मीचं का समजून घ्यायचं...

 

नंदनीच्या लग्नाला सात वर्ष झाली होती. दर वर्षी सुट्यांमध्ये अनुप तिला गावी घेवून जायचा. पण आता जरा व्याप वाढला होता. मुलगी पाच वर्षाची होती, आणि मुलगा तीन वर्षाचा, नंदनीनेहि नौकरी सुरु केली होती. जेमतेम सहा महिने झाले होते तिला ऑफिस जॉईन करायाल. दिवाळीत कसं बसं अनुपने स्वतःला साभाळलं, पण त्याची कुरकुर सुरूच होती, यंदा त्याला नंदिनीच्या नौकरी मुळे गावी जाताच आलं नव्हत. आईला उत्तर देतांना त्याची दमछाक झाली होती.  आणि शेवटी बोलता बोलता त्याने आईला सांगितल,

“आई आता जमायचं नाही यायला, नंद्नीने नौकरी सुरु केली आहे. मुलंहि मोठी होतं आहे.”

आईला हे ऐकताच राग आला, “मग रे ती माहेरी जात असणारंच ना? इथे यायला काटे लागतात काय? आता भाऊबीजला जावून आली असणारच ना? शिकवू नको रे, तिची भाषा बोलत आहेस तू. नाहींतरी तिला इथे न येण्यासाठी कारणांची काय कमी होती.”

“आई तसं नाही, बऱ मी बोलतो तिच्यासाठी, जमलं तर येवू आम्ही. तू समजून घे ना, मलाही सुट्या हव्यात ना.

सांगू नको रे, तू काय इकडे गावात शेती मोजायला म्हणून येवू शकतोस, पाटबंधारे विभागात चालते. काहीही कारणं तुमची.

अनुपने काहीच उत्तर दिलं नाही. आणि येतो म्हणून फोन ठेवला.

मनात त्याच्याही खूप काही होतं. आईही कशाला वरच्या वर बोलावते हेही त्याला कळत नव्हतं. इथे जावून नुसता घरात बसायचं हेहि त्याला कळत नव्हत पण आईला टाळू शकत नव्हता. नंदनीच बोलणं त्याला पटत होतं पण आईचही बोलणं त्याला योग्य वाटत होतं.

संध्याकाळी नंदनी घरी आली, अनुप आधीच घरी आलेला आणि मुलानाही त्याने पाळणा घरातून आणलं होतं. नंदनीसाठी चहा केला, तिला देत म्हणाला, “ऐक ना, जावून येवूया ना गावी, आईला नातवांची आठवण येते ग, आता किती दीवस राहिले त्यांचे. जरा मुलासोबत घालवतील वेळ.”

“अरे पण कसं जमायचं हे, मला नाही जमणार बाबा, आई बाबांना सांग ना इकडे या म्हणावं. काही दीवस राहा म्हणावं.”

“आग पण ते कशाला येतील भाड्याच्या घरी.”

“भाड्याच्या घरी, का हे घर नाही का?”

“बघ, समजून घे ना? जावूया आपण.. तू ना नौकरी सोडून दे. किती मिळतात तुला, तेवढे तर भेट म्हणून मिळतात मला, मोजणी करायला गेलो कि.”

“अनुप! जास्त होत आहे. माझं येवढ शिक्षण काय मी फक्त गावी जाण्यासाठी आणि तिथे जावून काय नुसतं स्वयपाक घरात काम करण्यासाठी नाही घेतलं. आधी दीवस वेगळे होते. जायची ना मी? केलंय सर्व. आता नाही जमणार.”

अनुप ताडकन उठला. आणि खोलीत निघून गेला. पुढचे काही दीवस तो धड बोलत नव्हता. नंदिनीहे फारसं बोलली नाही. दर वेळी मनाला मुरडा मारून ती स्वतःच सगळं सोडून जायची, कधी कॉम्पुटर क्लास सुटायचे, कधी कुठली परीक्षा तर कधी इंटरव्ह्यू, तर कधी नात्यातला कार्यक्रम पण सासरी जायची ती. ह्या वेळी तिने समजून घायचं नाही हेच ठरवलं.

परंतु अनुपच वागणं फारच विचित्र झालं होतं. त्याचीही गोची होतं असावी. आईचं बोलणं आणि उगाच फोनवर रडणं त्याला नंदनीचा राग करायला लावत होतं.

त्या दिवशी छकु, नंदिनीचीमुलगी तिला म्हाणाली, “मम्मा तू वाईट आहेस. आज्जीला भेटायला जावू देत नाहीस.”

आता मात्र नंदनी भडकली, ती तशीच काम सोडून अनुपकडे आली, “काय हे काय सुरु आहे तुझं, हे असं मुलांना सांगतोस काय?

