भाग १८
आपलं राहतं घर आनंदाने डोलावं असं प्रत्येकाला वाटतं, त्यासाठी घरातलं प्रत्येक माणूस स्वतःच्या परीने आनंदाला कारण ठरावं असं वागत असतोच, नाही का?
प्रत्येक नातं हे सुदृढ तेव्हाच असते जेव्हा त्यात संवाद असतो. आणि संवाद तेंव्हाच होतो जेव्हा त्या नात्यात गुंतलेली ‘मन’ सवांद घालत असतात.
बाळूच्या आणि सानूच्या खेचाखेचीत घरातलं प्रत्येक मन आज आनंदी होतं. जेवताना आज सर्व सोबत होते. पण शांत राहणं सानूला कुठे जमणार होतं.
सानूने परत विषय छेडला,
"काय रे बाळू, कोण होती रे ती? सांगतोस कि माझी मी शोधू?”
“कोण ग...?”
“अरे बोलतोस की बोलू?”
“असं! माझ्या बाईकवर ती होती कि मी तिच्या बाईकवर होतो.”
“आ...” सानू पुढे बोलणार होतीच तर बाळू परत तिला कटात म्हणाला,
“आणि मला सांग, तू मला बाईक कधी घेऊन दिली? अरे आपल्या तायडीला भर दिवसा स्वप्न पडतात कि काय बाबा."
“ये शेंबड्या गप्प रे.” सानूने बाळूला धक्का दिला.
ती आईला बघत म्हणाली,
“आई बघ, तुझा लाडाचा लेक, मुलीच्या बाईकवर फिरतो... बघ मोहित्यांची इज्जत घालवत आहे हा.”
“ये बाई काहीही बोलू नको.” आई सानूला म्हणाली.
“ये तायडे, भंकस नको ना करू. नव्हतो ना ग मी कुणासोबत... आज इंटरव्ह्युमध्ये फार प्रशणांनी फाडून काढलं, आता तू पोस्टमार्टन नको ना करू तायडे.”
सारेच जरा शांत झाले, मग सानू म्हणाली,
“अरे यार... तू पण ना सेंटी झालास खूप... ह्या इंटरव्ह्युच टेन्शन घ्याच नसतं. ते घेणाऱ्याला द्यायचं असतं...”
नंतर सानू त्याला परत म्हणाली,
“चल भाऊराया उद्या आपण तुझ्यासाठी बाईक बघू, मी लवकर येईल, शोरूम शोधून ठेव. आणि शेंबड्या कुठली घायची तेही बजेटमध्ये शोध.”
बाबाने सानूला हात लावला, पण बाबांना तिने काहीच बोलू दिलं नाही. बाळू उर्फ अंकित आनंदाने आताच मोबाईलवर शोरूम बघत होता. तर त्याला येवढ्या वाजता कॉल आलेला, त्याने फोन उचलला तर समोरून बोलणाऱ्याने अभिनंदन करत, त्याच सिलेक्शन झालंय असं सांगितलं.
बाळूने सानूला मागून मिठी मारली,
“तायडे, आता तू मला बिनधास्त बाईक घेऊन दे, पहिला डाऊन पेमेंट भर, मी हप्ते भरेल. माझं आयटी कंपनीत प्रोग्रामर म्हणून सिलेक्शन झालंय, उद्या कागदपत्र घेऊन बोलावलंय.”
आई तशीच पटपट आटपून टेबलावरून उठली. देवघरात गेली, मंदिरात ठेवलेला अंगारा तिने आणला आणि तो आधी अंकितच्या माथ्यावर लावला,
“माझा गुणाचा मुलगा, खूप प्रगती करा...”
तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते. राणीने उठून फ्रीजमधून मिठाई काढून आणली, सर्वांना दिली.
