जोडीदार तू माझा... भाग ३५

  

जोडीदार तू माझा...  

भाग ३५आईला अनया पसंत होती पण असं तिचं अचानक घरात येणं मनाला लागलं होतं तिच्या. तशी परिस्थिती कुणाच्याही हातात नव्हती पण घडला प्रकार ती समजून घ्यायला वेळ घेत होती. तिचा पूर्ण त्रागा ती अरुणवर काढत रडत होती. अनुने सार काही ऐकलं होतं. मनात गुंता वाढत होता, हळवी ती होतीच पण आता गुन्हेगार आहोत कि काय असं तिला वाटत होतं. आता पुढे

अनु दारात उभी होती, तर मागून कुणीतरी येत आहे ह्या भासाने दचकली, अंजली आत्या घरात दादा आणि वहिनीला शोधत मागच्या माळ्यावर आली आणि अनयाला बघून तीही दचकली,

“कोण ग तू? आणि इथवर कशी आलीस?”

अनया आता घाबरली आणि पायऱ्या भराभरा उतरून खोलीकडे निघाली,

आता अंजली आत्या ओरडली,

“दादा, वाहिनी, ही कोण आहे घरात? बघा इथवर आली आणि पाळली आता.”

बाबा अंजलीचा आवाज ऐकताच माळ्याच्या खोलीतून बाहेर आले आणि त्यांनी पळत जाणाऱ्या अनयाला बघितलं.

“अरे ही का! ही अनया, आली असेल आम्हाला शोधत.”

“म्हणजे, आपल्या घरी आहे का ही?”

“अग हो, तू ये, तुला सांगतो मी सगळं.”

अंजली आश्चर्याने बघत वहिनीला हाक मारत खोलीत शिरली,

“वाहिनी, कोण ही आणि आपल्या घरी का? माझ्या ओळखीची नाही.”

जरा थांबून ती परत म्हणाली, “अरे ही त्या दिवशी साखरपुड्यात सानूसोबत होती, तिची मैत्रीण, हो ना? पण इथे काय करते आहे?”

आई परत रडायला लागली, “अग बाई, तिला बायको करून घेवून आलाय काल अंकित…”

अंजलीने तोंडावर हात ठेवला, “अग बाई! कसं काय ग?”

बाबा, “ये, असं काहीही तिला सांगू नको, हे बघ अंजली, अंकितने लग्न केलंय तिच्याशी, ते दोघेही ऐकमेकांना चार वर्षापासून ओळखतात, आणि काही घटना अश्या घडल्या कि आपल्या अंकितला तिच्याशी एवढ्या तातडीने लग्न करावं लागलं, आता ती मोहित्यांची सून आहे. हेच सत्य आहे.”

अंजली, “दादा ..,. अंकित एवढा मोठा झाला! आणि म्हणून त्याने हिला साखरपुड्याच्या दिवशी बोलावल होतं का?”

“असेल, त्याच तसं बोलणं झालं असेल सानूशी म्हणून ती आली होती... पण हे लग्न अचानक करावं लागलं त्याला, आता ती बायको आहे अंकितची.”

“मी हिला तेच समजावत आहे, ही आपली त्या साध्याश्या मुलीला सहन करत नाही आहे घरात, सारखं रडणं सुरु आहे, आता सर्व आपल्या आपल्या कामाला सकाळी गेलेत आणि ही... हिने नवीन काम सुरु केलं... रडण्याच. आता असं रडून हे सांर कसं निस्तरायचं ग? आता मुलं आपली, कुठे जाणार... काढून देवून आपलीच इज्जत जायची ना? प्रश्न आहेत पण त्याची उत्तर असतीलच ना ग? ही आपली, सारखी अंकितला बोलत आहे.”

“दादा, राजन रावांना कळवलं का?” अंजली काळजीने म्हणाली.

“अग हो, ते येवून गेलेत सकाळी, टाकली गोष्ट कानावर त्यांच्या, आता काय लपून ठेवायचं आहे का? आणि ठेवलं तरी किती दिवस? लोकांना अनया दिसेल आणि ते बोलतीलच मग आपणच सगळं सांगून मोकळं व्हायचं ना.”

“हो दादा, मी आता खाली जाते, ती खूप घाबरली होती... मी...मी... समजू शकते, वहिनी सारखी तिलाही खूप गरज आहे आपल्या सर्वांची. मी जाते खाली.”

अंजली माळ्यावरून खाली धावत निघाली होती.

“हो हो जा, मी हिला घेवून येतो खाली, अग एक मिनिट थांब, मला मदत कर ही शिलाई मशीन खाली घ्यायला...”

“ही मशीन! कशाला काढली तू दादा आता?”

