जोडीदार तू माझा... भाग १६

  

जोडीदार तू माझा...  भाग १६ 



सानूचा विचारात वेळ गेला, आणि तिने भानावर आली, डेस्कटॉप बदलला आणि कामाला लागली, कामात मेंदू होता पण परत परत मन त्याच वाटेने भरकटत होतं. तेवढ्यात राणीचा फोन आला,

“तायडे, निघ ग आता, साडे सात झालेत. मी आणि राजन इथे पोहचलोय, तुझी वाट बघतोय आम्ही.”

“अरे बापरे आज लक्षातच राहिलं नाही ग, निघालेच मी.”

तिने सामानची आवरा आवर केली, डेस्कटॉप बंद करतांना परत तिने एकदा सुमंतचा फोटो नकळत बघितला, जरा स्मित हसली, आणि डेस्कटॉप बंद केला. कॅबिनच्या बाहेर आली, सर्व स्टाफ घरी गेलेला होता आणि वॉचमन सानूची वाट बघत दारात उभा होता. सानूला बघताच म्हणाला,

“सानवी मॅडम मी सगळं लॉक करतो तुम्ही निघा, वेळ होईल तुम्हाला.”

त्याला हात दाखवत सानू घाईतच निघाली, तिने ऑटो वाल्याला हात दाखवला आणि ती बसली. अर्ध्या तासात ती राणीने सांगितलेल्या कॉफी शॉपमध्ये आली, राणी आणि राजन दोघही तिची वाट बघत होते.

“काय म्हणता जावईबापू, कधी करायचं मग शुभमंगल”, सानू पोहचताच राजनला म्हणाली.

“काय हो ताईसाहेब! मस्करी काय हो!” राजन तिला हाय करत म्हणाला.

“अरे, सांगा की, आम्हाला तयारीला लागावं लागेल. आम्ही मुली कडले बाबा”, सानू जरा खुर्ची ओढत आणि बसत म्हणाली.

राजन हसला, “काय हो, तयारी आजकाल दोन्हीकडे करावी लागते.”

“हो, पण मुलीकडे जास्तच असते हो.”

“ताईसाहेब एक विचारू का?”

“एक काय दहा विचारा... हम तो बस जवाब देना जाणते है! आप सवाल तो करो!”

“तुम्हाला वाईट नाहीना वाटत की तुमच्या आधी तुमच्या बहिणीच लग्न जुळलं म्हणून.... आम्ही आता तेही बोलत होता, काय ग राणी?”

राणी सानूला कॉफीचा कप देत म्हणाली,

“हो ताई, मी म्हणाले ह्यांना, माझी ताई मोठ्या मनाची आहे ते.”

राजन परत म्हणाला, “हो ग पण ताई तुमच्या बद्दल उगाच चार लोकं काय काय ते बोलतील म्हणून काही वाटत नाही का हो तुम्हाला.?”

“ये राणी हा तुझा होणारा नवरा ना पक्का आईचा लाडाचा जावई होणार बघ...”, सानू कॉफीचा एक सिप घेत म्हणाली.

तिने परत दुसरा सिप घेतला आणि म्हणाली,

“ राजनरावं तुम्हाला ते चार लोकं भेटले ना तर मलाही भेटवून द्या. लग्न राणीचं जुळतय हो तेही तुमच्या सारख्या मुलासोबत. हयाहून दुसरा मला आनंद नाही... जरा तिला माझ्या पेक्षा ह्यात तरी अनुभव असू द्या ना... सारखी ताई हे कसं, ते कसं म्हणत असते. आता मला राहिल ना ती तिचा अनुभव सांगायला...”

“काय ग राणी... सांगशील ना?”

राजन आणि राणीला हसू आवरलं नाही. राणीने सानूचा अलगत चिमटा काढला, तर सानू परत म्हाणाली,

“ये मस्करी नंतर, आधी मला तुम्ही सांगा काय ठरवलं ते, राजनरावं तुमच्या घरच्यांचं कसं? त्यांना कळवलंय ना, तुम्ही आज हिला भेटायला येणारं म्हणून.”

“हो तर, लग्न करायचं आहे, पळवून न्यायची नाही मला. घरी बोललो मी.”

