जोडीदार तू माझा... भाग ९


 जोडीदार तू माझा... भाग ९ 


भीमा काकाला  दारात बघताच अरुण ओरडला,

“काय रे, तुला काही कुणाला सांगायची गरज नाही. आता तुझं काम अजून वाढलं आहे. वहिनीच बरोबर आहे हा बूट तुला लकी आहेच दोस्ता.”

“काय म्हणतोस रे... सानू अजून काही बोलली का? काय निर्णय बदलला का रे बाबा तिने?”

आणि ते सानुला आवाज देत घरात शिरले,

“सानू बाळा....”

अरुण परत म्हाणाला, “अरे सानू नाही राणीसाठी जुळव आता तेच स्थळ. राजनरावांना राणी पसंत आहे म्हणते ही सानू, आणि ह्या पोरीने नाकारलं त्याला... बघ आता तुझ्या हातात आहे सारं... तुला नव्याने सुरु करावं लागेल परत आपल्या राणीसाठी.”

“सानूने बिनधास्त नकार दिला राजन रावांना! म्हणजे समोरा समोर!” भीमा काका घरात शिरत म्हणाले.

सानुने भीमा काकाची पिशवी हातात घेतली, आणि त्यात डोकावत म्हणाली,

“काय भरून असते हो काका ह्यात, नुसते कागद दिसतात मला, आधी मी लहान होते तेव्हा तुम्ही पिपरमेंटच्या नाहीतर संत्रा गोळ्या काढून द्यायचे, आज नाहीत का ह्यात.”

“आहेत ना सानू बघ जरा, आता तू मोठी झालीस, तुचं मागत नाहीस ग, नाहीतर मी आलो कि धावत यायची. बघ आहेत त्यात, सकाळीच मी घेतल्या होत्या. आम्ही आजही त्याच आठवणीत असतो बाळा, आज त्याच संत्रा गोळ्या सुपर मार्केट मध्ये मिळतात, घेतो मी आठवण झाली की, कालच घेतल्या आहेत आणि निघतांना काकीने माझ्या पिशवीत मुद्दाम टाकल्या, ती नेहमीच टाकते, तुला आज आठवण झाली.”

सानुने पिशवी पूर्ण बघितली, आणि त्यातून तिने संत्रा गोळ्याचं पोकीट काढलं, गोळ्या काढल्या आणि सर्वांना दिल्या, आणि भीमा काकाला म्हणाली,

“काय हो काका, मी म्हणाले नाही राजनला, बिचारा गडबडला होता, पण राणीचं नावं घेताच अगदीच आतुर झाला होता. हो मी त्याला सरळ नकार दिलाय. मी तर इकडे हॉलमध्येपण बोलणार होते पण राजनने थांबवलं मला.”

आता आईने अगदीच डोक्याला हात लावला,

“आता काय करू मी ह्या मुलीचं, बऱ झालं त्या राजनरावांनी थांबवलं.”

आणि मग ती अरुणला म्हणाली, “बघा हो तुमची लाडाची वाया गेलेली लेक, काही बोला ना तिला.”

“का ग? नाही आवडला ना तिला मग काय झालं, दिला नकार, माझी मुलगी हिंमत वाली आहे, अग हिंमत लागते असा नकार समोरून द्यायला, मुलंच देवू शकतात काय?”

“तुमच्याशि बोलून काही फायदा नाही, चढवा अजून डोक्यावर मुलींना.” आई शांत खुर्चीवर बसली.

“काय हो वहिनीसाहेब तुम्ही का अश्या बसल्या?” भीमा काका आरतीला म्हणाले.

“अहो आता काय करायचं! राजनच्या घरच्यांना तर सानू पसंत आहे आणि आता ते राणीला कसं हो म्हणतील. कसं करायचं हो. आणि हे तर मुलीची बाजू घेवून मोकळे झाले.”

“अहो वहिनीसाहेब, राणीला पसंत आहे का राजन?”

“हो, ती तर वेडीच आहे... झालं हे की, आले मोठीला बघायला आणि पसंत पडली ती लहान. लोकं काय बोलतील कोण जाने आता... राहिलं, पण हेही साधसं नाही मुलाच्या घरी मोठी पसंत आहे आणि मुलाला लहान आवडली.”

“अहो वहिनी, मुलाची पसंत महत्वाची, बाकीच्यांचं काय मनाला लावून घेता, मिया बीबी राजी तो काय करेगा काजी? मी बघतो कसं करायचं ते. राणी ये ग इकडे.”

