जोडीदार तू माझा... भाग ३२

  

जोडीदार तू माझा...  भाग ३२ अंकित अनयाला लग्न करून घरी घेवून आला होता. घरात सगळे अवाक होते, मग वळूया आजच्या भागाकडे.

दारात उभी असलेल्या राणीला बाजूला करत सानू दोघांना आत घेत म्हणाली,

“या आधी आत या,”

राणीने गुमान दार पटकन लावून घेतलं. परत घरात शांतता. सर्व एकमेकांकडे बघत होते. शब्द तर कुठच्या कुठे पाळले होते. असं सर्वाना बघून अनया रडायला लागली,

“मी जिद्द केली लग्नाची, बाबा माझं लग्न जुळवत होते आणि मला ते करायचं नव्हतं, आम्ही लग्न करून नसतो गेलो तर बाबानी मला घरातून निघणं मुश्किल केलं असतं.”

बोलता बोलता  ती अजूनच जोराने रडायला लागली.

सानू तिच्याकडे धावली,

“अग, जरा शांत हो, तुला अजूनतरी कुणी काही बोललं नाही, तू रडू नको, राणी हिला आधी आतमध्ये घे.”

राणीने खाणाखुणा करत नकार दिला, सानूने नजरेने विनंती केली मग तिने मन मोठं करत अनयाला हात देत खोलीत घेऊन गेली.

बाबा, “बाळू काय आहे हे सगळं?”

“बाबा, मला अनयाचा आपण दुकानात असतांना फोन आला, ती रडत होती, मी चौकशी केली तर म्हणाली, तिचे बाबा तीच लग्न फिक्स करत आहे आणि तिने थांबवलं तर ऐकतही नाही आहेत. मी घाबरलो आणि तसाच तिच्याकडे निघालो, मनात खूप शंका येत होत्या, मला काही सुचलं नाही मी हिला मंदिरात घेऊन गेलो आणि लग्न करून हिच्या घरी गेलो.”

“मग काय तिचे बाबा शांत झाले.” सानू जरा रागावल्या सारखी बोलली.

“नाही ताई, पण गोष्ट टळली ना, आता ते निदान तिचं लग्न कुणाशी जबरदस्तीने लावून तर देऊ शकत नाही “

“मग त्यांनी हे स्वीकारलं का ?” सानू परत बाबांना बसवत म्हणाली.

“नाही, ते आधीही भडकले होते आणि आताही तसेच आहेत पण मी अनयाला वाचवलं…  मला तिला गमवायचं नव्हतं बाकी मी तुमचा सर्वांचा अपराधी नक्कीच आहे.”

आता मात्र कुणीच काही बोलत नव्हते, सर्व गप्प झाले होते. सानूने आई बाबांना खोलीत नेलं आणि औषधी दिल्या, जेवण भरवलं आणि झोपायला सांगितलं.

राणीने अनयाला मनात नसूनही, कसं बस शांत केलं आणि झोपवलं. नंतर तिघेही हॉल मध्ये बसले, राणी, सानू आणि बाळू. कुणीच बोलत नव्हतं मग हळूच बाळू राणीच्या पायाजवळ येऊन खाली बसला,

“राणी मला माफ कर कर ग, हे असं काही होईल ह्याचा काही अंदाज नव्हता मला, आता काय करायचं?”

राणी सानुकडे बघत म्हणाली, “मला काही सुचत नाही आहे, तू उठ रे, करायचं ते केलंस ना आता.... पण तुला समजलं नाही का माझं लग्न आहे म्हणून, लग्नासमोर हे असं तू उभं केलंस, आता राजन कडल्यांना काय सांगायचं आपण... तू ना खरंच स्वार्थी आहेस, कुणाचा विचार करत नाहीस. बघितलंस ना आई बाबांना, कसे  चेहरे झाले होते त्यांचे, अरे निदान थांबायचं तरी... इथे कुणी तुला थांबवणार नव्हते... अनया पसंत होतीच कि सर्वांना, घाई झाली होती ना तुला.”

“गप्प राणी! काहीही काय बोलते आहेस.” सानू राणीला गप्प करत म्हणाली

“ताई... तू...”

