जोडीदार तू माझा... भाग ७

 जोडीदार तू माझा...  भाग ७ 



सानुचा नकार राजनला कळला होताच आणि बाबांनाही, राणी राजनला पसंत होती पण त्याच्या घरच्यांना सानू सून म्हणून पसंत होती.

पाहुणे निर्णय अर्धवट सोडून निघाले होते. खरं तर तो निर्णय राजनने थांबवला होता. होकार तर त्याच्या घरच्यांचा होताच. अरुण आणि आरतीने गोडपणे पाहुण्यांना निरोप दिला होता.

राजन निघतांना गडबडला होता, पण अलगत परत राणी समोर आली आणि हास्य आलं त्याच्या चेहऱ्यावर. राणी पसंत होती त्याला पण सानूने नाकारलं होतं हे सांगू कसा घरी हे त्याला कळेना झालं होतं. मुलीने समोरून थेट नकार म्हणजे आजही आपल्याकडे कुतूहलाचा विषय. त्यात राजन जरा स्वतः गुरफटून राहणारा, सानुचा नकार त्याला खात होता, आपण नकार देवून का मोकळेपणाने राणीसाठी बोलू शकलो नाही हा विचार त्याच्या मनात नकळत शिरला होता.

पाहुण्यांसोबत भीमा काका ही निघ्रणार होते तर आई आरतीने त्यांना थांबायला सांगितलं. भीमा काका आरतीला म्हणाले

“अहो वहिनीसाहेब येतो मी. पाहुण्यांची गाडी लावली आहे ना आपल्या सदाच्या घरासमोर. जरा बोलून परत येतो मी. नाहीतर तो सदा एवढ्या वाजता इग्रजीतच बोलतो, आणि काय बोलतो त्यालाच माहित. तो काही गाडीला हात लावू द्यायचा नाही.”

“काय रे अरुण तुला तर माहित आहे त्याची सात नंतरची इग्रजी.”

आणि दोघही हसायला लागले, “अरे हो, जा जा... नाही तर बाळूला पाठवू का...? त्याला आणता येतो सदाला वठणीवर. “

“नाही रे.. आपला जुना याराना साल्या... मीच पुरतो त्याला... पोराला कशाला मध्ये आणतोस! आपल्या दोस्ताला आपणच सभाळूया.”

“हो रे, तुला तर नमतोच तो, जा आता आणि लवकर ये.”

अरुण आता परत भीमा काकाच्या जवळ आला आणि कानात म्हणाला,

“आता हे पाहुणे गेल्यावर आपलं काही खरं नाही दोस्ता... पोरीनं पार वाट लावली वाटते मुलाची. आता तुझी वहिनी आपली लावणारं... येरे भावा माझ्या बाजूने बोलायला. कुणीतरी हवं ना.”

अरुणाला सानुचा निर्णय कळाला होता आणि त्याने तो खाना खुणा करत भीमा काकाला सांगितला होता.

भीमा काका जरा तोंडावर हात ठेवत म्हणाले,

“काय म्हणतोस रे!  सानूना! खरंच, लाखात एक आहे माझी पोरं... दिला का रे नकार, हुश... मला अजून किती चकरा मारायला लावते आणि माझे सारे पाय झिजवते की काय कोण जाने... पण माझंही वचन मित्रा... माझ्या सानुच्या अंगावर अक्षदा टाकल्या शिवाय... त्या यमाला शिवू देणार नाही मी अंगाला.”

“अबे ये... वचन बद्ध, आधी जा... आणि ये लवकर. इथं माझी आतून हादरली आहे.“

“आलोच... घाबरू नको मी आहे तुझी बाजू घ्यायला. हम है अभी! “

आणि भीमा काकाने त्यांचा बूट घातला आणि निघाले पाहुण्यांच्या मागे...