आणि त्यांनी राणीला जवळ घेतलं,

“बाळा राणी, राजन पसंत आहे का ग तुला? म्हणजे सानू म्हणते ते बरोबर आहे का ग?”  

राणी गुमान गप्प होती, तिला असं बघून भीमा काका परत म्हणाले,

“राहिलं तू मला निवांत फोन कर, मी राजनशी बोलून घेतो.”

राणीने अलगत मान हलवली, काहीशी नाराज झाली होती ती.

भीमा काका परत म्हणाले, “वहिनी साहेब, तुम्ही काळजी नका करू, मुलाला मुलगी पसंत असणं जास्त महत्वाच, शेवटी काय सारी नाती जोडीदारासोबत येतात, नाती आधी येत नाहीत नात्यात, जोडीदार असतो समोर मग मागून सर्व.”

“हो, हे म्हणायलाच असतं, सारी नाती जोडीदारा सोबतच येतात, पण मुलाला पसंत पडलेली बायको ही त्याचीच पसंत होवून राहते आणि त्याला काही फरक पडत नाही, सगळं सहन करावं लागतं ते मुलीला... लग्न दोघांच असतं हो, पण दोन घरही लग्नबद्ध होतात. जोडीदारच नातं दोघांच असतं पण नाती सर्वांसोबत ठेवावी लागतात... तेव्हाच जोडीदारच नातं मजबूत होतं, नाहीतर तुटायला वेळ लागत नाही. तुम्हाला नाही कळायचं हे.”

“कळते हो आपली चिंता आम्हाला... पण चालयच, लग्न आणि संसार म्हटला कि अडजस्टमेंट आलीच.”

“हो पण तीही मुलीला करावी लागते.”

“म्हणजे ग, आम्हीं पुरुषही किती किती करतो.” अरुण जरा गंभीर होतं म्हणाला.

“हो तुमची अडजस्टमेंट माहित आहे मला...पण आपलं निभलं आता... आपल्या गरजा कमी होत्या पण काळानुसार आजच्या पिढीच्या गरजा वाढल्या तश्या जोडीदारा कडूनही अपेक्षा जास्तच असतात. बदल घडायला हवा असं सगळेच म्हणतात पण बदल स्वतः पासून नाहींना सुरु होत... त्याची अपेक्षा समोरच्या कडून आधी असते...”

आई गंभीर झाली होती. वातावरण शांत झालं होतं. तिचही म्हणणं योग्य होतं. जोडीदाराशी नातं निभावतांना कही नाती निभवावी लागतात, आणि खरा कस तिथे लागतो. नाहीका!

आरती काळजीत पडली होती, काहीशी आनंदी होतीच पण सानुसाठी अजूनच चिंतेत होती. जोडीदाराशी नातं निभावतांना सारी नातीही निभवावी लागतात आणि खरा कसं तिथे लागतो ह्या शब्दाने सारे कसे शांत झाले होते. राणी आणि सानू त्याच्या खोलीत आल्या होत्या. काळजीने घरात तिचं साम्राज्य पसरलं होतं.

भीमा काका आरतीला असं बघून अरुणला इशारा करत म्हणाले,

“वहिनीसाहेब मी बघतो सावंत साहेबांशी बोलून. पण आपली राणी काय म्हणते? ते बघा हो तुम्ही, तिची मत महत्वाच आहे. मी करतो तिला फोन, पण तुम्हीही बोला.”

“बोला तुम्ही, पण मला बाई अवघड वाटतं सारं... पोरीने पूर्ण अडचणीत टाकलं आपल्याला. चार लोकं कुजबुजतील हो, मोठीला सोडून लहानीच लग्न ठरलं म्हणून... सानूबद्दल वाईट बोलतील काय हो लोकं? मला बाई चिंता लागली आता.”

“नाही नाही, असं काही नसतं हो” भीमा काका आरतीला समजावत म्हणाले.

“नुसतं बोलण्यासाठी असतं भावजी, मुलीला खूप काही सहन करावं लागतं, आणि तो प्रवास करतांना पदोपदी जोडीदाराची साथ लागते.”

“मग तेच तर, कशाला काळजी, राजनला राणी पसंत आहे म्हटल्यावर... तो राहिल ना तिच्यासोबत. तुम्ही काळजी करू नका, उगाच बी पी वाढायचा तुमचा.”