“हो, कदाचित एक जीव वाचवला त्याने... नाही... बरेच जीव वाचवले जे अनया मुळे गुंतले होते, तिला काही झालं असतं तर हा राहिला असता का शांत आणि मग आई बाबांचं काय झालं असतं, जे झालंय ते कदाचित योग्य नव्हतं पण वाईट नाही ना झालं काही.“

“ताई तू... मला तर काही सुचत नाही.” राणी परत सानू जवळ जावून बसली. तिचा तर कंठ दाटून आला होता. सानू राणीला शांत करत म्हणाली,

“अग, पण तुझा काही ह्यात दोष नाही... बाळूने त्याच्या जोडीदाराची साथ दिली आहे, तुझा जोडीदार तुला साथ देईल... योग्य काय ते त्याला नक्की कळेल... बाकी सांभाळेल राजन. आई बाबा भक्क्म आहेत अजून एकमेकांना सांभाळायला... त्यांची काळजी करू नको तू. जरा वेळ जाऊ दे. सर्व नीट होईल. आता त्या अनयाला बोलण्यात काही पॉईंट नाही, ती खूप हळवी आहे. आणि आता तर माहेर तुटलंच तिचं, आपल्याला जपावं लागेल तिला.”

“आणि बाळू हे असं काही लग्न होत नाही, काही दिवस जाऊ दे, काय करायचं ते बघू आपण. तोपर्यंत ती आमच्या सोबत आमच्या खोलीत राहील.”

“ताई तू जसं म्हणशील तसं ग, मला नाही काही सुचत आहे.”

“सुचत नाही म्हणजे, जोडीदार होणं म्हणजे छोटी गोष्ट नाही, तूच आहेस तिला आता पदोपदी... जवाबदारीने वाग आता... लग्न करून आलास तेव्हा सुचलं नाही. ”

“तायडे.. तू पण?”

“का मी रागवू शकते तुझ्यावर... आता एवढं तर बोलू दे.”

“उद्या सर्वात आधी राजनला घरी बोलावं राणी, आणि त्याला सर्व सांगूया आधी... तो तुझा होणारा नवरा आहे त्याला अधिकार आहे हे सर्व जाणून घेण्याचा. त्यालाच सांभाळायचे आहेत सर्व संबंध तिकडे, त्याला विश्वासात घेणं जास्त म्हणत्वाचं आहे.” सानू राणीला म्हणाली.

दिवे बंद करून सर्व शांत झाले होते, कुणी कुणाशी बोलत नव्हतं, मन बोलत होती, कुणाचं मन माफी मागत होतं तर कुणाचं हुरहुरत होतं, कुणी काळजीत होतं तर कुणाला अपेक्षा होती... सर्व स्वार्थी झाले होते आणि एकमेकांसाठी गुंतले होते. जणू नकळत मनांची सभा भरली होती. आणि शरीर झोपले होते. त्या क्षणांना साक्षी होतं ते घर, जे सर्वांसोबत श्वास घेत होतं, प्रत्येकात जगत होतं उद्याच्या आशेवर.

---

अनया आणि अंकितने लग्न केलं होतं, मन नाराज होती पण अजून नाती जुळून होतीच ना, आणि अंकित आणि अनया सज्ज होती ती नाराजी स्वीकारायला...

सकाळी सगळे परत हॉल मध्ये जमले, बाळू गुमान जावून अनयाजवळ उभा झाला, त्याने तिचा हात पकडला, तिला भावनेने शाश्वती दिली कि तो तिच्या सोबत आहे. घरच्यांच्या ते लक्षात आलं होतं, आईने आणि सानुने सर्वाना चहा दिला. पण बोलणार कोण म्हणून सर्व चहा गुमान पीत बसले. तर सानू म्हणाली,

“हा अनया, सांग काय घडलं कि तू एकाकेकी लग्न करायला लावलस अंकितला, मी तुला साखरपुड्याच्या दिवशी काहीच विचारलं नाही कारण मला अंकितच्या पसंतीवर विश्वास होता आणि विचारणारही नव्हते पण आज प्रसंग असा आहे कि तुला उत्तर द्यावे लागेल.”