“न्या हो पळवून, माझा पूर्ण सपोर्ट आहे, पण तुमच्या होणाऱ्या सासूची परवानगी काढा... नाहीतर ती त्या चार लोकांचा विचार करत बीपी वाढवत आजारी पडायची. आणि धावपड माझी वह्याची.”

राजन परत हसला, “असं होय. पण तसं काही करावं लागणार नाही, हा राजा, ह्या राणीला रीतसर पळवून नेणार बघा!”

“ये बात! असं बोला हो, कसं दिलखुलास वाटतं...”

“काय राणी, राजाचं भेटला बुवा तुला.”

“काहीही पण ग तुझं तायडे.”

“काहीही पण नाही, खरं बोलले मी, आपण सरळ बोलतो, काय हो राजनराव, खरं बोलले म्हणून जुळून आलं ना सारं?”

“हो हो हे मात्र नक्की...”

“मग! आणि आता तर तुमची लव स्टोरी अशी आहे कि मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी...”

राजन परत हसला, “ताईसाहेब मानलं बुवा तुम्हाला... पण खरच खूप हलकं वाटलं मला. खूप जड वाटत होतं बघा कालपासून.”

“अरे जड वाटूही देवू नका आणि जळू ही नका... बसं जुळवून घ्या, आमच्या राणीशी. हळवी आहे पण प्रेमळ आहे हो माझी बहिणाबाई.”

“ताई काहीहीपण तुझं, निघूया ग, आई खरच वाट बघत असेल.” राणी मध्येच बोलली.

“हो ग निघुया, पण तू गप्पा केल्यास कि नाही कि इकडे तिडके बघत होती, हा दिसेल तो दिसेल करत, आईसारखी. ”

आता मात्र सानूच असं बोलणं आणि तेही राजन समोर, राणीला लागलं होतं, ते तिच्या चेहऱ्यावर दिसलं होतं, राणीला सानूचा राग येत होता.

सानू बिनधास्त राजनशी बोलत होती, आणि ओघात तिने नकळत राणीला दुखावलं होतं. तशी राणी जेवढी लवकर रागात यायची तेवढीच लवकर ती शांतही होत असायची, सानूचा असा प्रश्न तिला मनातून राग आणत होता.  मनात गोंधळ उडत होता तिच्या पण बोलणार कशी...

राणी मनात म्हणाली, “मला काय कळत नाही का, काय आणि कसं बोलावं ते? ही ताई पण ना, मला मोठी होवू देणार नाहीच मुळी, स्वतःच मोठी होते जिथे तिथे.”

सानुने तिचं मन अलगत ओळखलं, हसली म्हणली,

“म्हणूनच तुला मी ह्या अनुभवात मोठं करते ना.”

राणी दचकली, आपण मनातले शब्द बाहेर बोललो कि काय ह्या नादात ती जरा गंभीर झाली होती, हलकीशी हसली आणि स्वतःच काही हरवलंय ह्या नादात बॅगकडे बघत राहिली.

कदाचित राजनने ते जाणून घेतलं, राणीचा पडलेला चेहरा त्याने अलगत टिपला, म्हणाला, “कळतं ग सगळं ताईला, बसं शाश्वती करवून घेतात त्या. तू नको काळजी करू.”

राणी परत दचकली, आता तिला वाटलचं आपण बोललो म्हणून. जरा गप्प झाली. मनातलं राजनने कसं ओळखलं ह्या विचारात ती त्याला बघायला लागली, राजनने तिला नजरने खाना खुणा केल्या, आणि तो सानूला म्हणाला,

“तुम्ही काही काळजी करू नका, घरी बाबांना मी समजवलं आहे. आता तेच आईला समजावतील. सगळं राणीच्या कला कलाने होईल. बघा तुम्ही. आता तिची परीक्षा आहेच पुढच्या महिन्यापासून मग तिने नुसता अभ्यास करावा असचं मला वाटतं. सर्व बोललोय आम्ही, बसं तिने आता बाकीचा कुठलाच विचार करू नये.”

“काय ग राणी, हेच बोललो ना आपण?”

राणी जरा लाजली, मनातलं स्मित हास्य चेहऱ्यावर आलं होतं तिच्या. सानूनेही ते टिपलं होतं. राणीच्या हाताला हात लावत सानू म्हणाली,

“बसं, आणि काय हवं आम्हाला! आमच्या नाजूक मनाच्या राणीला असा समजूतदार नवरा मिळणार हेच तर खूप आहे. बाकी माझा तर पूर्ण सपोर्ट आहे तुम्हाला आणि राणीला, काहींही असलं तर बिनधास्त बोला मला.”