इकडे सदाच्या अंगणात पाहुणे गाडी जवळ आले आणि दचकले होते, सारी वस्ती जवळपास जमा झाली होती, लहान मुल सदाच्या जवळ येवून उभी होती, बायका दारात उभ्या होत्या आणि माणसं गल्लीत उभी होवून सार काही बघत होते. सदा काकाने सर्व गोंधळ घातला होता, तो काही राजनला त्याच्या चाराचाकी गाडीला हात लावू देत नव्हता,

सदा गाडीला आलिंगन देवून बसला होता आणि बडबडत होता,

“ माय बायको  सेंड इट टु मी, शि स्टिल लव मी, शि इज वॉचिंग मी, ये बायको...  यु वॉचिंग मी.... एस!!! मी कमिंग टू यु, वेट लेट मी ड्राइव्ह थिस माय कार....ढूर...ढूर आय एम कमिंग माय बायको… “

बोलण्याच्या नादात आता तो गाडीच दार उघडण्याचा प्रयत्न करत होताच तर भीमा काका तिथे पोहचला.

“ ओह माय डिअर फ़्रिएन्ड, यु डू नॉट नो, युअर वाइफ टोल्ड मी, यु नीड टू टेक रेस्ट नाऊ,  अँड कम इन द मॉर्निग..... अँड शी विल शाऊट ऑन यु इफ शी सीस यु लाईक थिस… गो क्लीन युअर फेस फस्ट."

“ एस यु आर राईट माय दोस्ता!“

“माय बायको नेव्हर लाईक थिस ...तू  वेट मी कमिंग. तू नॉट गोइंग अन्यिव्हेअर.”

“ एस माय डिअर, आय एम हिअर ,...”

सदा घरात चेहरा धुवायला शिरला आणि भीमा काकाने राजनला त्याची चारचाकी काढायला सांगितली, भीमा काका सावंत साहेबांना हात जोडून म्हणाले,

“अरे सावंत साहेब क्षमा असावी... तो ना...”

राजनचे बाबा भीमा काकाला थांबवत म्हणाले,

“नाही नाही असुद्या.. सगळं आलं लक्षांत... सांभाळा त्यांना... जोडीदाराची कमी जाणतो आम्ही. मोठ्या भावाला बघतोय आम्ही. जोडीदार सुटला की हा आयुष्याचा प्रवास नकोसा होता आणि ह्या वयात तर सांगूच नका, काळजी घ्या त्यांची, बऱ, भेटूया परवा... कळवा निरोप. येतो आम्ही.”

राजनने गाडी काढली होती, पाहुणे निघाले आणि भीमा काका सदाला सांभाळायला त्याच्या घरात शिरला,

सदा काकाची बायको वर्षाआधी वारली होती, मुलगा सून दूरच्या शहरात राहायला होते. हा ऐकटाच इकडे असायचा. सोबत उभा असणारा जोडीदार जेव्हा सोबत दिसत नाही, आणि नुसता फोटोतून बघतो तेव्हा जी अवस्था होते ना तीच सदाची व्हायची. बायकोच्या फोटो समोर सतत बसून बोलत असायचा. तिला विनवण्या करायचा कि त्यालाही बोलवून घे आणि मग तिच्याशी भांडायचा कि ती त्याला का बोलवत नाही म्हणून.

घरात येताच त्याच तेच सुरु झालं होतं आणि भीमा ते बघून भावूक झाला होता. म्हणाला, 

“ये सदा आता तरी माझ्या बहिणीला शांत राहू दे रे, अजूनही भांडतोस का रे...? “

“बघ ना रे ...मी रिक्वेस्ट हर एव्री डे, पण शी इज नॉट कॉलिंग मी, तू टेल हर, यू ब्रदर ना, प्लीज रे."

“ये…गप्प रे... तुझी वेळ आली कि बोलवेल ती तुला. तू आधी औषध घे बघू आणि झोप. कुठे ठेवलंस औषध... काय हा पसारा सदा. आवरायचं ना, करतोस तरी काय घरी.”