सानूने जेवणच्या टेबलवर सर्वांना सांगितलं,
“उद्या बाईक घेतल्यानंतर सर्व आपण जेवायला बाहेर जाऊया, किती दिवस झालेत आपण बाहेर जेवायला गेलोच नाही... ये आई उद्या तुझं किचन बंद ठेव आणि आत्याला सांग छकुलीला घेऊन दुपारीच इकडे यायला, घेऊन जाऊ तिला आणि छकुलीला सोबत. तिला सांग माझे ड्रेसस घेऊन ये म्हणावं.”
“अरे तायडे पार्टी पक्की केली मग तू.” अंकित आनंदात म्हणाला.
“मग तुझ्या बाईकचीही पार्टी मीच देते बघ... तू कधी देणार मला पार्टी.”
“तायडे, तू आहेस ना ग, मग मी कशाला देवू, मेरी बेहना अभी है! तो हमे क्या कमी है!”
“हुहम... बसं असं म्हणून फसवं तू मला.” सानू हसत म्हणाली.
घरात वातावरण अगदीच आनंदी झालं होतं. जेवण आटपवून सगळे आपल्या आपल्या खोलीत निघून गेले, आई किचन आवरत होती, बाबा तिला मदत करत होते. कदाचित अरुणला कळालं होतं कि जोडीदाराच शेवटपर्यंत सोबत असतो. आणि पाखरं उडण्याची वेळ सुरु झाली आहे.
दोघेही स्वयंपाक खोली आवरत होते, बाबा आईला म्हणाले,
“आरती…”
“काय हो?”
“ऐक ना.”
“आधी ते ग्लास द्या बऱ, मी लावते कपाटात.”
अरुणने एक गाल्स आरतीला दिला,
“अग उद्यापासून मलाही स्वयंपाक करू देतं जा ग, खूप करतेस. थकतेस मग.”
“असं होय, मग कुणी थांबवलं. या कि स्वयंपाक खोलीत.”
“ठरलं तर...”
“बघू...”
“अग हे पाखरं उडणार आता, एक एक करून, मग आपण दोघचं असणारं ह्या घरट्यात, तू आणि मी, मग आपण दोघे मिळून सर्व करण्याची सवय आजपासूनच लावूया ना.”
आरती थबकली, शून्यात बघत म्हणाली,
“हो ना... पिलं मोठी झालीत आता, राणीला राजा मिळालाय, बाळूला नौकरी लागली, तोही आता जवाबदारीने वागेल, आणि आपली सानू तर आधीच आई झाली आहे सर्वांची... तिच्या मायेत आणि प्रेमात घर डगमगलं नाही कधी, आता मला काही काळजी नसणार, फक्त माझ्या सानूला सांभाळून घेणारा गवसला ना कि डोळे मिटले तरी चालले हो माझे.”
“ये, काहीही काय बोलतेस! मी अजून लहान होणार आहे, माझं कोण करणार, माझी काळजी घेत जा...”
“काहीही पण हो तुमचं.”
“आह, कसं जमतं ग तुला हे असं म्हणायला..”
“काहीही हो तुमचं..”
“परत बोललीस.. गोड वाटते ऐकायला.”
“ते ठीक आहे हो.”
“आणि अशी कशी तू जाणार ग? माझ्या सोबत राहायचं, नातवं खेळवायची, जावयांच कौतुक करायचं, सुनेला स्वयंपाक शिकवायचा, मुलींना जसे पंख दिलेस ना तसे सुनेला भरारीचे पंख द्यायचे... खूप काही करायचं आहे... आली मोठी, डोळे मिटले तरी चालेल म्हणणारी, मी बरा जावू देतो तुला.”
असं म्हणतानाही बाबाच्या डोळ्याच्या किनाऱ्यावर पाणी साचत होतं. पण ते त्यांनी हळूच पुसलं. आईही हळवी झाली होती जरा, तिचे डोळे डबडबले होते. बाबा आईच्या आणखीनच जवळ आले,
“आरती, तुला एक गोष्ट सांगू का?”
“सांगा हो, आणि तो पाट पण उचला, आता कंबर दुखत आहे माझी.”
