जोडीदार तू माझा... भाग २६

 जोडीदार तू माझा...  भाग २६ 


आई बाबांना आनंद होता कि मुलांनी त्यांच्या व्यापातून वेळ काढून लग्नाचा पस्तीसावा वाढदिवस साजरा केलेला. पुरेस होतं त्यांना पुढचं आयुष्य आठवणीत काढण्यासाठी. असा योग नाही ना येणारं होता कधी... कोण कुणाचं असतं, आयुष्याच्या वळणावर वळता वळता वेळ कधी विरळ होता कळत नाही... नाही का!  आपण वळूया आजच्या भागाकडे.

राणीचा निकाल लागला होता तिला तिच्या अभ्यासानुसार मार्क्स मिळाले होते. घरात आईला तिच्या साखरपुड्याची घाई होती तर सानुला तिच्या एमबीए  प्रवेशाची. सोनूची प्रवेश फीची जमवाजमव झाली होती. सकाळी सर्व ऍडमिशनची चर्चा करत चहा घेत होते. सानू आज राणीला घेवून ऍडमिशनसाठी निघणार होती.

तोच बाईकचा आवाज आला, राजन घरी आला होता. बाबा आवाजाने बाहेर आले.

“अरे जावई बापू, आपण, आता इकडे? या या...” बाबा राजनला बघून आश्चर्याचे स्वागत करत म्हणाले.

“अरे आज राणीची ऍडमिशन आहे ना? तुमची सहमती असेल तर मी जातो सानवीदी सोबत. “

“अहो त्यात काय.. या आधी आत या.”

राजनने गाडी लावली, “आणि माफ करा, ऍडमिशन फी मी भरणार, राणी होणारी बायको आहे माझी. हा हक्क माझा आहे.”

सानूही बाहेर आली होती तिला बघताच राजन म्हणाला,  

“सानवीदी प्लीज.”

“अहो, असुद्या, अजून राणी आमच्या घरी आहे.” सानू राजनला हात जोडून म्हणाली.

“नाही दी, नको, खूप केलंय तुम्ही, राणीला माझ्या घरातल्या सर्व स्त्रियांसारख तयार करणं ही माझी जवाबदारी आहे आता.”

“हो मान्य, पण तिला त्या ताकदीने उभी करणं ही माझी जवाबदारी समजते मी.”

“पण त्याची सुरुवात इथूनच होते. मी सर्व तयारीने आलोय. चला निघूया, वेळ लागेल आपल्याला तिकडे. आज सुट्टी आहे माझी.”

सानू हसली, “तुम्ही अगदी तयारीने आलेले दिसता.”

“मग, राणी माझी होणारी राणी आहे.”

“अहो राजन मग मी कशाला हवी, तुम्ही दोघे जावून या. राणी सांगेलच ना तुम्हाला सर्व.” सानू राणीला चिडवत म्हणाली.

“मला काही हरकत नाही जर बाबा आणि आईला हरकत नसेल तर.” राजन राणीला इशारा करत बोलला.

बाबांनी राजन समोर हात जोडले. आईने दारातूनच धन्यवाद देत आशीर्वाद दिला. राणी आणि राजन ऍडमिशनसाठी निघाले होते. बाळूही सानूला चौकात सोडून ऑफिससाठी गेलेला.

आज परत आई बाबांना निवांत भेटला होता. दोघेही शेंगा तोडत बसले होते. आयुष्याच्या रुळावर संसाराचा गाडा दोघांनीही मिळून आनंदाने ओढला होता. नात्यात रमले होते आणि मुरलेही होते. एकमेकांचे पक्के जोडीदार होते. आयुष्याच्या उतरत्या किनाऱ्यावर आजही तसेच सोबत होते जसे ते सुरवातीला होते. दोघातला भावनिक गोडवा आणि चटणी सारखा होणारा वाद नेहमी त्यांच्यातला प्रेमाचा ओलावा कायम ठेवत होता.

“काय ग! काय विचार करतेस? बाबा शेंग हातात घेत म्हणाले.