“नाही मी काही सांगितलं नाही, तिनेच तिचं काय ते ठरवलं असणार.”

“हो ना? तू असा असा पुळका घेवून असतोस मग ती बोलली असणारं नाही.?”

“ग पण, समजून घे ना, जावूया ना? कशाला करतेस असं. तू तर माझी लाडाची बायको आहेस. काढ ना काहीतरी मार्ग.”

“लाडाची म्हणतोस, काय रे करतोस, तुचं समजून घे ना, दर वेळेस मीचं का समजून घ्यायचं, आणि केलं ना पण नाही जमत रे आत्ता सारखं सारखं तिकडे जायला. मला काम पण बघायचं आहे. आत आही सोडणारा नाही मी.”

“काय किरकिर करतेस ग, आता माहेरी जायचं असतं तर?”

“तिथेही गेले का? उगाच काहीही बोलू नको? आणि काय रे तुझ्या आईला बाबांना येता येत नाही इकडे. काही करावं म्हटल तर घरचे आधी आड येतात. मग बाहेरचे काय? नवरयाने समजून घ्यावं तर तोही असा. समजून काय मीचं घ्यावं? उद्या नौकरी सोडते मग चला जावून येवू, नाही गेलो तर तिकडे सांगळे वाट बघून बघून आजारी पडतील ना?” 

“नंदनी असं नाही ग… जावूदे तुला बोलणं म्हणजे ना...”

आणि अनुपचा फोन वाजला. आई फोनवर होती, तिने फोन स्पीकरवर टाकला होता, म्हणाली,

“काय ते अनुप कधीची तयारी आहे. मी इकडे मस्त ज्वारीच पीठ दळून आणलं आहे. वांगी मस्त आलीत आपल्या शेतात. ये उद्या आणि नंद्नीला इकडेच ठेवशील आठवडाभर, माझे नातू खेडतील शेतात आणि मज्जा करतील.”

“आई माझं जमणार नाही, काय ग तुझं, आम्हाला काय मिळत नाही का इकडे? आणि नंद्नीला का ठेवू मी, इथे माझं कोण करणार, मुलांच्या शाळा आहेत. त्यापेक्षा तुम्हीच या ना इकडे, शेती गडी माणसं बघतील ना. नातवांसोबत राहता येयील आणि माझी गैरसोय होणार नाही. नंदनीच म्हणशील ना तर तिचं नवीन काम आहे. जम बसला कि सुट्या काढू आणि मग येवू पण दर वेळेस तिनेच का समजून घायायचं.”

“अरे पण, समजून घे ना?”

आता बाबा बोलले, “बऱ, सगळं ठीक आहे ना रे. काही काळजी करू नकोस.”

आणि त्यांनी आईला फोन ठेवायला सांगितला.

फोन ठेवताच आई म्हणाली, बघितलं, बायकोची भाषा बोलत आहे. कशाला थांबवलं तुम्ही? अरे काय होतं इकडे यायला. आम्ही काय कुठल्या गोष्टीला नाही बोलतो काय? नौकरी करते म्हणे.”

“तू शांत हो, पण आधी ती यायची ना? आणि ऐवढी शिकलेली सून तुलाच हवी होती ना, मुलाच्या बरोबरीची, म्हणजे मिरवायची तू! मग आता तिने ते सांर काही तुझ्या त्या भाकरी करण्यात घालवायच का? आणि नेहमीतिनेच समजून का घ्यायचं. तयारी कर उद्य निघुया आपण.”

अनुप आईशी ओघात बोलला खरा पण त्याला त्याचं मन खात होतं. नंदनीला मनातून बऱ वाटत असलं तरी तिला काहींतरी चुकतंय हे जाणवत होतं. मनोनन तिने ठरवलं, “काम लक्षात आलं कि सुट्या घ्यायच्या आणि जावून यायचं गावी. कशाला अनुप रावांना चुनचुन वाटू द्यायचं. लग्न केलं आणि समजून घ्याण्याचा ठेका जसा माझ्याकडेच आलाय. नौकरी केली तरी सारं काही समजून घ्यावं लागेल. असो, पण आता नाही जमत माझं.”

दुसऱ्या दिवशी अनुप गुमान ऑफिससाठी निघून गेला. नंदनीने सारं काही आवरलं आणि तीही मुलांना शाळेत सोडून कामाला गेली. संध्याकाळी नंदिनी घरी आली तेव्हां घरात आई बाबा होते. मुलही पेरू खात मज्जा करत होते. तिने आश्चर्याने आईला आलिंगन देत विचारलं, तुम्ही इकडे? आणि अचानक?

“का येवू शकत नाही का? आम्ही दुपारीच आलो, शेजारी विचरापूस केली तर कळालं चाबी त्यांच्या कडे असते भांडे वाल्या बाईसाठी म्हणून. मग काय शिरलो बाबा घरात, शेजारच्या काकूने मदत केली मग मुलांनाही घेवून आले हे पाळणाघरातून.”