बाळूने परत अनयाचा हात गच्च पकडला, अनया म्हणाली,

“ताई माझ्या घरी अंकितबद्दल काहीच माहित नव्हत, बाबांनी लग्न पक्क केलं होतं माझं त्यांच्या मित्राच्या मुलाशी, मी त्यांना नंतर अंकित बद्दल सांगितलं तर ते खूप चिडले आणि त्यांनी मग मला चक्क ताकीद दिली कि घरातून बाहेर निघायचं नाही, मी गेले चार दिवस घरात कोंडून होते, मग काल अचानक आईने दार उघडं ठेवलं आणि मी बाहेर निघाले आणि अंकितला फोन लावला. आणि त्याला लग्न करायला भाग पाडलं, तसं मलाही काही सुचलं नाही, मी मागच्या दोन वर्षापासून बाबांना प्रत्येक वेळेस लग्नासाठी नकार देत होते पण आता त्यांना नकार देणं शक्य नव्हतं आणि तेही मानायला तयार नव्हते. मला दुसऱ्या कुणाशी लग्न करायचं नव्हतं...”

ती परत रडायला लागली, रडतच म्हणाली,

“अंकित बोल ना काही, कुठे जायचं मी आता... मला नाही रे तुझ्याशिवाय कुणी.”

“अग रडू नको, मी आहे ना, तुला कुठे जायची काही गरज नाही, मी आहे तुझ्यासोबत, तू आधी शांत हो.” अंकित तिला आवरत म्हणाला.

सानू परत तिच्या जवळ आली, “हे बघ अनया रडून कुठलाच मार्ग निघणारा नाही, आम्ही तुला काही घालवून देणार नाही पण आम्हाला ही माहित हवं कि नेमकं काय घडलं, आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोतच, तुला माहित आहे ना घरी राणीचं लग्न आहे आता पंधरा दिवसात, आणि हे असं घडलं तर काय करायचं... प्रश्न आहे की नाही, मग चर्चा नको व्हायला आपसात.”

ती राणीला लगेच म्हणाली, “राणी राजनला बोलावून घे, आधी त्याच्या कानावर घालू आपण हे सांर, तसा हा आपला घरचा प्रश्न आहे पण त्याला सांगावं असं मला वाटतं, उगाच तुझ्या आणि त्याच्या नात्यात तरी काही आड नको.”

राणीने लगेच राजनला फोन लावला. आणि त्याला वेळ मिळाल्यावर घरी यायला सांगितलं. आई एकतार बघत बसली होती आणि बाबा तिच्या जवळ बसले होते. आई बाबांना असं बघून अंकितने अनयाचा हात आणखीनच घट्ट पकडला आणि तो तिला घेवून त्यांच्या समोर उभा झाला, आई बाबा तुम्ही म्हणाल तसं, पण मी अनयाला आता परत तिच्या माहेरी पाठवणार नाही. मी बघितलं आहे तिच्या वडिलांना आणि घरच्यांना.

आता मात्र बाबा बोलले, “अरे पण तू तिला असं घेवून आलास, त्यांचीही ती मुलगी आहेच ना?”

“हो पण मुलीशी असं कुणी वागत नाही, तिला असं कोंडून ठेवत नाही.”

“त्यांची मुलगी आहे ती, आणि त्यांना तिच्यासाठी त्यांनी बघितलेला मुलगा यौग्य वाटत असणारा ना?”

“बाबा..”

“मला तसं म्हणायचं नाही मी फक्त तिच्या बाबांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. शेवटी मुलगी आहे ती त्या घरची आणि मीपण दोन मुलींचा बाप आहे... त्यांचीही काही बाजू असेल.”

“हो असेलच पण मला आता अनयाला तिथे पाठवायचं नाही, मी आहे तिच्या सोबत, म्हणूनच मी लग्न केलंय.”

“ये शेंबड्या गप्प, मंदिरात लग्न करून आला आणि लग्न केलंय, लग्न केलंय म्हणतोय. स्वार्थी कुठला.” राणी ओरडली.

“अग नाही ताई, हिने तिच्या घरात काय सुरु आहे जरा मला सांगितलं होतं मग मी आधीच कोर्टात अपील करून ठेवली होती, पण हे अचानक झालं म्हणून मग लग्न मंदिरात केलं, हप्त्याभरात करतो मी कोर्टातही... मग तर झालं पण आता मी अनयाला गमवणार नाही... आणि तिला तिकडे पाठवणार नाही. तुला माहित नाही मी तिला कश्या अवस्थतेत बघितलं आहे. नाही म्हणत असाल तर मग मी आणि अनया राहू कुठेतरी....” आता मात्र अंकितचे डोळे पाणावले होते.

बघूया घरचे काय निर्णय घेतात अंकित आणि अनायाच्या नात्याचा.... भेटूया लवकरच पुढच्या भागात.


कथा क्रमशः 

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल... 

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

फोटो साभार गुगल

Post a Comment

0 Comments