जोडीदार तू माझा... भाग २०
घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात आठवणीच तर असतात ज्या दूर उडून गेलेल्या पक्ष्यांना त्या घराशी बांधून ठेवत असतात. कधी परतले तर त्याच कोपऱ्यातल्या आठवणी त्यांना हळवं करवून जात असतात.
मनाच्या कोपऱ्यात आजही ते घर तसचं असतं जिथे आपण लहानाचे मोठे होतो, नाहीका?
मोठे झाल्यावरही आपल्याला आपल्या बालपणाच्या तर कधी तरुणपणाच्या घराची स्वप्न पडतात कारण आपण बदललो असलो तरी मन मात्र त्या सुंदर दिवसांमध्ये डुबकी मारून येतच असतं.
सानू घाईतच ऑफिस मध्ये पोहचली. गेल्या गेल्या तिने कॉफी मागवली, आईने पॅक करून दिलेला पोहा तिने प्रेझेन्टेशन बघत संपवला. स्वतःच्या टीमला कॅबीन मध्ये बोलावून घेतलं. समोरून मीटिंगचं सूर होण्याची ती वाट बघत होती. ते पंधरा मिनटं तिच्यासाठी पंधरा तासा एवढे होते. प्रत्येक क्षणाला ती अधिकच अधीर होत होती, कॉफीचा घोट घेत तिचा वेळ सरकत होता आणि कॉफीचा शेवटचा घोट घेऊन तिचा उतावळेपणा वाढला. नाकावर राग येत होता. मनात पुटपुटायला लागली,
“वेळेचं काही भान आहे कि नाही ह्या लोकांना, उगाच इकडे आम्हाला टांगून ठेवतात, असतील यूएसएब्रांचचे मग काय झालं!”
आता ती परत कॉफी मागवणार होती तर समोरून मॅसेज आला,
“सॉरी, उशीर झाला, जरा बिझी होतो मेनेजमेंट मिटिंगमध्ये, आपण सुरु करूया का? इन्व्हिटेशन स्वीकारा प्लिज.”
सानूने पटकन मिटिंग इन्व्हिटेशन स्वीकारलं,
सुमंत, “लेट्स गो अहेड, प्रपोजल डिटेल्स सांगा प्लिज.”
“हो, स्क्रीन शेअर करते आहे.”
सानूने पूर्ण लॉजिकली एक्सप्लेन केलेलं आणि ती जरा थांबली, तिला अपेक्षित होतं कि सुमंत आताही तिला उत्तम प्रतिसाद देईल पण तसं झालं नाही.
सुमंत, “मिस सानवी, आपण महत्वाचा मुद्दा विसरलात, आपला बजेट! मला हे प्रपोजल मान्य नाही. हा प्रोजेक्ट मिडल क्लास लोकांसाठी आहे. तेव्हा असा लॉंच करावा असं मला वाटत नाही, तुम्ही लीड करणार आहात, शंका नाही पण आपण हा असा लॉंच केला तर?” आणि सुमंत बोलायला लागला.
सानू ऐकत होती आणि शब्द नि शब्द आत्मसात करत होती. आज पहिल्यांदा तिला तिचं लॉजिक फेल करणारा सापडला होता. सुमंतने कुठेही तिला दुखावलं नव्हतं आणि तिची त्या प्रोजेक्टची आयडिया सहज बदलली होती. कुठलंही क्रेडिक्ट त्याने घेतलं नव्हतं, शेवटी म्हणालाही,
“मिस सानवी यू आर ग्रेट, व्हेरी नाईस प्रेझेंनटेशन... मला पूर्ण शाश्वती आहे कि आपला प्रोजेक्ट योग्य हाताने लीड होत आहे. तुमच्याकडून खूप शिकायला मिळेल मला.”
सानूच्या मनात खूप काही चालत होतं पण ती काहीच बोलू शकली नाही. कमेटीने प्रपोजल पास केलं होतं. सुमंतने सानूला धन्यवाद देत मोजच्या शब्दात मिटिंग संपवली होती. त्याच मोजकं, मुद्देसूद बोलणं आणि सर्वांना नकळत सोबत बांधून ठेवणं काहीतरी वेगळीच छाप सानूच्या मनात पाडत होतं.
सानू मनात विचार करायला लागली,
“काय माणूस आहे हा, स्वतःला जे हवंय ते त्याने माझ्याकडून, माझ्यामार्फ़त करवून घेतलं आणि क्रेडिक्ट ही मला देऊन गेला. येफर्ट्स त्याने घेतले आणि मला पुढं करून गेला, भारीच दिसतोय.”