“नाही हो, राणीला राजाचं भेटलाय ना! नशीबवान आहे माझी राणी... बसं आता माझ्या सानूला हे सुखं मिळू देत... मग...”

“मग काय... झालं तुझं सूर तेच कॅसेट... बोर झालो ग मी ऐकून आता. ते काही नाही, आपल्याला तर ह्या घरात नातू खेळवायचे आहे. मी तर बुवा १०० वर्ष जगणार आणि तुला सोबत ठेवणार माझी काळजी घ्यायला.”

“हो हो,.. मीच देते ना करून मेथीचे लाडू दर हिवाळ्यात, आताही टाकली आहे मेथी वाळत, करणार आहे. “

“ये पण मी ह्या वेळी पथ नाही करणार बघ, असेच खाणार, आणि सुनीकडून शिक ग तू, तुझ्या हातचे कडू होतात. माझी मैत्रीण किती आवडीने करते माझ्यासाठी. अजिबात कडू होत नाही तिच्या हातचे मेथीचे लाडू.”

“मैत्रीण ना ती म्हणून. मी बायको, काहीही केलं तर खोड काढायला तुम्ही तयार.”

“माझी कॉलेजपासूनची मैत्रीण आहे ती, तिच्याबद्दल काही बोलायचं नाही.”

“राहिलं, हो करते ती सुरेख लाडू, आताही सांगा ना तिला.”  

“सांगेन, एक शब्द जरी काढला ना मी तरी उद्या लाडवांचा डबा घरी येईल.”

“असं, मग ही मेथी मी मेथकुटासाठी वापरते. सांगा तिला. नाहीतरी काम काय असते तिला. बिचारे भीमा भावजी काहीही त्रास देत नाहीत. ”

“म्हणजे मी देतो, तुला म्हण्याच काय आहे.”

“तसं नाही हो, ते घरी कुठे असतात!

“मग मी काय घरी असतो म्हणून त्रास देतो.”

“जावू द्या, तुम्ही ना....”

“आणि सुनीला तुझ्यासारखी समजतेस काय ग, सोसायीटीची अध्यक्ष आहे ती. समाजकार्य करते. आणि तू चार लोकात बोलू शकणार नाहीस पण चार लोकांच्या गोष्टी मात्र दहादा सांगत फिरते.”

“राहू द्या हो, आता मैत्रिणीपुढे माझी काय गत, घेतली मी माघार....”

जरा हसली आरती, “नाही हो, सुनी मलाही खूप आवडते, मनमिळाऊ आहे ती, तुमची मैत्रीण म्हणता म्हणता ती माझी कधी मैत्रीण कधी झाली कळलंही नाही. भीमा भावजीला तोड आहे तुमची मैत्रीण. काय हो ते दोघं कॉलेजमधेही असेच होते का?”

“अग म्हणजे, मी आणि भीमा तर सुनीच्या घरच्या चकरा मारायचो, जाम मजा केली आम्ही तिघांनी.”

“मग तुम्हाला काही मिळालं कुणी?”

“हा होती एक.... पण तिची ट्रान्स्फर झाली आणि मग मी भीमाची प्रेमकहाणी पूर्ण करण्यामागे लागलो.”

“असं होतं तर.... “

“आणि तू भेटायची होतीस ना, माझी जोडीदार म्हणून.... मग...”

आरती परत गोड हसली, परत जोडीदाराच्या विचारात शिरली,

जरा विचारत शांत होतं झाली, हळूच म्हणाली  “अहो ऐका ना... “

“हुम्म्म, बोल ग, ऐकतोय मी....”

“अहो”

“अग बोल”

“तुम्ही सानूशी बोलले का? कि ती बोलली तुमच्याशी काही?”

“नाही ग, अजून तर नाही, पोरगी खुलत नाही आहे अजून, कदाचित तिच्याकडे सांगायला नाही काही... पण सांगेल जरूर, आणि लवकरच,”

बाबा शेंगा सोडून समोर उन्हात ठेवलेल्या मेथीच्या दाण्यांना हाताने सावरायला लागले, तेही विचारात होतेच पण दाखवून कसं चालायचं? आई मात्र मनाला आवरू शकली नाही.