“चल ग राणी, ऑटो मिळणार नाहीत ग त्या मार्गाने. निघायला हवं आपण.”

“राजनराव निघण्याची अनुमति द्या.”

सानूने राणीचा अलगत हात धरला. आणि दोघही उठल्या. रस्त्याकडे नजरा टाकत त्या ऑटो बघत होत्या.

राजननेही त्याच्या बाईकला किक मारली, ऑटोलाही हात दाखवून थांबवलं. दोघीही बसल्या आणि घरासाठी निघाल्या. राजन त्या दूर जाईपर्यंत इथेच होता. गाडीची किक सुरु करूनही तो तसाच एक्ष्सिलेटर घुमवत उभा होता, मनातच मनाशी बोलला,

राजन ही किक आयुष्याला समोर नेण्यासाठी मिळाली आहे, राणी माझ्या सोबत असणारं तर काही अशक्य नाहीच, आता मागे वळणे नाही. चला राजन रावं खूप काही करायचं आहे. माझं साम्राज्य मला बोलावत आहे.” आणि त्याने सुसाट गाडी वळवली.

इकडे ऑटोत राणीच्या मनात स्वप्नांची घरं उभी राहत होती. तशी, सानुच्या नजरेत फक्त तो स्क्रीनवरचा सुमंत दिसत होता. आता तिला तो सगळी कडे दिसू लागला होता. समोर मोठी जाहिरात लागली होती, तिथेही तिला सुमंत “ईकझॅक्टली” असं बोलतांना दिसला, नकळत तो तिच्या सोबत ऑटोत येवून बसला, आणि म्हणाला, “ओके”

राणीही राजनचा शब्द नी शब्द आठवतं मनात हसत होती, राजनने दिलेलं कार्ड कधी उघडत होती तर कधी बंद करत होती.  अचानक ऑटो वाल्याने ब्रेक दाबला आणि दोघीही स्वप्नातून बाहेर आल्या.

दोघीही एकदम म्हणाल्या, “भाऊ थांबवा इथेच.”

आणि दोघींनीही एकमेकींकडे बघितलं, हसल्या आणि सानूने ऑटो वाल्याला पैसे दिले आणि दोघीही खाली उतरून घराकडे वळ्ल्या. आता राणीच्या हातात एक गोष्ट लागली होती, आज सानू नेहमीसारखी ऑटोत बडबड करत नव्हती. ती शांत होती. कुठेतरी हरवली होती. घरातही ती शांतच आत शिरली, हॉलमधून निघून जातांना बाबांना जरा जाणवलंही, त्यांनी इशाऱ्यात राणीला विचरलं, तर राणीने इशाऱ्यात उत्तर दिलं कि तिला काही माहित नाही.  राणी आईकडे स्वयंपाक खोलीत निघून गेली. आणि आईशी बोलण्यात गुंग झाली, राजनशी झालेल्या गप्पा ती आईला सांगत होती. आईही तिच्या गप्पांमध्ये रंगली होती. हळूच आईने सानूबद्दल राणीला विचारलं,

“राणी सानू आज गप्प कशी ग?”

“हो ना आई, मी पण बघितलं तिला, आज ऑटोमध्येही शांत होती. नाहीतर काही ना काही बोलत असते.”

“तुला काहीच बोलली नाही का ग ती?”

“नाही ना, पण मी दुपारी फोन केला होता तेव्हा तिची कुठली तरी महत्वाची मिटिंग होती. त्यात काही झालं असेल कदाचित. काही माहित नाही ग.”

“काहीही पण ग, तसल्या मिटिंगला ती काही मनावर घेणारी नाही. आणि आपल्याला तर सांगणारही नाही, सांगेल तिच्या वडिलांना.”

दोघीही बोलत होत्या, आणि बोलता बोलता चपात्या झाल्या होत्या. आईने डाळ फोडणी घातली आणि राणीने सलाद काटायला घेतली.

बघूया पुढल्या भागात सानू कुणासोबत मन मोकळं करते...


कथा क्रमशः 

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल... 

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

फोटो साभार गुगल

Post a Comment

0 Comments