“हे, हेच म्हणायचो मी तिला, पण ती कधीच उलटून बोलली नाही, नाही शिकवलं रे तिने मला, सवय लागली, तू बोलाव ना तिला कॉल हर... आय नीड हर.”

भीमालाही भरून आलं होतं, म्हणाला,

“कसं घर अगदीच नेटून ठेवायची संगीता, आणि कसं आहे आता, काहीच सापडत नाही रे मला.”

शोधता शोधता त्याला औषधी सापडल्या, भीमाने डोळे पुसत त्याला त्याच्या औषधी दिल्या आणि झोपायला सांगितलं. तो तिथेच बसून राहिला, सदा झोपेपर्यंत बडबडत होता आणि भीमा त्याच्या उश्याशी बसून होता. सदा झोपला आणि भीमा उठला, खोली त्याने जराशी आवरली आणि तो निघाला होता अरुणकडे. त्याचा तोच झिजलेला बूट तो पायात घालत होता तर त्याची नजर सदाच्या बायकोच्या फोटोवर पडली, डोळे भरून आले त्याचे,

“काय ग संगीता, बघती आहेस ना माझ्या सदाला. नाही ग तुझ्या सदाला... तुझी काळजी घेतो हा आताही! बघ ना रोज नवीन ताजा हार चढवतो तुला आणि तुझ्या आवडीचा गजरा आणून ठेवतो तुझ्यासमोर. भांडायची ग तू त्याच्याशी कधी विसरला तर तो हा गजरा...पण आता नाही विसरत तुझं काहीही तो... आज त्याला माफ कर.... जरा जास्तच घेतली त्याने कदाचित. पण तू काळजी करू नकोस मी येतो इकडे कधी कधी. जोडीदार म्हणायची त्याला, का ग गेलीस लवकर? असं कुणी जातं का नुसत्या तापाने...”

परत भीमाने डोळे पुसले आणि म्हणाला, “काळजी घे त्याची, नुसती बघ त्याला बसं! येतो मी उद्या अजून.  आपल्या सानुसाठी स्थळ घेवून आलो होतो... सानू, राणी मोठ्या  झाल्यात ग आता, तुला काय सांगतो तुझ्या अंगाखांद्यावर तर खेळत मोठ्या झाल्या त्या, येतो मी. काळजी घे बऱ.“

भीमा काका अरूणकडे निघाले होते. विचारात होते की जोडीदाराच स्थान खरच किती महत्वाच असतं, पण बघाना जवळ असला कि माणूस कधी ते महत्व एकमेकांना जाणवू ही देत नाही आणि मग सोबत नसला कि ती सल मनाला बोचते. जोडीदाराच नातं असंच असतं, ती जोडी असते, मग एकटं पुढचं आयुष्य काढणं कठीणच होवून जातं, बऱ्याच ठिकाणी तर जोडीदार सोडून गेला आणि जवाबदऱ्या नसल्या की वर्ष दोन वर्षात दूसराही निघून जातो. आणि जवाबदऱ्या असल्या की मग ती मनात असलेली साथही जगण्याची उमेद देवून जाते.  

भीमा काका विचारात झपझप पावलं टाकत निघाले होते.

आपणही भेटूया कथेच्या पुढच्या भागात.

कथा क्रमशः

कथेचे सर्व भाग वेबसाईट आणि पेजवर आहेत, तुम्ही वेबसाईटवर, कथा मालिका जोडीदार तू माझा... ला क्लिक करा. आणि सर्व भाग वाचा.

नोट- माझी विषकन्या कश्यपी ही ऐतिहासिक कादंबरी सध्या मराठी साहित्यात खूप कौतुकाचा विषय ठरत आहेत.... सर्वाना धन्यवाद! आपणास हवी असल्यास आपण अमेझोन/ फ्लिप कार्ट वरून मागवु शकता. लिंक हवी असल्यास मला मेसेज करा...

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

 


Post a Comment

0 Comments