतो. त्याचा सुगंध दूरवर पसरलेला असतो. खोडं खडबडीत झालेले असतं. अगदीच बुंध्यावर दिमाखात डोलत असतो. कुणीही नसतं त्याच्या आसपास. 

तो जेव्हा पूर्ण बहरतो, तेव्हा तो आनंद व्यक्त करायलाही त्याच्यासोबत कुणीच नसतं. चाफ्याची पूर्ण पान त्याची साथ सोडून देतात. अगदीच एखाद्या डोंगर रानात किंवा कडेला, कुणाचं सहसा लक्ष जाणार नाही अश्या ठिकाणी तठस्थ उभा असतो. तरीही त्याच फुल किती आत्मविश्वासाने टवटवीत उभं असतं. जवळचे नसले तरी आपल्यासारखे कही लोक त्याची मनसोक्त स्तुती करतात आणि परमेश्वराला वाहतांना मान देतात.  

काल बऱयाच दिवसांनी माझ्या सोबत काम करणाऱ्या एका मैत्रिणीचा नवीन फोटो तिच्या वॉट्सअप च्या अकाउंटवर बघितला. आणि मला राहावलंच नाही. मी लगेच मॅसेज टाकला, 

"मस्त फोटो ..  काय ग कस चाललंय ..."

 समोरून मॅसेज आला, "बिनधास्त ... ये पुण्यात कधीतरी.. भेटू ... तू तर पार विसरलीस, आहेस कुठे ?"

तिला उत्तर देवून मी फोन बाजूला ठेवला आणि सांर कसं नजरी समोर आलं. शिक्षण झाल्याझाल्या मी इंजीनियरिंग कॉलेज मध्ये लेक्चरर होते. तिथेच माझी भेट ऋचाशी झाली. दोघीही एकाच डिपार्टमेंट मध्ये, मग एकमेकांचं सगळंच माहित असायचं. ती घरची लहान आणि मी घरची मोठी. माझा प्रेम विवाह आणि तीच अरेन्ज लग्न. सगळं दोघी सोबत करायचो ऑफिसमध्ये.

 मात्र दोघीही कडे सासू हा विषय बोलाय साठी असायचाच. माझं आयुष्य माझ्या नवऱ्या सोबत बहरत होत. आणि मी माझ्या आणि ह्यांच्या रोजच्या गमती जमती तिच्याशी शेअर करायची. सुरवातीला तीही शेअर करायची आणि आमची दोघींची लंच ब्रेक मध्ये मैफिल रंगायची. पण का कोण जाणे, तिच्याकडे संसारातल्या गमती जमती हळूहळू कमी व्हायला लागल्या होत्या.  खूपदा विचारायची मी तिला. पण माझ्या लक्षात येत गेलं, कि तिला आता माझ्या बडबडीचा त्रास होत होता. ती गप्प राहायला लागली होती. जणू काही ती स्वतःला शोधत असायची. कुठेतरी शून्यात बघत राहायची.  कधी लाजायची, कधी माझ्या बोलण्याकडे लक्षही द्यायची नाही. लगेच विषय बदलायची.

अचानक एक दिवस माझ्या ती जवळ आली आणि म्हणाली, 

"कशी दिसतंय ग मी आज?". 

मी म्हटलं, "झक्कास, नेहमीप्रमाणे. पण, तू आज उशिरा का आलीस?"

तिने खुर्ची ओढली, बसली,  पुढे ती खूप शांत पणे  म्हणाली, "मी आज डिव्होर्स फाईल करून आले." 

मी जागेवून उभीच झाले. तिने मलाच शांत करून बसवलं आणि म्हणाली, 

"नवऱ्याचं प्रेम प्रकरण माहित झालं होत मला, आणि माहेरचे सतत गप्प राहायला सांगून, सगळं नीट होईल असच सांगायचे. मुलालाच नको होते, मग संसारच्यांनी पळ काढला. आणि,आता पक्क माहित आहे, कि माहेरी मला जागा भेटणार नाही. वडील गेल्यापासून, माहेरी आईच काहीच चालत नाही. भाऊ आणि वहिनीला मला ठेवून घ्यायचं नाही. आईच्या काळजीने वर्ष काढलं सासरी... आता बास .. तुझ्या घरी राहू देशील? माझी नवीन जागा शोधेपर्यंत?".

 मी लगेच म्हटलं, "तुझं सामान?"

ती म्हणाली, "कॉलेज च्या कँटिंग वाल्याकडे ठेवलंय."

पुढ मी तिला काहीच बोलले नाही, तिच्या चेहऱ्यावरच समाधान खूप बोलून गेलं होतं. नवऱ्याला सगळं सांगितलं आणि तिला घरी घेवून आले. आठ दिवस राहिली होती माझ्याकडे. आम्ही दोघांनी मिळून एक वन रूम किचन शोधलं होत तिच्यासाठी. बस, तेवढीच मदत झाली तिला माझी. 