आई स्वतःचा चेहरा लपवत हळूच डोळे साडीच्या पदराने पुसत म्हणाली.
बाबा पाट उचलत म्हणाले,
“अग तू आता म्हणत होतीस ना सानूबद्दल, कि कुणीतरी गवसावं सानूसाठी, कदाचित त्याची चाहूल लागली आहे... बघ सानू सांगेल लवकरच.”
“काय म्हणता, अग बाई आजचा दिवस किती आनंद घेऊन आलाय हो, तुम्हाला कसं कळालं?”
“मग, माझ्या लेकीला ओळखतो मी!”
“माझी सानू, खूप करते हो घरासाठी, सगळं तिच्या भरोसे तर आहे, ह्या घराचे हप्ते आणि...”
“हो ना, आणि काय ग?”
“अहो हेच ना, आता तिने आपल्या बाळूसाठी गाडीची गोष्ट केली होती तेंव्हा मीच विचारात पडले होते. पण देवबाप्पा धावून आले आणि बाळूच्या नौकरीची वार्ता कळली. अहो, मी काय म्हणते. आहेत का तिच्याकडे डाऊन पेमंटसाठी पैसे. माझ्याकडे आहेत थोडे, वेगळे ठेवलेले, बोलायचं का तिला? आता आपण प्रत्येकाच्या नावाने एफडी करून ठेवलेल्या आहेत म्हणून बिनधास्त आहोत आणि सानू बाकीच सर्व सांभाळते पण हे बाईक वगैरे, अवघड नाही का होणार?”
“नको, तिला आवडायचं नाही, असतील तिच्याकडे तेव्हाच बोलली, नाहीतर बोललीही नसती. आता बाळू त्याचं करेलचं. त्याच सगळं रुळावर आलं कि बोलतो मी त्याला घराचं लोन शेअर करत जा म्हणून, म्हणजे सानू तिच्यासाठी काही जमवून ठेवेल.”
“हो, नक्की बोला, किती करणार माझी पोरं...”
“पोरं खंबीर आहे आपली.”
“ते आहेच हो, पण तुम्हाला सांगू, मला ना ह्या सर्वांचे जोडीदार एकदा कधी सोबत येतात असं झालं आहे बघा. आता आपल्या सानूच्या वयाच्या सर्व लग्न होवून दोन दोन लेकरांच्या आया झाल्या, चार लोकं कुजबुजतात माझ्या लेकीच्या नावाने. आणि आता तर राणीचं जुळतंय कळल्यावर अजून कसा विचार करतील कोण जाने. बाप्पाने कृपा करावी आता आणि माझ्या सानूच लग्न जुळावं.”
“तू काळजी करू नको, तो आहे ह्यावर विश्वास आहे माझा, सानूचा राजकुमार लवकरच येणार आता... तू तुझी तयारी ठेव... वादळ आहे आपली सानू. कुठल्या झोक्यात आपल्याला सांगेल आणि झटका देईल सांगता येत नाही तेव्हा मनाची तयारी ठेवा राणीसरकार.”
“हो तेही आहे.”
"आणि काय ते चार लोकं माझ्या लेकीपासून तर दूरच ठेव, चार काय चारशे लोकं जरी काही बोलत असले ना तरीही माझ्या लेकीला मी बोलणार नाही काही. बघ तू, राजा असेल माझ्या सानूचा जोडीदार...”
“हो, आता अगदीच जीवं कंठात आलाय माझा, माझ्या लेकीचं लग्न वेळेत व्ह्यायला हवं हो.”
“तू काळजी करू नकोस, सगळं कसं जुळून येईल आपल्या सानूसाठी.”
आई बाबांनी मिळून स्वयंपाक घर आवरलं होतं. दोघेही एकमेकांना हात देत त्याच्या खोलीकडे निघाले.