“पण अनुप?”

“त्याला काही माहित नाही, मुल दिसले नाहीत पाळणाघरात म्हणून त्याने आता काही वेळा आधी शेजारच्या काकूला फोन केला होता म्हणे. मग त्यालाही आताच कळालं, येतोय तो लवकर. तुला बोलला नाही का ग?”

“नाही आई, तो ना बोलत....”

नंदिनी सांगणारच होती तर तेव्हांच बाबा बोलले, जणू त्यांना कळालं होतं कि सूनबाई आणि मुलात अबोला आहे ते.

“सुनबाई चहा टाकतेस ना? हिने केलेला पण काही जमला नाही बुवा. तिला तो तिकडेच जमतो. पण मला तुझ्या हातचा हवा आहे?”

अनुप घरी आला होता, आई बाबांना बघून तो खूप खुश होता, पण नंदिनीशी बोलत नव्हता, बाबा आईला इशारा करत म्हणाले, “कधी कधी आपणही समजून घ्यावं काय अनुपची आई. नेहमी नेहमी आपणच का हट्ट धरावा. आणि समोरच्या तो कुठल्याही परिस्थितीत तो पूर्ण करावा. हे काही बरोबर नाही वाटलं, मग आलोय आम्ही. आणि इकडे आता पंधरा दिसव राहणार. काही हरकत आहे का सुनबाई?”

“नाही ना बाबा, तुमच घर आहे. हवं तेवढं राहा. तुम्हाला सांगू येवढा आनंद झालाय ना? खूप मोठं ओझं कमी झालं.”

नंदिनी चाह्चे कप घेवून स्वयपाक खोलीत गेली. अनुपला त्याची चूक कळाली होती. पण तो स्वयपाक खोलीत जाण्याआधी आई शिरली, तिने भाकरीच पीठ आणलं होतं. खूप काही घेवून आली होती. कुठे काय ठेवायचं विचारात ति हळूच नंदिनीला म्हणाली, “नवीन कामाचा व्याप जास्त आहे काय ग? आता आहे मी, जरा निवांत हो. नंतर सुट्या टाक तुझ्या सोयीनुसार आणि ये गावात, उन्हाळ्यात, संत्री मस्त येतील यंदा.”

“हो ना आई, मी आजचं माझ्या बॉसला बोलून ठेवलं होतं आणि तुम्ही आलात... कसं ना ओझं वाटत होतं.”

“असू दे ग, सांग त्याला सुट्या उन्हाळ्यात घेते म्हणून.”

दोघीही काम करत राहिल्या. अनुपच गुमान गप्प होता. आईच्या आणि बाबांच्या गोष्टीतून नंदिनीला कसं काढावं ह्या विचारात अनुप पडला होता. पण बाबांनी आणि आईने एवढं काही आणलं होतं मग ते नंदिनीला सगळं देत होते. आणि नंदिनी सगळं लावण्यात मग्न होती. शेवटी अनुपची तळमळ बाबांना कळाली. आणि ते परत म्हणाले. “माझी झोपायची वेळ झाली, सुनबाई माझा तांब्या भरून द्या आणि बसं बाकी आम्ही उद्या लावतो दोघं.”

नंदिनीने सांर आवरून घेतलं, आणि खोलीत शिरली, काहीच बोलली नाही, अनुप गुमान तिला येवून बिलगला, हळूच कानात सॉरी म्हणाला आणि नंदिनी परत म्हणाली मीचं का समजून घ्यायचं, आता मात्र अनुप हसला.

काय मित्रा मंडळी, घरच्या बायकोनेच का समजून घ्यायचं, कधी कधी नवऱ्याचं समजून घ्यावं. कारण कधी कधी बाहेरचे समजून घेतात आणि मग आपल्या सारखे वागतात पण घरच्यांनी जरा समजून घेतलं तर मनावर ओझं वाटत नाही. अबोला धरून घरात सावट पसरवण्यापेक्षा बोलून मनात शांतता ठेवणं उत्तम ना...

मग समजून घ्या समजून घेण्याची अपेक्षा ठेवू नका...

 कथा कशी वाटली नक्की कळवा!

नवीन कथा वाचण्यासाठी पेजला लाईक नक्की करा!

 https://www.facebook.com/manatlyatalyat


जोडीदार कथेचे भाग सर्व भाग इथे आहेत - कादंबरी कथा- जोडीदार... प्रवास तुझा माझा 

https://www.manatalyatalyat.com/search/label/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE?&max-results=8

पेजला लाईक करा 

कथेच्या प्रकाशनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव 

फोटो साभार गुगल

©उर्मिला देवेन

Urmiladev@gmail.com


Post a Comment

0 Comments