नंतर मी सॉफ्टवेअर क्षेत्रात पाय ठेवला आणि माझा तिच्याशी संपर्क जरा कमी झाला. पण वेळ भेटेल तेव्हा गप्पा करायचो तेवढच. मालच कसतरी व्हयाच तिच्याशी बोलतांना, मग हळू हळू बसं चौकशी करायचे आणि काय करू शकत होते मी... 

कधी काळी आम्ही दोघिनी सोबत PHD करण्याचा विचार केला होता. पण मी संसारात गुरफटले आणि PHD चा विचारच पुढे ढकलला. तिने एकटं राहून PHD पूर्ण केली. आई देवाघरी गेल्याने आता माहेर तिला नव्हतंच. मोठी बहीण विदेशात आणि भाऊ तिला आता ओळखतही नव्हता. माझ्याशी अधून मधून फोन वर संवाद व्हायचा पण मीही नवऱ्यासोबत कधी USA, कधी जपान तर कधी सिंगापूर फिरत होते. मग संपर्क तुटला आमचा. 

दोन वर्षा आधी तिच्या पेटेंट ची स्तुती माझ्या एका कलाईन्ट कडून ऐकली आणि मी भारावून गेले. मनातच पुटपुटले, "व्हा ऋचा, एकटीच बहरलीस तू .... तुझ्याजागी कुणी दुसरं असत तर निराश आयुष्यात कुठेतरी हरवलं असतं. आज नव्याने तुझी ओळख कुणी दुसरच करून देतोय मला." 

त्याच  कलाईन्ट कडूनच तिचा नंबर मिळवला आणि फोन केला. माझ्या एका फोन ने तिला एवढा आनंद झाला कि प्रत्येक शब्दाला ती मला धन्यवाद देत होती आणि म्हणली, 

"आज कितीतरी वर्षाने माझ्या आनंदात आपलं कुणीतरी सहभागी झाल्याचा आनंद मिळतोय".

मी म्हटलं, "तू आता चाफा झाली आहेस. तुझा दूरवर दरवळणारा सुगंध पोहोचला माझ्यापर्यंत. सगळे असून तू एकटी वाट चालत राहिली आणि बहरत गेलीस. लग्न नाही केलस का अजून....?" 

ती मिश्किल पणे म्हणाली, "तुझ्या नवऱ्याला भाऊ नाही ना, मग कस करणार?"

नंतर बरेच दिवस तिचा विषय घरात घोळत राहिला...आता एवढं बोलणं होत नाही तिच्याशी पण खुशालीचा एक मॅसेज तिला नक्की करते आठवणीने.

माझी मुलगी जेव्हाही तिच्या शाळेच्या गोष्टी सांगतांना मला सांगते, कि ती आज एकटीच खेळत होती, कुणीच खेळत नव्हतं तिच्यासोबत. तेव्हा तिला मी तिला आवर्जून सांगते," काही होत नाही बाळा, कुणी तुझ्यासोबत खेळत नसलं तरी तू खेळणं थांबवू नकोस. तुला खळतांना बघून कुणीतरी नक्कीच येईल आणि नाही आलं, तर तुझ्या एकटं खळण्याच्या कलेचा हेवा वाटेल समोरच्याला" 

आणि मला ऋचा आठवते .... आज माझ्या मुलीला ऋचाची गोष्ट आज नक्कीच कळणार  नाही. पण मला मात्र खूप काही सांगून जाते ... 

आपण एकटे पडू ह्या भीतीने आपण कधीच जगापेक्षा वेगळा विचार करत नाही आणि एकटे पडलो तरी समोरच्याला दोष देत एकटेपणात स्वतःला विसरून जातो. पण, खरं तर आपण एकटे असतो तेव्हाच एकाग्र असतो. सर्व दुःखावर मात केलेली असते. समोर फक्त ज्ञान असतं फक्त ते आत्मसात करून प्रकाशित होता आलं तरी आयुष्य बहरत जात. आणि चाफ्या सारख डोलदार उभं राहायला कुणाची गरज पडणार नाही आणि जेव्हा खाली पडू तरीही आपला ताजेपणा आणि सुगंध बराच वेळ तसाच राहील ....

कथा कशी वाटली नक्की कळवा ! आणि माझ्या कथा वाचण्यासाठी माझ्या पेजला नक्की लाईक करा https://www.facebook.com/manatlyatalyat

©उर्मिला देवेन

सदर लेखाच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.

फोटो साभार गुगल

मधुचंद्राची रात्र ह्या कथेचा पहिला भाग प्रकाशित झाला आहे.  थेची प्रस्तावना Dr. Prakash Baba Amte फेम प्रसाद ढाकुलकर ह्याच्या दर्जेदार कवितेच्या माध्यमातून मांडली आहे... आणि कथा प्निती संदीप ह्यांच्या सुमधुर आवाजात मांडून चित्रबद्ध केली आहे नक्की बघा , मनातल्या तळ्यात youtube channel वर नक्की बघा




Post a Comment

2 Comments

Emoji
(y)
:)
:(
hihi
:-)
:D
=D
:-d
;(
;-(
@-)
:P
:o
:>)
(o)
:p
(p)
:-s
(m)
8-)
:-t
:-b
b-(
:-#
=p~
x-)
(k)