“अहो पण कधी..?”

“अग, आता होवून जावू दे ना राणीचं लग्न.”

पण काय सूर आहे तिचं, हे तरी कडू देत, मला ना तिच्या पसंतीचा मुलगाही चालले हो, काही अट नाही माझी.”

“हो हो.... तू शांत हो.”

“काय शांत होवू....”

“तू चिडू नको, भारी गोड दिसतेस, उगाच ह्या वयात...”

“तुम्ही कुठची गोष्ट कुठ नेवू नका.”

“घे आता मी काय म्हटलं, तू गोड दिसतेस चिडली की हेच ना.”

“काहीही काय हो तुमचं....अहो पण राणीच्या लग्नाआधी हीच काही ठरलं तर किती बऱ ना,? चार लोकांची तोंड बंद होतील हो.” आई काळजीत बोलत होती.

“झालं, तुला ना त्या चार लोकांचच पडलं असते, काय तुझं नेहमीच. बंद कर ते. चार लोकं... चार लोकं... त्याच्या काय घरी खायला जाते माझी मुलगी. मला जड नाही... किंवा तिला आपण जड नाही मग त्यांना कशाला.” बाबा मेथी परत उन्हात सरकवत होते.

“अहो चिडताय का? मी आपल्या समाजाबद्दल बोलले... तुम्हाला तर काही वाटतच नाही. लोकं मागे पुटपुटतात. मला बाई चिंता लागली मुलीची.”

“कुठला समाज ग? आपण समाज असतो, कोण काय बोलतं, बोला म्हणा माझ्या समोर येवून. तुला सांगून ठेवतो माझ्या मुलींना ह्या असल्या गोष्टीचा त्रास देवू नको आणि मलाही.”

“अहो, काहीही काय? तुमच्याशी ना, बोलणं वाईटच आहे. जरा मनातल्या गोष्टी बोलून दाखवल्या कि झालं ह्याचं आपलं सूर, हे करू नको नी ते करू नको, जरा मन मोकळं करावं म्हटल ती समोरून किल्ली लागलीच समजा. माझंच चुकलं. बसली इथे ह्याच्या समोर.”

आरती कुरकुरत स्वयंपाक खोलीत निघून गेली. 

बाबा अंगणात झाडांना पाणी घालत राहिले. पण चटणी सारख्या जराश्या वादाने त्यांना जुने दिवस आठवले. आरतीला आजही त्यांची काळजी तशीच आहे हे जाणून त्यांना भरून आलं होतं.  समोर ठेवलेली मेथी आता लाडूच रूप घेवून कधी समोर येते ह्यांची वाट त्यांना होती.

मुलीसाठी आपण काहीच करू शकत नाही हे तिला जाणवत असल्याने ती कासावीस होती हे जाणून होता अरुण. मग तिची चीडचीड दुसऱ्या मार्गावर वळवली होती त्याने.

इकडे आरतीलाही कळाल होतं कि अरुण तिला न सांगता किती काळजी करतो म्हणून मग  त्याच्या ह्या अश्या वागल्याने वाईट वाटलं नव्हतं, त्याचा मुद्दा तिला कळला होता. तिला मुख्य मुद्याचा त्रास होवू द्यायचा नसला कि अरुण असाच वागतो हे ती चांगलच माहित होतं.

आज घर परत खदकण हसलं, परत त्या आठवणीत शिरलं.... नात्यांची वात तशीच प्रेमाच्या तेलाने भरून आहे अजुनही हे बघून मानतच भारावून गेलं... आता इथे उजेड नक्कीच ह्या विश्वासाने सानुच्या जोडीदारची वाट बघत होतं. त्यालाही वाट होतीच नवीन पिढीची, नव्या पर्वाची....मग भेटूया पुढल्या भागात.

कथा क्रमशः 

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल... 

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

फोटो साभार गुगल

Post a Comment

0 Comments