स्टाफला जायला सांगून ती विचार करत बसली, तिने परत त्याचा प्रोफाइल कंपनीच्या डेटाबेस मध्ये बघितला, सुमंत मेनेजमेंटमध्ये मास्टर आणि टेकनॉलॉजितही मास्टर. वीस वर्षांपासून युएसएमध्ये. स्वतःच्या नावाने पेटेंट... जसं जसा ती त्याचा प्रोफाइल बघत होती मनात ती म्हणत होती,
“हा काही आपल्या दूर दूर पर्यंत गवसण्यातला नाही. चला सानू इथूनच टाटा बाय बाय करा. लय भारी इसम वाटतो. मला बाळू वादळ म्हणतो. पण हा कश्या प्रकारच्या वादळात येतो काही कळत नाही. आपली हुशारकी जिथे संपते ना, तिथे कदाचित ह्याची सुरु होते.”
ती गालात हसली, म्हणाली,
“शांत वादळ... तरीही मनाला अलगत हादरवून सोडणारं जे नकळत आपल्यासोबत घेऊन घेत. शीतल शांत वाऱ्याचा झोका स्वतः मध्ये घेत मोहून टाकणारा... पण, वादळच की!”
बाळूचा विचार मनात फिरत होता तर तिला आठवलं कि त्याच्यासाठी बाईक घ्यायची आहे, तिने स्वतःच बँक अकाउंट चेक केलं आणि बजेट बसवत डाऊन पेमेन्टची रक्कम बाजूला केली. तासभर ती प्रोजेक्टवर विचार करत राहिली आणि तिच्या वॉचमेनचा फोन आला कि बाळू बाहेर आलेला म्हणून.
सानू उठणाराच होती तर सुमंतच्या मॅसेज वर नजर पडली, त्याचा टीमच्या मॅसेंजर मॅसेज होता,
“सॉरी, तुम्हाला मध्येच थांबवलं आणि स्पष्ट नकार दिल्याबद्दल. मी जरा स्पष्ट बोलतो पण मुद्दा पटला ना तुम्हाला?”
सानूने उत्तर द्यायला हात उचलला, खुप टाईप केलं, मग डिलिट केलं आणि तसंच काहीही न लिहिता स्वतःतच म्हणाली,
“चायला, कुठलं भूत आहे हे, सर्व चाबी भरून मला नाचवायला लावणार आहे आणि उलट सॉरी म्हणे...”
परत तिचे बोटं कीपेडवर फिरली, आणि थांबली.
“पण काय वाईट बोलला तो? योग्य तेच केलं त्याने, मॅनेजमेंट बाबा! उगाच नाही कंपनीचं मॅनजेमेंट त्याचं ऐकत. माझ्या सारख्या पन्नास टीम लिडरला हॅन्डल करतो. जावूदे ! आपल्या कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर येतो कदाचित.”
तिने दीर्घ श्वास घेतला, अलगत शब्द बाहेर आले,
“काय विचार करते मी! अजून राणीचं लग्न व्हायच आहे, बाळू अजून स्थिर नाही, घराच लोन अजून आहेच. भानावर या मिस सानवी. अजून तरी प्रेम, लग्न तुमच्या कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे, चला आधी मिशन भाऊ राया.”
तिने स्वतःच सामान आवरलं, समोर ठेवल्या असलेल्या आई बाबांच्या फोटोकडे बघत म्हणाली,
“जोडी असावी तर अशी दोघही एकदम जोडीला जोड आहेत, ह्या वर्षी पस्तीस वर्ष पूर्ण होतील ह्यांच्या ह्या जोडीला. काय बऱ करावं ह्यांच्यासाठी...”
आई बाबांच्या विचारात ती निघाली.
सानू, सर्वांचा विचार करणारी पण स्वतःसाठी जगणारी. एक अनोखं असं वादळ. मनात विचारांच्या अंसख्य विजा असूनही समोरच्याला नुसता प्रकाश दर्शवणारी होती.
बाळूला आज बाईक घ्यायची होती, नौकरीही पक्की झाली होती, सगळं त्याला सुरळीत होत आहे ह्याची शाश्वती झाली होती, मनात प्रेमाचा विचार शिरला होता. प्रेमाच्या विचारात सानूही होती आणि राणीही. फक्त तिघांनाही वेगळे वेगळ्या मार्गाने उडायचं होतं.
तिचा मेसेज बघत तो फोन हातात घेवून बाहेर सानूची वाट बघत होता. आज त्याने सर्वांत आधी सर्व तिच्याशी शेअर केलं होतं. त्याची ती आणि तिचा तो खूप आनंदी होते. सानू येताच त्याने सानूला हाय फाय दिला,
“काय रे शेंबड्या, सगळं सोबत आणलंस ना? कुठे जायचं आहे आपल्याला?”