“अग अनयाला शिवणकाम येतं मग तिच्यासाठी काढून देतो, पोरीचं तेवढच मन रमेल... डीझीनिंग कोर्स केलाय तिने. करेल काही तरी...”

“अरे व्हा, तुझ्या लाडाच्या मशीनला वाली भेटला मग!”

“हो हो, घे हात दे माझ्या उषाला....(उषा मशीनच नावं)”

दोघांनी मशीन खाली घेतली आणि ती आणून वरांड्यात ठेवली, अंजली अनयाला आवाज देत राणीच्या खोलीत शिरली, अनया डोकं खाली टाकून रडत बसली होती, अंजली तिच्या जवळ गेली,

“ये बाळा असं रडायचं नाही ग, तुला जेवढ नवीन आहे ना सर्व तसं इथे सगळ्यांना तू आहेस बघ, आता सगळे मोठ्या मनाचे नसतात, कुणी सहज सगळं मान्य करतं, कुणाला वेळ लागतो... तर कुणी करतच नाही. आणि तुला तर खूप शिकायचं आहे वहिनीकडून, खूप चांगली आहे ग ती, वेळ दे तिला, गैरसमज करू नको. आणि आधी रडणं बंद कर.”

“तुम्ही?”

“मी आत्या, बाळूची... अंकितची ग, अत्तु म्हणतात मला सर्व... तू ही म्हण, मला चालेल हा... हा एवढासा होता बाळू, तेव्हापासून खेळवला आहे मी त्याला. ह्या हाताने तेल लावलय, आणि ढुंगण धुवून दिलंय... आज बायको आली त्याला! मोठा झाला माझा बाळू.”

अंजलीचे जरा डोळे पाणावले होते, बाळ होतं नव्हतं म्हणून अंजलीने बाळूलाच बाळसारखं प्रेम दिलं होतं, तो त्याच्या आईजवळ कमी आणि आत्या कडे जास्त राहायचा.

जराशी हसली अनया, अश्रू पुसले आणि आपुलकीने बघत राहिली आत्या कडे.

“अग बाई गोड दिसतेस ग हसली कि, तुलाही खळी पडते वाटते बाळू सारखी... छान, छान जोडा आहे तुमचा... आवडलीस मला, आहेस ग आहेस... अगदी माझ्या वहिनीला जोडं. तीही सुरुवातीला अशी रडायची, मग माझी आई तिला सर्व समजवायची. आता काय तेच घडणार परत मोहित्यांच्या घरात, परंपरा बघ.” अंजली पाणावलेले डोळे अलगत ओढणीने पुसत म्हणाली.

अनया रमली, रडणं थांबल होतं तिचं.

अंजली परत म्हणाली, “वहिनी तुला सगळं शिकवेल, खात्री आहे मला. जरा वेळ दे सर्वाना, आणि ती सासू आहे तुझी, जरा सासूपण असू दे ग, मजा येते, माझ्या नशिबात नाही आलं हे सर्व... पण तू जग हे सर्व... खूप आठवणीत राहते आपल्या आयुष्यभर.”

“हो आत्या... मला काही हरकत नाही पण भीती वाटते, आणि आता त्याचं हे सर्व मत ऐकून तर मला अजूनच भीती वाटते आहे आईंची.”

“भीती कसली त्यात, आलीया भोगाशी असावे सादर... कर सहन.. मग बघ कशी विरघळते ती, मायाळू आहे ग ती... आता तुम्ही असं लग्न केलं, तर तिलाही त्रास होत असेल ना. काही इच्छा आकांशा असतात ना ग मुलाच्या आईच्या पण, समजून घे, मग बघ तुझ्यावाचून तिला करमणार नाही.”

“आत्या तसं होईल का? मला तर भीती वाटते, त्या तर मला स्वयंपाक घरातही शिरू देत नाही.”

“ये बाई, आजचं आलीस आणि असं बोलते आहेस, ओळखतेस किती तू तिला? सर्व नीट होईल. तू मात्र अगदी तयार राहा. तू स्वतः वाढून घेतलं आहेस सर्व मग तुलाच गुमान गिळावं लागेल.”

“हो आत्या, तुम्ही येत असता का इकडे?”

“हो, माझा एक पाय इथेच असतो, आणि आहे कोण मला ह्या घरातल्या लोकांशिवाय... दादा आणि वहिनी आहेत म्हणून तर मी आहे. दादा आणि वहिनी अस्सल जोडी आहे. त्यांनी दोघांनी मिळून आयुष्याच्या बऱ्याच लढाया लढल्या आहेत, पाहिलं तर ते दोघेही वेगवेगळ्या प्रवाहाने वाहतात कधी कधी पण पुढे जावून मिळतात, म्हणून तू काळजी करू नको.”