इकडे सानू आणि राणी तिच्या खोलीत बोलत होत्या, सानुने राणीला स्पष्ट विचारलं,

“राणी, तुला आहे का ग पसंत राजन?”

“ताई, पण तो तुला बघायला आला होता. तुला वाईट तर वाटणार नाही. मला राहून राहून कसंस होतं आहे ग.”

“ये असल्या पिचकाऱ्या मारू नको... सरळ सरळ सांग... “

“तुला... वाईट तर वाटणार नाही ना?”

“त्यात काय, मी त्याला नाही बोलले... बसं! विषय संपला माझ्याकडून आता, तू तुझा नवीन विषय सुरु कर, विसर सारं.”

तरीही राणी उदास बसून होती, कळत नव्हतं कदाचित तिला, कि ती जे विचार करते ते होवू शकतं. हरवली होती कुठेतरी. गुमान गप्प होती.

कानातले खडे काढून ठेवतांना सानू अलगत म्हणाली,

“तो माझ्यासारखा आहे ग... त्याला आधीच टॅक्सीत भेटले मी आणि खरा खुरा स्वभाव बघितला त्याचा. मला नाही ग जमणार... माझ्या जोडीदारच्या कल्पनेतही बसत नाही तो.”

“म्हणजे तो चांगला मुलगा नाही?”

“तसं नाही ग, मला पसंत नाही पण राजन चांगला मुलगा आहे ग राणी.”

“तुला आवडला नाही म्हणून तू मला म्हणतेस का? तुला लग्नच करायचं नाही हे तू मला बोलले होते, मग तू मला म्हणतेस का ग?” राणी जरा दुखावल्या सारखी बोलली.

“तसं नाही... तुझी जशी इच्छा... पण मला माझा जोडीदार एका जोडीसारखा हवा आहे.”

राणी नाराज झाली होती कि ताईने नाकारलेला मुलगा तिला पसंत पडलाय म्हणून. हे सानूने टिपलं होतं. आता सानू तिच्या अगदीच जवळ येवून बसली,

“हे बघ राणी मी त्याला नकारलं नाही. नाही बोलले फक्त, मला नाही वाटलं ग काही. तू एवढा विचार करू नकोस. तू असं समज ना, कि तो तुला बघायला आला होता. हा, आता मी त्याचा इंटरव्ह्यू घेतला पण, तुझ्यासाठी. तो उत्तम आहे, आणि मुख्य म्हणजे मी त्याला पसंत नाहीच ना... त्याने तुला बघितलंय आधी. पहिल्या नजरेत त्याला तू आवडलीस ग, त्याच्या घरच्यां लोकांच काय ग.... कळलं कि वळतील सारे... तू नको तसा विचार करू. राजन करेल ना काही तरी. तू आता जरा शांत हो. त्याला तू बायको म्हणून हवी असले तर येईल तो परत. नही तो हम कम है काय?”

“एवढं सोपं आहे काय ग!”

“का नाही, गोष्टी सोप्याच असतात आपण त्यांना कठीण करतो, जावूदे, तू इतकी सुंदर आहेस कि तुला कुणीही नाही म्हणणार नाही ग. चलो छोडो भी यार, रात गयी बात गयी, और अगर बात बनी तो बसं... दिल से बनेगी डार्लिंग.”

“पण मी नौकरी नाही ना करत... लोकांच काय ग, त्यांना सुंदर आणि कमावती बायको पाहिजे असते.” राणी परत उतरत्या स्वरात म्हणाली.

“असं काही नसतं, राजन त्यातला वाटला नाही... आता त्याच्या घरच्यांना वाटत असेल की सून नौकरी करणारी हवी म्हणून, त्याचं सांभाळून घेणारी हवी. पण, ते तर तुम्ही दोघं नंतरही ठरवू शकता... तुही नौकरी करू शकतेस. हो ना? जावू दे, तू विचार करू नको. आपले भीमा काका आहेत तो विचार करायला. ते नक्की बोलतील राजनशी आणि त्याच्या घरच्यांशीही.”

सानू राणीची समजूत काढत होती. राणी मात्र मनात आनंदी असली तरी मंदूने विचारात पडली होती. तुम्ही कथेच्या पुढच्या भागाची वाट नक्की बघा....


कथा क्रमशः 

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल... 

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

फोटो साभार गुगल

Post a Comment

0 Comments