निघतांना त्यांची नजर सानूवर पडली. सानू अजूनही हॉल जवळच्या मधल्या खोलीत बसून काम करत होती. आई म्हणाली,
“सानू बाळा, लवकर झोप, नाहीतर...”
पुढचं सानूच बोलली, “नाहीतर, डोळ्याखाली काळे डाग पडतील, अजून लग्न झालं नाही तुझं... कोण पसंत करेल मग...”
आता आईला आणि बाबांना हसू आवरलं नाही, आई बाबाना म्हणाली,
“तुमची लाडाची लेक! माझं कधी ऐकलंय तिने...”
बाबा त्यांच्या खोलीत शिरतांना परत म्हणाले,
“सानू बाळा, लवकर झोप... उद्या तुझी मिटिंग आहे म्हणत होतीस ना. त्याची तयारी करतेस काय ग? झोप ग बाळा, उद्या बघ काय ते.”
सानू मीटिंगचं नावं घेताच परत भानावर आली आणि उत्तरली,
“हो बाबा तुम्ही झोपा, उद्या बोलू आपण. मला जरा काही प्लन फाईनल करायचे आहे.”
मिटिंगच नाव घेताच तिने स्वतःचा शेडूल परत चेक केला, तर उद्या सकाळी तिची मिटिंग होती सुमंतसोबत. नसत्या त्या कल्पनेने मोहरली होती, क्षणात तिने मिटिंगच आमंत्रण स्वीकारलं आणि मिटिंगमध्ये कोण कोण असणार हेही चेक केलं. लगेच प्रेझेनटेशन एडीट करायला लागली, स्वतःला प्रेझेंट करणार होती कि प्रोजेक्टला तिलाच कळत नव्हतं, तर परत बाबांचा त्यांच्या खोलीतून परत आवाज आला,
“झोप बाळा, उद्या कर ते सांर... खूप वेळ झालाय, इथे आई माझ्यावर ओरडत आहे.”
सानूने नुसता होकार देवून तिचं काम पुढे सुरूच ठेवलं. प्रेझेंनटेशन तयार करायला सानूला दोन वाजले होते. तिला तिच्या कडून काहीच कमी ठेवायची नव्हती, खरं तिला इम्प्रेशन मारायचं होतं. टीमवर कि सुमंतवर तिलाही कळत नव्हतं. पण काही तरी भन्नाट फिलिंग तिला येत होती. मनातच मनाची चढाओढ सुरु होती. घडीवर लक्ष पडताच लॅपटॉप तिने बंद केला, बॅग भरून ठेवली आणि झोपायला तिच्या खोलीत शिरली तर राणी फोनवर होती.
“अरे राणी अजून झोपली नाही का ग तू?”
आणि मग जरा आवाज वाढवून म्हणाली,
“अरे जावई बुवा, झोपा हो आता... काही उद्यासाठी राहू द्या बोलायला. रात्र संपली हो, दिवस बदलला, आता काही वेळात पहाट होईल.”
राणीने ताईला चिमटा घेतला, आणि फोन बंद केला,
“ ताई काहीही काय ग? हे मला सांगत होते कि लॉजिकली कसा पेपर सोडवायचा.“
“पेपर आणि लॉजिकली, कुठला सब्जेक्ट आहे ग हा? तू मायक्रोबॉयोलॉजी मध्ये ग्रॅड्युएशन करत आहेस कदाचित.”
“तायडे, समज ना ग. बसं बोलत होते मी. काहीही पण ग तुझं.”
“नाही, काहीही नाही, आधी अभ्यास राणी! बोलावं लागेल मला राजनशी... “
“ताई!”
राणीला राग आला होता, तसा तिला लवकर राग येत असायचा पण शांतही ती लगेच होत होती. पण आता विषय नेहमीचा नव्हता, इथे राजनवर तिचं प्रेम होतं ज्याला सानूने नाकारलं होतं, बघूया पुढच्या भागात सानू राणीला समजावू शकेल...
कथा क्रमशः
© उर्मिला देवेन
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो साभार गुगल
0 Comments