“तायडे, सब प्लॅन है!”
त्याने ऑटोला बोलावलं, ऑटोत बसताच सानू ऑटोवाल्याला म्हणाली,
“भाऊ, जरा समोरच्या एटीअमला थांबवा.”
ऑटोवाल्याने मान हलवली आणि दोघही निघाले, नंतर पुढे अंकित ऑटोत त्याचा तो मग्न होता आणि ऑटो थांबला, सानूने ATM मध्ये जावून रक्कम काढून आणली. दोघेही शोरूम कडे निघाले. आज सानू गप्प होती, नेहमी बाळूला बड बड करणारी आज शांत का म्हणून बाळूही अवाक झाला होता. त्याने तिला बोलतं करावं म्हणून प्रयत्न केला,
“काय तायडे तो यूएसएचा आला का ग तुझ्या वादळाच्या चपाट्यात.”
सानूने दीर्घ श्वास घेतला आणि म्हाणाली,
“काही मासे समुद्रात चांगले वाटतात, त्यांना जाळ्यात घायचं नसतं.”
अंकितला काहीच कळाल नाही तरीही तो मजा म्हणून नुसता हसत होता. पण नेमकं त्याच्या ताईच काय बिनसलं ह्याचा थांग पत्ता त्याला तरी लागले शक्य नव्हतं. मग त्याने आईला फोन लावला, आणि म्हणाला,
“आई, आज वादळ शांत आहे. पण कदाचित आज वादळात समुद्री मासा शिरलाय ग, आई, ही कदाचित मोठ्या वादळामागची शांतता तर नाही?”
बाळू हसत होता पण तरीही चिंतेत होताच.
आईने फोन सानूला द्यायला सांगितला, सानूने तो घेतला आणि म्हणाली,
“आई मी आणि बाळू निघालोय शोरूमसाठी, आम्हाला तीन तास जवळपास लागतील तुम्ही सावकाश निघा, आणि आपल्या नेहमीच्या ठिकाणी जावूया जेवायला. मी टेबल बुक करायला फोन करते आणि मेनू तू फोनवर सेंड कर मला.”
“अग सानू, ठीक आहेस ना?”
“मी, मला काय झालं? ह्या बाळूच्या नादाला लागू नकोस, काहीही बोलतो. तुम्ही या सर्व. आमचं झालं कि आम्ही येतो तिकडे नवीन बाईकवर.”
तिने फोन ठेवला आणि बाळूकडे दिला. शोरूम आलं होतं. दोघेही उतरून आत गेले.
इकडे मोहिते निवासात आई मात्र काळजीत पडली होती. आईला सानुच्या बोलण्यातून खूप काही कळाल नाही मग ती अरुण कडे आली,
“अहो, ऐका ना.”
“बोलाहो राणीसरकार.”
“काहीही पण हो तुमचं, मी काय म्हणते.”
“काय म्हणता आता! तुमचंच तर ऐकतो आम्ही. बोला हो. कधी तरी बोलतपण जा, नुसत्या ऐकवता आम्हाला.”
“काही पण हो तुमचं, आता हे काय नवीन, बोलत जा वगैरे...”
“बर बोल काय...”
“आता मी सानूशी बोलले, काही तरी बिनसलंय हो पोरीचं, बाळू सांगत होता पण त्यालाही काही कळत नाही म्हणे.”
“काही नाही, शेर का बच्चा आहे माझं पिल्लू. जरा वेळ जावू दे सांगेल आपल्याला. तू काळजी करू नकोस.”
“आपल्याला कि फक्त तुम्हाला?”
“हो, मला सांगेल ती, तू आधी तयार हो, मी अंजलीला कॉल करतो, छकुली आली असेल शाळेतून.”
बाबांनी आईला समजवण्यासाठी गोष्ट टाळली होती पण काळजीत ते होतेच. सानूशी उघडपणे बोलण्यात काही फायदा नाही हे तेही जाणून होते मग त्यांनीही मनाला समजावलं, “सांगेल ती... कदाचित ती वेळ आली नसेल किंवा अजून काही... सहज शांत होणार वादळ नाहीच सानू जोपर्यंत ह्या वादळाला सामवून घेणारा भेटत नाही हे काही शांत होणार नाही.”
बघूया पुढच्या भागात सानूच्या मनात सुरु असलेली प्रेमाच्या रंगांची उधळण तिला रंगवून जाते की... निघून जाते.
कथा क्रमशः
© उर्मिला देवेन
कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!
कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल...
कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!
कथेचा पुढचा भाग लवकरच.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो साभार गुगल
0 Comments