अनयाची धास्ती कमी तर झाली नव्हती पण जरा आशा वाढली होती तिची. आपण जे सर्वांसमोर अचानक आणून उभं केलंय तर हे सगळं अपेक्षित आहेच हे तिला आत्याशी बोलण्या नंतर कळला होतं, आत्याचा विचारही मनात घोळत होता. आत्याच असं काय गुपित आहे ज्याने ती एवढी शांत झाली आहे हे तिला जाणून घायचं होतं, पण भेट पहिली आणि तीही नवीन आणि आत्याच नातं घरात जुनं... मग विचारात पडली आणि मनाच्या गाभाऱ्यात शिरली.

अनया बघत राहिली, तिलाही अजून आत्याबद्दल विचारण्याची हिंमत झाली नाही. पहिलीच भेट होती, प्रश्न होता आणि तो मनात घोळत होता.

“भावना कळाल्या ग, पण बोलू कधीतरी, घाई काय आहे? माझ्या जखमांवरची खट्टी अजून जरा राहू दे, आठवणींमुळे खट्टी खरडून काढली कि जरा वेळ त्रास होतो ती परत येईपर्यंत.” आत्या अनयाला सुस्कारा देत म्हणाली.

तेवढ्या बाबांनी हाक मारली, “अनया बेटा, ये जरा इकडे.“

आत्या अनयाला घेवून बाहेर आली, बाबांनी शिलाई मशीन साफ करून ओईलीन्ग केली होती,

“हे बघ मशीन रेडी आहे, आणि हे माझे काही कपडे आहेत, ह्याला डबल शिलाई करून देशील ना? अर्थात, तुला काही हरकत नसेल तर, बाळूने हे माझ्यासाठी काही सदरे आणले होते, मला थैल्या सारखे दिसतात... जरा फिटिंग कर.. दोन सेंटीमीटर एवढी शिलाई दे मारून... मग आपण काही ड्रेस मटेरीयल घेवून् येवू तुझ्यासाठी. चला लागा कामाला सुनबाई.”

बाबाने अलगत माळ्यावर अजूनही असलेल्या आईला टोमणा दिला,

“काय सासूबाई! सुनबाई कामाला लागल्या आपल्या. घ्या निवांत जरा आता, मला तर बाबा माझे हे सदरे नीट करण्यासाठी उगाच आता तुझ्या मागे लगाव लगणार नाही.”

आत्या मध्येच म्हणाली, “अग बाई, आता मला काही सानू आणि राणीचे ड्रेस कामासाठी मिळणारा नाही तर.”

अनया, “आत्या तुम्ही पण शिवणकाम करता का?”

“हो, छोट मोठं, म्हणजे मी काही कोर्स वगैरे नाही केलेला. पण करते काही तरी, होतं माझ.”

“मग आपण दोघी मिळून काही तरी करूया. म्हणजे बाबा तुम्हाला काही हरकत नसेल तर..”

“मला काय.. काही प्रोब्लेम नाही.”

“अग हो, आधी तू रूळ इथे, ती पहिली प्राथमिकता आहे, होणा ना रे दादा!”

“हो...  आधी हायकमांडला विश्वासात घ्या सुनबाई ... मग कसं सर्व रुळावर येईल,  आता आपण एकदम, ना बँड  ना बारात, घरात शिरल्या मग समोरच्याला समजून घ्या तेव्हा ते समजतील तुम्हाला, आमचं काय हो, आमची गाठ आमच्या जोडीदाराशी घट्ट बांधल्या गेली आहे, त्यांची ताणली की आम्ही ताणल्या जावू.... तसं आम्ही सगळे आहोच पाठीशी, आता हे मोहिते निवास तुम्हालाच सांभाळायच आहे मग घाई कशाला? चार दिवस जरा एकूण घ्याल तर पुढचे चाळीस वर्ष तुमचा आवाज असेल ह्या वास्तूत, काय सुनबाई मोहिते घराण्याच्या एकुलत्या एक सुनबाई आहात तुम्ही, रडू बाई लडू चालयच नाही. चला भूक लागली आहे, घ्या जेवायला.. मी आणतो साहेबांना माळ्यावरून.”

बाबांच्या मस्करीत अनया सारंकाही विसरली होती. तुम्ही पुढचा भाग वाचायला विसरू नका!


कथा क्रमशः 

© उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

कथा वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथेच्या प्रकाशनाचे आणि सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे कायद्याने राखीव... कथा कुठेही चोरून टाकलेली आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असाल... 

कथेवर प्रतिक्रिया नक्की नोंदवा! आवडल्यास लाईक/ कमेंट/शेअर नक्की करा!

कथेचा पुढचा भाग लवकरच.

स्टे कनेक्ट, स्टे सेफ...

फोटो साभार गुगल

Post a Comment

0 Comments